सीमेपलीकडे सहकार्याची गरज !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 13, 2013 10:59 PM IST

jatin_desai_150x150(Posted by -जतीन देसाई पत्रकार आणि पाकिस्तानातील राजकीय घडामोडींचे विश्लेषक)

काहीजणांना सतत बातम्यात कसं राहायचं याचं ज्ञान असतं. एखादं निवेदन करून वाद निर्माण करायचा आणि त्यातून उमटणार्‍या प्रतिक्रियेतून प्रसिद्धीत कायम राहण्याचं तंत्रज्ञान काही लोकांना अवगत असतं. यात प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजूंचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांनी धर्मनिरपेक्ष नेतृत्वाखाली एकत्र यायला पाहिजे असं जाहीर निवेदन न्या.काटजूंनीनागपूर येथे एका कार्यक्रमात केलं.

1947 पर्यंत हे तिन्ही देश एकत्र होते. हजारो वर्षांचा समान इतिहास त्यांचा आहे. राष्ट्रवादाच्या सिद्धांतामुळे भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तान अस्तित्वात आला. पण धर्म देशाला एकसंध ठेवू शकत नाही हे 1971 ला स्पष्ट झालं आणि पाकिस्तानचं विभाजन होऊन बांगलादेश अस्तित्वात आला. काटजूंच्या निवेदनात धर्माच्या आधारे भारताची झालेली फाळणी अवैज्ञानिक आणि अतार्किक असल्याचं सुचवतं. फाळणीला हिंदू आणि मुस्लीम समाजातील जातिवादी जबाबदार होते हे नाकारून चालत नाही. 1940 मध्ये मुस्लीम लीगनं लाहोर येथे हिंदू आणि मुस्लीम समाज म्हणजे दोन भिन्न राष्ट्रीयता अशा स्वरूपाचा प्रस्ताव मंजूर केलेला. त्यापूर्वी 1937 मध्ये हिंदू महासभांनी देखील अशाच प्रकारचा प्रस्ताव त्यांच्या अहमदाबाद येथील अधिवेशनात मंजूर केलेला.

फाळणी ही वास्तविकता आहे. या तिन्ही देशांनी धर्मनिरपेक्ष नेतृत्वाखाली एकत्र यावं अशा आशयाची चर्चा कुठल्याही देशात नाही. मात्र या तिन्ही देशांनी चांगलं शेजारी म्हणून राहावं, असं लोकांना आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला वाटतं. भारत आणि पाकिस्तानच्या बाबतीत हे जास्त महत्त्वाचं आहे. 1985 साली दक्षिण आशियातील देशांमध्ये प्रादेशिक सहकार्य वाढावं यासाठी साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल को-ऑपरेशन (सार्क) ची स्थापना करण्यात आली. आज दक्षिण आशियातील 8 देशांचा त्यात समावेश आहे. सार्क देशांचा एकमेकांशी त्यांच्या एकूण आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या 5 टक्के एवढाच व्यापार आहे.  याउलट युरोपियन आणि आशियन गटाचा आपल्या संलग्न देशांशी परस्पर व्यापार 45 टक्के एवढा आहे. सार्कमध्ये भारत आणि पाकिस्तान मोठी राष्ट्रं. त्यांच्यातील परस्पर अविश्वास, तणावाचा सार्कवर परिणाम होतो. ही वस्तुस्थिती असल्याने सार्क अजून तरी फारसा प्रभावी ठरला नाही.

भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशनं सार्कला कसं प्रभावी करता येईल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. या देशांनी एकत्र येण्याऐवजी त्यांच्यात परस्परात आणि सार्क देशात प्रादेशिक सहकार्य कसं वाढेल, हे पाहणं महत्त्वाचं आहे. वाढत्या व्यापारातून चांगले संबंध निर्माण होतात. प्रादेशिक व्यापारातून आर्थिक फायदा होतो आणि तो समाजातील सर्व वर्गाला मिळतो. आंतरराष्ट्रीय संबंधातदेखील आर्थिक हितसंबंध सगळ्यात महत्त्वाचा असतो. आर्थिक हितसंबंध दोन किंवा अधिक देशांना जवळ आणण्यात महत्त्वाचा असतो.

Loading...

प्रादेशिक सहकार्य वाढल्यास व्यापार वाढेल, त्यामुळे एकमेकांच्या देशात लोकांचं येणं-जाणं वाढेल. येण्या-जाण्यामुळे अनेक गैरसमज दूर होण्यात मदत होईल. याकरिता व्हिसाचे नियम आसान करावे लागतील आणि व्यापार व आर्थिक हितसंबंधांमुळे हे सार्क देशाला करावं लागेल. भारत-पाकिस्तानात व्यापार हळूहळू वाढायला लागला आहे. पाकिस्तानासमोर आज सर्वात मोठा प्रश्न वीज समस्येचा आहे. भारतातून वीज खरेदी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पाकिस्तानातील एका शिष्टमंडळानं गुजरात राज्यात जाऊन दोन वीज प्रकल्पांची भेटदेखील घेतली आहे. गुजरातमधून वीज खरेदी करण्यास पाकिस्तानला काही अडचण नाही. थोडक्यात आर्थिक कारण सर्वात महत्त्वाचं असतं.

भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशचा एक महासंघ बनावा, असा विचार समाजवादी विचारवंत डॉ.राममनोहर लोहियांनी यापूर्वी मांडलेला. एकत्र येण्याऐवजी या तिन्ही देशांत वेगवेगळ्या मुद्द्यांवर सहकार्य कसं वाढेल, हे पाहणं जास्त गरजेचं आहे. बांगलादेशात या वर्षीच्या शेवटी निवडणुका होणार आहेत. बांगलादेशात अवामी लीगचे सरकार कायम राहील हे भारताच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. याकरिता भारतानं काही पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. दोन्ही देशांतील लँड बाऊंड्री ऍग्रिमेंटला भारतीय संसदेनं मंजुरी देणं गरजेचं आहे. याशिवाय तिस्टा नदीच्या पाण्याच्या वाटपावर समजुती होणंदेखील आवश्यक आहे.

प्रादेशिक सहकार्यातून एकमेकांबद्दल विश्वास वाढेल. एकदा विश्वास निर्माण झाल्यानंतर भविष्यात त्याचे काय परिणाम होतील, हे आता सांगणं कठीण आहे. इतिहास कुठली वाट घेईल, याचा अंदाजदेखील घेता येत नसतो. लोक आणि परिस्थिती इतिहास घडवितात. पूर्व आणि पश्चिम जर्मनी एकत्र आल्याचं उदाहरण आपल्यासमोर आहे, तसंच उदाहरण प्रचंड शक्तिशाली सोव्हिएत रशियाच्या विघटनाचं पण आहे. पाकिस्तानात बलुचिस्तान प्रांतात स्वतंत्र होण्यासाठी अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. भारताच्या काश्मीर खोर्‍यात देखील स्वतंत्र होण्यासाठी चळवळ सुरू आहे. एकूण अशा परिस्थितीत भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशनं एकत्र येण्याऐवजी त्यांच्यात परस्पर सहकार्य कसं वाढेल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. चांगले शेजारी म्हणून आपल्याला कसं जगता येईल, या गोष्टीला महत्त्व देण्याची आवश्यकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2013 10:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...