शिवसृष्टी की मेट्रो, का दोन्हीही ??

शिवसृष्टी की मेट्रो, का दोन्हीही ??

वनाज ते रामवाडी या उन्नत(elevated) मेट्रो. मार्गावरील स्थानक कचरा डेपोच्या जागेवर होणार आहे. नेमक्या याच जागी शिवसृष्टी व्हावी असा ठराव मंजूर झाल्यानं तिढा निर्माण झाला.

  • Share this:

अद्वैत मेहता, पुणे

पुण्यातील कोथरूड भागातील कचरा डेपोच्या ठिकाणी शिवसृष्टी होणार का मेट्रोचं स्थानक याचा निर्णय शुक्रवारच्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. कचरा डेपोच्या 28 एकर जागेवर शिवसृष्टी व्हावी असा ठराव 2009 साली पालिकेत झाला आणि राज्य सरकारकडे मंजुरी करता पाठवण्यात आला.यावर अंतिम निर्णय अजून झालेला नाही.

वनाज ते रामवाडी या उन्नत(elevated) मेट्रो. मार्गावरील स्थानक कचरा डेपोच्या जागेवर होणार आहे. नेमक्या याच जागी शिवसृष्टी व्हावी असा ठराव मंजूर झाल्यानं तिढा निर्माण झाला. याच जागेतील काही भागात बीडीपी (जैवविविधता उद्यानाचंही)आरक्षण आहे. नागरिकांनी आपल्या नात्यातल्या व्यक्तींच्या स्मृतीप्रित्यर्थ लावलेली झाडे अर्थात स्मृतीवन प्रकल्पही या परिसरात आहे.

इतकी गुंतागुंत असल्याने तिढा सोडवणे सोपं नाही. दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन अर्थात डीएमआरसीने मेट्रो स्थानक किंवा शिवसृष्टी यापैकी एकच प्रकल्प होईल असं सांगितलं होतं. दुसरीकडे सर्वच राजकीय पक्षांचे बहुतांश नगरसेवक हे शिवसृष्टी होण्याबाबत आग्रही आहेत. महामेट्रोचे अध्यक्ष ब्रजेश दीक्षित यांनी शिवसृष्टी आणि मेट्रो स्थानक हे दोन्हीही प्रकल्प होतील का याची चाचपणी सुरू असून तज्ज्ञांकडून मतं मागवली जातील असं म्हटलंय.

काँग्रेस मधून राष्ट्रवादीत आलेले दीपक मानकर यांनी शिवसृष्टी करता ठाम आग्रह धरलाय. तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी पत्रकार संघात झालेल्या वार्तालापात शिवसृष्टी दुसरीकडे होऊ शकते मेट्रो स्थानक दुसरीकडे होऊ शकत नाही असं रोखठोक वैयक्तिक  मत मांडतानाच जर अशी भूमिका घेतली तर शिवसृष्टीला विरोध आहे असा अपप्रचार होईल म्हणून सर्वानुमते मध्यममार्ग काढावा असं सुचवलं होतं.

आता पालिकेत सत्ता पालट होऊन गिरीश बापट पालक मंत्री झाले आहेत. शिवसृष्टीचा मुद्दा भावनिक असल्याने राजकीय किंमत चुकवावी लागू नये म्हणून सर्वच पक्ष,राजकीय प्रतिनिधी यावर स्वभाविकपणे बॅलन्सड भूमिका मांडत आहेत.शिवसृष्टीला कुणाचा विरोध असायचं कारण नाही त्यामुळे सांस्कृतिक वैभवात भरच पडणार आहे मात्र तज्ज्ञांचा सल्ला काय येतो तो जो असेल तो सर्वमान्य होणार का यावर मेट्रो स्थानकाचं भवितव्य अवलंबून आहे. स्वतः  छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचं म्हणजे जनतेचं हित पहायचे अशी मतं यानिमित्ताने व्यक्त होत आहेत तीही महत्वाची आहेत.

पुणे हे शहर फक्त राज्याचीच नाही तर देशाची सांस्कृतिक ,शैक्षणिक राजधानी आहे.त्याच सोबत पुण्याची  वेगाने महानगराकडे, स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. पुण्याच्या ज्वलंत असलेल्या वाहतुकीच्या समस्येवर मेट्रो प्रकल्प हा जालीम, रामबाण उपाय आहे. त्यामुळे मेट्रो स्थानक होणं गरजेचं आहे. भावनिक राजकारणात मेट्रोस्थानकाचा बळी जाणं परवडणार नाही याचा  शांत,समंजसपणे विचार होणं जरुरी आहे.

सर्वसामान्य पुणेकरांना काय वाटतं याचाही कानोसा लोकप्रतिनिधींनी घेतला पाहिजे. लोकभावना,जनमताचा आदर राखला गेला पाहिजे. शिवसृष्टी तसंच मेट्रोचा राजकीय फायद्या तोट्यासाठी राजकीय आखाडा होता कामा नये. या संवेदनशील मुद्यावर सर्वच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी दूरगामी विचार करून पुणेकरांच्या हिताचा निर्णय घेतील हीच प्रामाणिक अपेक्षा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2017 11:50 PM IST

ताज्या बातम्या