खेळाडू घडवावे लागतात..!!

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 19, 2013 09:29 PM IST

खेळाडू घडवावे लागतात..!!

rajiv kasle ibn lokmatराजीव कासले, असिस्टंट स्पोर्टस् एडिटर, आयबीएन लोकमत

आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या निमित्तानं पुण्याच्या बालेवाडी क्रीडानगरीत जाण्याचा योग आला... नुकतीच 3 जुलै ते 7 जुलैदरम्यान ही स्पर्धा पार पडली... अवघ्या 21 दिवसांत या स्पर्धेची तयारी करणार्‍या भारतीय अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन आणि महाराष्ट्र सरकारचं खरं तर याबद्दल कौतुकच करावं लागेल... बालेवाडीची सुसज्ज क्रीडा नगरी, सहभागी होणारे 42 देशांचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ, अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी अशा शेकडो लोकांच्या राहण्याची व्यवस्था, क्रीडा नगरीची सुरक्षा असं सर्वच कसं ठरल्याप्रमाणे पद्धतशीर... इतकंच काय, तर स्पर्धेचा उद्‌घाटन आणि समारोप सोहळाही तितकाच आटोपशीर... पण एक कमतरता राहिलीच, ती म्हणजे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशचे अध्यक्ष अजित पवार या स्पर्धेकडे फिरकलेही नाहीत.

असो! पण महाराष्ट्र सरकारनं जितकी चांगली तयारी केली, तितकीच खराब कामगिरी महाराष्ट्राच्या खेळाडूंची झाली... 108 खेळाडूंच्या पथकात महाराष्ट्राच्या 10 खेळाडूंचा समावेश होता... यातल्या जिच्यावर मेडलची सर्वाधिक अपेक्षा होत्या ती कविता राऊत स्पर्धेआधीच बाहेर झाली... तर उरलेल्या मोनिका आथरे, भाग्यश्री शिर्के, अनिरुद्ध गुज्जन आणि सिद्धांत थिगांलिया या खेळाडूंनी साफ निराशा केली... तसं भारतीय खेळाडूंनाही म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही... गेल्या आशियाई स्पर्धेपेक्षा मेडल टॅलीत केवळ एक स्थान वरचं गाठलं हीच काय ती समाधानाची गोष्ट... तसं पाहिलं तर चीन, जपान, भारत हे देश क्रीडा क्षेत्रात तसे प्रगतच... या तुलनेत ओमान, लेबनान, ताजिकीस्तान, कझाकीस्तान हे देश तसे मागासलेलेच. पण असं असतानाही भारताला या स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करता आली नाही...

 asian photo

Loading...

चीननं अपेक्षेप्रमाणेच या स्पर्धेवर वर्चस्व गाजवलं आणि तेही नावाजलेल्या खेळाडूंना न पाठवता... घरच्या मैदानावर, घरच्या प्रेक्षकांच्या पाठिंब्याचा लाभ भारतीय खेळाडूंना उठवता आला नाही... भारतीय खेळाडूंच्या खराब कामगिरीच्या कारणांचा गेली अनेक वर्षं शोध घेतला जातोय, सरकारची क्रीडा क्षेत्राबद्दलची अनास्था, खेळाडूंचा दृष्टिकोन, स्पर्धेसाठी लागणारी तयारी, त्यासाठी लागणार्‍या अत्याधुनिक सुविधांची कमतरता अशी अनेक कारणं... एखादी मोठी स्पर्धा जवळ आली की मग याविषयी मीडियामध्येही जोरदार चर्चा सुरू होते. आपण कसे मागे आहोत, याविषयी भरभरून लिहिलं जातं, मोठमोठ्या गेष्टींना बोलवून चर्चा झडतात, पण हे तेवढ्यापुरतंच. स्पर्धा संपली की पुन्हा जैसे थे... खरं तर याला मीडियाही तितकीच जबाबदार आहे... आणि याचा प्रत्यक्ष अनुभव आला तो मला आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये... मला कोणावरही टीका करायची नाही, पण जे मी अनुभवलं तेच मला सांगावंसं वाटलं... मराठी, तामिळ किंवा इतर प्रादेशिक चॅनलचे किंवा प्रिंटचे रिपोर्टर स्पर्धेला बर्‍यापैकी प्रसिद्धी देताना दिसले... भारताला एखादं मेडल, त्यातही गोल्ड मेडल मिळालं (तसं ते अभावानंच मिळतं म्हणा) तर प्रादेशिक चॅनलचे किंवा प्रिंटचे रिपोर्टर बातमी देण्यासाठी धडपत होते...

पण एरवी क्रिकेटच्या एखाद्या बातमीवर अख्खा दिवस काढणारे हिंदी चॅनलवाले तर या स्पर्धेकडे फिरकले नाहीत, इतकंच काय तर मेडल मिळाल्याची साधी बातमी तर सोडा, पण एखादा न्यूज फ्लॅश तरी... कदाचित त्यांच्या तुलनेत ही फारशी महत्त्वाची स्पर्धा नसावी... हे झालं हिंदीवाल्यांचं... इंग्लिश पत्रकारांचं तर काय वेगळंच... इंग्लिश प्रिंट मीडियाच्या काही पत्रकारांनी या स्पर्धेला हजेरी लावली होती, पण त्यांना स्पर्धेपेक्षा एखाद्या काँट्राव्हर्शियल न्यूज किंवा गॉसिपिंगमध्ये जास्त इंटरेस्ट होता... आयोजक व्यवस्थेत कमी पडले का, खेळाडू डोपिंगमध्ये अडकले का याची त्यांना जास्त काळजी... डोपिंगची बंदी उठलेली अश्विनी अकुंजी या स्पर्धेत खेळणार अशी बातमी पेरली गेली ती इथूनच... आधी या स्पर्धेला महत्त्व द्यायचं नाही आणि मग नंतर स्पर्धेत भारतीय खेळाडूची कामगिरी खराब झाली किंवा आयोजक कमी पडले की टीका करायची... भारतीय खेळाडूंच्या पीछेहाटीला सरकारी अनास्था जितकी जबाबदार आहे तितकेच आपण मीडियावालेही... स्पर्धेदरम्यान एका ज्येष्ठ खेळाडूशी बोलण्याची संधी मिळाली... त्यांनी दिलेली माहिती ऐकून मी थक्क झालो, टेलिव्हिजनवरून खेळांना आणि खेळाडूंना प्रसिद्धी मिळू लागल्यानंतर काही देशांनी आपल्या खेळाडूंवर अधिक मेहनत घेतली... कारण जागतिक पटलावर आपल्या देशाचं नाव भक्कम करण्याचा हा चांगला मार्ग होता... मग आपल्याकडच्या मीडियानंही क्रिकेट सोडून इतर खेळांसाठी प्रसिद्धी दिली तर... शेवटी खेळाडू घडत नसतात तर ते घडवावे लागतात आणि यासाठी सरकारी यंत्रणा जितकी सक्षम हवी तितकाच मीडियाचा खंबीर पाठिंबाही हवा...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2013 09:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...