ऋतुपर्णो घोष

ऋतुपर्णो घोष

  • Share this:

meena_karnik_blog

                                                                           Posted By- मीना कर्णिक, चित्रपट समीक्षक

‘उनीशे एप्रिल’ पाहिल्याची एक आठवण मनात अजूनही ताजी आहे. साल होतं १९९४. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये तेव्हा महोत्सवाचे सिनेमे होत. त्यातच ‘उनीशे एप्रिल’ हा ऋतुपर्णो घोषचा बंगाली सिनेमा होता. त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार नंतर या सिनेमाने मिळवला. सिनेमा सुरू झाला आणि अचानक पडद्यावरून सबटायटल्सच गायब झाली. समोरच्या व्यक्तिरेखांचे संवाद कळणं आता शक्यच नव्हतं. आयोजकांनी माफी मागितली आणि सिनेमा बंद करावा की चालू ठेवावा ते विचारलं. सगळ्यांनी एकमुखाने सिनेमा पुढे चालू रहावा असं म्हटलं आणि सबटायटल्सशिवाय आम्ही सगळ्यांनी हा सिनेमा बघितला.

त्यामुळे काय झालं? संवादांमधले बारकावे कळले नाहीत हे खरं, पण सिनेमा? तो तर थेट मनाला भिडला होता. दिग्दर्शकाला काय सांगायचं आहे ते कळण्यासाठी भाषेचा अडसर मुळीच आला नव्हता. सिनेमाची मुळं जेव्हा घट्ट आपल्या मातीतली असतात आणि त्याचं व्याकरण वैश्‍विक असतं तेव्हा भाषा दुय्यम ठरते याचा अनुभव मी पहिल्यांदाच घेत होते. एक वेगळं भान मला या सिनेमाने दिलं आणि त्यासाठी ऋतुपर्णो घोषची मी आयुष्यभर ऋणी आहे.

ऋतुपर्णो घोष. अनेक वर्षं त्याचे सिनेमे मी पहात आले आहे. वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांमध्ये मी त्याला पाहिलेलं आहे. त्याच्या सिनेमांप्रमाणेच त्याच्या दिसण्यामध्ये होणारे बदलही अचंबित होऊन बघितलेले आहेत. आणि लिंग बदलाची प्रक्रिया सुरू केल्यानंतरही त्याचं आत्मविश्‍वासाने वावरणं, आपल्या मनातली द्वंद्व पडद्यावर मांडणं, स्वत:ची लैंगिकता जराही न लपवणं यामुळे दिग्दर्शक म्हणून आणि माणूस म्हणूनही एक वेगळंच कुतुहल वाटायचं. अगदी २०१०च्या गोव्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये त्याच्याकडे पाहताना या माणसाशी बोलायला हवं असं तीव्रतेने वाटे. पण तशी वेळ कधीच आली नाही. हां, त्याच्या एका सिनेमाच्या वेळेस आकाशवाणी थिएटरमध्ये प्रेक्षकांशी त्याने केलेली प्रश्‍नोत्तरं आठवताहेत. सिनेमा होता ‘दहन’. ऋतुपर्णो घोषच्या माझ्या आवडत्या सिनेमांपैकी एक. रोमिता (रितुपर्ण सेनगुप्ता) आणि पलाश (अभिषेक चटर्जी) हे नुकतंच लग्न झालेलं जोडपं. रस्त्यावर काही गुंड त्यांच्यावर हल्ला करतात. रोमितावर बलात्काराचा प्रयत्न होतो. त्यांना वाचवण्यासाठी कोणीच पुढे येत नाही असं वाटत असतानाच झिंकु (इंद्राणी हलदर) ही शिक्षिका पुढे सरसावते आणि मदत करते. दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रांमध्ये झिंकुविषयी कौतुकाचे चार शब्द छापून येतात.rutpuparna ghosh

Loading...

हल्लेखोरांना शिक्षा व्हायला हवी असं झिंकुचं म्हणणं असतं. सुरुवातीला रोमिता आणि पलाश तिच्याबरोबर राहतात. पण समाजाचा दृष्टिकोन, अशा लढाईमध्ये होणारा मानसिक आणि सामाजिक त्रास यामुळे तेच मागे हटतात आणि मग झिंकुची ससेहोलपट सुरू होते. (१९९८ मध्ये या सिनेमासाठी ऋतुपर्ण सेनगुप्ता आणि इंद्राणी हलदर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार विभागून देण्यात आला होता आणि ऋतुपर्णो घोषला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.) सिनेमा पाहिल्यानंतर दिग्दर्शकासाठी प्रेक्षकांच्या मनात खूप प्रश्‍न होते. हा सिनेमा झिंकुचा की रोमिताचा? दिग्दर्शकाची प्रोटॅगॉनिस्ट कोण आहे? यात खूप जास्त संवाद आहेत असं वाटत नाही का? इत्यादी इत्यादी. मला स्वत:ला मात्र सिनेमा पाहताना सतत या दिग्दर्शकाला बाई किती छान समजली आहे, तिची मानसिकता, तिचं द्वंद्व सगळं कसं इतकं बरोबर उमगलं आहे याचंच आश्‍चर्य वाटत राहिलं होतं. ‘उनीशे एप्रिल’ पाहतानाही हेच विचार मनात आले होते आणि ‘दहन’ बघतानाही.

ऋतुपर्णो घोष हा बायकांचा दिग्दर्शक आहे, बायकांचं मन त्याला समजतं यावर ‘दहन’ने शिक्कामोर्तब केलं जणू. ऋतुपर्णो घोषचा जन्म ३१ ऑगस्ट १९६३चा. अर्थशास्त्राची पदवी घेतल्यानंतर काहीतरी सर्जनशील करावं म्हणून जाहिरात एजन्सीमध्ये कामाला लागला. १९९२मध्ये त्याने आपला पहिला सिनेमा बनवला. ‘हिरेर अंगती’ प्रदर्शित झाली. पण त्याची खरी दखल घेतली गेली ती अर्थातच ‘उनीशे एप्रिल’मुळे. अपर्णा सेन, देबश्री रॉय, प्रसोनजित चॅटर्जी आणि दिपांकर डे हे कलावंत. १९७८ साली आलेल्या इंगमार बर्गमन या महान दिग्दर्शकाच्या ‘ऑटम सोनाटा’वर साधारणपणे हा सिनेमा आधारलेला. सरोजिनी, म्हणजे अपर्णा सेन ही एक नृत्यांगना. आपल्या कलेवर प्रचंड प्रेम. इतकं की त्यामुळे अनेकदा तिचं घराकडे दुर्लक्ष होतं. तिचं यश नवर्‍याला सहन होत नाही आणि ते वेगळे होतात. मुलगी मोठी होते ती आईचा राग करत. नवर्‍याच्या मृत्युनंतर सरोजिनी मुलीला हॉस्टेलमध्ये ठेवते.

आदिती, म्हणजे देबश्री रॉय, मोठी होऊन घरी परतते ही सिनेमाची सुरुवात आहे. आई मुलीमधला तणाव आपल्याला सतत जाणवत राहतो. सरोजिनीला एक खूप मोठा मानाचा पुरस्कार जाहीर होतो आणि १९ एप्रिल या दिवशी त्याचं वितरण असतं. वडिलांचा हा मृत्युदिन. आपली आई हा दिवस विसरली याचा आदितीला राग येतो. इकडे आदितीची आई ही नर्तकी आहे हे कळल्यावर तिच्या होणार्‍या नवर्‍याच्या घरचे लग्न मोडतात. आदिती आत्महत्येचा प्रयत्न करते जे सरोजिनीला कळतं आणि मग होतो आई आणि मुलीचा आमने सामने संघर्ष. दोघी भडाभडा बोलतात, एकमेकांच्या मनातले राग, चीड, द्वेष, प्रेम सगळं व्यक्त करतात आणि मोकळ्या होतात. त्याच १९ एप्रिल या दिवशी. या सिनेमाचं वैशिष्ट्य हे की यातली ना आई खोटी वाटत ना मुलगी. ना आई दुष्ट वाटत ना मुलगी अतिरेकी. दोघी आपापल्या जागी खर्‍या असतात. त्यांचे मार्ग भिन्न असतात इतकंच. ऋतुपर्णो घोष दिग्दर्शक म्हणून या दोघींनाही आपल्यासमोर जिवंत व्यक्तिरेखा म्हणून पेश करतो. म्हणूनच त्या भावतात.

सवंदेनक्षमता ही ऋतुपर्णो घोषची नेहमीच जमेची बाजू राहिलेली आहे. त्याच्या सिनेमांमध्ये वास्तव दाखवतानाही एक तरलता जाणवत राहते. दोन दशकांच्या आपल्या कारकीर्दीत उगीच नाही त्याने १२ राष्ट्रीय आणि काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले. ८०च्या दशकात जाहिरात एजन्सीमध्ये काम करत असताना त्याने उत्पादनांसाठी दिलेल्या अनेक स्लोगन्स आणि वन लाईनर्सचं खूप कौतुक झालं होतं. इंग्लिश किंवा हिंदीमधून जाहिरातीच्या कॉपीचा अनुवाद न करता मूळ बंगालीमधूनच त्या लिहिल्या जाव्यात ही प्रथा त्याने बंगाली जाहिरात क्षेत्रात रुजवली. या अनुभवाचा उपयोग त्याला अर्थातच त्याच्या सिनेमांमध्ये झाला. त्याच्या सिनेमांची मुळं घट्टपणे बंगाली मातीतच रोवलेली होती.

‘बाडीवाली’ हा १९९९मध्ये आलेला त्याचा सिनेमाही याच पठडीतला होता. पुन्हा एकदा ऋतुपर्णोने एका बाईच्या मनाचा वेध घ्यायचा प्रयत्न केला. तीच संवेदनशीलता, तोच तरलपणा आणि तीच प्रत्येक फ्रेममध्ये दिसणारी सौंदर्यदृष्टी. या दिग्दर्शकाचं हे आणखी एक वैशिष्ट्य म्हणायला हवं. त्याच्या सिनेमांमधली दृष्य म्हणजे जणू एखाद्या चित्राची फ्रेम वाटावी इतकं अप्रतीम. त्याचं लायटिंग, त्याची रंगसंगती, सगळंच भारावून टाकणारं. ‘बाडीवाली’च्या बाबतीतही हेच म्हणता येईल. एका भल्याथोरल्या वाड्यात राहणारी ही बाडीवाली (किरण खेर) म्हणजे जणू त्या उध्वस्त वाड्यासारखीच. एकटी. शरिराच्या सगळ्या इच्छा मारलेली. आपल्याच कोशात राहणारी. वय होत जाणारी. आणि अचानक एका सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने वाडा माणसांनी गजबजून जातो. सिनेमाचा देखणा दिग्दर्शक या विधवा बाडीवालीला मोहवून जातो.

Rituparno Ghosh3

ऋतुपर्णो घोषचे मला सर्वात आवडलेले हे तीन सिनेमे. त्याचे नंतरच्या काळातले चोखेर बाली, रेनकोट किंवा आंतरमहल मला फारसे भावले नाहीत. द लास्ट लिअर या इंग्लिश सिनेमामध्ये त्याने अमिताभ बच्चनबरोबर काम केलं. उत्पल दत्त यांच्या आजकेर शहाजहां नावाच्या आत्मचरित्रात्मक नाटकावर हा सिनेमा आधारलेला होता. गोव्याच्याच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मी हा सिनेमा बघितला तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया ही काय अप्रतीम फोटोग्राफी आहे अशी झाली. आणि मग लक्षात आलं, अशी प्रतिक्रिया होणं हे काही चांगला सिनेमा पाहिल्याचं लक्षण नव्हे. आपल्याला सिनेमातली दृष्य भावली पण सिनेमा भावला का? आपल्याला सिनेमातला अमिताभ बच्चनचा अभिनय आवडला पण त्याने साकारलेला हरीश मिश्रा मनात ठाण मांडून बसला का?

