Home /News /blog-space /

फक्त भ्रमनिरास !

फक्त भ्रमनिरास !

देशात सत्तांतर झाले तरी सामान्यांची परिस्थिती बदलली नाही, सुधरली नाही उलट बिघडलीच आहे. म्हणून आज भारतातला सामान्य माणूस अस्वस्थ आहे.

चित्ततोष खांडेकर, प्रतिनिधी भारतावर इंग्रजांचे राज्य प्रस्थापित झाल्यानंतर मिर्झा गालिब संपूर्ण देशभर फिरला होता. तेव्हा काशी पासून दिल्लीपर्यंत देशातल्या लोकांच्या यातना ,वेदना त्याला जाणवल्या होत्या. त्याने त्या अनुभवल्या होत्या. तेव्हा संपूर्ण देशात एक अस्थिरतेचं, अस्वस्थतेचं वातवरण होतं. गालिबच्या त्यावेळच्या शेरोशायरीतून हे स्पष्ट दिसून येतं. शेतकऱ्याला हमीभाव मिळत नव्हता, हवी ती पिकं घेता येत नव्हती. दुष्काळातही न भूतो न भविष्यति इतका भयानक कर इंग्रज सरकारने बसवला होता. इंग्रजांच्या धोरणामुळे फक्त शंभर वर्षांपूर्वी संपन्न असलेल्या ग्रामीण भारताची पर्यायी बिहार बंगाल सारख्या राज्यांमधील शेतकऱ्यांची प्रचंड दुरावस्था झाली होती. शहरी भागात  इंग्रजी भाषेतून पदवी मिळवणाऱ्यांना नोकऱ्या मिळत होत्या. इंग्रजी शिक्षण घेणारे श्रीमंत उच्च जातीतले आणि उच्चभ्रू घरांमधीलच होते. मध्यमवर्ग  आणि गरीब वर्गात प्रचंड असंतोष होता. त्यावेळच्या नोंदी पाहिल्या तर 1857च्या संग्रामाआधी आणि नंतरही शेतकऱ्यांची अनेक आंदोलन झाली  होती. ही अर्थात हिंसक प्रकारची होती. ज्यूटच्या शेतकऱ्यांनी तर चक्क ब्रिटीशांची एक चौकी फोडल्याच्याही नोंदी आहेत. 1850चं दशक आणि 2017 काय फरक झाला आणि किती फरक झाला? आजही उत्तर प्रदेशपासून  तामिळनाडूपर्यंत प्रत्येक राज्यातील शेतकरी होरपळला आहे. रस्त्यावर उतरतो आहे. चांगलं शिक्षण ही फक्त श्रीमंतांची मक्तेदारी होऊन बसली आहे. त्यातही ज्यांना शिक्षण मिळतंय त्यांना नोकऱ्या मिळत नाही आहे. जागतिकीकरणाच्या 25 वर्षांनंतर देशाची झालेली दुरावस्था आणि 19व्या शतकात इंग्रजांच्या राज्यात देशाची झालेली दुरावस्था सारखीच आहे. 2014 साली भारतात सत्तांतर झालं. हे सत्तांतर का झालं? नरेंद्र मोदी एक उत्तम प्रशासक आहेत म्हणून? संघाचे प्रचंड नेटवर्क पसरलं आहे म्हणून? कांग्रेसने लोकांची निराशा केली म्हणून? मला वाटतं या सगळ्या कारणांहून वेगळं एक कारण आहे. प्रत्येक मानवी समाजात त्रास हालअपेष्टा दु:ख या गोष्टी असतातच. प्रत्येक समाजातील दुबळ्यांना, उपेक्षितांना शोषितांना आपल्याला वाचवायला कोणीतरी एक मसीहा येईल आणि आपले सगळे त्रास दुर करेल अशी आशा असते. मग तो येऊन हजारोंना दु:खातून बाहेर नेणारा यहुदी समाजातला मोझेस असतो. मी तुम्हाला वाचवेन अशी आशा दाखवणारा कधी येशू ख्रिस्त असतो. समाजातीन वाईट प्रवृत्तींचा नाश करणारा  श्रीकृष्ण असतो.  तर कधी कुठलेही शस्त्र न वापरता देशातील लोकांना धीर देत पुढे नेणारा महात्मा गांधींसारखा नेता असतो. असे मसीहा येतील आणि दु:खातून बाहेर काढतील ही आशा कायम जन सामान्यांच्या मनात असते. असे मसीहे कधी कधी येतातही. महागाईने होरपळलेल्या, गरिबीने  त्रासलेल्या, गुंड मवाल्यांच्या दादागिरीने पिचलेल्या  आणि भ्रष्टाचारामुळे  आतून पुरत्या खंगलेल्या भारतीय माणसाला खरोखर एक 'मसीहा' च  आपल्याला वाचवू शकतो ही अपेक्षा होती. अशी आशा होती. 