S M L

नो मॅन्स लँड !

Sachin Salve | Updated On: Sep 4, 2013 06:25 PM IST

नो मॅन्स लँड !

meena_karnik_blogPosted By- मीना कर्णिक, चित्रपट समीक्षक

‘उसको कुछ नक्को करो सरकार,’ अशी विनवणी करणारी गरोदर शबाना आझमी आपल्या मुक्या आणि मार खाणार्‍या नवर्‍याला, साधू मेहेरला, उचलून उभं करते आणि दोघे निघून जातात. सरकार म्हणजे अनंत नागच्या घराकडे एवढा वेळ टक लावून पाहणारा एक लहान मुलगा जमिनीवरचा दगड उचलतो आणि त्वेषाने घराच्या खिडकीवर फेकतो...

१९७४ साली आलेल्या श्याम बेनेगल यांच्या ‘अंकुर’ या सिनेमाचा हा शेवट होता. मी शाळेत होते आणि सिनेमा पाहून, विशेषत: हा शेवट पाहून भारावून गेले होते. वाटलं, सगळे जण हा सिनेमा पाहणार आणि मग क्रांतीच होणार की! पण त्याहीपेक्षा हे भारावलेपण होतं ते असाही सिनेमा असतो या जाणीवेचं. आपण नेहमी पाहतो त्यापेक्षा हा सिनेमा वेगळा आहे या विचाराचं.‘अंकुर’मुळे सुरू झालेला प्रवास आजतागायत चालू आहे. जाणतेपणी सिनेमांचा आस्वाद घेता यायला लागल्यानंतर भारतीय आणि परदेशी मास्टर्सची पारायणं करून झाली आहेत. यातल्या प्रभाव पाडणार्‍या एकाच सिनेमाची निवड करणं निव्वळ अशक्य आहे. याचं कारण प्रभाव म्हणजे नेमकं काय इथपासूनच सुरुवात करायला हवी. एखाद्या सिनेमाने आयुष्यच बदलून गेलं इतका प्रभाव पडू शकतो किंवा मग वेगवेगळ्या सिनेमांचे निरनिराळे प्रभाव पडत असतात.

 

मग एकच एक सिनेमा कसा शोधायचा? रेंची अप्पू ट्रायॉलॉजी घ्यायची की नाही? कुरोसावाच्या ‘राशोमान’चं काय? आणि त्रुफॉंचा ‘४०० ब्लोज’ किंवा मग बर्गमनचा ‘सेव्हन्थ सील’, किस्लोवस्कीचा ‘डेकेलॉग’ की गोदारचा....या मास्टर्सचा एकेक सिनेमा निवडायचा म्हटलं तरी पंचाईत होणार अशी परिस्थिती. आणि बिमल रॉय यांचा ‘दो बिघा जमीन’ किंवा ‘बंदिनी’, सथ्यूंचा ‘गर्म हवा’, गुरुदत्तचा ‘साहीब बीवी और गुलाम’, विजय आनंदचा ‘गाईड’, राज कपूरचा ‘श्री ४२०’, थोडं नव्या काळात आलं तर महेश भटचा ‘अर्थ’ किंवा केतन मेहतांचा ‘मिर्च मसाला’ आणि ‘स्वदेस’, ‘रंग दे बसंती’ किंवा ‘तारे जमींन पर’चं काय? हॉलीवूडकडे वळलं तर ‘डॉ. झिव्हॅगो’, ‘ब्युटिफुल माईंड‘, ’शॉशॅन्क रिडेम्प्शन‘, ’इनव्हिक्टस‘ यासारखे सिनेमेही विसरता येणं शक्य नाही.

Loading...
Loading...

 

मराठी सिनेमांचा तर दरवाजाही मी उघडलेला नाही. मात्र, अशी निवड करायची तर मी माझ्याचसाठी एक चाळणी केली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मास्टर्स बाजूला ठेवायचे. हॉलीवूडचा विचार करायचा नाही. मुळात फार जुन्या काळात शिरायचंच नाही. भारतीय मुख्य प्रवाह वगळायचा. असा विचार करत असताना मनाशी चमकून गेला ‘नो मॅन्स लँड’. आठवली ती हा सिनेमा पाहिल्यानंतर झालेली माझी प्रतिक्रिया. शेवट पाहताना पोटात पडलेला खड्डा.

‘नो मॅन्स लँड’ २००१ साली प्रदर्शित झाला. आपल्या देशात हा सिनेमा लोकांना जास्त माहीत झाला ते ‘लगान’मुळे. दोन्ही सिनेमे एकाच वेळी ऑस्करच्या शर्यतीत होते. सर्वोत्कृष्ट परदेशी भाषिक सिनेमासाठी. आणखीही एक अप्रतीम सिनेमा त्या वर्षी ऑस्करच्या या यादीत होता. ‘आमिली’. अनेकांना ‘आमिली’ला पुरस्कार मिळाला नाही याचं वाईटही वाटलं. पण ‘नो मॅन्स लँड’समोर ‘आमिली’ टिकणं कठीणच होतं, ‘लगान’ची तर बातच नको. बोस्नियाचा लेखक दिग्दर्शक डॅनिस टॅनोव्हिकचा हा पहिलाच सिनेमा.no man land2

‘नो मॅन्स लँड’ हा युद्धावरचा सिनेमा आहे, तोही बॉस्निया आणि सर्बिया यांच्यातल्या युद्धावरचा सिनेमा आहे असं म्हणता येईल. पण म्हणून तो तेवढाच नाही. त्यात एकूणच युद्धावरचं भाष्य आहे. राजकारण आहे. बाजू घेणं म्हणजे काय आणि तटस्थ राहणं म्हणजे नेमकं काय याचा वेध आहे. माध्यमांवरची टिप्पणी आहे. मैत्री आहे. शत्रुत्व आहे. मानवी नातेसंबंध आहेत. प्रेम आहे. आणि विनोदसुद्धा आहे. यातल्या संवादांमध्ये एक तिरकसपणा जाणवतो आणि शब्द सांगतात त्यापेक्षा आणखी कितीतरी गहन अर्थ दिग्दर्शक आपल्याला सांगू पाहतोय हे जाणवतं. पण त्या आधी थोडक्यात सिनेमाची गोष्ट.

बॉस्नियाचा चिकी नावाचा एक सैनिक आणि निनो नावाचा बोस्नियन सर्ब हे दोन जखमी सैनिक एका खंदकामध्ये अडकून पडले आहेत. हा खंदक आहे नो मॅन्स लँडमध्ये. म्हणजे दोन्ही बाजूंपैकी कोणाच्याच नसलेल्या भूमीवर. चिकीचा मित्र सेराही या खंदकात आहे. त्याच्या शरिराखाली एक सुरुंग आहे. तोही पिन काढलेला. सेराने जरा जरी हालचाल केली तरी फुटेल असा. निनोच्या बरोबर असलेल्या सैनिकाने सेरा मृत आहे असं समजून त्याच्या शरिराखाली हा सुरुंग ठेवलाय. बॉस्नियाचे सैनिक येतील, आपल्या सैनिकाचं शव उचलतील आणि तेही मरतील असं म्हणून. मुळात जिथे तिथे सुरुंग पेरणं हे दोन्ही बाजूचे सैनिक करताहेत. पण बेशुद्धावस्थेत असलेला सेरा शुद्धीवर येतो आणि आपण जराही हालचाल करायची नाहीये हे त्याला चिकीकडून समजतं. दरम्यान चिकी आणि निनो यांच्यात शाब्दिक चकमकी चालू आहेत. एकमेकांवरचा अविश्‍वास, द्वेष आणि सध्या तरी आपल्याला एकमेकांच्या सहवासावाचून पर्याय नाही याची होणारी जाणीव असं हे नातं आहे.

दरम्यान, एक बॉस्नियन आणि एक सर्बियन सैनिक नो मॅन्स लँडमध्ये अडकले असल्याची खबर युनायटेड नेशन्स प्रोटेक्शन फोर्स (युएनपीआरओएफओआर)ला कळवली जाते. दोन्ही बाजूचे अधिकारी आपापल्या सैनिकासाठी मदत मागतात. संयुक्त राष्ट्र संघातर्फे बॉस्नियामध्ये पाठवल्या गेलेल्या या फोर्सचं काम असतं सहाय्य करणार्‍या गटांना संरक्षण देणं, तटस्थ राहणं आणि जे घडतंय ते नुसतं पाहणं. फोर्सचा एक फ्रेंच सार्जंट खंदकापर्यंत पोहोचतो आणि या तीन सैनिकांना मदत करायचं आश्‍वासन देतो. मात्र, तिथून ताबडतोब परत येण्याचा आदेश त्याला वरिष्ठांकडून मिळतो. सुदैवाने एका टेलिव्हिजन चॅनेलची रिपोर्टर तिथे येते. (युएनचे रेडिओ संदेश चोरून ऐकत असल्याने ही बातमी तिला कळलेली असते.) फ्रेंच सार्जंट तिच्या मदतीने आपल्या वरिष्ठांवर दडपण येईल हे पाहतो आणि युएनला मदत पाठवण्यावाचून पर्याय उरत नाही.