हरीश मिश्रा या निवृत्त नटाची ही गोष्ट. आयुष्यभर रंगभूमीवर त्याने शेक्सपिअरच्या व्यक्तिरेखा साकारलेल्या असतात आणि तीस वर्षं काम केल्यानंतर तो निवृत्त होतो. मनाने अजूनही शेक्सपिअरच्या काळात जगतो. त्याच्यापेक्षा चांगलं दुसरं काही लिहिलंच जाऊ शकत नाही असा त्याचा ठाम विश्‍वास असतो. सिनेमाकडे तर तो तुच्छतेनेच पहात असतो. आणि एक दिवस एक तरुण दिग्दर्शक त्याच्याकडे येतो. आपल्या सिनेमात काम करण्याची ऑफर घेऊन.

सिनेमाची सुरुवात होते तीच मुळी दिवाळीत वाजणार्‍या फटाक्यांनी. शबनम (प्रीती झिंटा)च्या नवीन सिनेमाचा प्रिमिअर आहे. पण तिथे न जाता ती आपल्या कोमामध्ये असलेल्या सहकलाकाराला भेट द्यायला त्याच्या घरी येते. हरीश मिश्रा बिछान्यावर पडले आहेत. वंदना, हरीशची मैत्रीण त्याची काळजी घेते. सोबत एक नर्स आहे. वंदना आणि शबनममधला तणाव आपल्याला जाणवतो. शबनमच्या आठवणींमधून आपल्यासमोर हरीशची कहाणी उलगडत जाते. शबनमशी निर्माण झालेला त्याचा स्नेह, वंदनाशी असलेलं त्याचं नातं, त्याने अचानक थिएटर सोडून देण्यामागची कारणं आणि त्याचं कोमात जाणं. कथेमध्ये दम होता पण तरीही त्याचा जो परिणाम व्हायला हवा होता तो दिग्दर्शकाला साधला नाही असं वाटलं.

त्यानंतर तीन वर्षांपूर्वी ऋतुपर्णोचे दोन सिनेमे महोत्सवामध्ये दाखवले गेले. एक होता रवींद्रनाथ टागोरांच्या कथेवर आधारलेला नौकाडुबी तर दुसरा सत्यजित रेंच्या जीवनाशी साधर्म्य सांगणारा आभोहोमन. सत्यजित रेंच्या सिनेमाचं गारुड भारतीयच नव्हे, तर जगभरातल्या सिनेप्रेमींच्या मनावर पडलेलं आहे. मग ज्या बंगालचे ते आहेत तिथल्या दिग्दर्शकांना त्यांच्या सिनेमांची आणि त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यातल्या नाट्याची मोहिनी पडली नाही तरच नवल. ऋतुपर्णो घोषने आपण रेंच्या जीवनातल्या एका अध्यायावर सिनेमा करणार असल्याची घोषणा केली तेव्हा म्हणूनच आश्‍चर्य वाटलं नव्हतं. मात्र त्यानंतर रेंच्या मुलाने संदीप रेने त्याला आक्षेप घेतला, त्याला स्वत:ला आपल्या वडिलांच्या आयुष्रयावर सिनेमा करायचा असल्याचं त्याने जाहीर केलं आणि हा वाद चांगलाच पेटला. प्रसार माध्यमांनी ही त्यात भर घातली. सत्यजित रेंच्या आयुष्यात आलेल्या नायिकेमध्ये ते कसे गुंतत गेले ही ऋतुपर्णो घोषच्या सिनेमाची गोष्ट होती.

