एप्रिल फूल !!

एप्रिल फूल !!

  • Share this:

sandeep_chavan_बरोबर दोन महिन्यांपूर्वी म्हणजे 1 एप्रिल रोजी आम्ही आयबीएन लोकमतवर आमच्या धमाका आयपीएलचा पहिला कार्यक्रम केला... गेले दोन महिने तो सुरू होता... 1 एप्रिलच्या त्या पहिल्या शोमध्ये मी स्पोर्ट्स एडिटर या नात्यानं मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज फायनलमध्ये येतील आणि मुंबई आयपीएलचे विजेते होतील असं भाकीत केलं होतं, जे तंतोतत खरं ठरलं. माझ्या या अचूक विश्लेषणावर अनेक अभिनंदनांचे फोन आले, एसएमएस आले... त्यातला एक एसएमएस खूप भारी होता. त्यात म्हटलं होतं, सर काय पण दिवस निवडला हा प्रोग्राम सुरू करायला. एक एप्रिल म्हणजे अंदाज बरोबर आले तर हुशारी दाखवायची आणि चुकले तर एप्रिल फूल म्हणायला मोकळे... हा एसएमएस येईपर्यंत माझ्याही डोक्यात हा अजब योगायोग आला नव्हता..

यातील जोक सोडला तर यंदाच्या आयपीएलनं खर्‍या अर्थानं क्रिकेटप्रेमींना एप्रिल फूल केलं. स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेले खेळाडू, बेटिंगसाठी स्वत:च्याच टीमला जुगारात विकणारा चेन्नई टीमचा मालक गुरुनाथ मय्यप्पन. बॉलीवूडमध्ये कमावलेली प्रतिष्ठा बेटिंगमध्ये गमावणारा विंदू दारा सिंग... क्रिकेटमधील मैदानावरचा अंतिम शब्द ज्याचा मानला जातो तो अंपायर असद रौफ... थोडक्यात काय - क्रिकेटर, अंपायर, मालक, बॉलीवूड स्टार या सार्‍यांनी मिळून यंदाच्या आयपीएलमध्ये तमाम क्रिकेट शौकिनांना एप्रिल फूल केलं. आणि यावर कळस म्हणजे यंदाच्या आयपीएलमधील फेअर प्ले पुरस्कार हा चेन्नई सुपर किंग्ज या टीमला देण्यात आला. आणि तो ज्यावेळी दिला गेला त्यावेळी त्या टीमचे पडद्यामागील मालक आणि भारतीय क्रिकेट संघटनेचे वादग्रस्त अध्यक्ष श्रीनिवासन मैदानात हजर होते.

 

Loading...

आयपीएलमधील या विनोदाची तुलना 1939 साली क्रूरकर्मा ऍडॉल्फ हिटलरची ऑस्कर पुरस्कारासाठी करण्यात आलेल्या नॉमिनेशनशीच करावी लागेल. अर्थात नोबेल पुरस्कार समितीवर त्यावेळी एस. श्रीनिवासन यांच्यासारख्या मस्तवाल अधिकार्‍याचं वर्चस्व नव्हतं. त्यामुळे हिटलरला त्यावेळी पुरस्कार नाकारण्यात आला होता. पण तशी धमक बीसीसीआय आणि आयपीएलमधील कुणाकडेच नाही. कारण सगळे मोडलेल्या कण्याचे पोकळ माणसं... न्यायाची अपेक्षा त्यांच्याकडून कुणी ठेवावी? हा फेअर प्ले ऍवॉर्ड कसा देतात माहिती आहे का? स्पर्धेतील अंपायर खेळाडूंच्या मैदानातील वर्तणुकीसाठी गुणांकन देतात आणि त्यावर हा फेअर फ्ले ऍवॉर्ड दिला जातो.

