Elec-widget

पाकिस्तानातला भगतसिंग चौकाचा लढा !

  • Share this:

jatin_desai_150x150लाहोरचा शदमान चौक...इथं वाहनांची आणि माणसांची वर्दळ सतत सुरू असते. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लाहोरचा सतत विस्तार होत असल्याने आता शदमान चौक शहराच्या मध्यभागी आला आहे. जवळपास श्रीमंत लोकं राहतात. पूर्वी या ठिकाणी तुरूंग होती. अजुनही शदमान चौकाला लागून तुरूंग आहे. पण,आता ही तुरूंग लहान झाली आहे. आजही अनेक कैदी या तुरूंगात आहेत पण आधीच्या तुरूंगाच अवशेष त्याला म्हणता येईल. या तुरूंगाबद्दल एवढं लिहिण्याच कारण म्हणजे आजचा शदमान चौक आहे. तेथे 23 मार्च 1931 रोजी ब्रिटीश साम्राज्यवाद्यांनी भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेवला फाशी दिलेली. अशी ही एक ऐतिहासिक जागा.

गेली काही वर्ष मी, सातत्याने 23 मार्च रोजी शदमान चौकला जात आहे आणि क्रांतिकारकांना अभिवादन करत आलो आहे. या तिन्ही क्रांतीकारकांना ब्रिटीशानी फासावर चढवलं तेव्हा कोणी स्वप्नातही पाकिस्तान नावाचा देश अस्तित्वात येईल याची कल्पना केली नसेल. भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव खर्‍या अर्थाने उपखंडाचे क्रांतीकारक आहेत. उपखंडातील जनतेला ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त करून समाजवादाकडे नेण्याचं त्यांचं स्वप्न होतं. मुस्लीम लीग आणि मोहम्मद अली जिन्नाह यांनी द्विराष्ट्राच्या सिद्धांताची मांडणी करून पाकिस्तान बनविला.

पाकिस्तान अस्तित्वात आला तरी दोन्ही देशात हजारो वर्षांचा समान इतिहास आहे. आणि स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिकारक त्याला अपवाद नाही. म्हणून भगत सिंग आणि त्यांच्या सहकार्‍यांकडे उपखंडातील क्रांतीकारक असं पाहिलं पाहिजे, अशी भूमिका पाकिस्तानात अनेक जण घेतात. शदमान चौकाचं नाव बदलून शहीद भगतसिंग चौक करण्यात यावं अशी अनेक वर्षांपासून मागणी करत आहेत. डावे आणि उदारमतवादी पाकिस्तानी दर 23 मार्च रोजी या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करून आपली मागणी पुढे रेटतात. काल-परवा पर्यंत पंजाब प्रांतात पाकिस्तान मुस्लीम लीग (एन)चं सरकार होतं आणि शाहवाज शरीफ मुख्यमंत्री होते. गेल्या वर्षी 23 मार्चला कुलदीप नय्यर आणि महेश भट्ट देखील सोबत होते. नवाझ शरीफनी शदमान चौकाच शहीद भगत सिंग चौक असं नामांतर करण्यात येईल असं आश्वासन कुलदीप नय्यरला दिलेलं त्या अनुषंगानी पंजाब सरकारनी कारवाई देखील सुरू केली. काही कट्टर मुस्लीमांना ही बाब आवडली नाही आणि त्यांना न्यायालयाचा आधार घेतला. नामांतर अडकून पडलं.

