S M L

एक पत्र राजसाहेबांना....

Sachin Salve | Updated On: Aug 9, 2013 07:30 PM IST

एक पत्र राजसाहेबांना....

santosh ganjureराजसाहेब आपली वक्तृत्वशैली असो वा जीवनशैली त्याचे प्रचंड आकर्षण आजच्या तरुणाईला आहे, तर इतरांना कौतुक. मग तो विरोधी पक्षातील असो वा अमराठी!!! अर्थात आम्हीही त्यास अपवाद नाही आहोत. पण ते वैचारिक साम्यतेमुळे. साहेब कोणत्या विषयावर काय बोलतील, कोणावर टीका करतील, कोणाचे कौतुक करतील याचे अचूक अंदाज आम्ही बांधत असू, ते इतके अचूक असत की काही मित्रांना मी भाषणे लिहून देतो की काय अशी शंका येते. पण आता साहेबांची मोहिनी ओसरत चालली आहे, आमचे अंदाजही चुकू लागलेत. जसा पक्षाचा विकास वेगाने झाला तशाच लोकांच्या अपेक्षाही वाढल्या, पण त्यांचा भ्रमनिरासच झाला.

समर्थकांसह विरोधकांचेही लक्ष नाशिकवर केंद्रित झालंय, होणारच. कारण नाशिक शहरात आपले तीन आमदार आहेत ज्यांचा कालावधी संपत आलाय, महापालिकेत सत्ता आहे. पण विकासाची कुठे सुरुवात आहे असे दिसत नाही. लोकांचा भ्रमनिरास होतोय आणि याची आपणास निश्चित जाणीव आहे. वेळोवेळी पुरेसा कालावधी पूर्ण झाला नाही, पूर्ण सत्ता नाही अशी कारणे आपण देत आहात. नाशिक शहरात आपले तीन आमदार आहेत ज्यांचा कालावधी संपत असताना, महापालिकेत सत्ता असताना आपण अशी कारणे देणे शोभत नाही. सत्तेत असल्याशिवाय कामे होत नाही हे पटत नाही. कारण विरोधी पक्षातीलही काही आमदार-खासदार आहेत जे सत्तेत नसताना जोमाने काम करत आहेत. मग इतरांना का अडचण यावी. आपण एक-दोन वर्ष पाळणा नाही हलला तर अनेक शंका घ्यायला. अनाहूत सल्ले द्यायला सुरुवात करतो. मग एक वर्षानंतर काही कामांची अपेक्षा करणे निरर्थक नक्कीच नाही. लोकांसाठी स्वत:ची संस्कृती,अस्मिता टिकवण्याबरोबरच विकासही महत्त्वाचा आहे. बायको नुसती सुंदर असून चालत नाही तिला मुलंही व्हायला हवीत ना?

मोदींनी ठेका दिल्याप्रमाणे गुजरातेतून जशा विकासाच्या बातम्या येतात तशाच बातम्या नाशिकमधून येतील अशी आमची भोळी आशा होती. होती अशासाठी की, आता वर्ष उलटून गेले पण तिकडे विशेष काही होतेय याची जराशीही कुणकुण लागत नाहीये. गुजरातेत काय, किती आणि खरंच विकास झालाय हे आम्ही थोडंच पाहिलंय? पण सगळेच उदोउदो करतायत आणि आपण स्वत: गुजरातचा विकास पाहून आला आहात आणि तोंडभरून स्तुतीही केली आहे म्हणजे नक्कीच विकास होतोय असे मानायला हरकत नाही. पण आपल्या नाशिकमधून, महाराष्ट्रातून अशा बातम्या कधी येणार?

 Raj Thackeray blog

आमच्या पुरंदरमध्ये विजयबापू शिवतारे या शिवसेनेच्या वाघाने, नजरेत भरेल असा कामं करण्याचा सपाटा लावला आहे, तेही विरोधी पक्षातच आहेत आणि राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात!! त्यांची कामं बघून बारामतीकरांना घाम फुटलाय म्हणे. निवडणुकीच्या वेळी आमच्या मातोश्रींनी कोणाला मत देऊ असं विचारलं तर आम्ही रेल्वे इंजिनवर शिक्का मार म्हणालो. माझा पक्ष आहे. शेजारीपाजारी, सगेसोयरे म्हणाले घड्याळ्यावर शिक्का मार आपला पाहुणा आहे. आईने बेधडक धनुष्यबाणावर शिक्का मारला. तोपर्यंत धनुष्यबाणाचा पुरंदरशी संबंध फक्त अनामत रक्कम जप्त होण्याइतपतच होता. यावेळी इतरांची अनामत रक्कम जप्त झाली!! आज आम्हाला आमच्या मातोश्रींचा अभिमान वाटतोय. ती अशिक्षित आहे पण अडाणी नाही.त्यामुळे आपल्याकडे सत्ता नाही, पुरेसा कालावधी मिळाला नाही अशी कारणे आपल्यासारख्या डॅशिंग नेत्याकडून अपेक्षित नाहीत.

Loading...

आता विधानसभा निवडणूका जवळच आल्यात. काही दिवसांत आपण सभा घ्यायला सुरुवात कराल. पण खरं सांगतो साहेब, सभा ऐकण्याची ती ओढ शिल्लक नाही राहिली. मान्य आहे बरेचशे वैचारिक दिवाळखोर नेते आहेत. त्यांच्यावर आपण टीकाटिप्पणी करता, त्यांची खिल्ली उडवता, नक्कल करता. आम्ही ते शेकडो वेळा पाहिलंय. पुन्हा पुन्हा, पण आता ते पाहून आम्हाला हसू येत नाही. त्या नेत्यांनी सुद्धा आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी काही ना काही कामं केलीत, काही तजवीज केलीय. याउलट आपल्या नेत्यांची- कार्यकर्त्यांची नावे खंडणी वसुली, खून, मारामारी, बलात्कार अशा अनेक गुन्हेगारी खटल्यांत येतायत आणि आपण सभामधून एकहाती सत्तेची मागणी करताय. जनतेचं राहू दे बाजूला, पण कार्यकर्त्यांचे काय. त्यांना अपेक्षित ऊर्जा मिळालीच नाही, कसं काम करणार ते. सत्तेची पहिली पायरी म्हणून नाशिककडून काही अपेक्षा होत्या पण सर्वांच्या पदरी निराशाच पडलीय. आपल्या टीकेचा, कारणांचा आम्हाला उबग आला आहे. त्यामुळे उद्या कोणीही एखादा टग्या उठून साहेबांना रड्या म्हणेल, आम्हाला ते बिलकूल आवडणार नाही. पण त्याचा विरोध तरी आम्ही कसा करायचा?

posted by- संतोष गांजुरे, मुंबई

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 9, 2013 06:38 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close