पद्मावती,अॅन इनसिग्निफिकंट मॅन आणि सहिष्णुता !

पद्मावती,अॅन इनसिग्निफिकंट मॅन आणि सहिष्णुता !

पण हा निकाल देताना सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाची नोंद केली. कुठलाही चित्रपट बनवणं, कादंबरी लिहिणं, नाटक तयार करणं ही एक कला आहे. कलाकाराला यातून कसं व्यक्त व्हायचं हा सर्वस्वी त्याचा अधिकार आहे. कारण ती कला आहे. त्यावर कायदा कुठलीही बंधनं आणू शकत नाही.

  • Share this:

चित्ततोष खांडेकर,प्रतिनिधी 

सध्या देशात सर्वाधिक गाजतोय तो मुद्दा म्हणजे पद्मावती या सिनेमाचा. मध्य प्रदेशपासून जम्मू काश्मिरपर्यंत या सिनेमाला राजपूत समाज तसंच काही हिंदुत्ववादी संघटना सर्वच स्तरातून जोरदार विरोध करत आहे. या सिनेमावर मध्य प्रदेश सरकारने प्रकाशनपूर्व बंदीही घातली. तर त्याच वेळी महाराष्ट्रात चर्चा होते आहे दशक्रियाची कर्मकांडाचा 'व्यवसाय' कसा केला जातो यावर हा सिनेमा भाष्य करतो. याला राज्यातील पुरोहित वर्गाने मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे.

पण या सगळ्यात जास्त चर्चेत न आलेला पण तरीही महत्त्वाचा ठरतो तो 'अॅन इनसिग्निफिकंट मॅन' हा चित्रपट. केजरीवालच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतलेला आहे. या सिनेमातलं सगळं शुटिंग हे दिल्लीत लोकसभा आणि विधानसभेच्या घडामोडी चालू असताना झालंय. त्यामुळे राजकीय घटना जशा घडत गेल्या तशा तशा त्या सिनेमात उतरल्या आहेत. कुठलेही अभिनेते सेट, नृत्य या सिनेमात नाही. सगळ्या सत्य घटनांचं आहे तसं शुटिंग आणि वास्तव दर्शन. तर अशा या सिनेमाने काही लोकांना त्यांच्या परवानगी शिवाय शुटिंग केलं म्हणून त्यांना सेन्सॉरचा सर्टिफिकेट मिळू नये अशी मागणी सुप्रीम कोर्टात केली. यावर सुप्रीम कोर्टाने निकाल मात्र सिनेमाच्या बाजूने दिला. पण हा निकाल देताना सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाची नोंद केली. कुठलाही चित्रपट बनवणं, कादंबरी लिहिणं, नाटक तयार करणं ही एक कला आहे. कलाकाराला यातून कसं व्यक्त व्हायचं हा सर्वस्वी त्याचा अधिकार आहे. कारण ती कला आहे. त्यावर कायदा कुठलीही बंधनं आणू शकत नाही.

 

या निर्णयातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. काही दिवसांपूर्वी 'बाजीराव मस्तानी' हा सिनेमा आला. त्यात काशीबाई या बाजीराव पेशव्यांच्या पहिल्या पत्नीची भूमिका करणारी प्रियांका मस्तानीची भूमिका करणाऱ्या दीपिकासोबत 'पिंगा' या गाण्यावर थिरकताना दिसते. खऱ्या काशीबाई तर लंगड्या होत्या मग त्या नाचणार कशा यावरून अनेकांना विरोध केला होता. गंमत अशी आहे की, बाजीराव मस्तानी हा एक 'बॉलिवूड'चा सिनेमा होता. ती काही इतिहास सांगणारी डॉक्युमेंट्री नव्हती. शाळा कॉलेजात शिकवण्यासाठी तयार केलेला एक ऐतिहासिक संदर्भही तो चित्रपट नाही. तर तुंबळ पैसे कमवण्यासाठी आणि थिएटरमध्ये 'हाऊसफुल्ल'चा बोर्ड लावण्यासाठी तयार केलेला एक चित्रपट होता. बॉलिवूडचा सिनेमा चालतो तो त्याच्यातील उडत्या चालीच्या नाचायला लावणाऱ्या गाण्यांमुळे. मग वहिदा रेहमानच्या 'होटो में ऐसी बात' या डान्स साँगपासून काल परवाच्या दीपिकाच्या 'नगाडा' पर्यंत बहुतेक हिट सिनेमांमध्ये असे डान्स साँग होते. बाजीराव मस्तानी ही एक 'कलाकृती' होती. त्यामुळे त्यात काशीबाईंनी गाण्यावर ताल धरला ती कलाकृती समृद्ध होण्यासाठी! बॉक्स ऑफिसवर सिनेमा हिट व्हावा म्हणून. त्याचा वास्तवाशी संबंध नव्हता. कलाकृती या नात्याने कायद्याच्या चौकटीतही तो बसत होता. त्यामुळे त्या गाण्याचा विरोध चुकीचा होता.