याच स्पर्धेतील अंपायर पाकिस्तानचे असद रौफ यांच्यावर स्पॉट फिक्सिंगचा आरोप आहे. स्पर्धा सुरू असतानाच त्यांनी अनाकलनीयरीत्या भारतातून पलायन केलं. याच अंपायर महाशयांना चेन्नई सुपर किंग्जचे मालक आणि आता सध्या पोलीस कोठडीत असणार्‍या गुरुनाथ मय्यप्पन यांनी महागड्या वस्तू भेट दिल्या होत्या. पैशाच्या मोबदल्यात झुकणार्‍या याच रौफ महाशयांनी चेन्नई आणि बंगलोरमधील पहिल्या लीग मॅचमध्ये अंपायरिंग केलं होतं. बंगलोरच्या ख्रिस्तियन यानं पाचव्या ओव्हरमध्ये टाकलेला पहिलाच बॉल असद रौफनी 'नोबॉल' घोषित केला होता. आजही तुम्ही क्रिकइन्फोच्या साईटवर जाऊन त्या बॉलच्या कॉमेंट्रीचं वर्णन वाचू शकता.

ख्रिस्तियन यानं ओव्हर स्टेप केलेले नसतानाही असद रौफ यांनी तो बॉल नोबॉल दिला होता. इतकंच कशाला, याच मॅचमध्ये शेवटच्या बॉलवर चेन्नईला दोन रन्स जिंकण्यासाठी हवे असताना वीतभर लांब ढेंग टाकत नोबॉल टाकला होता. एक तर तो शॉर्ट टाकला होता आणि त्यातही बराच वाईडही होता, म्हणजे नोबॉल नसता गेला तर सिक्सर नक्कीच. पण आरपीचं नशीब इतकं वाईट होतं की तो कॅच गेला पण अंपायर चौधरीनं तो नोबॉल दिल्यामुळे चेन्नई नाट्यमयरीत्या जिंकली होती.

आरपी सिंगनं टाकलेल्या त्या नोबॉलवर अजूनही अनेकजण संशय घेतायत. शेवटच्या 6 बॉलमध्ये 16 रन्स चेन्नईला हवे होते आणि ते त्यांनी केले. बरं, आरपी सिंगनं एकदा नव्हे तर याच मॅचच्या चौदाव्या ओव्हरमध्येही शेवटचा बॉल चांगला वीतभर लांब ढेंग टाकत नोबॉल टाकला होता... आता या सर्वांवर प्रश्नचिन्ह उभं राहणार. आपण गुन्हेगार नाहीत हे सिद्ध करण्याची जबाबदारी ही अंतिमता आता क्रिकेटर्सचीच असणार आहे. थोडक्यात, अशा या लबाड पंचाच्या गुणांकनांवरून फेअर प्ले ऍवॉर्ड निर्लज्जपणे चेन्नईला दिला गेला. यासारखी दुसरी मूर्खपणाची गोष्ट कोणती असावी..

चेन्नईची त्यानंतरची दुसरी मॅच होती ती पुणे टीमसोबत आणि तीही चेन्नईत. पॉईंट टेबलमध्ये तळाशी असणार्‍या पुणे टीमनं 16 मॅचमध्ये फक्त चार विजय मिळवले. त्यातील एक विजय होता तो चेन्नई टीमविरुद्धचा... होय, दुबळ्या पुण्यानं चेन्नईवर दणदणीत विजय मिळवला होता. आता सांगा या मॅचमध्ये अंपायर कोण होतं. उत्तर सोपं आहे असद रौफ..घाईघाईत पाकिस्तान गाठणार्‍या असद रौफ यांच्या हॉटेल रूमवर पोलिसांनी जेव्हा धाड टाकली तेव्हा त्यातील सुटकेसमध्ये प्रत्येकी 50 हजार रुपये किमतीच्या सहा जीन्स, 30 हजार रुपये किमतीच्या बुटाच्या चार जोड्या. 10 महागडी घड्याळं आणि एक हॉलेड टूर पॅकेज सापडलं.. असद रौफ यांनी अंपायरिंगच्या पेशाला काळिमा फासत क्रिकेटचीच विकेट काढली... पोलीस तपास सुरू आहे.. अजून बरेच मोठे मासे गळाला लागल्याचा दावा पोलीस करतायत. पण एक नक्की की, यंदाच्या या आयपीएलमध्ये क्रिकेटप्रेमींचा पुरता एप्रिल फूल झालाय..

Posted by .संदीप चव्हाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 13, 2013 06:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...