S M L

धोणी लकी आहे का?

Sachin Salve | Updated On: Jul 15, 2013 11:27 PM IST

sandeep_chavan_                                                                  Posted by -संदीप चव्हाण, डेप्युटी न्यूज एडिटर, IBN लोकमत

भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर एकहाती भारताला विंडीज आणि श्रीलंकेचा समावेश असलेली ट्राय सीरिजही जिंकून दिली. शेवटचा बॅट्समन ईशांत शर्माला घेऊन धोणीनं फायनल मॅच जिंकून दिली, तीही शेवटच्या ओव्हरमध्ये 17 रन्स काढत. आणि तेही कुणाविरुद्ध तर त्या फायनलमध्ये सर्वाधिक धोकादायक बॉलर ठरलेल्या हेरंगाविरुद्ध. या सगळ्या विजयानंतर क्रिकेट कट्ट्यावर पहिली प्रतिक्रिया उमटली होती ती म्हणजे धोणी काय नशीब घेऊन जन्माला आलाय! खरंच धोणी नशीबवान आहे का? या प्रश्नाचं उत्तर माझ्यापुरता तरी मी नाही असंच देईन.

 


कारण त्याला नशीबवान ठरवून आपण त्याच्या कर्तृत्वावर अन्याय करतोय. त्याला नशीबवान म्हणण्याचा अर्थ असा की धोणीच्या जागी इतर कुणीही कॅप्टन असता तरी त्यानं असाच विजय मिळविला असता आणि या प्रश्नाचं उत्तर लगोलग विंडीजमधील ट्राय सीरिजमध्ये मिळालं. ज्या विंडीज आणि श्रीलंकेच्या टीमना हरवून आपण आठवड्याभरापूर्वी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली त्याच या दोन टीमविरुद्ध आपण सपाटून मार खाल्ला. कारण एकच या दोन्ही टीममध्ये धोणी नव्हता. मी एवढंच म्हणेन की धोणी नशीबवान नाहीय पण धोणी भारतीय टीमसाठी मात्र लकी ठरलाय. मी अगदी आकडेवारी देऊन हे सांगतोय. तो मिडास राजा जसा हात लावेल त्याचं सोनं करायचा तसं धोणीकडे कोणतीली टीम द्या तो त्या टीमचं सोनं करून देतोय. म्हणून लकी धोणी नव्हे तर भारतीय टीम आहे कारण त्या टीमकडे धोणी आहे.

सुरुवात साध्या उदाहरणापासून करुया... भारतीय टीमला अगदी अलीकडच्या काळात म्हणजे आयसीसीची क्रमवारी सुरू झाल्यापासूनचा काळ पकडला तर अझर, सचिन, गांगुली, द्रविड, कुंबळे आदी दिग्गज खेळाडूंनी नेतृत्व दिलं पण या सगळ्या कॅप्टन्सच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमचं वन डे आणि टेस्टमधील आयसीसीतील सर्वाेत्तम मानांकन होतं नंबर तीन. धोणीकडे भारतीय टीमचं नेतृत्व सोपवलं गेलं आणि आपण लगोलग झेप झेतली नंबर दोनवर आणि त्यानंतर धोणीनं भारतीय टीमला एकामागोमाग एक अविश्वसनीय विजय मिळवून देत वन डे आणि टेस्ट मानांकनातही नंबर एकच स्थान मिळवून दिलं.

धोणीनं भारताला टी-20चा वर्ल्ड कप जिंकून दिला, वन डेचा वर्ल्ड कप जिंकून दिला, चॅम्पियन कप जिंकून दिला, आशियाई कप जिंकून दिला. क्रिकेट जगतात जे जे सर्वाेत्तम ते ते धोणीनं भारताला जिंकून दिलं. आयसीसीच्या सगळ्या मानाच्या ट्रॉफीज धोणीनं जिंकल्या. आजवर जगातील कोणत्याही कॅप्टनला हे जमलेलं नाही आणि यापुढेही जमणार नाही.

Loading...

जगात दोन प्रकारची माणसं असतात. एक नशिबाला दुषणं देऊन आपलं अपयश झाकू पाहणारी आणि दुसरी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर नशिबाला आपली गुलाम करणारी. धोणी हा दुसर्‍या गटातील माणूस आहे. साधं उदाहरण घ्या. टी 20 वर्ल्ड कपला भारतीय क्रिकेट बोर्डाचा प्रचंड विरोध होता. या क्रीडा प्रकारास मान्यता देणारा भारत हा सर्वात शेवटचा देश होता. साहजिकच दक्षिण आफ्रिकेतली पहिल्या टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतानं दुय्यम दर्जाचा संघ निवडला होता आणि त्याचं नेतृत्व सोपवलं होतं महेंद्रसिंग धोणीकडे. ही स्पर्धा 13 सप्टेंबर 2007 रोजी दक्षिण आफ्रिकेत होणार होती. आणि 7 सप्टेंबर 2007 रोजी भारतीय टीम इंग्लंडमध्ये आपली शेवटची सातवी वन डे द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळत होती. भारतानं ही वन डे 4-3 अशी गमावली.

