S M L

विम्बल्डनचे गवत पेटले..!

Sachin Salve | Updated On: Jul 5, 2013 05:16 PM IST

विम्बल्डनचे गवत पेटले..!

Posted by -संदीप चव्हाण, डेप्युटी न्यूज एडिटर, IBN लोकमत

sandeep_chavan_

बुधवार दि. 26 जून 2013 हा विम्बल्डनसाठी घातवार ठरला. विम्बल्डन स्पर्धा सुरू असताना एकाच दिवशी 7 खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली. टेनिस स्पर्धेला व्यावसायिक स्वरूप आल्यानंतर गेल्या 45 वर्षांतील ही अशी पहिलीच घटना आहे. हे 7 खेळाडू कुणी एैरेगैरे नव्हते तर टेनिस करियरमध्ये कधीना कधी जागतिक टेनिस क्रमवारीत नंबर एक पटकावलेले खेळाडू होते. या खेळाडूंनी दुखापतीचे कारण पुढे केले असले तरी कुजबूज ही विम्बल्डनवरील धोकादायक गवताबाबतच अधिक होतंय. त्यातच विम्बल्डनच्या हिरवळीचा बेताज बादशहा आणि तब्बल सातवेळा विम्बल्डन जिंकणारा रॉजर फेडरर, माजी विम्बल्डन विजेते राफेल नदाल, मारिया शारापोव्हा आणि सेरेना विल्यम्सही पराभूत झाल्यानं या चर्चेला उधाण आलंय. विम्बल्डनच्या गवताला जणू भाले फुटलेत.

मारिया शारापोव्हा एकाच टेनिस मॅचमध्ये तीनवेळा घसरल्याचं तुम्ही कधी पाहिलेलं आठवतंय का? पण यंदाच्या विम्बल्डनमध्ये ती चक्क तीनवेळा घसरून पडली. एकदा तर तिला त्यासाठी मॅच सुरू असताना उपचारही घ्यावे लागले. त्याची परिणीती अशी झाली की या स्पर्धेत तिसरं मानांकन मिळालेल्या शारापोव्हाला जागतिक क्रमवारीत पोर्तुगालच्या मिशेलनं 6-3, 6-4 असं हरवलं. इतर मानांकित खेळाडूंनी गवतावर भाष्य करणं टाळलं, पण मारिया शारापोव्हानं रणशिंग फुंकलं. विम्बल्डनचं गवत धोकादायक असल्याचं तिनं जाहीर केलं.

दहाव्या मानांकित क्रोएशियाच्या मॅरिन सिलिकनं तर अशा या धोकादायक गवतावर खेळणं टाळलं. विम्बल्डनच्या इतिहासातील हा काळा दिवस असल्याचं त्यानं म्हटलंय तर महिला टेनिसमध्ये दुसरं मानांकन मिळालेल्या व्हिक्टोरिया अझारेंकानंही गवताच्या या दर्जावर नाराजी व्यक्त करत विम्बल्डनमधून माघार घेतली.

Loading...

इतकंच काय यंदाच्या स्पर्धेत पहिल्याच फेरीत राफेल नदालसारख्या टेनिसमधील जगजेत्त्याला हरवणार्‍या बेल्जियमच्या स्टीव डार्सियानंही या स्पर्धेतून पुढच्याच दुसर्‍या राऊंडमध्ये खांद्याच्या दुखापतीमुळे माघार घेतली. डार्सियानंही गवताला दोष दिलाय. माझ्यासमोरचा प्रतिस्पर्धी त्याचा काहीही दोष नसताना या गवतावरून घसरून पडताना पाहणे त्रासदायक होते अशी टिपण्णी त्यानं केलीय.

एक नजर टाकूयात कुणीकुणी या विम्बल्डनमधून माघार घेतली त्याच्यावर... सगळ्यात पहिल्या क्रमांकावर अर्थात नदालला हरवणारा डार्सिया. त्याच्यासोबत सहावा मानांकित जो विल्फ्रेड त्सोंगा, दहावा मानांकित मॅरिन सिलिक, विम्बल्डनवर सर्वाधिक प्रदीर्घ वेळ मॅच खेळण्याचा विक्रम नावावर असणारा जॉन इश्नर, रॅडेक स्पेपनिक, यारोस्लोव्हा श्‍वेडोव्हा आणि महिलांमध्ये सातवी मानांकित व्हिक्टोरिया अझारेंका अशा दिग्गज खेळाडूंनी माघार घेतली. त्यात भर म्हणून फेडरर पराभूत झाला तो जागतिक क्रमवारीत 116व्या क्रमांकावर असणार्‍या युक्रेनच्या सर्जिय स्टेकोव्हस्कीकडून. सर्जियनं त्याचा6-7(5), 7-6(5). 7-5, 7-6(5) असा पराभव केला. 10 वर्षांपूर्वी फेडरर फ्रेंच ओपन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पराभूत झाला होता. त्यानंतर त्यानं सलग 36 वेळा ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेची क्वार्टर फायनल गाठली होती. हा विक्रम यावेळी मोडला गेला. टेनिस जाणकार म्हणतात गवतानं फेडररचा घात केला.

लिसिकीचा अनोखा विक्रम

हे कमी की काय म्हणून सेरेना विल्यम्सही पराभूत झाली. सेरेनाला सॅबिन लिसिकीनं 6-2, 1-6, 6-4 असं पराभूत केलं. या लिसिकीनं सेरेनाला हरवून अनोखा विक्रम केलाय. फ्रेंच विजेत्या महिला खेळाडूला विम्बल्डनमध्ये हरवण्याचा अनोखा चौकार तिनं लगावला. 2009मध्ये लिसिकीनं स्वेटलाना कुत्झनेत्सोव्हाला विम्बल्डनमध्ये पराभूत केलं. 2011 मध्ये ली ना या फ्रेंच विजेत्या खेळाडूला पराभूत केलं. 2012 मध्ये लिसिकानं मारिया शारापोव्हाला पराभूत केलं आणि यंदाची फ्रेंच चॅम्पियन होती सेरेना विल्यम्स. परंपरेनुसार लिसिकानं तिचाही पराभव करत फ्रेंच ग्रँडस्लॅम विजेत्या खेळाडूला पराभूत करण्याची किमया साधली.

प्रत्यक्ष मैदानावर इतका गदारोळ होत असताना विम्बल्डन स्पर्धा संयोजकांनी मात्र याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलंय. नील स्टुबली हा यंदाचा विम्बल्डनचा नवा ग्राऊंड्समन आहे. विम्बल्डन स्पर्धेसाठी स्वतंत्रपणे मैदान तयार करण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे. असं असलं तरी ऑल इंग्लंड टेनिस क्लबनं मात्र त्याला पुरतं पाठीशी घातलं आहे. ऑल इंग्लंड टेनिस क्लबचे कार्यकारी प्रमुख रिचर्ड लुईसनं तर स्वत:ची पाठ थोपटून घेतलीय. ज्या खेळाडूंनी माघार घेतलीय त्याच्यामागे धोकादायक गवत हे कारण नाही, असं या लुईस महाशयांचं म्हणणं आहे. उलट बर्‍याच खेळाडूंनी यंदाचं गवत उत्तम असल्याचं म्हटलंय असंही लुईस म्हणतोय. 'गिरे तो भी टांग उपर' यालाच तर म्हणतात ना!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 5, 2013 04:55 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close