अनिकेत हे बंगालमधले ङ्गार मोठे दिग्दर्शक अतिशय आजारी आहेत. आपल्या मुलाबरोबर, अप्रतीमबरोबर ते एका हिल स्टेशनवर आले आहेत. धुसर अशा एका सकाळी ते मुलाशी सिनेमा माध्यमावर गप्पा मारताहेत. पहिल्याच ङ्ग्रेममधून आपल्याला बाप आणि मुलाच्या नात्याची, दोघांचाही सिनेमाशी असलेल्या घनिष्ट संबंधांची जाणीव होते. दरम्यान वडिलांची प्रकृती खालावते, मुलगा कोलकात्याला घेऊन येतो पण त्यांचा मृत्यू होतो. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या अनेकांमध्ये एक असते शिखा. शिखाला पाहून कॅमेरे सरसावतात, लोकांमध्ये चलबिचल होते. पण अनिकेतबाबूंची पत्नी दिप्ती मात्र शांत असते. आणि शांत असतो आपू, म्हणजेच अप्रतीम. त्यानंतर फ्लॅशबॅकमध्ये ही कहाणी आपल्यासमोर उलगडत जाते. आणि पाहता पाहता ती केवळ अनिकेतबाबू किंवा शिखा यांच्या संबंधांची न राहता, दीप्ती आणि अनिकेतबाबू, दीप्ती आणि शिखा, शिखा आणि आपू यांच्या परस्परसंबंधांचीही होऊन जाते.

दिग्दर्शकाने अतिशय हळुवारपणे हे नातेसंबंध हाताळाले आहेत. कोणालाही काळ्यापांढर्‍या रंगात रंगवलेलं नाही. आयुष्यात असलेल्या ग्रे शेड्समध्ये सिनेमा बघायला मिळतो. आणि केवळ बघण्याचा, म्हणजे नजरेचा विचार केला तर तो ङ्गार सुंदर दिसतो. मात्र, ऋतुपर्णो घोषच्या सगळ्या सिनेमांप्रमाणे यातही प्रचंड संवाद आहेत. सिनेमामधल्या सिनेमातही आहेत आणि सिनेमामधल्या प्रत्यक्ष आयुष्यातही आहेत. सिनेमातल्या सगळ्या व्यक्तिरेखा अतिशय हळूवार, संथ आवाजात बोलतात. जणू कोणाला कसली घाईच नाही. एखाद्या तरल दृष्यात ते ठिक वाटतं, पण संपूर्ण सिनेमाची तीच गती एखाद्या वेळेस कंटाळा आणते. लांबण लागल्यासारखी वाटते आणि सिनेमामध्ये गुंतत जाणारं आपलं मन त्यातून बाहेर पडू लागतं. अप्रतीम दृष्यांच्या माध्यमातून आणि एक जबरदस्त कथा हाताशी असताना दिग्दर्शक जर प्रेक्षकाला खुर्चीला बांधून ठेवणार नसेल तर ते त्याचं एका परीने अपयशच म्हणाला हवं.

पुन्हा एकदा या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे यातल्या दोन बायका. दोघींच्याही व्यक्तिरेखा उभ्या करताना ऋतुपर्णो कोणावर अन्याय करत नाही. दिप्तीचं (ममता शंकर) शिखाशी सुरुवातीला असलेलं वागणं अगदी आईसारखं असतं. आपल्या नवर्‍याला गळ घालून ही बाई शिखाला भूमिका द्यायला लावते. आणि मुलीच्या वयाच्या शिखाच्या प्रेमात आपला नवरा पडला आहे हे कळल्यानंतर पार खचून जाते. इतक्या वर्षांचा संसार, नवर्‍यासाठी आणि घरासाठी काढलेल्या खस्ता सगळं जणू एका क्षणात संपून गेलंय अशी तिची भावना होते.

आपल्या तरुण मुलामध्ये ती एक मित्र शोधू पहाते. आणि एका कमजोर क्षणी नवर्‍याच्या समोर मुलाला उभं करून त्याला मोठा स्क्रिप्ट रायटर बनवण्याचे प्रयत्नही करते. शिखाच्या बाजूने विचार केला तर तिचीही काही चूक नाही असं वाटत रहातं. एवढा मोठा दिग्दर्शक, त्याच्या बरोबर काम करायची मिळालेली संधी, शिखाच्या अमॅच्युर असण्यामुळे खावा लागणारा ओरडा, आणि त्यातून हळूहळू दोघांमध्ये निर्माण होणारी जवळीक... यात म्हटलं तर काहीच अनैसर्गिक नाही. पण हा हुशार दिग्दर्शक आपल्यासमोर या दोन बायकांची बाजू मांडतो ती एका पुरुषाच्या दृष्टिकोनातून.कारण ही गोष्ट अप्रतीमचीही आहे. आईविषयी प्रचंड सहानुभूती असलेला हा मुलगा वडिलांच्या निधनानंतर शिखाला भेटायला जातो आणि तिची बाजूही समजून घेतो.वडिलांच्या शेवटच्या काळात त्यांच्याशीही मैत्री करू पहातो, त्यांना समजून घेवू मागतो. सुरुवातीच्या सिनेमांचा अनुभव हा सिनेमा देत नसला, तरी एक वेगळी गोष्ट नक्कीच सांगतो.

Rituparno Ghosh33नौकाडुबीने मात्र माझी पूर्ण निराशा केली होती. या आधीही ऋतुपर्णोने रवींद्रनाथांच्या कथांवर सिनेमे केले होते आणि त्यानंतरही केले. चोखेरबाली आणि चित्रांगदा (२०१२मध्ये प्रदर्शित झालेला ऋतुपर्णोचा हा शेवटचा सिनेमा. मृत्यूपूर्वी तो सत्यान्वेषी या सिनेमावर काम करत होता. ब्योमकेश बक्षी या बंगाली डिटेक्टिव्हवर आधारित या सिनेमाचं शूटिंग बरंचसं पूर्ण झालंय). ९९मध्ये त्याने केलेल्या असुख या सिनेमात रवींद्रनाथांची अदृष्य भूमिका होती. आणि गेल्याच वर्षी त्याने टागोरांच्या आत्मचरित्रावर आधारित केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयासाठी एक डॉक्युमेंटरीही केली. मगाशी म्हटल्याप्रमाणे रे आणि टागोर हे ऋतुपर्णोचे खास प्रेमाचे विषय होत. ही डॉक्युमेंटरी केल्यानंतर टागोरांविषयी बोलताना तो म्हणाला होता, ‘लहानपणापासून ते वय होईपर्यंत टागोर हे एकटे होते. त्यांचं अगदी यशही शेअर करण्यासाठी त्यांच्या आयुष्यात कोणीही नव्हतं. एका एकट्या प्रवाशाची सफर होती ही. पण त्यांना मजा करायला आवडायची, त्यांच्यापाशी तीक्ष्ण विनोदबुद्धी होती हे मात्र मी माझ्या डॉक्युमेंटरीमध्ये पकडू शकलो नाही. मी त्यांना दाखवलंय ते विचारवंत, गुरू म्हणूनच. कदाचित टागोरांविषयी माहिती नसलेल्या प्रेक्षकांसाठी हे करणं मला आवश्यक वाटलं.’

तर नौकाडुबी. व्हिज्युअली या सिनेमामधली प्रत्येक ङ्ग्रेमही सुंदर, देखणी झालेली आहे. नौकाडुबी ही टागोरांची प्रसिद्ध गोष्ट. १९२० सालातली. त्यामुळे आजच्या काळात काहीशी जुनी वाटणारी. रमेश हा गावातून कोलकात्याला आलेला मुलगा. शहरातल्या आपल्या मित्राच्या बहिणीच्या हेमच्या प्रेमात पडतो. दोघे लग्न करणार असं वाटत असतानाच रमेशला गावातून वडिलांचं बोलावणं येतं. त्यांनी त्याचं लग्न गावातल्या एका मुलीशी ठरवलेलं असतं. रमेश काही कारणाने नाही म्हणू शकत नाही आणि लग्न करूनच तो शहरात यायला निघतो. वाटेत प्रचंड वादळ येतं आणि त्यांची बोट बुडते. किनार्‍याला लागलेला रमेश शुद्धीवर येतो, आजुबाजूला पहातो तेव्हा नव्या नवरीच्या कपड्यांमधली एक मुलगी बेशुद्धावस्थेत त्याला दिसते. तो तिला घेवून घरी येतो आणि काही काळाने त्याच्या लक्षात येतं की जिला आपली बायको समजून आपण घरी आणली ती कुणी वेगळीच आहे. आपली बायको सुशीला नाही.

