News18 Lokmat

'साहेब' सध्या काय करतायत?

गणेशोत्सवाच्या निमित्तानं राज ठाकरेंनी आपलं मौन तोडून मुलाखत दिली. या मुलाखतीच्या वेळी त्यांनी बेधडक शैलीत आपली मतं मांडली. मजेशीर स्वभावाप्रमाणे पत्रकारांना चिमटे काढलेत. शिवाय एका मोठ्या संकटातून बाहेर पडल्याचा निवांतपणा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Sep 5, 2017 04:05 PM IST

'साहेब' सध्या काय करतायत?

प्रणाली कापसे, प्रतिनिधी, IBNलोकमत

राज ठाकरे आहेत कुठे असा प्रश्न विचारला जावा इतके राज ठाकरे गप्प होते. पण गणेशोत्सवाच्या निमित्तानं राज ठाकरेंनी आपलं मौन तोडून मुलाखत दिली. या मुलाखतीच्या वेळी त्यांनी बेधडक शैलीत आपली मतं मांडली. मजेशीर स्वभावाप्रमाणे पत्रकारांना चिमटे काढलेत. शिवाय एका मोठ्या संकटातून बाहेर पडल्याचा निवांतपणा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

खरं तर आपला नेता असा दिलखुलासपणे हसताना मनसैनिकांनी खूप दिवसांनी पाहिला. गेल्या आठ महिन्यात राज ठाकरे असे कुणाला दिसलेच नव्हते आणि आता दिसले आहेत तर ते मनसैनिकांना दिलासा देणारं ठरलं आहे. फेब्रुवारी २०१७ला झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपासून कोशात गेलेले राज ठाकरे पुन्हा एकदा बाहेर पडून पक्ष संघटनेकडे लक्ष देताहेत. आजवर ज्या काही टीका त्यांच्यावर होत होत्या त्याच सगळ्या टीकांवर काम करायला त्यांनी सुरुवात केलीय. सूर्यपुत्र म्हणून हिणवण्यात आलेले राज ठाकरे सध्या पहाटे चार वाजता उठून व्यायाम करतात, सायकलिंग करतात, अनेक कार्यकर्त्यांना सकाळी सकाळी फोन करून पक्षाच्या कामाबाबत विचारपूस करतात. नॉन एक्सेसेबल असलेले राज ठाकरे सध्या सगळ्याच कार्यकर्त्यांना एक्सेसेबल झाले आहेत.

Loading...

आधी लोकसभा,विधानसभा आणि सहा महिन्यापूर्वी झालेल्या महापालिकेतील पिछेहाट पहाता राज ठाकरे काहीच करत नसल्याची टीका त्यांच्यावर सातत्याने होत होती. पक्षातल्या शेकडो कार्यकत्यांनी, नेत्यांनी त्यांची साथ सोडून दुसऱ्या पक्षाचा पदर धरला होता. सातत्यानं पक्ष पिछाडीवर पडत असताना राज ठाकरे मात्र हातावर हात ठेवून बसले असल्याच्या प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून येऊ लागल्या होत्या. दरम्यानच्या काळात राज ठाकरेंनी कुणावरही कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. घडणाऱ्या सगळ्या गोष्टींकडे ते तटस्थपणे पहात होते. दुसरीकडे प्रय़त्न करुनही राज ठाकरेंना गमवलेला सूर गवसत नव्हता.

इतक्यात वैयक्तिक आयुष्यात त्यांच्यावर मोठा प्रसंग ओढावला. त्यामुळे यावर्षी फेब्रुवारीत झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये राज ठाकरे म्हणावे तसे दिसलेच नाहीत. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. अवघ्या चार-पाच वर्षातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वेगात निघालेल्या इंजिनाला ब्रेक लागला आणि त्याचं रूपांतर ढक्कलगाडीत झालं. राज ठाकरेंनी गेल्या काही काळात राज्यात अनेक भागात दौरे सुरू केले. कधी ते नाशकात असायचे तर कधी पुण्यात, एकेकाळी या शहरात त्यांचा डंका वाजायचा. आता तिथली मैफिल सुनी सुनी झालीय. राजकारणातला हा बदल लक्षात यायला राज ठाकरेंना वेळ लागला. पण त्यांना तो आता लक्षात आलाय. राज ठाकरेंमधला बदल जितका कार्यकर्त्यांनी टिपलाय तितका तो राजकारण्यांनी सुद्धा टिपलाय.

एकेकाळी या नेत्याचं गारुड महाराष्ट्रातल्या बहुतांश मराठी मनांवर होतं. बाळासाहेब ठाकरेंनंतर आणखी एक ठाकरे महाराष्ट्रातल्या मराठी मनावर राज्य करत होते. बोटावर मोजता येईल इतक्या कमी वर्षात महाराष्ट्राला १३ आमदार देणारा हा नेता आणि त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष. पण जितक्या वेगात कार्यकर्ते या पक्षाला जोडले गेले तितक्याच वेगात पक्षातून बाहेरही पडले. असं का व्हावं यावर खूप कारण मिमांसा झाली. त्यासाठी पक्ष प्रमुखाचं स्वस्थ बसणं हे कारण अनेकांनी दिलं. पुढे त्यातूनच चेष्टेच्या रूपात प्रश्न विचारला जाऊ लागला. ते सध्या काय करतात, आता या प्रश्नाचं उत्तर स्वत: राज ठाकरेंनीच दिलंय. राज ठाकरे २०१९च्या निवडणुकांसाठी तयारी करताहेत.पक्षाच्या पदाधिकाऱ्यांपासून तर अगदी नेत्यांपर्यंत सगळ्याच स्तरावर हे बदल केले जाताहेत. आजवर राज ठाकरेंच्या अवतीभोवती कडं करून असलेले पक्षातील ज्येष्ठ नेते दूर ठेवण्यात आले आहेत. नेत्यांशिवायच्या कर्मठ मनसैनिकांना पुढे आणण्यात आलंय. असे बदल करताना चक्क लोकशाही मार्गाचा अवलंब करण्यात आलाय.

नव्या गड्यांचं हे नवं राज्य उभं राहतं का हा खरा कळीचा प्रश्न आहे.राज ठाकरेंमध्ये वैयक्तिक त्याचबरोबर नेतृत्व करण्याच्या पद्धतीत झालेला हा बदल इतका सहज झालेला बदल नाही. तर त्यासाठी कारणही तेवढंच मोठं आहे. गेल्या काही महिन्यांचा काळ हा राज ठाकरेंच्या वैयक्तिक आयुष्यातील कठीण काळ होता. त्यातूनच तावून सुलाखून निघालेले राज ठाकरे हे अधिक परिपक्व, संवेदनशील वाटू लागले आहेत. ज्याबाबतचा उल्लेख त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केलाय. पोटच्या गोळ्याचं दु:ख हे जगातलं सगळ्यात मोठं दु:ख असतं अशी म्हण आहे. हेच दु:ख काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी अनुभवलंय.

राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे नुकतेच मोठ्या आजारपणातून सुखरूप बाहेर पडले आहेत. गेले सहा-सात महिने राज ठाकरे कोशात गेलेत अशी टीका सर्वत्र सुरू असताना राज ठाकरे मात्र वेगळ्याच संकटाचा सामना करत होते. स्वत:च्या मुलावर ओढावलेलं हे आरिष्ट्य कसं दूर करावं या चिंतेनं त्यांना ग्रासलं होतं. अशा परिस्थितीत ही फेब्रुवारीत झालेल्या महापालिका निवडणुकीच्या तीन-चार दिवस आधी राज ठाकरेंनी प्रचाराच्या काही सभा घेतल्या, पण त्यातही त्यांच्या मनात सुरू असलेलं द्वंद्व प्रकर्षानं जाणवत होतं. पण अमित यांच्या आजारपणामुळे राज ठाकरेंनी आजवर उघडपणे न दिसलेला हळवा बाप त्यांना लपवता आला नाही.

