राजकारणातील 'सयामी जुळे'

राजकारणातील 'सयामी जुळे'

  • Share this:

Rajendraराजेंद्र हुंजे, न्यूज एडिटर, IBN लोकमत

राज्यात नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीच्यावेळी सत्ताधारी भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षात घमासान झाल्याचं पाहायला मिळालं. किंबहुना अजूनही दोघे धुमसतानाच दिसताहेत. मुंबईसह 10 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका पार पडल्या. परंतु, सगळ्या राज्याचं लक्ष केंद्रित झालं होतं ते मुंबई महापालिकेत काय होणार याकडं. खरं पाहता, शिवसेना-भाजपनं राज्यापेक्षा मुंबई महापालिकेलाच अधिक महत्व दिलं. त्यामुळं कुणाचं काय होणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. शेवटी नंबर वन आम्हीच होणार असा दावा ठोकत शिवसेनेने तो खरा जरी ठरवला असला तरी, भाजपनंही त्यांच्या आसपासचं संख्याबळ मिळवून त्यांच्या नंबर वनचं महत्व अगदीच कमी करून टाकलं.

गेली 27-28 वर्षे एकत्रितपणे निवडणुका लढवणारे सेना-भाजप 2014 च्या विधानसभा निवडणुकीत युती धर्म तोडून वेगळे झाले. दोघांनीही एकमेकांची ताकद आजमावली. लोकसभेनंतर मोदींची लाट कायम असल्यामुळे त्याचा फायदा भाजपनं चांगलाच करून घेतला. 122 जागांवर मजल मारत शिवसेनेचा मोठा भाऊ आपणच हे सिद्ध केलं. आतापर्यंत भाजपला शिवसेनेचा लहान भाऊ म्हणूनच राहावं लागलं होतं. पण, 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर या दोन्ही पक्षाच्या महत्वाकांक्षा बदलत गेल्या. त्यानुसारच त्यांच्या रणनीती ठरत गेल्या. प्रत्यक्षात याचा फटका त्या दोघांना फारसा बसलाच नाही. उलटपक्षी एकमेकांच्या जागा वाढवण्यात त्यांना यश आलं. सोबतच त्यांच्या मतांचा टक्काही वाढताना दिसला.

cm_uddhav_selfiyविधानसभा निवडणुकीपूर्वी तुळजाभवानीचं कुटुंबासह दर्शन घ्यायला आलेल्या उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे मंत्री घेऊन पुढे दर्शनाला येईन, असं बळ दे...असं साकडं देवीला घातलं होतं. त्यानंतर झालेल्या प्रचाराच्या रणधुमाळीत दोघांनीही म्हणजे शिवसेना-भाजपनं एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. कधी-कधी तर टीकेची पातळीही ओलांडलेली पाहायला मिळाली. परिणामस्वरूप दोघांच्या पदरात अपेक्षित असं यश पडलं नसलं तरी, विरोधकांच्या जागा पटकावण्यात मात्र ते सरस ठरले. तसाच पायंडा पुढे कल्याण-डोंबिवली आणि आता महापालिका, तसंच जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला.

2014 ला विधीमंडळात शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय देवेंद्र फडणवीस सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला. पुढे 70 दिवस विरोधात बसलेल्या शिवसेनेला सत्तेत जाण्याची घाई झाली. त्यानंतर वेगानं चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या आणि शिवसेना सत्तेत सहभागी झाली. पुन्हा सत्तेत मिळालेल्या मंत्रिपदावरून आणि त्यांच्या हक्कावरूनही या दोघांमधली सुंदोपसुंदी पाहायला मिळाली. वैशिष्ट्य म्हणजे एकमेकांवर इतकी टोकाची टीका सत्तेत राहून करून देखील, ते एकमेकांपासून फारकत घ्यायला तयार नाहीत. म्हणूनच त्यांना राजकारणातील सयामी जुळे म्हणून संबोधायला हरकत नाही. कारण, सयामी जुळ्यांची अडचण अशी असते की, ते काहीही झालं तर एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीत. दोघांपैकी एकाची इच्छा झाली म्हणून त्यानं ठरवलं की, आता आपण आपल्या बाजूकडे सगळं खेचून नेऊ, तर त्यावेळी दुसऱ्यालाही त्याच्यासोबत फरफटत जावं लागतं. दुसऱ्यानं खेचलं, तर पहिल्याला त्याच्याकडे जावंच लागतं. अशी ही सयामी जुळ्यांची परिस्थिती असते. अगदी अशीच काहीशी परिस्थिती भाजप आणि शिवसेनेची झालेली आहे.

सत्तेतला अधिकाधिक वाटा मिळावा म्हणून सत्तेत राहूनदेखील एकमेकांवर जोरदार टीका करून विरोधकांची जागाही आपणच घ्यायची, त्याच्यासोबतच त्यांच्या मतांचा टक्का आपल्याच आरोप-प्रत्यारोपातून खेचण्याचा प्रयत्न करायचा. त्यात हे दोघे काही प्रमाणात निश्चित यशस्वी झाले. पण सत्तेत राहून विरोधी भूमिका कायम ठेवत किती दिवस हे असंच चालणार हा ही प्रश्न आहेच. सयामी जुळ्यांना असं करून चालतच नाही. दोघांनाही कुठल्यातरी मुद्यावर एकमेकांशी तडजोड करावीच लागते. एकवेळ पहिल्याचं, तर कधी दुसऱ्याचं ऐकून घ्यावंच लागतं. कल्याण-डोंबिवलीत लढताना एकमेकांचा दोघांनी इतका उद्धार केला की बस्स! पण शेवटी काय झालं, एकमेकांपासून विभक्त होताना फारच त्रास होईल म्हणून, हा ह्या परिस्थितीत सोबतच राहूया असं म्हणून शेवटी भाजप-सेनेनं जुळवून घेतलंच की...

BJP-Sena-Bannerहिंदुत्वाच्या विचारावर एकत्र आलेले शिवसेना-भाजप हा मुद्दा स्वतःपासून दूर करून एकमेकांशी फारकत तर घेऊच शकत नाहीत. अशावेळी फक्त मुद्दा हाच आहे की, जन्माने कुणी कुणाला मोठा मानायला लागला तर, जनसंघापासूनचं भाजपचं नातं सांगून भाजप म्हणतोय मीच मोठा...त्यापुढे जाऊन शिवसेना म्हणते की, भाजपला महाराष्ट्रात आम्ही रूजवलं, आमच्या बळावरच भाजप इथं वाढली, त्यामुळं राज्यात आम्हीच मोठे...प्रत्यक्षात ही परिस्थिती अशी झालीय की, जेव्हा जुळ्यांचा जन्म होतो, त्यावेळी कोण आधी जन्मला तो मोठा, असा प्रघात रूढ आहे. पण जेव्हा ते मोठे होतात, त्यावेळी त्यांच्यातला लहान मोठा ओळखणं फारच कठीण असतं. बरोबरीनं वाढत असताना दोघेही दावा करत असतात की, आपणच कसे मोठे आहोत. तसंच सध्या दोघांमध्ये अर्थात शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू आहे.

पण, इथं हा मुद्दा जुळ्यांच्या बाबतीतला नाहीच मुळी. कारण आता इतके दिवस जेव्हा केव्हा सत्ता आली, त्यावेळी एकत्र सत्तेचा आस्वाद घेतल्यानंतर हे दोघे इतक्या झटपट फारकत घेऊच शकत नाहीत. पूर्वी बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, सुधीर जोशी यासारखी मंडळी दोन्ही पक्षात होती. त्यावेळी सत्ताकारणासाठी एकमेकांना समजून-उमजून ते निर्णय घ्यायचे. एकमेकांशी जुळवून घ्यायचे. छोटा भाऊ-मोठा भाऊ हा मुद्दाच नसायचा. पण, बाळासाहेब गेले, वाजपेयी गेल्या काही दिवसांपासून आजारीच आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर भाजपमधल्या अडवाणी पर्वाचा अस्त सुरू झाला. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर शिवसेना-भाजपमधला दुवाही निखळला. तिकडे शिवसेनेतले मनोहर जोशी, लीलाधर डाके ही ज्येष्ठ नेते मंडळी केवळ मोठ्या सभांच्या व्यासपीठापुरतीच मर्यादित राहिली. त्यामुळंच पुढे या दोन पक्षात छोटा भाऊ-मोठा भाऊ अशी तुलना सुरू झाली.balasaheb thakre and bihari vajpayee