या वर्षी 23 मार्च जसा जवळ आला तसे कार्यकर्ते तयार झाले. अनेक कार्यक्रमांची त्यांनी आखणी केली. मी तर 19 मार्चलाच लाहोरला पोहचलेलो. सगळे आपआपल्या तयारीला लागले होते. तीन डाव्या पक्षानी एकत्र येऊन बनवलेल्या अवामी वर्कस पार्टीचे व इतर कार्यकर्ते नेहमी सगळ्यात पुढे असतात. यावेळी त्यांना विरोध करण्यासाठी मुल्ला मौलवी आणि कट्टर इस्लामी देखील कामाला लागले होते. 22 मार्च रोजी त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन त्यानी त्याची घोषणाच केली. दुसर्‍या दिवशी म्हणजे 23 मार्चला काही वर्तमानपत्रात या मुल्ला-मौलवीनी दिलेल्या जाहिरातीच झळकल्या. शहीद भगत सिंगच नाव देण्याला त्यांनी विरोध केलेला. भगत सिंगचा विचार पाकिस्तानच्या विचारसरणीच्या विरूद्ध असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. भगत सिंगचा जन्म आजच्या पाकिस्तानच्या फैसलाबाद जिल्हात झाला होता. तेव्हा त्या जिल्ह्यात नाव लायलपूर होतं. पाकिस्तानात नावाच्या इस्लामिकरणाची सुरूवात झाल्यानंतर लायलपूरच फैसलाबाद झालं. मोन्टगोमेरीचं नाव बदलून साहिवाल करण्यात आलं. मात्र अनेक नाव बदलण्यात नाही आली ही देखील वस्तुस्थिती आहे. उदाहरणार्थ लाहोर येथील गंगाराम हॉस्पिटल.

23 मार्चचा दिवस उजाडला. सायंकाळी पाच वाजता कार्यक्रम ठरलेला कार्यकर्ते भगत सिंगचे फोटो घेऊन आलेले. बर्‍यापैकी तरूण मुलं-मुली गोळा झालेले. भगत सिंग आणि त्यांच्या विचाराबद्दल ते बोलत होते. आजच्या पाकिस्तानात त्यांचा विचार कसा आवश्यक आहे, असं एकमेतांशी ते बोलत होते. समोर जमले होते कट्टर मुल्ला-मौलवी. आतंकवादी संघटना लष्कर-ए-तय्यबाशी संबंधीत जमीयत-उल-दावाचा या मुल्ला मौलवीना समर्थन होतं. 'भगतसिंग इस्लाम विरोधी होता' असं त्यांचं म्हणणं होतं. नास्तिक भगत सिंगच नाव इस्लामिक पाकिस्तानात एखाद्या चौकाला कसं देता येईल,असा त्यांचा युक्तिवाद होता. भगत सिंग समर्थक आणि विरोधक समोरासमोर आल्याने वातावणात तणाव होता. शेवटी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.

Loading...

या सगळ्या तणावाच्या वातावरणात मला नेमकं शदमान चौकला सायंकाळी जाता आलं नाही. पाकिस्तानी सहकार्‍यांच मी शदमान चौकात येण्याचं टाळावं, असा सल्ला होता. त्यांचं म्हणणं बरोबर होतं. एकतर मी परकीय नागरिक आणि त्यातही भारतीय एखादा भारतीय शदमान चौकात हजर आहे असं विरोधकांना कळालं असतं तर त्यांनी जास्त आक्रमक पवित्रा घेतला असता. सायंकाळच्या कार्यक्रमात सहभागी न होता मी रात्री लाहोरहून कराचीला रवाना झालो.

पाकिस्तान एका संकटात सापडलं आहे. पाकिस्तानची विचारसरणी काय, यावर अतिरेक केला जात आहे. या निवडणुकीच्या काळात तर अतिरेकाचा कहर होत आहे. पाकिस्तनची विचारसरणी इस्लामिक आहे की 11 ऑगस्ट 1947 रोजी मोहम्मद अली जिन्नाहनी घटने स्तंभसमोर केलेलं भाषण आहे. जिन्नाहनी या भाषणात राज्याचा धर्माशी संबंध राहणार नाही,असं म्हटलेलं. कहर या वरूनही लक्षात येईल की, या निवडणुकीच्या अनेक उमेदवारांना वेगवेगळ्या निवडणूक अधिकार्‍यांनी आयात वाचता येते की नाही याची परीक्षा घेतली.

तालिबानची विचारसरणी आणि उदारमतवादी विचार याचा पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू आहे. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय समुदायानी उदारमतवाद्यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे.

Posted by .जतीन देसाई

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 13, 2013 05:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...