चिकी आणि निनोला खंदकातून बाहेर काढलं जातं. बॉम्ब निकामी करणारा एक जर्मन सैनिक खंदकात उतरतो. मात्र एवढ्या तासांचा तणाव सहन झालेल्या चिकी आणि निनोमध्ये सुरू झालेलं भांडण विकोपाला जातं आणि चिकी निनोवर पिस्तुल रिकामं करतो आणि स्वत: एका शांतीसैनिकाच्या गोळीचा बळी पडतो.no man land

खंदकातला सुरुंग निकामी करणं अशक्य आहे हे जर्मन सैनिकाच्या लक्षात येतं. फोर्सचे वरिष्ठ शक्कल लढवतात. एका भलत्याच सैनिकाला खंदकातून बाहेर काढतात आणि सुरुंग निकामी केल्याचं पत्रकारांसमोर जाहीर करतात. सेरा वाचला असं म्हणून सगळ्यांना तिथून परत फिरण्याचा आदेश दिला जातो. फोर्सचे कमांडर बॉस्निया आणि सर्बियन सैनिकांना शत्रू तो खंदक रात्री ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार असल्याची खोटी माहिती पुरवतात, ज्यायोगे रात्री त्या भागात चकमक होईल आणि सेराच्या मृत्यूचा पुरावा पुसला जाईल. दिवस मावळत असतो आणि खंदकामधल्या सेरावरून कॅमेरा मागे येतो. आणि सिनेमा संपतो.

पहिल्यांदा हा सिनेमा पाहताना अंगावर सर्रकन आलेला काटा अजूनही माझ्या लक्षात आहे. हा काय शेवट झाला? सेराला सरळ मेलेला दाखवला असता तरी चाललं असतं, पण हा असा सुरुंगावर ताठ झोपलेला सेरा आणि दूरवर मावळणारा सूर्य आपल्या डोळ्यांसमोर हलत नाहीयेत त्याचं काय करायचं असा प्रश्‍न रागाने दिग्दर्शकाला विचारावा असं वाटलं होतं. त्यानंतर आणखी दोन तीन वेळा मी हा सिनेमा पाहिला आणि त्यातले अनेक बारकावे जाणवून तो अधिकच थोर वाटू लागला.

सिनेमातल्या तिरकस, खटकेबाज संवादांची ही काही उदाहरणं पहा.

सिनेमाची सुरुवात होते तेव्हा गर्द धुक्यात बॉस्नियन सैनिकांना एक गाईड घेऊन चालल्याचं आपल्याला दिसतं. पुढे जाणं खूप धोक्याचं आहे असं गाईड म्हणतो त्यावर चिकी पुटपुटतो, ‘याच्याबरोबर तर कॉफी पिणंही धोकादायक आहे!’ आशावादी आणि निराशावादी माणसांमधला फरक सांगणारा हा संवाद पहा, ‘निराशावादी माणसाला परिस्थिती यापेक्षा खराब होऊच शकत नाही असं वाटत असतं आणि आशावादी माणसाला, तशी ती होऊ शकते हे माहीत असतं.’

एका दृष्यात दोन सैनिक नो मॅन्स लँडच्या दिशेने दुर्बिण लावून बसलेले असतात. तिथे काही घडतंय का हे पाहण्यासाठी. त्यांचा अधिकारी त्यांना म्हणतो, काही बदल जाणवला तर मला कळवा. बदल म्हणजे? बरोबरच्या सैनिकाने विचारलेल्या या प्रश्‍नाला दुसरा सैनिक उत्तर देतो, म्हणजे मेलेली माणसं चालताना दिसू लागली तर... याच दोन सैनिकांपैकी एक जण देखरेख करत असतो तर दुसरा वर्तमानपत्र वाचत असतो. मध्येच तो म्हणतो, ‘फक्... वॉट अ मेस इन रवांडा!’ युद्धभूमीवर जीव धोक्यात असताना रवांडामधल्या बिघडलेल्या परिस्थितीवर प्रतिक्रिया देणारा हा सैनिक थोरच म्हणायला हवा.

सुरुंग निकामी करणारा सैनिक खंदकात उतरतो तेव्हा वरून त्याच्याकडे पाहणार्‍या दोन शांतीसैनिकांपैकी एकजण म्हणतो, ‘किती भयंकर काम आहे हे. असं म्हणतात की हे काम करणारा सैनिक आयुष्यात एकच चूक करतो.’ त्यावर दुसरा म्हणतो, ‘एक नाही, दोन. पहिली चूक तो हे काम स्वीकारतो ती असते!’

आणि हा फ्रेंच सार्जंट आणि इंग्लिश रिपोर्टरमधला संवाद. खंदकात अडकलेल्या सैनिकांना मदत करण्यासाठी तू एवढा का धडपडतोयस असा प्रश्‍न रिपोर्टरच्या मनात आहे. ती विचारते, ‘तू तटस्थ असायला हवंस ना?’ यावर सार्जंटचं उत्तर, ‘खुनाचा सामना करत असताना तुम्ही तटस्थ नाही राहू शकत. तो खून थांबवण्यासाठी काही न करणं याला बाजू घेणं म्हणतात.’

एका बाजूला या रिपोर्टरच्या मदतीने फोर्सवर दडपण आणण्याचं काम फ्रेंच सार्जंट करतो आणि माध्यमांचा उपयोग आपल्याला दिग्दर्शक दाखवतो आणि दुसर्‍या बाजूला माध्यमांची बातमीची भूक काही वेळा किती विकृत वळण घेते याचंही दर्शन घडवतो. या रिपोर्टरला स्टुडिओतला तिचा बॉस म्हणतो, ‘सुरुंगावर पडलेल्या त्या सैनिकाची मुलाखत घेता आली तर फारच छान होईल. दरम्यान इतर दोघांशी बोल आणि मग आपण ताबडतोब लाईव्ह एअरवर जाऊ.’ पत्रकारांच्या याच वृत्तीने संतापलेला चिकी त्यांना गिधाडं म्हणतो आणि त्यानंतरच्या बाचाबाचीमधून चिकी आणि निनो मरून पडतात आणि या रिपोर्टरचा आपल्या कॅमेरामनला पहिला प्रश्‍न असतो, ‘डिड यू गेट इट?’

आणि चिकी आणि निनोमधलं नातं? त्यांच्यातला तणाव? तोही छोट्याछोट्या प्रसंगांमधून दिग्दर्शकाने नेमका दाखवलाय. सुरुवातीला चिकीच्या हातात बंदूक आहे. दोघांमध्ये वाद चाललाय. तुमच्यामुळे आपल्या देशाची वाट लागलीये. नाही, तुम्ही आधी लढाई सुरू केलीत. एका क्षणी चिकी म्हणतो, तुमच्यामुळे युद्ध झालं असं म्हण. कारण माझ्याकडे बंदूक आहे आणि तुझ्याकडे नाही. घाबरलेला निनो तसं म्हणतो आणि त्याला जोड देतो, पण आता आपण सगळे या चिखलात सापडलो आहोत एवढं मात्र खरं. नंतरच्या एका प्रसंगात, निनोच्या हातात बंदूक येते आणि तो चिकीकडून आमच्यामुळे युद्ध झालं असं म्हणवून घेतो. का? कारण बंदूक माझ्याकडे आहे. ज्याच्या हाती ताकद तो म्हणेल ती पूर्व दिशा इतकं साधं सरळ समीकरण आहे हे. खूप भांडल्यानंतर तिघेजण सिगारेट शेअर करतात, प्रत्येक सैनिकाच्या खिशात एखादा फोटो असतो यावर गप्पा मारतात आणि चिकीची गर्लफ्रेन्ड निनोच्या गावची निघते तेव्हा माहितीची देवाणघेवाणही करतात. केवळ देशांमध्ये भांडण आहे म्हणून हे शत्रू आहेत, नाहीतर मित्र बनण्याची सगळी शक्यता त्यांच्यात आहे.

खरंच, किती वेगवेगळ्या पातळींवर दिग्दर्शक बोलू शकतो, नेमकेपणाने आणि ठामपणे बोलू शकतो हे हा सिनेमा दाखवून देतो. एका बाजूला दिग्दर्शकाच्या मातीतली ही गोष्ट सांगताना तो किती वैश्‍विक बनून जातो याचं उदाहरण हा सिनेमा देतो. हा लेख लिहिण्याच्या निमित्ताने ‘नो मॅन्स लँड’ मी पुन्हा एकदा बघितला. आपल्याला तो तेवढाच भावतोय का हे तपासण्यासाठी. आणि लक्षात आलं, आधी आवडला होता त्याहून जास्त आपल्याला तो आवडलाय. नव्याने काही जागा दिसल्या आहेत. या सिनेमाने आपल्याला परत एकदा अस्वस्थ केलंय. खंदकामधला सुरुंगावर पडलेला सेरा पाहून पुन्हा आपल्या पोटात खड्डा पडलाय. अजूनही डोळ्यासमोरचं ते दृष्य जात नाहीये. प्रभाव, प्रभाव म्हणजे आणखी काय असतं?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 4, 2013 06:22 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close