2013-14 साली भाजपने केलेल्या प्रचारामुळे असेल ,गुजरातमध्ये काही प्रमाणात का  होईना पण झालेल्या चांगल्या कामामुळे असेल पण तो मसीहा नकळत  नरेंद्र मोदींमध्ये देशातील असंख्य जनतेला दिसत होता. त्यात मोदींची सभा जिंकणारी भाषणं  त्याची खात्रीच पटवत होती. खेडोपाडी ,शहरात रस्त्यांवर राहणाऱ्या लोकांमध्ये सगळीकडे हीच भावना होती. पण गेल्या तीन वर्षात या देशातील सामान्य माणसाचे दु:ख, त्रास, हालअपेष्टा काहीच कमी झालेले नाहीत. तीन वर्षात ते कमी होणं अशक्य आहे असं काही जण म्हणतीलही. पण तीन वर्षात जनसामान्यांचे त्रास मोठ्या प्रमाणात वाढल्याचे मात्र स्पष्ट दिसतं आहे. या देशात सामान्य जनतेला सगळ्यात जास्त फटका बसतो तो महागाईचा. आता महागाई ,जागतिक बाजारपेठेच्या अधीन आहे, त्याला अनेक कारणं जबाबदार आहे असे वादही होतील. पण वास्तव हे आहे  की ही महागाई कमी तर झालेली नाहीच. उलट वाढलीय. नोटाबंदीच्या काळात देशातील सामान्यांचं कंबरडंच मोडलं होतं. जीएसटी नंतरच्या काळातही शहरी भागात अनेक गोष्टींचे दर वाढले आहेत. या वाढलेल्या दरांनी शहरी नागरिक त्रस्त आहेत. 2013-14मध्ये याच सामान्यांना काळा पैसा परत येईल आणि सामान्यांचे प्रश्न संपतील अशी स्वप्नं दाखवली गेली होती. काळा पैसा परत आलाच नाही. उलट देशातील काही श्रीमंत अधिकच  श्रीमंत झाल्याचे आज या सामान्य माणसाला दिसतं आहे. काहींची संपत्ती तर कितीतरी पटींनी वाढली आहे.  यामुळे शहरी भागातील नागरिक प्रचंड अस्वस्थ झाला आहे. आपल्या समस्या सुटतील म्हणून ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनी त्याचा पुरता विश्वासघात केल्याची भावना आज त्याच्या मनात आहे. त्याच्या समोरची दुसरी समस्या बेरोजगारीची. बेरोजगारी का आहे? तर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये लागणारं स्किल आणि शिक्षण या देशातील युवकाला मिळत नाहीये. तर दुसरीकडे छोट्या व्यापारांना, उद्योगांना पोषक अशी व्यवस्था ही या देशात नाही. यामुळे नवीन संधी येत नाहीत आणि बेरोजगारीसारखी समस्या देशासमोर भेडसावते आहे. या देशाला आयआयटी आयआयएमची नाही तर आयआयटी आयआयएमच्या लायकीचं शिक्षण आणि कौशल्ये देशातील शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोचवण्याची गरज आहे. ते पोचत नाही म्हणून आज शहरी समाज अस्वस्थ आहे. तर ग्रामीण भागात सगळा आनंदी आनंदच आहे. बहुतांश ग्रामीण भागात 24 तास सोडा पण 12 तासही वीज नाही.  शेती, उद्योग उभे राहतील अशा पोषक सुविधाही नाहीत आणि व्यवस्थाही नाही.याशिवाय समृद्धी महामार्गासारखे प्रकल्प ,भूमी अधिग्रहण सारख्या कायद्यांमुळे सरकार आपली जमीन हडपत की काय अशी साशंकतेची भावना शेतकऱ्यांच्या  मनात आहे.या साऱ्यामुळेच या देशातील बळीराजा संतप्त आहे. मग  तमिळनाडूचे शेतकरी रस्त्यावर येऊन नग्न धिंड काढतात. महाराष्ट्रात शेतकरी संप पुकारतात. मध्य प्रदेशात हिंसक होतात. याशिवाय  शेत मजूर आणि महिलांच्या परिस्थितीवर तर न बोललेच बरं. बेरोजगारीचा मुद्दा इथेही भेडसावतो आहे. अशावेळी देशातील या सामान्यांना चित्र काय दिसतं आहे? तर देशात बुलेट ट्रेन येते आहे. ही बुलेट ट्रेन फायदा फक्त उद्योगपतींचाच करेल अशी त्याची धारणा होते. कारण बुलेट ट्रेन आली म्हणून गावी वीज आली नाही. बुलेट ट्रेन आली म्हणून तरूणांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत. या सगळ्याचा राग तो वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करतो.  मग मुंबईच्या चेंगराचेंगरीनंतर देशभरातून होणारी टीका ही या रागामुळे होणारी  टीका आहे. राज ठाकरेंनी मुंबईत काढलेल्या मोर्च्याला मिळणारे प्रतिसाद असतील किंवा बनारस विद्यापीठात होणारा विद्यार्थ्यांचा उद्रेक याला हा राग काही प्रमाणात कारणीभूत आहे. देशात सत्तांतर झाले तरी सामान्यांची परिस्थिती बदलली नाही, सुधरली नाही उलट बिघडलीच आहे. म्हणून आज भारतातला सामान्य माणूस अस्वस्थ आहे. नरेंद्र मोदी सत्तेवर येणं ही एक ऐतिहासिक घटना असेलही. पण आज तरी भारतातील सामान्य माणसाचा या घटनेमुळे सगळ्यात मोठा भ्रमनिरास झाल्याचं दिसून येतं आहे.
First published:

Tags: नरेंद्र मोदी, बुलेट ट्रेन

पुढील बातम्या