'ऑर्मस्ट्राँग' भुजबळ आणि शरद पवारांची साथ!

'ऑर्मस्ट्राँग' भुजबळ आणि शरद पवारांची साथ!

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना अखेर जामीन मिळाला. यासाठी भुजबळांना दोन वर्ष वाट पाहावी लागली. या पुढची त्यांची वाटचाल काटेरी असणार आहे. त्या वाटेवरून चालताना त्यांना शरद पवारांची साथ कशी मिळते यावर खूप काही गोष्टी अवलंबून असणार आहेत.

  • Share this:

सचिन साळवे, प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना अखेर जामीन मिळाला. यासाठी भुजबळांना दोन वर्ष वाट पाहावी लागली. याहुनही महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भुजबळांबद्दल घेतलेली भूमिका...

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जे बोलतात त्याचा अर्थ काढण्यात भल्ल्याभल्यांना तर्क लढवावे लागतात ते बरोबरच आहे दस्तरखुद्द शरद पवारच सांगू शकतात. कित्येक वेळा तर पवार जे बोलतात त्याच्या उलट होतं असतं. राजकारणात पवार ज्यांना सढळ हाताने देतात तेवढंच वसूलही करतात असं पवारांबद्दल म्हटलं जातं. शिवसेनेतून राष्ट्रवादीत दाखल झालेले छगन भुजबळ हे पवारांच्या टीमचे खास नेते. त्यामुळेच शरद पवारांनी पक्षातील दिग्गजांना डावलून भुजबळांना थेट उपमुख्यमंत्रिपदीही बसवले. जे जे भुजबळांना हवं ते ते भुजबळांनी मिळवलं साहजिकच हे सगळं शक्य झालं ते शरद पवार यांच्यामुळेच.

 

2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातलं राजकारणाचं चित्र बदललं. 15 वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी बाकावर बसावं लागलं. अशातच अजित पवार, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. भाजपच्या नेत्यांनी तर तिन्ही नेत्यांना तुरुंगात जावेच लागणार असं छातीठोकपणे सांगितलं. पण यात बळी गेला तो छगन भुजबळांचा...आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात छगन भुजबळांना अखेर अटक झाली. अटकेनंतर भुजबळांकडे तब्बल 25000 कोटींची संपत्ती असल्याचे आरोप झाले. उघड झालं.

भुजबळांसारख्या दिग्गज नेत्यांना अटक झाली तेव्हा शरद पवारांनी अत्यंत संयमी भूमिका घेतली. "चूक केली नसेल तर सरकारला आणि झाली असेल तर भुजबळांना किंमत चुकवावी लागेल, अशी सुचक प्रतिक्रिया शरद पवारांनी भुजबळांच्या अटकेनंतर दोन महिन्यानंतर दिली होती. दोन महिन्यानंतर पवारांनी प्रतिक्रिया देऊन एकीकडे भुजबळांची पाठराखण केली आणि चूक असेल तर भुजबळांना किंमत चुकवावी लागेल असं सांगून भुजबळ प्रकरणातून हातही झटकले होते.

 

गेल्या दोन वर्षांत छगन भुजबळ तुरुंगात होते. त्यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी सुप्रिया सुळे गेल्या होत्या. तर भुजबळांच्या अटकेनंतर येवल्यात भुजबळ समर्थकांनी मोर्चा काढला त्यावेळी धनंजय मुंडे सहभागी झाले होते. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षातल्या दिग्गज मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट घेतली होती तर दिलीप कांबळे यांनी भुजबळांनी बाहेर येण्यासाठी प्रार्थनाच केली होती. पण भुजबळांसाठी इतर कोणताही राष्ट्रवादीचा नेता पुढे आला नाही हेही वास्तव आहे.

दोन महिन्यांपूर्वी शरद पवार यांनी छगन भुजबळांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रात भुजबळांच्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि हा त्यांचा अधिकार आहे. भुजबळांना योग्य त्या आरोग्य सुविधा पुरवाव्यात. जर येणाऱ्या काळात त्यांचं काही बरं वाईट झालं तर त्याला सरकार जबाबदार असेल असा इशारा पवारांनी सरकारला दिला होता. तसंच भुजबळांबाबतच्या कायदेशीर बाबी कोर्टाने निकाली काढलेल्या नाहीत आणि कोर्ट कोणत्याही निष्कर्षांपर्यंत पोहोचेपर्यंत भुजबळ निर्दोष ठरतात असं पवारांनी ठळकपणे नमूद केलं होतं. तसंच जर 'जामीन हा नियम, जेल हा अपवाद', हे सूत्र सुप्रीम कोर्टाने वारंवार अधोरेखित केलंय. पण मला यावर भाष्य करायचं नाही असं म्हणत भुजबळांच्या तुरुंगातल्या मुक्कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता.

 

शरद पवारांच्या या इशाऱ्यानंतर फडणवीस सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली. अखेर आज छगन भुजबळ यांना जामीन मिळाला आणि लवकरच ते तुरुंगाबाहेर येतील. भुजबळांच्या सुटकेवर शरद पवारांसह सर्वच नेत्यांनी आनंद व्यक्त केलाय. ते साहजिक होतं. पण गेल्या दोन वर्षात पुला घालून बरच पाणी वाहून गेलं. महाराष्ट्राचं नेतृत्व अजित पवारच करतील अशी घोषणाच काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळेंनी केली होती. गेल्या दोन वर्षात अजित पवारांची पक्षावरही घट्ट पकड निर्माण झाला. अजित पवार आणि छगन भुजबळांमधलं सख्य जगजाहीर आहे. त्यातच अजुन कोर्टाची मोठी लढाई भुजबळांना लढावी लगाणार आहे. थकलेलं वय, कोर्टाचा ससेमीरा, भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप अशा पार्श्वभूमी लढवय्या भुजबळांची पुढची वाटचालही काटेरीच असणार आहे.

 

First Published: May 4, 2018 08:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading