Elec-widget

काँग्रेसवाल्यांमुळे आंबेडकरी तरुण नक्षलवादाच्या वाटेवर?

काँग्रेसवाल्यांमुळे आंबेडकरी तरुण नक्षलवादाच्या वाटेवर?

  • Share this:

saudhakar kasyap                                    posted by- सुधाकर काश्यप, प्रिन्सिपल करस्पाँडंट, IBN लोकमत

बस्तर येथे नक्षलवाद्यांनी काँग्रेसच्या नेत्याची हत्या केल्यानंतर नक्षलवादाबाबत देश पातळीवर चर्चा सुरू झालीय तर इथं महाराष्ट्रात आंबेडकर अनुयायी नक्षलवादाच्या वाटेवर याची चर्चा सुरू झालीय. याचे दोन मुद्दे आहेत. एक नक्षलवाद आणि दुसरा आंबेडकर अनुयायी. आंबेडकर अनुयायी हा या देशातील एक ताकदवान आणि धोकादायक घटक आहे. याची चिंता सर्वच राजकीय पक्षांना असते.

आंबेडकर अनुयायी अस्वस्थ आहे. तो राजकीय, सामाजिक आणि आर्थिक बाबतीत पराभूत झाला आहे. या देशातील राज्यकर्ती जमात व्हा, असं बाबासाहेब म्हणाले होते. पण आंबेडकर अनुयायांचा एक सक्षम राजकीय पक्ष नसल्याने तो राजकीय पराभूत झालाय. सामाजिक बाबतीत समाज संघटित नाही. त्याला आजही जातीयतेला तोंड द्यावं लागतंय. दिवसेंदिवस ही परिस्थिती बिकट होत चाललीय. बाबासाहेबांनी समतेची चळवळ सुरू केल्यांनतर समाजाला जाग आली. पण आंबेडकर अनुयायाला खर्‍या अर्थाने जाग आली आणि तो आक्रमक झाला तो दलित पँथरच्या चळवळीनंतर. दलित पँथरच्या चळवळीने समाज एकप्रकारे झपाटला होता. वरची पोस्ट मिळवायची. कलेक्टर, अधीक्षक व्हायचंच असं समाजातील तरुणांना वाटत होतं आणि तो सरकारातील महत्त्वाची पदं मिळवतही होता. 1990 नंतर परिस्थिती पुन्हा बदलली. 1990 नंतर सरकारी नोकरभरती बंद झाली. यामुळे समाज पुन्हा एकदा बिथरला. नोकरीमुळे स्थैर्य आलं होतं. त्यामुळे संघटना उभ्या राहत होत्या. मात्र नोकरी मिळत नसल्याने पुन्हा संघटनांवर परिणाम होत होता. एकूणच काय, तर आंबेडकरी तरुणाचा प्रगतीचा मार्ग बंद झाला होता. मुस्लिमांप्रमाणे आंबेडकर अनुयायी कधीच धंद्यात नव्हता, नाही. यामुळे सरकारी नोकर्‍या नसल्याने त्याने इतरत्र हायपाय मारायला सुरुवात केली.

सर्वच राजकीय पक्षांना आंबेडकर अनुयायांचं वावडं असतं. या देशात दोन महत्त्वाचे पक्ष आहेत. एक काँग्रेस आणि दुसरा भाजप. भाजपात एकही आंबेडकर अनुयायी खासदार, आमदार नाही. काँग्रेस पक्षात अनेक बौद्ध खासदार आहेत. पण ते आंबेडकराईट्स नाहीत. राज्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन पक्ष आहेत. राष्ट्रवादी हा एक पक्ष प्युअर मराठ्यांचा म्हणजेच 96 आणि 95 कुळींचा पक्ष म्हणून ओळखला जातो.महाराष्ट्रात आमदार, खासदारांचे काही राखीव मतदारसंघ आहेत. त्यातील बहुतेक मतदारसंघांत सेनेची मंडळी आहे, पण ती हिंदुत्ववादी आहे. म्हणजे आंबेडकर अनुयायांची ओंजळ रिकामीच. ही सर्व परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील आंबेडकर अनुयायी अस्वस्थ आहे. त्याची आंबेडकरांवर प्रचंड श्रद्धा आहे.

संविधानावर विश्वास आहे. संविधानानुसार हा देश चालावा, देशात समता असावी, जातीयवाद नष्ट व्हावा. वंशभेद, वर्णभेद नष्ट व्हावा. सर्व जातिधर्मांना समतेनं वागवण्यात यावं. एखाद्या जातिधर्माकडे संशयाने पाहिलं जाऊ नये, एवढी आणि एवढी माफक त्याची अपेक्षा आहे. सर्वात महत्त्वाचं सर्व राजकीय पक्षांनी, जातीयवाद्यांनी संविधाला घाबरावं, त्याचा आदर करावा असं त्याला वाटतं. पण इथं कुणीच संविधानाला घाबरत नाही. त्यांना गोळीची भाषाच कळत असल्याने आंबेडकर अनुयायाला नक्षलवाद्यांबाबत सहानुभूती वाटतेय. नक्षलवाद्यांसारखी आपणही बंदूक हातात घ्यावी, असं त्याला वाटतंय. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे इथल्या राजकीय पक्षांनी लोकशाहीला रखेली केलीय. सत्ताधारी, विरोधक ही पवित्र गोष्ट स्वत:च्या सोयीप्रमाणे तिला ठेवून घेतोय, मानतोय. भारत गेली 66 वर्षं स्वातंत्र्य भोगतोय. यातली 50-55 वर्षं काँग्रेसने राज्य केलंय. त्यामुळे इथल्या बिघडलेल्या परिस्थितीला काँग्रेसलाच जास्त जबाबदार धरता येईल. काँग्रेस कधीही आंबेडकर अनुयायी स्वत:च्या ताकदीवर निवडून येणार नाही, याची काळजी घेत असते.

Loading...

1999 साली काँग्रेसने ठरवलं तेव्हा आरपीआयचे चार खासदार निवडून आले होते.रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, प्रा.जोगेंद्र कवाडे आणि रा.सू. गवई हे ते चार महामानव होते. पण नंतर त्यांची युती तुटल्यानंतर काँग्रेसने या चारही जणांना पाडलं. हे चारही आंबेडकर अनुयायी निवडून येणार नाहीत हा काँग्रेसचा जुनाच अजेंडा आहे. या राजकारणामुळे आंबेडकर अनुयायांचा लोकशाहीवरचा विश्वास उडालाय. लोकशाहीच्या नावाखाली आपल्यावर पद्धतशीरपणे राजकीय बलात्कार (बलात्कार ही गुन्ह्यातील सर्वात हीन कृती आहे. राजकीय बलात्कार म्हणजे राजकारणातील सर्वात हीन कृती.) होतोय. याची चीड आंबेडकर अनुयायांमध्ये आहे. मुस्लिमांनी आपले मतदारसंघ निर्माण केलेत. राज्यात 38 जिल्हे आहेत. या प्रत्येक जिल्ह्यात एखाद्‌दुसरा मुस्लिमांचा मतदारसंघ आहे.उदाहरण द्यायचं झाल्यास मुंबईत नागपाडा, ट्रॉम्बे, मानखुर्द, मालवणी तसंच मालेगाव, भिवंडी असे अनेक मतदारसंघ आहेत. मग या मुस्लिम बहुसंख्येने असलेल्या मतदारसंघातून सर्वच राजकीय पक्ष केवळ मुस्लीम उमेदवारच देत असतात. आणि त्या मतदारसंघातून मुस्लीम व्यक्तीच निवडून येत असतो. पण दुसरीकडे आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने राहत असलेल्या मतदारसंघातून आंबेडकर अनुयायाव्यतिरिक्त कोणत्याही जातिधर्माचा व्यक्ती निवडून येत असतो याची त्याला चीड आहे.

या परिस्थितीमुळे आता जागृत असलेला आंबेडकर अनुयायी मार्ग शोधतोय. त्यातच तो आक्रमक आहे. तो कोणतंही टोक गाठू शकतो. तुम्हाला जर संविधानाची भाषा कळत नसेल तर आंबेडकर अनुयायी बंदुकीच्या भाषेतही सांगायला कमी पडणार नाही. खरं तर आंबेडकर अनुयायी नक्षलवादाकडे वळत चाललाय. ही चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पण 15-20 वर्षांपूर्वीच आंबेडकर अनुयायी हा नक्षलवादाचा सहानुभूतीदार झालाय. आता खूप उशीर झालाय. बस्तर येथे काँग्रेस नेते कर्मा यांची हत्या झाल्यानंतर काँग्रेसवाले धास्तावलेत. आंबेडकर अनुयायांनी फक्त बंदूक हातात घ्यायचा विचार केला आणि या काँग्रेसवाल्यांच्या नाका-तोंडातून आणि शरीराच्या इतर छिद्रातून धूर यायला लागलाय.

बस्तर येथे काँग्रेस नेत्याची हत्या झाली. ती एक खुनाची घटना होती. यानंतरही देशाच्या गृहमंत्र्यांनी आणि इतर मंत्र्यांनी घटनेच्या ठिकाणी भेट दिली.

पण गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात दलितांवर अत्याचाराच्या, अन्यायाच्या अनेक घटना घडल्यात. सोनई येथील दलित तरुणाचं शिरकांड, सातार्‍यात बैद्ध उच्चशिक्षित जोडप्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. तर आम्हाला सर्वात वेदना देणारी घटना होती ती खैरलांजी हत्याकांड. त्या ठिकाणी आई-मुलीवर बलात्कार करण्यात आला, त्यांची नग्न धिंड काढण्यात आली. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. ही घटना साधी नव्हती. तर वर्ण आणि वंशभेदातून हा प्रकार झाला होता. पण या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्र्यांनी भेट दिली नव्हती. काँग्रेस नेत्याची हत्या ती गंभीर घटना आणि दलितांवरील सामूहिक बलात्कार, नग्न धिंड, हत्या ही मामुली घटना. आपल्या देशाचा नागरिक तर सोडा, तुम्ही आंबेडकर अनुयायांना माणूस म्हणूनही मानत नसाल तर त्यांनी काय करायचं? साहेब आता निर्णय तुमच्यावर सोडतो. तुम्हीच सांगा... तुमची पुंगी वाजवायची की त्यांनी हातात बंदूक घ्यायची !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2013 11:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...