बोलण्याने होत आहे रे...

बोलण्याने होत आहे रे...

सीमेवर शहीद होणाऱ्या जवानांची संख्या दिवसागणिक वाढत चाललीय. एखादी भूमिका सोयीस्कर आहे म्हणून तिच्यासाठी काय किंमत चुकवावी लागतेय याचा विचार आपण कधी करणार?

  • Share this:

अमेय चुंभळे, मुंबई

'चीनशी चर्चेला तयार आहात, मग पाकिस्तानशी का नाही?', असं स्पष्ट मत फारुख अब्दुल्लांनी आज व्यक्त केलं. एका अर्थानं ते योग्य आहे. कुठलाही प्रश्न सोडवायचा, तर चर्चा करावीच लागते. आपण ती याआधी केली नाही, असं नाही. पण त्यात सतत खंड पडतो. मोठा दहशतवादी हल्ला होतो, आणि आपण चर्चा स्थगित करतो. पण त्यानं साध्य काय होतं? उलट, पाकिस्तानला युक्तिवाद करायला खाद्यच मिळतं. की बघा, आम्ही तर बोलत होतो, भारतालाच बोलायचं नाहीय.

दुसरा मुद्दा असा की चर्चा न करून तरी असं काय हाती लागतंय? फक्त इगो सुखावतो. पण सीमेवर शहीद होणाऱ्या जवानांची संख्या दिवसागणिक वाढत चाललीय. एखादी भूमिका सोयीस्कर आहे म्हणून तिच्यासाठी काय किंमत चुकवावी लागतेय याचा विचार आपण कधी करणार? ताठ आणि वास्तववादी यामध्ये नेहमीच पहिला पर्याय निवडायचा नसतो. त्यानं ताठपणाही बोथट होण्याची शक्यता असते.

आपल्याला हे कायमचं मान्य करायला हवं की काश्मीर प्रश्नात (आपल्याला पटली नाही तरीही) पाकिस्तानचीही बाजू आहे. ती गृहीत धरूनच पुढे जावं लागणार आहे. हुरियतशी मोदी सरकार बोलत नाहीय. भूमिका म्हणून ती ऐकायला चांगली वाटत असेल. पण हुरियतचं अस्तित्व नाकारून कसं चालेल? त्यांच्याशी न बोलून त्यांना आपलं सरकार अकारण मोठं करतंय. चर्चेत बसू द्या की, शेवटी निर्णय घेणं आपल्या हातात आहेच. मेहबूबा मुफ्तींशी युती करणं शक्य असेल तर हुरियतशी चर्चा करणं म्हणजे देशद्रोह नाही, हे मान्य व्हायला हवं. हुरियतवर बंदी घालून किंवा पाकला दहशतवादी राष्ट्र घोषित करा ही मागणी अमेरिकेकडे वारंवार करून हाती काही लागणार आहे का?

भारत-पाक संबंधांमध्ये अपरिपक्वता हा स्थायी भाव राहिलेला आहे. चर्चा स्थगित करणं, मिळेल त्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकचं गुऱ्हाळ लावणे, अमेरिकेशी चर्चा करताना सतत पाकचा मुद्दा काढणे... आंतरराष्ट्रीय राजकारणात यामुळे भारताच्या प्रतिमेस मदत होत नाही. हेही लक्षात घ्यायला हवं की...इतर देशांना आपल्या वादात तेवढा रस नाही. एकीकडे म्हणायचं की तिसऱ्या देशानं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करू नये, आणि दुसरीकडे जागतिक व्यासपीठावर पाकबद्दल गळा काढायचा. भारत इतर मुद्द्यांवरही बोलू शकतो, हेही जगाला जाणवायला हवं.

भारताचं सार्वभौमत्व अबाधित रहायला हवं, यात दुमत नाही. पण सीमेवर रोज एक ते दोन जवानांचा जीव जात असेल, तर भूमिकेत बदल करण्यात कसलाही कमीपणा नाही, हे सरकारनं जनतेला पटवून दिलं पाहिजे. सतत 'हीरो'ची भूमिका घेणं कुणालाच परवडणार नाहीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 21, 2017 07:05 PM IST

ताज्या बातम्या