अग्रणी पुनरुज्जीवन : तासगांव तालुका दुष्काळमुक्तीकडे !

अग्रणी पुनरुज्जीवन : तासगांव तालुका दुष्काळमुक्तीकडे !

मान्सून व परतीच्या पावसाने ही जलगंगा दुथडी होऊन तिचे पाणी झुळूझुळू वाहू लागेल अशी आशा आहे. प्रशासन, लोकसहभाग आणि विविध संस्थांच्या सहकार्याने हे काम झाले. अस्तित्व हरवलेल्या अग्रणीला तिचे मूळ रूप पुन्हा लाभले. ही किमया साधली आहे जलयुक्त शिवार अभियानाने.

  • Share this:

मिलिंद पोळ, सांगली  प्रतिनिधी

तासगांव हा सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुका. माळरानावर सोने पिकवण्याची जिद्द असणाऱ्या तासगांव तालुक्यातील सावळज परीसरातुन अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवनाचे काम साधारणपणे तीन महिन्यांपूर्वी सुरू झाले. जवळपास १० किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. मान्सून व परतीच्या  पावसाने ही जलगंगा दुथडी होऊन तिचे पाणी झुळूझुळू वाहू लागेल अशी आशा आहे. प्रशासन, लोकसहभाग आणि विविध संस्थांच्या सहकार्याने हे काम झाले. अस्तित्व हरवलेल्या अग्रणीला तिचे मूळ रूप पुन्हा लाभले. ही किमया साधली आहे जलयुक्त शिवार अभियानाने.

राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले असून त्याअंतर्गत टंचाईग्रस्त भागात अधिकाधिक पाणीसाठे निर्माण करण्यास प्राधान्य दिले आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी या अभियानाची जोड अग्रणी नदी पुनरुज्जीवनाच्या कामाला दिली. सांगली जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील खानापूर, तासगाव आणि कवठेमहांकाळ या तीन तालुक्यातील ५५ किलोमीटर लांबीची अग्रणी नदी बारमाही करण्याचे कामही जिल्हा प्रशासनाने गतीमान केले आहे.

नदी काठावरील २१ गावांना थेट साहाय्यभूत होणारी अग्रणी नदी पूर्वापार प्रवाहित करून ती बारमाही करण्याची महत्त्वपूर्ण संकल्पना जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी मांडली.  तिला जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह खासदार संजय पाटील आणि  आमदार सुमनताई पाटील यांनी प्रोत्साहन दिले. शासन योजना,जलबिरादरीसह सिंचन क्षेत्रात काम करणाऱ्या अन्य सेवाभावी-स्वयंसेवी संस्थांनी आणि लोकसहभागाने वर्षांनुवर्षे  कोरड्या पडलेल्या आणि अस्तित्व हरवलेल्या अग्रणी नदीचे पुनरुज्जीवन करण्याच्या संकल्पनेला उचलून धरले आणि हे काम करण्याचा विडा उचलला. उपविभागीय अधिकारी विकास खरात आणि तहसीलदार सुधाकर भोसले यांनी हे स्वप्न सत्यात आणण्यासाठी योगदान दिले.

खानापूर तालुक्यातील तामखडीजवळ अडसरवाडी येथे अग्रणी नदीचा उगम झाला आहे. डोंगरातून उगम पावलेली अग्रणी नदी खानापूर, तासगाव आणि कवठेमहांकाळ या तीन तालुक्यातून कर्नाटकातील अथणी तालुक्यात कृष्णा नदीला मिळते. नदीच्या उगमापासून जवळपास २० कि.मी. अंतरापर्यंत अग्रणी नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरणातून भव्य पात्र आज निर्माण झाले आहे. तासगांव तालुक्यातील सिध्देवाडी व सावळज येथील अग्रणी नदीचे पात्र जवळपास १० किलोमीटर  इतके आहे.

