नावात काय आहे ? #भटक्याचाफटका, नवं कोरं सदर

विझलेले #नारायणास्र... #सत्ताविनायकाचा #प्रसाद... नावाचे #भांडारी... #आशिषाची अपेक्षा / उपेक्षा #भटक्याचाफटका हे राजकीय घडामोडींवर खुमासदार भाष्य करणारं नवं कोरं सदर

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Nov 27, 2017 06:34 PM IST

नावात काय आहे ? #भटक्याचाफटका, नवं कोरं सदर

 

नावात काय आहे ? असा सवाल इंग्लंडमधील थोर साहित्यिक व कवी विलियम शेक्सपियर यांनी सोळाव्या शतकात विचारला होता. पण नावात बरेच काही दडलेले असते हे शेक्सपियर साहेबांना महाराष्ट्रदेशी आल्याशिवाय कळणार नाही. बघाना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु झाला होता, महाराष्ट्रात सगळ्याच पक्षांमध्ये नेतृत्वाविषयी नेहमीप्रमाणे संभ्रमाचे आणि संशयाचे वातावरण होते, अगदी त्याचवेळी ' दिल्लीत नरेंद्र , महाराष्ट्रात देवेंद्र ', अशी चर्चा सुरु झाली. त्यावेळेस महाराष्ट्रातील गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, एकनाथ खडसे, पांडुरंग फुंडकर अशा एकाहून एक दिग्गजांनी भाजपच्या नेतृत्वाची कमान पेलली होती. या दिग्गजांच्या मानाने देवेंद्र फडणवीस वयाने, अनुभवाने, सर्वार्थाने "धाकटे", परंतु, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि 'दिल्लीत नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र' ही घोषणा प्रत्यक्षात आली. त्यामुळे राजकारणात "नाव" काढण्यासाठी तसे नाव किंवा आडनाव असणे गरजेचे असावे, असा एक समज किंवा गैरसमज सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात पसरलाय. त्यातून काही मंडळी एकता कपूर यांच्या टीव्ही मालिकांच्या शिर्षकांप्रमाणे आपल्या नावात पक्षप्रमुखांच्या नावाचे आद्याक्षर जोडून राजकीय करियरला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी भविष्य सांगणाऱ्यांकडे जाऊन बसलेत असे समजते. प्रसाद लाड यांना भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी देणे, या एका घटनेने, सगळ्याच "नामचीन" राजकारण्यांना, आपल्या मिळालेल्या "नावांचा" फेरविचार करावासा वाटणे, ही खरेतर महाराष्ट्राच्या नजीकच्या काळातील "ऐतिहासिक घटना" ठरेल.

प्रसाद लाड, हे तेव्हा राजकारणात आले, जेव्हा ठाणे - डोंबिवलीतून आलेल्या बंटी उर्फ जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक यांनी काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत सूर आणि सूत जुळवण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. जितेंद्र आव्हाडांनी शरद पवार व्हाया पद्मसिंह पाटील असा प्रवास केला तर प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना अशी 'त्रिखंडी वारी' करून स्वतःचा जम बसवला. पण लाड यांच्या हातावर 'सिद्धिविनायक मंदिरातील पदाचा "प्रसाद" ठेऊन मोकळ्या होणाऱ्या राष्ट्रवादीच्या जयंत पाटील किंवा छगन भुजबळ यांनी त्यांचे आमदारकी किंवा मंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण केले नव्हते. मात्र मुंबई भाजपात महानगरपालिका निवडणुकीत महत्वाची कामगिरी करणारी लाड यांच्यावर "देवेंद्र" प्रसन्न झाले आणि त्यांचे मनोरथ पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला, असे आज म्हणता येईल. नाही म्हणायला या आधी, मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था प्रवर्गातून विधान परिषदेची अपक्ष उमेदवारी त्यांनी मिळवली होती आणि भाजपच्या कोट्यातील, अन्य पक्षातील मित्रमंडळींची मते मिळवून विजयी होण्याचा प्रयत्न केला होता. पण... भाई, नाव असलेले उमेदवार समोर आणि त्यांनी लाड यांना पराभूत केले.