अशी तुलना सुरू असतानाच त्यांना एवढं कळून चुकलं होतं की, महाराष्ट्रात ते एकमेकांच्या आधाराशिवाय सत्ताकारण करूच शकत नाहीत. याच गोष्टीमुळे कालांतराने जुळ्या भावाच्या भूमिकेत वावरणारे शिवसेना-भाजप या दोन पक्षांचं रूपांतर सयामी जुळ्यांमध्ये झालं. या परिस्थितीत दोघांनी कोणतीही बाजू कितीही खेचली, तर त्यापैकी एकाला त्याच्यासोबत फरफटत जाण्याशिवाय पर्याय नाही हे वास्तव आहे. मुंबईच्या महापौर निवडीवरून अगदी हेच सिद्ध होतंय. परिस्थितीत अशी आहे की, इथेसुद्धा सेना-भाजप दोघांना सोडून राहू शकत नाहीत. कारण इथल्या सत्ताकारणात त्यांना काँग्रेससोबत जाऊन चालणार नाही. शेवटी विचारांचा मुद्दा येतोच ना!  भाजपही शिवसेनेला वगळून पुढे जाऊच शकत नाही. कारण तसं करायचं असेल तर त्यांनाही अशा परिस्थितीत काँग्रेसला सोबत घ्यावं लागेल. एकीकडे देशात काँग्रेसमुक्त भारताचा नारा द्यायचा आणि इथे मात्र त्यांच्यासोबत जाण्याचा विचार करायचा म्हटला तर थेट पक्षाशीच प्रतारणा केल्यासारखं होईल. त्यामुळं भाजपला ते परवडणारं नाही. 1978 साली बाळासाहेबांनी त्यावेळी राजकीय हुशारी दाखवत मुरली देवरांना मुंबईचा महापौर करण्यासाठी सेनेचा पाठिंबा दिला. त्याबदल्यात वामनराव महाडिकांच्या आमदारकीला काँग्रेसचा पाठिंबा घेऊन आपला एक आमदार विधीमंडळात पाठवला होता. पण आता ती परिस्थिती नाही.

निवडणुकीच्या काळात रामायण-महाभारत आधुनिक अवतारात पाहायला मिळालं असलं तरी, आता छोटा भाऊ-मोठा भाऊ हा उरलाच नाही. कारण दोघांनाही अगदी एकमेकांच्या जवळ जाणारं संख्याबळ मिळालंय. आता त्यांचं रूपांतर सयामी जुळ्यांमध्ये झालं आहे. अशावेळी त्यांना एकमेकांच्या मुद्यांवर जुळवून घेतल्याशिवाय इलाज नाही. कारण, सयामी जुळे कितीही म्हणत असले आम्हाला वेगळं करा, तर तसं करता येत नाही. किंबहुना, तसं करायचं झालं तर फार मोठं ऑपरेशन करावं लागतं, ते कोण करणार हा प्रश्न आहेच की...त्यामुळं आता शिवसेना-भाजपला एकमेकांशी जुळवून घेतल्याशिवाय पर्याय नाही, हे वास्तव दोन्हीकडच्या नेत्यांना मान्य नसलं तरी स्वीकारावं तर लागेलच...या दोघांनी अशा सयामी जुळ्यांच्या भूमिकेत राहण्यापेक्षा संयमी जुळ्यांची भूमिका घेतली तर अधिक बरं होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 2, 2017, 6:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading