का घडतंय पुन: पुन्हा तेच?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 27, 2013 10:16 PM IST

का घडतंय पुन: पुन्हा तेच?

ketki joshiPosted By - केतकी जोशी, असोसिएट एडिटर,IBN लोकमत

 

पुन्हा तेच घडलंय... अगदी तसंच... फक्त ठिकाण, शहर बदललंय... नाहीतर काय फरक आहे? पुन्हा एकदा एका मुलीचं आयुष्य उद्‌ध्वस्त करून टाकणारा बलात्कार... त्यावरच्या संतप्त प्रतिक्रिया... निषेध मोर्चा... अगदी तेच... विरोधकांनी केलेली सत्ताधार्‍यांच्या राजीनाम्याची मागणी... पण या सगळ्यांमध्ये पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न फक्त चर्चेच्या पातळीवर... एखाद्या मुलीला, महिलेला अगदी मनापासून खरोखर सुरक्षित वाटायला पाहिजे, असं का नाही वाटत कोणाला?

मुलींना कुठेही, कधीही अगदी बिनधास्तपणे फिरता येतं अशी ख्याती या मुंबईची... अगदी रात्री-अपरात्रीही कोणाची सोबत नसेल तरीही महिला मुंबईत घराबाहेर पडू शकतात, बाहेर फिरू शकतात असं म्हटलं जायचं... अगदी लोकलच्या प्रवासापासून ते रस्त्यावर चालण्यापर्यंत खरोखर या मुंबईत सुरक्षित वाटायचं... अगदी पहाट असो किंवा अपरात्र पुरुषांच्या सोबतीनं महिलाही मुंबईत आपली जबाबदारी, कर्तव्यं पार पाडण्यासाठी बाहेर जाऊ शकायच्या.

मग आताच हे असं का घडतंय? कोणतीही वेळ असो, का शंका येते मनात... कसली तरी अनामिक भीती प्रत्येकीच्याच मनाच्या कोपर्‍यात दडून बसलेली... बाहेर तर पडावंच लागतं... अनेकींना आपलं पोट भरण्यासाठी, शिक्षणासाठी, करिअरसाठी...थांबून कसं चालेल. म्हणून बाहेर तर पडतातच या महिला... पण मनातल्या या भीतीचं काय करायचं? ज्या शहरात इतक्या विश्वासानं आलो, विसावलो, ज्या शहरानं आत्मविश्वास दिला,तिथं असं अविश्वासाचं वातावरण कसं झालं याचं उत्तर काही मिळत नाही.

कितीतरी वेळेस लोकलमध्ये रात्री अगदी उशिरा प्रवास करताना किंतुही मनात यायचा नाही. आता मात्र दिवसाही सांभाळावं लागतंय... न जाणो, कोणीतरी हल्ला करेल का आपल्यावर, कोणी डब्यात शिरेल... बाहेरून एखादा दगड आला तर... सगळ्यात वाईट म्हणजे या कालच्या घटनेनं तर दिवसाही असुरक्षितता वाटायला लागली आहे. आपण खंबीर राहायला पाहिजे, प्रतिकार करायला पाहिजे... आवाज उठवला पाहिजे... सगळं पटतंय... पण संधीच नाही मिळाली तर... ही भीतीही आहेच ना!

mumbai gang rape

निर्भया प्रकरणानं धास्तावलेल्या पोलिसांनी आता या प्रकरणात अगदी युद्धपातळीवर तपास करून पाचही आरोपींना अटक तर केलीय, पण त्यामुळे या मुलीचं उद्‌ध्वस्त झालेलं आयुष्य परत येऊ शकतं का? या बलात्कार झालेल्या आरोपींना फक्त शिक्षा देऊन हे प्रकरण संपत नाही. तर या मुलींचं पुनर्वसन करणं, त्यांना परत सामान्य त्यांचं पूर्वीसारखं आयुष्य जगण्याची संधी देणं ही त्याहीपेक्षा मोठी आव्हानं आहेत.

या सगळ्यामध्ये एकाच गोष्टीचं वाईट वाटतं, ते म्हणजे निर्भया प्रकरणात किंवा आताच्या मुंबईच्या प्रकरणात बलात्कार झाल्यानंतर ती तिथं कशाला गेली होती, हा प्रश्न कसा काय विचारला जाऊ शकतो... एखाद्या मुलीवर बलात्कार झाल्यावर तिचे कपडे, तिचं अमुक वेळेला बाहेर जाणं, तिच्यासोबत कोणी होतं की नव्हतं, ती तिथं जायची गरजच काय होती, या सगळ्यावर कशी काय चर्चा होते... बाहेर गेलेल्या मुलीवर, महिलेवर बलात्कार होतो, तेव्हा ती बाहेर जाण्याचा मुद्दा उपस्थित करणार्‍यांना एकच प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे जेव्हा घरात घुसून बलात्कार केला जातो, तेव्हा काय म्हणायचं...आपल्यावर कोणत्याही क्षणी बलात्कार होईल या भीतीनं मुलींनी, महिलांनी बाहेर जाण्याचं थांबवायचं...

उलट आपल्या समाजातल्या मुलींना, महिलांना कोणत्याही वेळेस, कुठेही निर्धास्तपणे जाता यावं असं वातावरण आपल्या समाजात निर्माण व्हावं यासाठी काय करता येईल यावर नुसतीच चर्चा करण्यापेक्षा काय करता येईल ते पाहिलं पाहिजे... आणि ते अगदी वैयक्तिक पातळीपासून ते प्रशासकीय पातळीपर्यंत झालं पाहिजे... पण साधा जाता जातासुद्धा मुलीला, महिलेला ते अगदी वृद्ध बाईलाही धक्का मारण्याची मानसिकता कशी बदलता येणार? मुळात बाई दिसली की अश्लील बोलणं, तिला स्पर्श करणं, धक्का मारणं हे कसं थांबवणार...

एखाद्या मुलीनं नकार दिला की तो पचवण्यापेक्षा तिच्यावर अ‍ॅसिड टाकणं सोपं आहे, असा विचार कधी बदलणार... आणि या सगळ्यासाठी गरज आहे ती अत्यंत कठोर आणि जरब बसणार्‍या अशा शिक्षेची... गुन्हा केला तरी काही दिवसांनी सुटून बाहेर येऊ शकतो, हे माहिती असल्यामुळे शिक्षेचं गांभीर्य राहत नाहीये. अगदीच नशीब असेल तर गुन्हा सिद्धही होत नाही... कधी कधी तर गुन्हा सिद्ध होऊ नये यासाठी काय करावं लागतं हेदेखील आधीच माहिती असतं... त्यामुळेच तर शिक्षेची जरब नाही आणि नैतिकतेचा धाक नाही अशा परिस्थितीत विनयभंग, बलात्कार ते अगदी अ‍ॅसिड टाकण्यापर्यंत म्हणनूच धाडस केलं जातं. अत्यंत कठोर आणि गंभीर अशी शिक्षा झाल्याशिवाय त्याबद्दल जरब बसणार नाही... पण तोपर्यंत असे आणखी किती बलात्कार घडत राहणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 27, 2013 10:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close