सुशीला त्या वादळात मृत्यू पावते. आणि रमेशबरोबर येते ही कमला. तिचंही त्याच वेळी लग्न झालंय. तिनेही आपल्या नवर्‍याला बघितलेलं नाही. कमलाचा नवरा आहे नलीनाक्ष. कर्मधर्मसंयोगाने रमेशच्या लग्नामुळे प्रेमभंग झालेली हेम नलीनाक्षला भेटते, दोघांमध्ये मैत्रीचं नातं निर्माण होतं. कमलाच्या येण्याची एक वर्षभर वाट बघितल्यानंतर नलीनाक्ष हेमशी लग्न करायचा निर्णय घेतो. (याच कथेवर काही वर्षांपूर्वी एक हिंदी सिनेमाही येवून गेलेला आहे, मात्र त्यात नौकेऐवजी ट्रेनचा अपघात दाखवलेला होता.) हा सगळा गोंेधळ आणि योगायोग आजच्या घडीला खूपच खटकतात.

गोष्ट जुन्याच काळात घडते, संपर्काची साधनं नव्हती, लग्नाअगोदर नवरा बायकोला एकमेकांचा चेहरा बघण्याची गरज नव्हती त्या काळात. पण मग आज ती का दाखवायची? आजच्या काळाशी या गोष्टीचं नातं कोणत्याही प्रकारे जोडता येत नाही. मग दिग्दर्शकाला ही गोष्ट का कराविशी वाटली? या प्रश्‍नांची उत्तरं आपल्याला मिळत नाहीत. आणि मग नव्वद वर्षांपूर्वीच्या या गोष्टीत रमून जायला होत नाही.

त्यातून इथेही प्रत्येक व्यक्तिरेखा पडद्यावर कशी सुंदर दिसेल याचा अट्टाहास दिग्दर्शकाने केला आहे असं वाटत रहातं. रडतानाही हेमच्या चेहर्‍यावर आलेली केसांची बट तिच्या रडण्यातला खरेपणा घालवून टाकते. हा आपला नवरा नाही हे कळल्यानंतर कमलाला बसलेला धक्का तेवढ्याच तीव्रतेने आपल्याला बसत नाही. कोणत्याच बाबतीत आपण या गोष्टीत गुंतून पडत नाही. एक छोटीशी, गंमतीशीर योगायोगांची गोष्ट एवढ्याच पातळीवर सिनेमा रहातो. ना त्यातल्या भावना आपल्याला आपल्याशा वाटत ना त्यातला अभिनय.

दरम्यानच्या काळात ऋतुपर्णोने काही सिनेमांमध्ये कामही केलं. हिमांशू परिजा यांच्या ओडिया सिनेमात त्याने अभिनय केला, संजोय नाग यांच्या मेमरीज इन मार्चमध्ये त्याने दिप्ती नवलबरोबर काम केलं पण त्याचा अभिनेता म्हणून गाजलेला सिनेमा म्हणजे कौशुक गांगुली यांचा अरेकती प्रेमेर गोलपो. समलिंगी नात्यावर आधारलेला हा सिनेमा म्हणजे एक प्रकारे ऋतुपर्णोचं आयुष्यच होतं.

ऋतुपर्णो घोषने खूप काम केलं. दिग्दर्शक म्हणून खूप निरनिराळे विषय हाताळले. काही वेळा तो यशस्वी ठरला, तर काही वेळा अपयशी. पण त्याची दखल न घेणं मात्र कधीच शक्य नव्हतं. कारण या दिग्दर्शकाची स्वत:ची अशी स्टाईल होती. स्वत:चं असं म्हणणं होतं. स्वत:ची अशी संवेदनशीलता होती. आणि हे सगळं घेऊन तो आपले सिनेमे करत होता. अत्यंत प्रामाणिकपणे. अत्यंत मनापासून. त्याच्या अकाली निधनामुळे तो चटका लावून गेला एवढं नक्की.

Posted By- मीना कर्णिक, चित्रपट समीक्षक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 22, 2013 05:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...