News18 Lokmat

पुणे भाजपमधील 'बावळट' गटबाजी

भाजपचे सहयोगी खासदार असलेल्या संजय काकडेंनी मुख्यमंत्र्यांना ही निविदा रद्द करावी, असं पत्रच लिहीलं होतं आणि मुख्यमंत्र्यांनीच निविदा रद्द करायला लावल्याचा दावा फेटाळणारे पदाधिकारी बावळट आहे असं वक्तव्य त्यांनी जाहीर पत्रकार परिषदेत केलंय

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 4, 2017 07:31 PM IST

पुणे भाजपमधील 'बावळट' गटबाजी

वैभव सोनवणे,प्रतिनिधी, पुणे

समान पाणीपुरवठ्याची निविदा स्थानिक स्तरावर रद्द केल्याचं पुण्याच्या महापौर आणि स्थायी समितीचे अध्यक्ष आणि सभागृह नेत्यांनी जाहीर केलं आणि खासदार काकडे भडकले. भाजपचे सहयोगी खासदार असलेल्या संजय काकडेंनी मुख्यमंत्र्यांना ही निविदा रद्द करावी, असं पत्रच लिहीलं होतं आणि मुख्यमंत्र्यांनीच निविदा रद्द करायला लावल्याचा दावा फेटाळणारे पदाधिकारी बावळट आहे असं वक्तव्य त्यांनी जाहीर पत्रकार परिषदेत केलंय. यानंतर स्थानिक शहर भाजपमध्ये प्रचंड विरोध उफाळून आलाय. काकडेंनी शहाणपणा शिकवू नये असं प्रत्युत्तरही काकडेंना दिलं गेलं.

पुणे महापालिकेत मुख्यमंत्र्यांचा चेहरा समोर करून भाजप सत्तेत आलंय. पुण्याची जबाबदारी पालकमंत्री असलेल्या गिरीश बापटांवर टाकण्यात आली. मात्र त्यांच्या जोडीला मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय म्हणून मी काम पाहातो अस म्हणत भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे ही सक्रिय झाले. भल्याभल्याचे अंदाज चुकवत काकडे यांनी सांगितलेला आकडा पार करून भाजपचे नगरसेवक निवडून आले,साहजिक काकडेंचा भाव मुख्यमंत्र्यांकडे वधारला. संजय काकडे यांनी हेच हेरून गिरीश बापटांना बायपास करून आपल्याला हवे ते निर्णय मुख्यमंत्र्यांकडून करून घेतले.

महापालिकेत होणाऱ्या कुठल्याच निवडीमध्ये संजय काकडे यांच्या समर्थक नगरसेवकांना पद ही त्यामुळेच मिळाली नाहीत.

महापालिकेतले निर्णय ही शहर भाजप काकडेंना सहभागी करून न घेताच करताना दिसतंय. भाजपमध्ये काकडे विरोधी गट हे त्यांच्या काहीही करण्याच्या व्यावसायिक वृत्तीला विरोध करतात. काकडे ही फार अंगावर आलं की बापटच पुण्याचे कारभारी असल्याचं सांगतात. मात्र पुण्यात भाजपमध्ये ही बावळट गटबाजी सुरू आहे ते कुणालाच कळत नाही असं भाजपच्या नेत्यांना वाटतंय. व्यावसायिक असलेले संजय काकडे हे आर्थिक पाठबळ पुरवत असल्याने आणि बापट यांची एकहाती कमांड येऊ नये मुख्यमंत्रीच त्यांना अधूनमधून ताकद देतात असाही एक मतप्रवाह आहे.

Loading...

समान पाणीपुरवठ्याचं कंत्राट हे या 'बावळट' मतभेदांचा स्फोट व्हायला कारणीभूत ठरलंय. १७०० कोटी रूपयाचं कंत्राट व्यावसायिक असलेल्या काकडेंच्या समोरून प्रक्रिया होत होत आणि त्यात प्रचंड व्यावसायिक फायदा असताना आपल्याला त्यात काहीच भूमिका वा फायदा मिळू नये हे काकडे यांना सहन झालं नाही. राष्ट्रवादीचे काही नेते तर खाजगीत काकडे यांनाच हे कंत्राट हवं होतं, राष्ट्रवादीची सत्ता असताना तर काकडे कंत्राट मिळवण्यासाठी प्रचंड आग्रही होते अस सांगतात. काकडे यांना विचारल्यावर ते अंगावर पाल पडावी तसा विषय झटकून टाकताहेत. आपण केवळ पुणेकरांच हित पाहतोय असं काकडे सांगतात.

वास्तविक समान पाणीपुरवठ्याच्या १७७० कोटीच्या कंत्राटात कंत्राटदारांची रिंग झाल्याने कंत्राट २६ टक्के अधिक दराने निविदा भरल्या होत्या त्यातही तीनच कंपन्यानी निविदा भरून त्या दुसऱ्या कुणाला कंत्राट मिळणार नाही. याची खबरदारीही घेतली गेली होती, या सगळ्या प्रकारात कंत्राटदार कंपन्यांच्या हिताच्या अटी आणि शर्ती या निविदेत टाकल्या आणि या प्रक्रियेत आयुक्तांनी महत्वाची भूमिका बजावली असा आरोप विरोधी पक्षांनी दोन महिन्यांपासून केले होते. मात्र तेव्हा काकडे यांनी कुठलीच भूमिका घेतली नव्हती, अचानक निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्यावर काकडे यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहून निविदाच रद्द करायची मागणी केली. महापालिकेत निर्णय घोषित होण्यापूर्वीच एक दिवस आधी काकडे यांनी पत्रकारांना निविदा रद्द झाल्याचं छाती ठोकून सांगितलं, जर निविदा नाही रद्द झाली तर राजीनामाच देईन असंही ते खाजगीत म्हणाले.

या सगळ्या दरम्यान अधिवेशनात असलेल्या गिरीश बापट यांनी महापालिकेतल्या पदाधिकार्यांना निविदेचा फेरविचार करायचा सल्ला दिला होता. पण, निर्णय काही झालाच नाही तोवरच काकडे यांनी मुख्यमंत्र्यांकडून निर्णय रद्द करून घेतला, नामुष्की नको म्हणून जीएसटीच्या दरवाढीचं कारण देत आयुक्त आणि नंतर महापौरांनी निविदा रद्द झाल्याच सांगितलं. निविदा रद्द होण्याचं कारण ऐकूणच काकडे चिडले आणि त्यांनी हा युक्तिवादच उडवून लावला हे सगळं आपल्यामुळे झालंय हे बावळट पदाधिकाऱ्यांना कळत नाही असा पवित्रा त्यांनी घेतला. काकडेंचं हे वक्तव्य सामाजिक माध्यमांमधून शहर भाजपमध्ये अत्यंत वेगाने प्रसारित झालं आणि काकडे यांनी शहाणपणा शिकवू नये पासून ते कोण हे काकडेपर्यंत शहर भाजप आक्रमक झालंय.

काहीही असलं तरी एकमात्र नक्की थेट मुख्यमंत्रीच काकडेंना पाठबळ देत असल्याचं चित्र असताना काकडे यांना थेट अंगावर तरी कसं घ्यायचं असा पेच काकडे विरोधी गटांमध्ये आहे

पुणेकर मात्र त्यांच्या स्टाईलमध्ये याकडे पाहतात

"एकूण काय...सगळाच बावळटपणा राजकारणातला..."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 4, 2017 07:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...