 

तशीच गंमत आहे 'पद्मावती'ची. पद्मावती सिनेमाची कथा ही अल्लाऊद्दिन खिलजीच्या ऐतिहासिक चितोडच्या स्वारीवर बेतलेली नाही. तेव्हा पद्मावती राणीने जोहार केला होता का याच्या ठोस नोंदीही उपलब्ध नाहीत. जे काही आहे ते सारं लोककथा, लोकसंगीत, यातूनच आपल्यापर्यंत पोचलं आहे. त्यातही पद्मावती बेतला आहे 'पद्मावत' या काव्यावरती. हे काव्य लिहिलं मलिक मुहम्मद जयसी या कवीने. आता मलिक मुहम्मद कवी हा कोणी इतिहासकार होता का? राजपुतांचा राजकीय लढवैया होता का? तर नाही. मलिक मुहम्मद जयसी हा एक सुफी पंथाचा कवी होता. पद्मावतीच्या लोककथा आणि त्याच्या सुपीक डोक्यातील कल्पना यातून पद्मावत हे काव्य त्याने लिहिलं.

ते काव्य वाचताना जी परिस्थिती दिसते ती 16 व्या शतकातील राजपुतान्याची परिस्थिती आहे. अल्लाऊद्दीन खिलजीची कथाही 13व्या शतकातील आहे. त्यामुळे त्या काव्यातली पद्मावती आणि खरी पद्मावती(असल्यास) त्यामध्ये खूप फरक आहे. खऱ्या पद्मावतीचं कुठलं चित्रही त्याच्याकडे नव्हते. तिच्या सौंदर्याची वर्णनं करणारी ठोस कागदपत्रेही तेव्हा नव्हती. मग तिच्या सौंदर्याची त्याने केलेली वर्णनं ही त्या कवीची कल्पना आहे. त्यावेळी कुठूनही त्याच्या लेखनाला विरोध झाला नाही. पद्मावती राणीच्या सौंदर्याचं असं वर्णन तो करूच कसं शकतो असं म्हणत त्यावर हल्लेही झाले नाही. कोणी तो केलाही नाही. उलट त्याचं काव्य लोकांनी स्विकारलं. डोक्यावर घेतलं. त्याकाळी अनेक भाषांमध्ये त्या काव्याचं भाषांतर झालं. भारताच्या साहित्यात लिहिल्या गेलेल्या काही नामवंत ट्रॅजिडीजमध्ये पद्मावत या काव्याची गणना होते. कारण त्याकाळी कलेकडे 'कला' म्हणून पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन होता. ते सत्य नाही तर फक्त मनोरंजन आहे असा उदात्त विचार भारतात रूजला होता. आपल्याला पटला नाही तरी तो कलाकाराची कल्पना म्हणून स्विकारणे हीच खरी 'सहिष्णुता'.ही सहिष्णुता तेव्हा भारतात होती. म्हणून मलिक मुहम्मद जयसीला विरोध झाला नाही. आणि आज कुठेतरी हीच सहिष्णुता हरवत चालली आहे. आणि म्हणूनच कलाकृतींना विरोध होतो आहे.

तशीच काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेली दुसरी गोष्ट राम गणेश गडकरींची! राम गणेश गडकरींना 'राजसंन्यास' नाटकात संभाजी महाराजांचं पात्र आक्षेपार्ह पद्धतीने रंगवलं म्हणून पुण्यातल्या त्यांचा संभाजी गार्डनमधला पुतळा हलवण्यात आला. मुळात राजसंन्यास हे गडकरींचं अपूर्ण नाटक. ते पूर्ण न करता त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पण गडकरींच्या काळात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे एक मोठे नेते होते. संभाजी महाराजांचे वंशज कोल्हापूरचे शाहू महाराजही तेव्हा जिवंत होते. बडोद्याचे सयाजी राजेही जिवंत होते. हे सर्व राजे तेव्हा संगीत नाटक करणाऱ्या कलाकारांना राजाश्रय देत होते. नाटकांचे प्रयोगही पाहत होते. त्यावेळी सयाजी महाराजांनी, शाहू महाराजांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंनी कुणीही राम गणेश गडकरींच्या नाटकांवर बहिष्कार टाकला नाही. त्यांच्या नाटकांचे प्रयोग बंद पाडले नाहीत. गडकरींचे भावबंधन,एकची प्याला ही नाटकं त्यामुळे आज मराठीतील सर्वोत्कृष्ट नाटकं म्हणून प्रसिद्ध आहेत. कारण तेव्हाही भारतात कलेला कला म्हणून पाहिलं जायचं. सहिष्णुता होती.

