नितीशकुमारांची 'रागबिहारी' राजकीय खेळी...

नितीशकुमारांची 'रागबिहारी' राजकीय खेळी...

कालपर्यंत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींसमोर सशक्त पर्याय म्हणून जे लोक नितीशकुमारांकडे डोळे लावून बसले होते, त्यांना हा बिहारी धक्का अजूनही पचनी पडलेला नाहीये. पण याची पटकथा 2015 च्या बिहार विधानसभेच्या निकालानंतरच लिहिली गेली होती.

  • Share this:

कौस्तुभ फलटणकर ,नवी दिल्ली

बिहारमधे बुधवारी झालेल्या राजकीय उलथापालथी नंतर विरोधक अजूनही धक्क्यात आहेत. या बिहारी राजकीय भूकंपाची तीव्रता कमी व्हावी, म्हणून नितीशकुमार तीन महिन्यापासून भाजपाच्या संपर्कात असल्याची माहिती आमच्याकडे होती, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केलेय. पण यातूनच काँग्रेसची हतबलता जास्त दिसली. कालपर्यंत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींसमोर सशक्त पर्याय म्हणून जे लोक नितीशकुमारांकडे डोळे लावून बसले होते, त्यांना हा बिहारी धक्का अजूनही पचनी पडलेला नाहीये. पण याची पटकथा 2015 च्या बिहार विधानसभेच्या निकालानंतरच लिहिली गेली होती.

खरंतर नितीशकुमार आणि भाजप यांचे राजकीय सूत हे 17 वर्षांपासूनचं आहे. त्यात 10 वर्ष बिहारमधे दोघांनी मिळून सत्ता चालवली, या काळात भाजपच्या बिहार नेत्यांनी नितीशकुमारांना 'ओव्हरटेक' करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही, त्यामुळेच कदाचित बिहारच्या सत्ताकारणात नेहमीच नितीशकुमारांचा एकहाती अंकुश राहिलाय. या सत्तेच्या जोरावरच संपूर्ण बिहारमधे नितीशबाबूंनी आपल्या विश्वासू अधिका-यांचे जाळे निर्माण केले, आणि त्या माध्यमातून स्वच्छ प्रशासन देणारा 'विकास बाबू' अशी प्रतिमा यशस्वीपणे निर्माण केली. याच दरम्यान, नितीशकुमारांनी स्वतःच्या पक्षातही दूसरा चेहरा निर्माण होऊ दिला नाही. जातीपातीत विभागलेल्या बिहारी राजकारणालाही त्यांनी विकासाच्या माध्यमातूनच यशस्वीपणे छेद दिला. याच काळात बिहारच्या बाहेरही नितीशकुमार यांची विकासपुरूष अशी प्रतिमा निर्माण झाली. नितीशकुमार स्वतः ला पंतप्रधान पदाचे भविष्यातले उमेदवार म्हणून तेव्हापासूनच पुढे आणू पाहत होते. 2013 मधे भाजपाच्याच काही नेत्यांनी त्यांच्या या प्रतिमेला हवा दिली आणि NDA पासून दूर होण्याचा सल्ला दिला होता. कारण तेव्हा मोदी पंतप्रधान होण्यासाठी धडपड करत होते, अशा त्रिशंकू परिस्थितीत भाजपाला बहुमत मिळाले नाही तर बाहेरून नितीशकुमारांना पाठिंबा द्यायचा, अशी ही योजना होती पण 2014च्या निकालाने त्यावर पूर्ण पाणी फेरले.

           केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर केवळ राजकीय अपरिहार्यता म्हणून नितीशकुमारांनी बिहार विधानसभा निवडणुकीत लालू आणि काँग्रेससोबत महागठबंधन केलं. पण तिथंही लालूंनी नितीशकुमारांना धक्का देत जेडियू पेक्षा जास्त जागा मिळवल्या. नितीशकुमारांसाठी हा तसा धोक्याचाच इशारा होता. बिहारमध्ये लालूंची ताकत वाढणे हे नितीशकुमारांसाठी कधीही डोकेदुखीच होतं. अशातच लालूंनी येडियूच्या जागा कमी हटकून नितीशकुमारांना मुख्यमंत्री करून सरकारस्थापनेतला नैतिक वरचष्मा कायम ठेवला, दरम्यानच्या काळातच लालू नितीशकुमारांना सतत डिचवत राहिले पण तरिही नितीशकुमार शांतच राहिले पण जेव्हा लालू थेट सरकारमधे हस्तक्षेप करायला लागले. अधिकाऱ्यांना धमकावने, उपमुख्यमंत्री मुलगा तेजप्रताप यांच्या मंत्रालयातील दालनात ते स्वतः बैठका अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊ लागले, आणि अधिकाऱ्यांना परस्पर आदेश देऊ लागले, लालूंचा प्रशासकीय कामातला हा वाढता हस्तक्षेप नितीशकुमारांना चांगलाच खटकू लागला.

 

अशातच राबडी देवींनी मुलगा तेजस्वीला मुख्यमंत्री करण्याची मागणी सार्वजनिकपणे केल्याने नितीशकुमार चांगलेच हादरले. या घटनेपासूनच नितीशकुमारांचे 'ऑपरेशन लालू' सुरु झाले. यावेळेपर्यंत आपण 2019 ला मोदींसमोर समर्थ राजकीय पर्याय होऊ शकणार नाही, याचीही चाणाक्ष नितीशकुमारांना पुरती जाणिव झाली होती. आणि तिथून पुढेच खऱ्याअर्थाने त्यांनी आपण पुन्हा NDA त यायला तयार असल्याचे संकेत देणे सुरु केले, आधी सर्जिकल स्ट्राईक नंतर नोटबंदीचे त्यांनी जाहीररित्या समर्थन केल्याचे बघायला मिळाले. नितीशकुमारांची बदलती भूमिका खरंतर तेव्हाच अनेकांच्या लक्षात यायला लागली होती. पण लालू आणि काँग्रेस हे नितीशकुमारांवर आंधळा विश्वास ठेऊन बेसावध राहिले. आणि दुसरीकडे धूर्त नितीशकुमार पावलागणिक भाजपशी जवळीक वाढवण्याची संधी शोधू लागले.

अशातच सीबीआयने लालूंच्या विरोधात रेल्वे कॅटरिंग घोटाळ्यात गुन्हे दाखल केले आणि नितीशकुमारांना लालू भ्रष्टाचारी असल्याचा नव्याने साक्षात्कार झाला. लालूंच्या कुटुंबियांच्या भ्रष्टाचाराचाचं आयतंच कोलित हाती आल्याने नितीशकुमारांनी लागलीच तडकाफडकी राजीनामा दिला आणि अवघ्या 16 तासात तेच नितीशकुमार भाजपशी घरोबा करून पुन्हा मुख्यमंत्रीही झाले. नितीशकुमारांच्या या धूर्त राजकीय खेळीला विरोधकांनी 'प्रिस्क्रिप्टेड बिहारी ड्रामा' म्हणून झोडपलं खरं पण तोपर्यंत बिहारसारखं मोठं राज्यं मोदी-शहा जोडगोळीने अलगदपणे विरोधकांच्या हातून काढून घेतलं होतं. नितीशकुमारांच्या या राजकीय खेळीला काहीजणांनी संधीसाधूपणा म्हणून हिनवलं असेलही पण सत्ताकारणात आजवर हेच होत आलंय.

नितीशकुमारांची एनडीए आघाडीत घरवापसी झाल्याने भाजपसाठी 2019ची राजकीय लढाई आणखीनच सोपी झालीय. तर विरोधक पुरते सैरभैर झालेत. 40 लोकसभा सीट असलेल्या बिहारमधे भाजपाने 2014साली 33 जागा जिंकल्या होत्या. पण 2015च्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश - लालू -काँग्रेस महागठबंधनच्या माध्यमातून एकत्र आल्याने भाजपला सपशेल हार पत्करावी लागली होती. म्हणूनच बिहारसारखं मोठं राज्य आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने नितीशकुमारांना पुन्हा जवळ केलंय. हे अगदी जगजाहीर आहे. बिहारमधल्या या नव्या राजकीय सोयरिकीबद्दल दिल्लीच्या वर्तुळात जोरदार चर्चा अशी आहे की उत्तरप्रदेश निवडणुकीच्या काळात प्रशांत किशोर यांनी दिल्ली जवळ एका फार्महाउस मधे नितीशकुमार आणि अमित शाह यांची भेट घडवून आणली होती आणि तिथूनच खऱ्याअर्थाने नितीशकुमारांच्या 'एनडिए घरवापसी'ची रणनीती तयार झाली. या नंतरची बोलणी थेट मोदी आणि नीतीश कुमार यांच्यात झाली ज्यात फक्त महागठबंधन तोडण्यासाठीचं 'टायमिंग' आणि प्रासंगिक कारणं तयार करण्याची अंतिम चर्चा झाली.

खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार, नितीश आणि भाजपामधे जो करार झाला आहे त्यानुसार मोदी - अमित शाह बिहारच्या राजकारणापासून दूर राहतील आणि त्या बदल्यात नितीशकुमार 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वोतपरी मदत करतील. खरंतर ही राजकीय तडतोड दोघांसाठीही 'विन विन' सिच्युवेशन आहे. कारण नितीशकुमारांना आपलंसं करून मोदींनी आपला एक प्रतिस्पर्धी कमी केलाय शिवाय विरोधकांच्या महागठबंधन आघाडीला मोठं खिंडार पाडून त्यांचा आत्मविश्वास सुद्धा तोडलाय. दूसरीकडे नितीशकुमारांना लालूंची सद्दी संपवून पुन्हा आपली जमीन मजबूत करता येणार आहे. शिवाय केंद्राच्या सत्तेत 13 वर्षांनी सहभागी होऊन बिहारसाठी भरगोस निधी मिळवण्यात सुद्धा नितीशकुमार आता यशस्वी होतील. पाहुयात विरोधक आतातरी या रागबिहारी धक्क्यातून सावरताहेत की नाही ते...पण या धूर्त खेळीच्या नादात नितीशकुमार आपला 'तत्वनिष्ठ' समाजवादी चेहरा गमावून बसलेत हेही तितकंच खरं...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2017 08:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading