Elec-widget

पाकिस्तानात नवाझ राज

पाकिस्तानात नवाझ राज

  • Share this:

  jatin_desai_150x150 (Posted by -जतीन देसाई पत्रकार आणि पाकिस्तानातील राजकीय घडामोडींचे विश्लेषक)

नवाझ शरीफ पाकिस्तानचे तिसर्‍यांदा पंतप्रधान झाले आहेत. तिसर्‍यांदा पंतप्रधान होण्याचा बहुमान मिळवणारे ते पहिले पाकिस्तानी. यावेळचे नवाझ शरीफ आधीच्या नवाझ शरीफपासून वेगळे असणार काय, याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. निवडणुकीच्या प्रचारात आपण आता वेगळे आहोत, असा संकेत नवाझनी दिला होता. भारतासोबत मैत्रीचा एक नवीन अध्याय सुरू करण्यात येईल अशी जाहीर भूमिका नवाझ व त्यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लीम लीग (एन)नी घेतली आहे. त्यांचा पक्ष प्रामुख्याने पंजाब आणि पंजाबींचा असल्याने पाकिस्तानातील इतर तीन प्रांत - सिंध, बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वामधील लोकांना विश्‍वासात घेण्याची व त्यांना सत्तेत सहभागी करून घेण्याची मोठी जबाबदारी नवाझवर आहे.

किमान नवाझ शरीफनी सुरुवात चांगली केली असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. पाकिस्तानच्या पश्चिमेतील बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वातील परिस्थिती अत्यंत स्फोटक आहे. या दोन प्रांतातील अतिरेक्यांना कसं संपवायचं, हा प्रश्न निश्चित नवाझसमोर असणार. दोन्ही प्रांतातील परिस्थिती भिन्न आहेत. खैबर पख्तुनख्वात तालिबानसारख्या अतिरेकी संघटनांची लोकांवर दहशत आहे. तर बलुचिस्तानातील आंदोलन प्रामुख्याने प्रांताला जास्त अधिकार मिळावेत याकरिता आहे. बलुचिस्तानातील राजधानी क्वेटा येथे मात्र लष्कर-ए-जांगवी आणि सिपाही-ए-साहेबासारख्या अतिरेकी संघटनांनी हझाराशिवाय जगणं कठीण करून ठेवलं आहे. काही बलुची पक्ष स्वतंत्र बलुचिस्तानची मागणीदेखील करत आहेत. यावेळच्या निवडणुकीत पाकिस्तानात विक्रमी मतदान झालं, पण बलुचिस्तानात नेहमीप्रमाणे मतदान कमी झालं.

PAKISTAN-UNREST-VOTE-SHARIF

Loading...

बलुचिस्तान विधानसभेचा विचार केल्यास कुठल्याच पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. संमिश्र सरकारला पर्याय नाही. बलुचिस्तानचा इतिहास पाहिल्यास सहसा मुख्यमंत्री एखाद्या आदिवासी जमातीचा सरदार किंवा एखाद्या मोठ्या राजकीय घराण्यातील नेता होता. या वेळेस मात्र असं झालं नाही. अब्दुल मलिक नावाच्या नॅशनल पार्टीच्या नेत्याला मुख्यमंत्री बनविण्यात आलं. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या मलिकला मुख्यमंत्री बनविण्याचं श्रेय नवाझ शरीफला निश्चित जातं. नॅशनल पार्टीपेक्षा आपल्याकडे अधिक जागा असताना आणि काही खासदार मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरत असाताना देखील नवाझनी मलिकचं नाव सुचवलं. मलिकांकडे संपूर्ण पाकिस्तानात आदराने पाहिलं जातं. काही वर्षांपूर्वी दिल्ली येथे भारत-पाकिस्तान संदर्भातील एका परिषदेत त्यांच्यासोबत सहभागी होण्याची मला एक संधी मिळालेली. त्यांच्यासोबत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याचा मला योग मिळाला. अत्यंत सादा, सरळ माणूस नॅशनल पार्टीचा अध्यक्ष असल्याची मला माहिती होती, पण काही वर्षांत तो बलुचिस्तानचा मुख्यमंत्री होईल, असं वाटलं नव्हतं. राजकारण सरळ माणसांसाठी नाही, असं आपण अनेकदा म्हणत असतो पण सादा-सरळ माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो हे मलिकवरून स्पष्ट होतं.