उगमापासून तामखडी, जाधववाडी, गोरेवाडी, बेणापूर, बलवडी, करंजे, सुलतानगादे अशा अनेक गावांतून हे काम करताना स्थानिक हजारो हात या भल्या कामासाठी पुढे आले. त्यामुळे जवळपास २ कोटी मूल्य असणारी ही कामे अवघ्या ६५ लाख रुपयांमध्ये पूर्णत्वास आली. तासगाव तालुक्यातही नदी पुनरुज्जीवन कामाला गती मिळाली आहे.  या कामांतर्गत नदीपात्रातील ३ लाख, ७० हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे नदीचे पात्र ५० फूट रुंद व ६ फूट खोल करण्यात प्रशासनाला यश आलं आहे.

या नदीपात्रात ठिकठिकाणी नालाबांध घालण्यात आले आहेत. त्यामुळे साठणाऱ्या पाण्याचा लाभ परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे. नदीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध काम केल्याचे फलित दृश्य स्वरूपात  पावसाने दिसु लागले आहे.  त्यामुळे पावसाच्या प्रत्येक थेंबालाही कृतार्थ झाल्यासारखे वाटले असेल.

अग्रणी नदी बारमाही करण्याच्या उपक्रमांतर्गत सुरुवातीच्या टप्प्यातील अनेक गावांमधून अग्रणी नदीचे पात्र रुंद करण्याबरोबरच त्याची खोलीही वाढविण्यात आली आहे. हे काम हाती घेण्याआधी एखाद्या ओढा-नाल्यासारखी दिसणारी अग्रणी नदी आता खऱ्या  अर्थाने भव्य आणि दिव्य दिसू लागली आहे. अग्रणी नदी बारमाही झाल्यानंतर नदीकाठच्या  गावांना तर लाभ होईलच, पण या उपक्रमामुळे अग्रणी खोरे बारमाही होऊन अग्रणी खोऱ्यातील १०५ गावात जलक्रांती निर्माण होईल.

अग्रणी नदी बारमाही करून दुष्काळग्रस्तांना दिलासा देणाऱ्या या उपक्रमास जलबिरादरीचे प्रमुख जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. कायम दुष्काळी ठरणाऱ्या भागाला या कामामुळे वरदान मिळाले असून, या कामामुळे पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे हा खरं तर राज्यासाठी पथदर्शी प्रकल्प ठरला आहे. अनेक वर्षांपासून दुष्काळ ठाण मांडून बसलेल्या तासगांव तालुक्याच्या पूर्व भागाच्या दुष्काळाच्या झळा यामुळे आता कमी होणार आहेत. या अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी सावळज गावातील तरुण वर्ग हिरीरीने सहभागी होताना दिसत आहे. सामाजिक जाणीव लक्षात घेऊन युवकांनीच आता आपल्या पाण्याची सोय आपणच करायचा चंग बांधला आहे.

आजपर्यंत कित्येक वर्षे अग्रणी बारमाहीच्या वल्गना राजकीय व्यासपीठावरून झाल्या. मात्र सध्याच्या घडीला नदीपात्रात झालेल्या कामाचे स्वरुप लक्षात घेता येणाऱ्या काळात दुष्काळाच्या झळातुन तालुक्याचा पुर्वभाग मुक्त झालेला दिसेल. अशीच आशा आहे.

"केल्याने होत आहे आधी केलेच पाहीजे"

सुमारे तीन चार वर्षापूर्वी अग्रणी पुनरुज्जीवनच्या कामासाठी तासगांव तालुक्यातील सावळज येथे काही युवकांनी काम सुरु केले होते. सुरुवातीला ग्रामस्थांनी त्यास अत्यल्प प्रतिसाद दिला होता. मात्र नदी पुनरुज्जीवनचा लाभ लक्षात आल्यावर शासन व लोकसहभागातून आज नदी पात्राची स्वच्छता झाली  आहे. जलतज्ञ राजेंद्रसिंह राणा यांच्या प्रेरणेने  विश्वास निकम ,राजु सावंत व काही युवकांनी पुनरुज्जीवनची  सुरुवात केलेल्या कामाला आज भलेमोठे स्वरुप आलेले दिसत आहे. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे अशा उक्तीप्रमाणे प्रारंभ केलेल्या अग्रणी पुनरुज्जीवनच्या कामामुळे आज तासगांव पुर्वभागावरील दुष्काळी कलंक पुसला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2017 11:09 AM IST

ताज्या बातम्या