अमित ठाकरेंच्या प्रकृती अस्वास्थाच्या संकटातून आता ते पूर्णपणे बाहेर आले आहेत. पण हे संकट या सगळ्या कुटूंबालाच बरचं काही शिकवून गेलं असल्याच दिसतय. स्वता अमित ठाकरेसुद्धा औषोधोपचार सुरु असताना सुद्धा राज ठाकरेंबरोबर बैठकांना उपस्थित राहातात. गेले सहा महिने अमित ठाकरे राज ठाकरेंबरोबर प्रत्येक सभा-बैठकांसाठी प्रवास सुद्धा करतात. त्यामुळे अमित ठाकरे यांचा आत्मविश्वास खूप वाढल्याचं दिसून येतय. शिवाय राज ठाकरे हे सुद्धा या प्रसंगानंतर जास्त संवेदनशील,परिपक्व आणि जबाबदार वाटू लागले आहेत. खळ्ळ खट्याकची भाषा करणारे राज ठाकरे या संकटातून बाहेर पडल्यावर विरोधकांवर टीका करताना सुद्धा  सबुरींनं करताहेत. टीका करताना कसलीच भीड न बाळगणारे राज ठाकरे संयमी झाल्यासारखे दिसताहेत.

मुलाच्या आजारपणातून सावरल्यानंतर राज ठाकरेंनी सगळ्यात आधी काळाची बदलती पावलं ओळखली आहेत. २०१९च्या निवडणुकात महाराष्ट्राच्या राजकारणात बरेच फेरबदल अपेक्षित आहेत. सध्याच्या गतीचं राजकारण कायम राहिलं तर काँग्रेस एनसीपीबरोबरचं शिवसेनेसमोर आव्हान असेल. मात्र भाजपला संपूर्ण बहुमतात यायला एखाद्या काडीचा आधार लागू शकतो. त्यामुळे ही रिकामी जागा भरण्याची ताकद आपल्याकडे असावी असा तर राज ठाकरेंचा प्रयत्न नाही ना. राज ठाकरेंमधला बदल आणखी एका गोष्टीतून दिसून येणार आहे. सोशल मीडियावर स्वत:चं अस्तित्व न ठेवणारे ठाकरे आता लवकर फेसबुकवर येतील. कार्यकर्त्यापर्यंत पोहचण्याचा त्यांचा हा आणखीन एक प्रयत्न असेल. तसं पाहिलं तर ट्विटरवर राज ठाकरेंच्या नावानं अनेक बनावट आधीपासूनच कार्यरत आहेत. त्या घोळात पडायच्या ऐवजी आणि वर्तमानपत्र काढायच्या खर्चापासून वाचण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलाय.

२१ सप्टेंबरला या नव्या प्रयोगाला सुरुवात करण्यात येतेय. सुरुवातीला तरुणांचा पक्ष म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष कालांतरांनं इतर पक्षांसारखाच अंतर्गत राजकारणानं पोखरून निघाला. तरुणांमधल्या उत्साहाची जागा शंकाकुशंकानी घेतली. पक्ष नेतृत्वावरचा अनेकांचा विश्वास डळमळीत झाला होता. पक्षाला लागलेली कार्यकर्त्यांची ओहोटी काही केल्या कमी होत नव्हती. राज ठाकरेंना भेटताच येत नसल्याची सल अनेक कार्यकर्ते बोलून दाखवत होते. पण आता मात्र कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न राज ठाकरे करताहेत.शिवाय पक्षाच्या पुनर्बांधणीसह पक्षाचं प्रसार-प्रचार माध्यम ही तरुणाईला भावेल असंच करण्यात येणार आहे. त्यामुळे आता तरी मनसेच्या स्थितीत सुधारणा होईल अशी आशा निर्माण झालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 5, 2017 04:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...