वास्तविक त्या निवडणुकीत, त्याच्या आधीच्या चार-दोन निवडणुकीत ज्यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली होती, ते भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, यांना यावेळेस भाजपची उमेदवारी दिली जाईल, अशी खूप शक्यता वर्तविण्यात येत होती. काँग्रेस सोडून भाजपच्या जवळ आलेले, एनडीएमध्ये सामील झालेले नारायण राणे यांच्याऐवजी माधव भांडारी यांच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला विधान परिषदेत पाठवले जाईल, अशा बातम्यासुद्धा झळकल्या. पण हाय रे दुर्दैवा, पुन्हा त्यांच्या पदरी निराशा आली. यावर एका कोकणातील भाजप कार्यकर्त्यांशी बोलताना वेगळीच माहिती मिळाली. तो म्हणाला. "माका माहित होता, या असाच होनार, भांडारींचो नावच आड इलो, दुसरा काय". त्यावर मोठ्या आश्चर्याने मी विचारले, अहो इथे नावाचा कसा संबंध येतो ? त्यावर तो म्हणाला, सोप्पं आहे, भांडारीं म्हणजे काय ? ज्याच्या हाती सगळे भांडार आहे तो, भांडाराचे रक्षण करणारा. चर्चेत जाऊन बोलणारा, भांडणारा, विरोधकांना चीतपट करणारा. त्यांचा खरा काम टीव्ही चॅनेलवर, ते विधान परिषदेत जाऊन काय करणार?

अहो, त्यांचे ठीक आहे, तुमच्या राणेसाहेबांचे काय, या प्रश्नावर आपला जन्मजात खवचटपणा बाजूला सारून तो कोकणी कार्यकर्ता म्हणाला, त्यांचे नाव नारायण आहे ना, मग तसेच व्हनार. पुराणात काय लिहिलाय ते वाचा, तुमका ब्रह्मास्त्र माहीत असालच, पण नारायणास्त्र नसाल माहीत, त्ये तर सगळ्यात पॉवरफुल, पण नारायणास्त्रच एक प्रॉब्लेम असतो, त्यो नेहमी, नेहमी उडत नाय. त्याचा दुसऱ्यांदा वापर झाला की बार फुसका झालाच समजा. दादांचो पण तसाच झालाय, याच्या आधी त्यांचे कितीक बार फुसके गेले, काँग्रेसात कोंडी झाली, मग भाजपात येण्याचा विचार झाला, पण त्याला भाजपनेत्यांनी वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या, मग स्वतःच जाहीर केला, मी 'एनडीए'मध्ये आलो, आता मला सांगा, एवढा अपमान गिळून आमचा वाघ भाजपशी जुळवून घेतोय, मग त्याचा त्यांना थोडा तरी कौतुक हाय का ?" नाय ना ! मग तोच तर खरा प्रॉब्लेम हाय. आता नारायणरावांनी त्याच्यावर तोडगा म्हणौन सत्यनारायण घातला पायजे, दुसरा काय? कोकणातील कार्यकर्त्यांशी बोलता बोलता, फोनवर काय तरी गोंधळ झाला, पलीकडून वेगळेच संभाषण ऐकू यायला लागले. बहुतेक क्रॉस कनेक्शन झाले असावे. मुंबईतील एक येक नेता बोलत होता, 'अहो थांबा हो, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, हो प्रसाद लाड आता आमदार झालेत, ते मंत्री पण होतील, अहो घाबरू नका, मंत्रिपदाकडे, बंगल्याकडे डोळे लावून बसणाऱ्या मुंबईतील कोणाला सांगू पण नका, मुंबई भाजपचे अध्यक्ष पण तेच होतील, ' तेवढ्यात दुसरा आवाज घुमला, 'मग त्या आशिषजींचे काय,' हास्याच्या गडगडाटात उत्तर आले, अहो, नावात सगळे आहे, "आशिष", म्हणजे आशीर्वाद, तो फक्त शाब्दिक असतो, मनाचे समाधान करणारा. "प्रसाद", म्हणजे प्रसाद, चविष्ट, स्वादिष्ठ, पॉट भरणारा." पुन्हा हास्याचा गडगडाट, फोन कट !

Loading...

- मदारी मेहतर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2017 06:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...