त्यानंतर जेव्हा संभाजी महाराजांचा 1960 साली इतिहास नव्याने लिहिला गेला तेव्हाही यशवंतराव चव्हाणांसारखे अनेक नेते राजकीय पटलावर होते. कोणीही गडकरींना विरोध केला नाही. पण आज त्या कलाकृतीचा अर्थ समजून न घेता गडकरींचा पुतळा हलवण्याचं काम काही संघटनांनी केलं.

गेल्या काही वर्षात असे प्रकार प्रचंड वाढले आहेत. कारण देशातील सहिष्णुता कमी होते आहे. मग दक्षिणेत कमल हसनच्या 'विश्वरूपम' या चित्रपटाला सुरूवातीच्या काळात मुस्लिम समाजाने केलेला विरोध असेल, किंवा 'जोधा अकबर' या सिनेमाला हिंदू संघटनांनी केलेला विरोध असेल. काही वर्षांपूर्वी दक्षिणेतील पेरूमाल मुरूगन या लेखकाने लिहिलेली 'मधुरोभागन' ही कादंबरी देखील वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. या कादंबरीला होणाऱ्या प्रचंड विरोधाला पाहून माझ्यातला लेखकच मेला आहे अशी भावना मुरूगन यांनी व्यक्त केली. मुरूगन यांचे विचारही एक कलाकृती म्हणून आम्ही समजून घेतले नाही. त्यांच्या कलेचा विचार 'सहिष्णुतेने' समजून घेतला नाही.

त्याहून मोठी शोकांतिका ठरते तस्लिमा नासरिन या लेखिकेची. तिने लिहिलेल्या कादंबऱ्यांना मुस्लिम समाजाने प्रचंड विरोध केला. तो पाहता भारतात तिला आम्ही राहायला जागाही देऊ शकलो नाही. आज या देशात फक्त हिंदुत्ववादी आणि करणी सेनाच असहिष्णु झालेली नाही. तर सहिष्णुतेचा पाठ देणाऱ्या समाजवादी विचारांच्या संघटनाही, आपल्या विरोधकांनाही प्रेमाने आपलेसे करणाऱ्या प्रेषित मुहम्मदाच्या 'इस्लाम'च्या संघटनाही अपवाद राहिलेल्या नाही.

थोडक्यात काय तर कला आहे तशी स्विकारण्याची आणि तिच्याकडे मनोरंजन म्हणून पाहण्याची वृत्ती आज कमी होते आहे. या देशाच्या इतिहासात आधी कधीही कलाकाराच्या कलेवर असं बालंट आलं नव्हतं. सहिष्णुतेचं-असहिष्णुतेचं राजकारण बाजूला ठेवून पाहिलं तर आज आमच्या देशातील सगळ्याच विचारधारांची संघटनांची माणसं असहिष्णू होताना दिसत आहेत. विरोधी मत स्वीकारलंच जात नाहीये. कारण आज शिक्षणातून आम्हाला सहिष्णुता शिकवलीच जात नाही. व्यक्तिमत्व विकासासारखे विषय आम्हाला शाळेत शिकवले जातात. पण त्यात इतर धर्म, विचारांच्या लोकांप्रती सहिष्णुता हा विचार शिकवलाच जात नाही. जैन बुद्धाचं तत्वज्ञान इतिहासाच्या पुस्तकामध्ये फक्त अहिंसेच सांगून गुंडाळलं जातं.

 

तत्वज्ञानाच्या पदवी अभ्यासक्रमातही त्यातला सहिष्णुता विचार नाही. सहिष्णुता हा माणसाच्या व्यक्तिमत्त्वातील एक महत्त्वाचं मुल्य आहे. दुसऱ्याचे विचार पटत नसतील तरी ते त्याचे विचार आहे म्हणून त्यांचा आदर करणं म्हणजे सहिष्णुता. पण आज या देशातील कित्येक जनांना विशेषत: तरूणांना सहिष्णुता म्हणजे काय हे माहित नाही. ज्याप्रमाणे आत्मविश्वास ,राष्ट्राप्रती प्रेम, शांतता हे गुण शिकवले जातात तसंच सहिष्णुताही शिकवली पाहिजे. ती मनामनात रूजवली पाहिजे. असं जर केलं नाही तर अशा प्रत्येक कलाकृतीला मग नाटक असो ,सिनेमा असो किंवा चारोळीची कविता असो विरोध होतंच राहणार. कलाकाराच्या कलेचा असा विरोध होतंच राहणार. शांततेसाठी सहिष्णुता शिकवली पाहिजे हे युनेस्कोनेही मान्य केलं आहे. त्यामुळे कलेला वाव मिळावा म्हणून सहिष्णुतेची शिकवण,विरोधी विचारांचा आदर देण्याची शिकवण देणं गरजेचं आहे.

First published: November 24, 2017, 6:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading