मला माफ करा डॉक्टर

Sachin Salve | Updated On: Aug 26, 2013 06:33 PM IST

मला माफ करा डॉक्टर

 

तुम्ही गेल्यानंतर मी श्रद्धांजली सभेला गेलो नाही

मोर्च्यात ही गेलॊ नाही

अपराधी भावनेने मन भरून आलंय

तुमच्या १८ वर्षांच्या लढाईत मी काहीच का केलं नाही

समुद्राने पिल्लं नेलेल्या टिटवीच्या आकांताने तुम्ही ओरडताना मी समुद्राचे  सौंदर्य बघत राहिलो

कधी ना तुमच्या आंदोलनात आलो … आंदोलनाच्या बाजूने लेख सोडाच साधे वाचकांचे पत्रही लिहिले नाही

फक्त तुम्ही भेटल्यावर हवापाण्याच्या गप्पा माराव्यात तशी विधेयकाची चौकशी करत राहिलो

क्रिकेटचा सामना बघावा तसा सरकारविरुद्ध अंनिस ही लढाई बघत राहिलो

प्रत्येक ख्रिस्ताला आपला क्रूस आपल्यालाच वाहून न्यावा लागतो …हे लढाईच्या बाबतही खरे असते का ….?

तुम्ही आम्हाला हवे होता महाराष्ट्र फाऊंडेशनसाठी, साधनेसाठी व्याख्यानमालांसाठी माझ्या पुरोगामी प्रतिमेला झळाळी देण्यासाठी…

यासाठी मला तुमची मैत्री हवी होती ….तुमच्या लढाईशी मला काहीच घेणे नव्हते

मंत्रालयाच्या पायया दर अधिवेशनापूर्वी तुम्ही एकटेच चढत होता

आणि अधिवेशन संपल्यावर विधिमंडळातून एकटेच पायरया उतरत होतात …।

मी मात्र मोजत होतो वर्षे क्रिकेट्च्या सामन्यासारखी

तुम्ही गेल्यावर रस्त्यावर उतरलेल्या गर्दीच्या एक दशांश गर्दी तेव्हा जरी उतरली असती तर तुमची तडफड तगमग कारणी लागली असती

तुमच्या मरणाची ब्रेकिंग न्यूज संपल्यावर तुमची जिवंतपणी उपेक्षा करणारे आम्ही खरच लढणार आहोत का?

आता आम्ही म्हणतो आहोत गोळीने विचार संपत नाही

असेच आम्ही म्हणालो होतो गांधीला संपवल्यावर

असेच आम्ही म्हणालो होतो सफदर हाश्मीला संपवल्यावर

असेच आम्ही म्हणालो होतो शंकर गुहा नियोगीला संपविल्यावर

पण आज वास्तव काय आहे डॉक्टर

मोदीमय गुजरातेत गांधी कुठे शोधायचे

सफदर हाश्मीचे राजकीय नाटक कोणत्या रस्त्यावर बघायचे

भांडवलदार आणि नक्षलवाद्यांनी वाटून घेतलेल्या छत्तीसगढमध्ये नियोगी कुठे शोधायाचे

आपल्या महान परंपरेनुसार जिथे गावोगावी तुम्ही शिव्या खाल्ल्या तिथे आता तुमच्यासाठी गावोगावी हार आहेत

तुमचा स्मृतिदिन, तुमचे स्मारक, तुमच्या नावाने पुरस्कार हे सारं यथासांग साजरे आम्ही करू

तुम्हाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना तुम्हाला १८ वर्षे ज्यांनी तळतळ करायला लावली त्यांच्याकडून आम्हाला तुमचे मोठेपण ऐकावे लागेल….

डॉक्टर

मला लाज फक्त याची वाटते की १८ वर्षे तुम्ही लढताना मी निष्क्रिय जिवंत होतो

तुम्ही असहाय्यपणे मारले जाताना मी जिवंत होतो…

 

- Posted by हेरंब कुलकर्णी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 24, 2013 06:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close