Britain Cricket ICC Trophy India Sri Lanka

या टीममध्ये खेळत असणार्‍या सचिन, द्रविड आणि गांगुलीला विश्रांती देण्यात आली. या टी 20 वर्ल्ड कपपूर्वी कुणी जोगिंदर शर्माचं नाव तरी ऐकलं होतं का? कसं ऐकणार कारण त्यापूर्वी जोगिंदरची कामगिरी होती बांगलादेशविरुद्धच्या चार मॅचमध्ये 35 रन्स आणि अवघी एक विकेट. पण याच जोगिंदरच्या हाती धोणीनं टी 20 वर्ल्ड कपच्या पाकिस्तानविरुद्धच्या फायनलमधील ती शेवटची ओव्हर दिली आणि जोगिंदरनं पाकिस्तानची शेवटची विकेट घेत तो वर्ल्ड कप भारताला जिंकून दिला. तुम्हाला माहिती आहे का, भारतासाठी लाखमोलाची ती शेवटची ओव्हर जोगिंदरच्या क्रिकेट करियरमधीलही शेवटची ओव्हर ठरली. त्यानंतर जोगिंदर कुठेच दिसला नाही की कोणत्याही टीममध्ये निवडलाही गेला नाही. जणू काही त्या वर्ल्ड कपसाठी धोणीनं त्याला घडवला होता आणि धोणीच्या याच जादुई कामगिरीमुळे भारत वर्ल्ड चॅम्पियन बनला.

धोणीनं केवळ चांगल्या खेळाडूंच्या जीवावर यश मिळवलं असं नाही तर त्या यशात त्याचाही सिंहाचा वाटा आहे. श्रीलंकेविरुद्धची वन डेची फायनल आठवतेय ना? भारत धावांचा पाठलाग करत असताना सेहवाग पहिल्या ओव्हरमध्ये शून्यावर आऊट झाला होता. त्यानंतर सचिनही 8 रन्स काढून आऊट झाला. त्या स्पर्धेत युवराज तुफान फॉर्मात होता. तरीही धोणी त्याच्याआधी फायनलला बॅटिंगला आला आणि तुफानी नाबाद 91 रन्सची विजयी खेळी केली. श्रीलंकेच्या कुलशेखराला शेवटच्या ओव्हरमध्ये खणखणीत सिक्सर ठोकत धोणीनं वन डेच्या वर्ल्ड कपवर भारताचे नाव कोरले होते. साधारणत: भारताच्या क्रिकेट इतिहासावर नजर टाकली की एखाद्या खेळाडूला कॅप्टन केलं की त्याचा कामगिरीवर परिणाम व्हायचा. बॅट्समन असेल तर रन्स व्हायच्या नाहीत, बॉलर असेल तर विकेट मिळायच्या नाहीत.

पण धोणीचं नेमकं उलटं. तो कॅप्टन होण्याआधी त्याचा टेस्टमधील रन ऍव्हरेज होता 33 आणि कॅप्टन झाल्यावर 56 आणि हेच वनडेतही कॅप्टन होण्याआधी 44 आणि कॅप्टन झाल्यानंतर 56. इतकंच काय बरेच आठवडे तो आयसीसीच्या वन डे बॅटिंग क्रमवारीत नंबर एकच्या क्रमांकावर विक्रमी आठवडे तो होता. बॅटिंगसोबतच त्याचं विकेट किपिंगही दृष्ट लागण्यासारखं होतं. एक परिपूर्ण क्रिकेटर आणि परिपूर्ण कॅप्टन. अर्थात सगळं काही चागलंच झालं असं नाही. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात सलग 8 टेस्ट आपण हरलो. पण म्हणतात ना दृष्ट लागण्यासाठी तीट असतो तसं होतं. त्यानंतर मायदेशी आलेल्या ऑस्ट्रेलियाला भारतानं 4-0 असा व्हाईटवॉश दिला. ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देणारा दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्ताननंतर भारत हा तिसरा देश ठरलाय.

इतकंच कशाला धोणीनं कॅप्टन्सी स्वीकारल्यानंतर ऑस्ट्रेलियानं भारतात एकूण 8 मॅच खेळल्यात. आणि या आठही मॅच भारतानं जिंकल्यात. त्याही सलग. लक्षात घ्या एकही मॅच ड्रॉ नाही की पराभव नाही. फक्त आणि फक्त विजय. तेही कुणाविरुद्ध तर टेस्ट क्रमवारीत नंबर एक असणार्‍या ऑस्ट्रेलियाविरुद्ध. जगातील कोणत्याच कॅप्टनला इतकी शंभर टक्के विजयी कामगिरी करता आलेली नाही. याला तुम्ही नशीब म्हणाल का? ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळविणार्‍या कॅप्टन्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे 12 विजयासह विंडीजचे क्लाईव्ह लॉईड. दुसर्‍या क्रमांकावर आहे ते 11 विजयासह इंग्लंडचे माईक बेअर्ली आणि तिसर्‍या क्रमांकावर प्रत्येकी 8 विजयासह आहेत डब्ल्यू. जी. ग्रेस आणि महेंद्रसिंग धोणी. धोणीचा विजयी धडाका पाहता लॉईड यांचा विक्रम नक्कीच धोक्यात आहे.

 बरं केवळ या आकड्यांवर जाऊ नका. जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा धोणीनं आपल्यातील जादुई करिश्मा दाखविला. मला आठवतंय 2008 मध्ये जेव्हा तो कॅप्टन नव्हता तेव्हा दोनदा मॅचच्या आधी फक्त अर्धातास आधी त्याला सांगण्यात आलं की तुला कॅप्टन्सी करायचीय. आणि त्या दोन्ही वेळा हंगामी कॅप्टन म्हणून तो मैदानावर उतरला आणि त्यानं टीमला चक्क जिंकून दिलं. आणि त्या दोन टीम होत्या दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड. माणूस म्हणूनही धोणी महान आहे. म्हणूनच त्याला टीम मॅन म्हणतात. साधं उदाहरण घ्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये कॅप्टन अनिल कुंबळे जखमी झाल्यानंतर धोणीकडे दौर्‍यादरम्यान कॅप्टन्सी सोपविण्यात आलीय धोणीनं आपल्या जादुई करिष्म्यानं दोन टेस्ट जिंकत भारताला ती सीरिज 2-0 अशी जिंकून दिली. सीरिजची ट्रॉफी देण्यासाठी जेव्हा धोणीला स्टेजवर बोलाविण्यात आलं तेव्हा त्यानं स्वत:हून अनिल कुंबळेला स्टेजवर बोलावलं. आयोजकांनाही जिथे कुंबळेचा विसर पडला होता तिथे धोणीतला टीम मॅन मात्र जागा होता. टी 20 असो अथवा वन डे वर्ल्ड कप, विजेतेपदानंतर जल्लोषात तुम्ही कधी धोणीला पुढेपुढे पाहिलंय का? ट्रॉफी उचलल्यानंतर ती संघसहकार्‍यांकडे सोपवून हे महाशय आनंद शेअर करत असतात.

केवळ आनंदातच नाही तर पराभवातही तो टीममॅन असतो. आयपीएलच्या पहिल्या हंगामात चेन्नईची टीम अटीतटीच्या मॅचमध्ये फायनल हरली होती. हातातोंडाशी आलेला विजयी घास गेल्यानंतर दुसरा-तिसरा कॅप्टन असता तर त्यानं आकांडतांडव केला असता, पण अवघ्या क्रिकेट जगतानं पाहिलं त्या पराभवानंतरही धोणीनं आपल्या चेन्नईच्या टीमसोबत भर मैदानात हर्डल केलं. पराभवातही मी तुमच्या पाठीशी आहे हेच जणू त्याला सांगायचं होतं. झालं त्यानंतर दोन वेळा त्याच्या टीमनं धोणीला आयपीएलचं विजेतेपद जिंकून दिलं.

धोणीनं भारतीय क्रिकेटला जर काय दिलं असेल तर तो म्हणजे जिंकण्याचा विश्वास, मी जिंकू शकतो, आपण जिंकू शकतो, भारत जिंकू शकतो हे धोणीनं कृतीतून दाखवून दिलं. धोणीच्या हातात जादू आहे. जिंकण्याची जादू. टीम कोणतीही असो, टीमचा कॅप्टन धोणी असला की ती टीम जिंकलीच पाहिजे. याच कामगिरीच्या जोरावर धोणी सर्वकालिक सर्वश्रेष्ठ कॅप्टनच्या दिशेनं वाटचाल करतोय. क्रिकेटसाठी जर कुणाला 'भारतरत्न' द्यायचं झालं तर भारताला दोन वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी, आशियाई कप जिंकून देणार्‍या धोणीला दिलं गेलं पाहिजे आणि हो वैयक्तिक वर्ल्ड रेकॉर्ड करणार्‍या सचिनच्याही आधी बरं का!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 15, 2013 11:21 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close