स्वाभाविक मलिकांकडून बलुची जनतेच्या खूप अपेक्षा आहेत. सर्वात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे तो म्हणजे अचानक गायब होणार्‍या तरुणांचा. स्वतंत्र बलुचिस्तानचं समर्थन करणारे किंवा गरीब बलुचींबद्दल बोलणारे तरुण अचानक गायब होतात आणि काही दिवसांनी त्यांचा मृतदेह दूर कुठेतरी सापडतो. यामागे आयएसआय असल्याचं बलुचिस्तानात उघड उघड म्हटलं जातं. बलुचिस्तानातील गरिबी हा दुसरा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. बलुचिस्तान खनिज आणि गेसनी समृद्ध आहे पण बलुचींना त्याचा फारसा फायदा होत नसल्याने ते गरीब आहेत. मोठ्या प्रमाणाने बलुचिस्तानातून लोक इतर प्रांतात किंवा इतर देशात जात आहेत. रोजगाराची फारशी संधी नसल्याने असं होणं स्वाभाविक आहे.

मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांनी म्हटलं, ''लोकशाहीचा एकमात्र विकल्प आपल्यासमोर आहे. पाकिस्तानात राहूनच काम करावं लागेल. आपल्याकडे दुसरा पर्याय नाही.'' त्यांचं हे मत अत्यंत व्यावहारिक आहे. बलुचिस्तानचं वेगळं राष्ट्र होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत बलुचिस्तानसाठी अधिक स्वायत्ता मागण्याचा मलिकचा विचार योग्य आहे. बलुचिस्तानचा काही भाग इराणला लागून आहे. इराणात देखील बलुची बर्‍या प्रमाणात आहेत. अफगाणिस्तानला देखील बलुचिस्तानची सरहद्द लागते. स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी काही नवीन नाही. या कारणाने देखील वेगवेगळ्या जागतिक शक्ती कुठल्या कुठल्या स्वरूपाने बलुचिस्तानात सक्रिय आहेत. अमेरिकन काँग्रेसात एका खासदाराने स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीचं समर्थन करण्यासाठी एक प्रस्ताव देखील सादर केला आहे. या प्रस्तावाची टीका करताना मलिकनी म्हटलं की, या प्रस्तावाला काही अर्थ नाही. गमतीत त्यांनी असंही म्हटलं की, पूर्वी क्रांती मॉस्कोहून यायची आणि आता वॉशिंग्टनहून. पाकिस्तान एकसंध राहण्यात भारताचा पण फायदा आहे.

बलुचिस्तानात आपला प्रभाव वाढावा यासाठी साऊदी अरेबिया आणि इराणात होत असलेल्या स्पर्धेचा येथील हिंसाचाराशी संबंध असल्याचं मलिक यांचं म्हणणं आहे. इराण हे शिया मुस्लीम राष्ट्र तर साऊदी सुन्नी मुस्लीम. सबंध जगभर साऊदी अरेबिया वहाबीवादाचा निर्यात करतो. वहाबीवाद हा एक कडवा विचार आहे. तालिबान आणि इतर अतिरेकी संघटनांच्या मुळात वहाबीवाद आहे. शियाविरोधी लष्कर-ए-जांगवी व सिपाही-ए-साहेबादेखील वहाबीवादांनी प्रभावित आहे. या कडव्या विचारामुळे हझारा शियांची ते कत्तल करत आहेत. बलुचिस्तानात साऊदीचा वाढता प्रभाव कमी करण्याचं काम मलिक यांना करावं लागेल आणि ते पाकिस्तान सरकारच्या मदतशिवाय शक्य होणार नाही. शांतता चळवळीशी संबंध असलेल्या मलिकांवर एक मोठी जबाबदारी येऊन पडली आहे.
 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2013 05:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...