S M L

मद्रास कॅफे : इतिहासाचं प्रभावी चित्रण

Sachin Salve | Updated On: Sep 5, 2013 05:33 PM IST

मद्रास कॅफे : इतिहासाचं प्रभावी चित्रण

sonali deshpande ibn lokmat- सोनाली देशपांडे,सीनिअर असोसिएट एडिटर,IBN लोकमत

एखादी ऐतिहासिक घटना सगळ्यांनाच ठाऊक असते. ती घडूनही फार काळ लोटलेला नसतो. अशा वेळी ती सिनेमात मांडणं आणि सिनेमा शेवटपर्यंत प्रेक्षकांना धरून ठेवणं हे मोठं आव्हानात्मक काम. आणि ते पेललं दिग्दर्शक शुजित सरकारनं आपल्या मद्रास कॅफे सिनेमातून. मद्रास कॅफे म्हणजे श्रीलंकेतली यादवी, तिथे झालेला पराकोटीचा हिंसाचार, भारतानं केलेला हस्तक्षेप आणि या सगळ्यातून झालेली राजीव गांधींची हत्या. हे सगळं येतं मद्रास कॅफेमध्ये. रॉ आपला एजंट विक्रमला श्रीलंकेत पाठवतं आणि मग अनेक गोष्टींचे धागेदोरे मिळत जातात, उलगडत जातात.

 

हा सिनेमा फास्ट आहे, ओघवता आहे. प्रेक्षकाला एकाग्र करून बघायला भाग पाडणारा आहे..श्रीलंकेतली यादवी अधोरेखित करताना दिग्दर्शकानं रॉमधले कच्चे दुवे, लबाड माणसं यावरही चांगला झोत टाकलाय. रॉमध्ये सगळ्यांना फसवून देशद्रोह करणार्‍या बालाची व्यक्तिरेखाही या सिनेमात महत्त्वाची ठरते. नर्गीस फाकरी ही परदेशी पत्रकारही वेगळी वाटते. महत्त्वाचं म्हणजे या व्यक्तिरेखेला कुठेही रोमँटिक अँगल दिलेला नाही.

मद्रास कॅफे एका उंचीवर पोहोचवण्याचं बरंच श्रेय आहे जॉन अब्राहमला. जॉन सिनेमात रॉ एजंटच वाटतो. आपली भूमिका अतिशय संवेदनशीलतेनं केल्यानं जॉनचा विक्रम खरा वाटतो. त्याचा आटापिटा मनाला भिडतो. सिद्धार्थ बासू यांनी रॉच्या अधिकार्‍याची भूमिका साकारलीय. खूप वर्षांनी त्यांना स्क्रीनवर बघताना छान वाटतं. शिवाय प्रामाणिक अधिकारी उभा करताना सिद्धार्थ बासूंची देहबोली एकदम चपखल बसलीय.

Loading...
Loading...

madras cafe

मद्रास कॅफेमधली प्रत्येक व्यक्तिरेखा, प्रत्येक प्रसंग हा त्या सिनेमाचा महत्त्वाचा भाग ठरतो. उगाचंच काही सिनेमात टाकलंय असं वाटत नाही. म्हणून तो सिनेमा आटोपशीरही होतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिनेमात दाखवलेल्या बर्‍याच घटना या इतिहास आहे. तो आपल्याला ठाऊक आहे. तरीही पुढे काय होणार याची उत्सुकता सिनेमा प्रत्येक क्षणाला जिवंत ठेवतो.

सिनेमाचा शेवट म्हणजे राजीव गांधींची बॉम्बस्फोटात झालेली हत्या. ती होणार हे प्रेक्षकांना माहीत असूनही, त्यांना वाचवण्यासाठी जॉननं शेवटी केलेली धावपळ, ऍक्शन प्रेक्षकांना पडद्यावर खिळवून ठेवते. सिनेमात राजीव गांधींचा उल्लेख एक्स प्राइम मिनिस्टर म्हणून केला गेलाय.

शुजित सरकारनं मोजकेच सिनेमे केले. पण ते उल्लेखनीय ठरले. मग तो विकी डोनर असो नाही तर शूबाइट. विकी डोनरची निर्मिती करून वेगळ्या वाटेवरच्या सिनेमांच्या निर्मितीची वाट सोडली नाही. मद्रास कॅफेवरून ते सिद्ध झालंच. माहीत असलेला इतिहास त्याच्या बारीकसारीक पैलूंसकट पुन्हा एकदा प्रभावीपणे मांडणं, हेच या सिनेमाचं मोठं यश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 4, 2013 11:10 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close