बीएमसी, मलिष्का आणि डेंग्यूच्या अळ्या...

बीएमसी, मलिष्का आणि डेंग्यूच्या अळ्या...

मलिष्काच्या बाल्कनीतल्या कुंड्यांमध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडताच बीएमसीनेही मोठा गड जिंकल्याच्या थाटात मलिष्काच्या कुटुंबियांना कारणेदाखवा नोटीस धाडली. पण बीएमसीच्या या कारवाईचं कौतुक होण्याऐवजी त्यांच्या हेतूवर शंका घेतली गेली. कारण कारवाईचं 'टायमिंग' हे निश्चितच मलिष्काच्या पथ्यावर पडणारं होतं. आणि झालंही तसंच.

  • Share this:

चंद्रकांत फुंदे, मुंबई

औरंगजेबाच्या सैन्याच्या घोड्यांना जसे जळी स्थळी संताजी धनाजी दिसायचे तसंच आता बीएमसी प्रशासनालाही जिथं तिथं आर. जे. मलिष्काच दिसतेय काहिशी अशीच परिस्थिती शिवसेनेनं या वादाच्या निमित्ताने स्वतःवर ओढून घेतलीय. कारण बीएमसीने चक्क मलिष्काच्या घरातल्या डेंग्यूच्या अळ्या शोधून काढल्यात. खरंतर मुंबईतील उच्चभ्रूंच्या बाल्कनीतील कुंड्यांमध्ये डेंग्यू डासाच्या अळ्या सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. तशाच पद्धतीने मलिष्काच्या घरातल्या कुंड्यांमध्येही डेंग्यूच्या अळ्या सापडल्या असतीलही....पण मग बीएमसीने नेमकी आत्ताच का मलिष्काच्या घरावर अळ्या शोधण्यासाठी धाड का टाकली असावी? हा प्रश्न अनेकांना पडलाय....तर मुंबईकरांनो त्याचं उत्तर अगदी साधं-सोपं आणि सरळ आहे. मलिष्काचं गाणं शिवसेनेला झोंबल्यामुळेच केवळ सुडबुद्धीपोटी बीएमसीने ही कारवाई केलीय, हे शेमडं पोरगंही सांगेल.

त्याचं झालं असं, दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर प्रसारमाध्यमं मुंबईतल्या रस्त्यांमधील खड्ड्यांवर आक्रमकपणे वृत्तांकन करत असतात. त्याच धर्तीवर 'रेड एमएम'ही पावसाळ्यात खड्ड्याचा मुद्दा लावून धरतं. पण यावर्षी त्यांनी हाच मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय 'सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाय का?' या लोकप्रिय गाण्याच्या आधार घेऊन प्रेक्षकांसमोर आणला. फेमस आर. जे. मलिष्कानं हे गाणं खास तिच्या स्टाईलनं गायल्याने ते रात्रीतून सोशल मीडियावर व्हायरल झालं...गाणं ट्रेडिंग होतंय म्हटल्यावर न्यूज चॅनल्सवाल्यांनीही हेच गाणं दाखवायला सुरूवात केली. खरंतर या गाण्यात शिवसेनेचा कुठेही थेट उल्लेख नव्हता. पण बीएमसीत त्यांचीच सत्ता असल्याने शिवसेनेला हे मलिष्काचं गाणं चांगलंच झोंबलं. खरंतर शिवसेनेनं मलिष्काचं हे गाणं खिलाडूवत्तीने घ्यायला काहीच हरकत नव्हती...पण गप्प बसेल ती शिवसेना कसली त्यांनीही मग चक्क नगरसेविका किशोरी पेडणेकरांना गायिका बनवून टाकलं आणि मलिष्काला प्रत्युत्तर देणारं गाणं तयार केलं. पण शिवसेनेच्या या पोरकटपणामुळे प्रसारमाध्यमांनी उघड उघड मलिष्काची बाजू घेऊन बीएमसीची पोलखोल सुरू केली. त्यामुळे शिवसेनेचा वाघ पुन्हा डिवचला गेला. एवढा डिवचला गेला की, उद्धव ठाकरेंनीही या वादावर प्रतिक्रिया देत मलिष्कालाच दोषी ठरवलं. खरंतर या साऱ्या प्रकारात वाघाने स्वतःहून चवताळून घेण्याची काहीच गरज नव्हती. आणि शेवटी व्हायचं तेच झालं.

बीएमसीच्या काही अतिउत्साही अधिकाऱ्यांनी मग थेट मलिष्काची आई राहत असलेली बांद्र्यातली सोसायटी गाठली आणि डेंग्यूच्या अळ्यांचा शोध सुरू केला. सेनेच्या कर्मधर्मसंयोगाने मलिष्काच्या बाल्कनीतल्या कुंड्यांमध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडल्या देखील. बीएमसीनेही मग मोठा गड जिंकल्याच्या थाटात मलिष्काच्या कुटुबियांना कारणेदाखवा नोटीस धाडली. पण बीएमसीच्या या कारवाईचं कौतुक होण्याऐवजी त्यांच्या हेतूवर शंका घेतली गेली. कारण कारवाईचं 'टायमिंग' हे निश्चितच मलिष्काच्या पथ्यावर पडणारं होतं. आणि झालंही तसंच. विरोधकांसह प्रसारमाध्यमांनीही मग पुन्हा मलिष्काचं तेच गाणं दाखवून शिवसेनेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. नितेश राणेही शिवसेनेला डिवचण्यासाठी मलिष्काचा 'बिन बुलाया' भाऊ म्हणून धावून आले. तशा आशयाचं ट्विटच त्यांनी केलं. मनसेच्या संदीप देशपांडेंनी तर बीएमसीच्या हेतूवरच शंका उपस्थित केली, खरंच मलिष्काच्या घरी अळ्या सापडल्यात का ? हे तपासलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केलीय. शिवसेनेनं अर्थातच या कारवाईचं समर्थन केलंय. पण त्यांचं लंगड समर्थन या घडीला तरी कोणीच ऐकूण घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. कारण सद्यपरिस्थितीत तरी मुंबईकरांची सहानूभूती ही मलिष्कालाच मिळतेय. कारण तिने बीएमसीच्या मर्मावरच बोट ठेवलंय. म्हणूनच अगदी मलिष्काच्या अंदाजामध्येच बोलायचं झालं तर 'शिवसेना, तुला स्वतःच भरोसा नाय काय ? असंच इथं खेदानं नमूद करावसं वाटतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2017 05:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading