S M L

रिपब्लिकन गोची !

Sachin Salve | Updated On: Feb 25, 2017 09:29 PM IST

रिपब्लिकन गोची !

randhir_kamble_ibn_lokmatरणधीर कांबळे, प्रिन्सिपल करस्पाँडंट,IBN लोकमत

राज्यातल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद,पंचायत समित्यांची निवडणूक पार पडलीय. प्रत्येक पक्ष आपला पक्ष अधिक ताकदीनं सत्तेत येईल, यासाठी कस पणाला लावल्याचं चित्र संपूर्ण राज्याला दिसलं. पण यामध्ये रिपब्लिकन पक्ष मात्र सत्तेत जाण्यासाठी किती जोर लाऊन उतरला होता,यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे.

नेहमीच सत्तेची फळ नेतृत्वाच्या पदरात पडणार असतात तेंव्हा सर्व कार्यकर्ते जीवाचं रान करून पक्षाचं काम करतात मात्र, जेंव्हा कार्यकर्त्याला सत्तेत जाण्याचा मार्ग दिसू लागतो तेव्हा मात्र नेते त्याची माती करतात. हा अनुभव वारंवार रिपब्लिकन चळवळीतल्या कार्यकर्त्यांना आला आहे. त्याचीच पुनरावृत्ती या वेळीही झालीय. खरंतर रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते हे आंबेडकरी चळवळीतून या पक्षात आले आणि त्या पक्षाशी व्यावहारिक ऐवजी भावनिक नातं जोडून भाकरी तुकडा न खाता काम करत राहीले. या पक्षातला कार्यकर्ता हा नेहमीचं सामाजिक कामावर भर देणारा असतो. कुठं एखाद्या ठिकाणी अन्याय झाला तर त्याचं उत्तर द्यायला रस्त्यावर उतरणारा हा कार्यकर्ता सत्तेच्या साठमारीत नेहमीच बाजूला फेकला गेलाय. त्याची काळजी पक्ष नेतृत्वानं कधी केलीच नाही.


खरं तर सिद्धार्थ हाॅस्टेलमधून थेट मंत्रिपदाची शपथ जेंव्हा रामदास आठवले यांनी १९८९ साली घेतली तेंव्हा रिपब्लिकन पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपणच मंत्री झाल्याचा आनंद तेंव्हा राज्यभरात दिसला. गावागावातल्या कार्यकर्त्याचा आत्मविश्वासही मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यानंतरच्या काळात काँग्रेससोबत युती झाली होती तेंव्हा जिल्हा परिषद,पंचायत समित्या तसंच नगरपालिकेत रिपब्लिकन पक्षाचे सदस्य दिसू लागले होते. मुंबईत तर चंद्रकांत हंडोरे महापौरपदाच्या खुर्चीत विराजमान होऊ शकले .या काळात जरी काँग्रेस रिपब्लिकन युतीच्या माध्यमातून रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना सत्तेत वाटा मिळाला होता. भले त्या काळात त्याचा फायदा काँग्रेसला अधिक झाला होता. पक्ष राज्यभरात अस्तित्वात असल्याचं चित्रं मोठ्या प्रमाणात दिसूही लागलं होतं.

rapi44रिपब्लिकन पक्ष म्हणजे एक परिवर्तनवादी भूमिका घेणारा पक्ष. पुरोगामी शक्तींच्या खांद्याला खांदा लाऊन राजकारण करण्यामागची सामाजिक भूमिका या पक्षाची होती.या पक्षाला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा भक्कम आधार असल्यानंच हा पक्ष प्रतिगामी शक्तीच्या विरोधात कायम सामाजिक आणि राजकीय पातळीवर लढत राहिला. मग त्यात त्याचा तोटा झाला तरी त्याचा त्यांनी कधी विचार केला नाही. त्या उलट त्यासाठी मोठी किंमतही त्यांनी मोजली. मात्र सत्ताधारी जमात बनवण्याची भूमिका घेत शिवसेनेसोबत भिमशक्ती-शिवशक्तीचा नारा रामदास आठवले यांनी दिला.

खरं तर सेना-विरूद्ध दलित पॅन्थर-रिपब्लिकन पक्ष असा इतिहास होता. त्यामुळेच नेहमीचं धर्मवादी राजकारण करणाऱ्या शिवसेनेसोबत जाण्याला समाजातून खूप काही उत्साहवर्धक प्रतिक्रिया उमटली नव्हती. हा निर्णय खरंतर सामान्य कार्यकर्त्याला मनापासून आवडला नव्हता.  शिवसेनेसोबतच्या युतीमुळे गावागावात होणाऱ्या दलितांच्या हल्ल्याचे प्रकार कमी होतील,आणि काँग्रेसनं रिपब्लिकन मतांचा फायदा घेतं सत्ता मिळवली. त्याप्रमाणात रिपब्लिकन पक्षाला काही मिळालं नाही. ही भावना पक्ष कार्यकर्त्यांच्या मनात होती.

Loading...

आता शिवसेनेसोबत राजकीय युती केल्यानंतर सत्तेत अधिकचा वाटा मिळू शकेल या भाबड्या आशेनं कार्यकर्त्यांनी तयारी केली.राज्यभरात भिमशक्ती-शिवशक्तीचा नारा त्यांनी राज्य़भर नेला. पण निवडणुकीच्या काळात मात्र रिपब्लिकन मतं सेनेच्या उमेदवारांना पडत नाहीत अशी भावना सेना नेत्यांची झाली. त्यातून रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना सेनेची मदत होणार नाही, याची काळजी घेतली गेली. पुढे सेनेसोबत राहिल्यास आपल्या पदरात विशेष काही पडणार नाही. याची चाहूल लागताच आठवले यांनी सेनेला दूर करत भाजपचा हात पकडला. मात्र भाजप सत्तेवर आल्यानंतर त्यांनी आपल्या सगळ्याच मित्रपक्षांना सत्तेची फळं मिळणार नाहीत,याची काळजी घेतली. रिपब्लिकन पक्षाला तर त्यांनी नेहमीच हेटाळणीच्या भूमिकेनं पाहिल्याचं चित्र दिसलं. रामदास आठवले यांना आधी राज्यसभा त्यानंतर मग केंद्रातलं राज्यमंत्रीपद देऊन बोळवण केली.

पण राज्यात  मंत्रीपदं,महामंडळाचे अध्यक्षपदं देणार असल्याचं जे लेखी आश्वासन प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. ते सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं गेलं. रिपब्लिकन पक्षाचे दुसऱ्या फळीतले नेतेही राज्यातल्या सत्तेत काहीतरी मिळेल. या अपेक्षेनं शांत राहिले. कार्यकर्त्याना त्यामुळे काय भूमिका घ्यावी हे समजेनासं झालं.

रिपब्लिकन पक्षाची सगळ्यात मोठी ताकद मुंबईत असताना, या ठिकाणी आत्मविश्वासानं जागा वाटपाची बोलणी व्हायला हवी होती. मात्र झाली नाही. एकतर्फी भाजपसोबत युती केल्याचं आठवले यांनी जाहीर केलं. मात्र, भाजपनं त्याबाबतची चर्चा गांभिर्यानं घेतली नाही. त्यामुळेचं रिपब्लिकन पक्षाला २९ जागा देण्याचं फक्त मान्य केलं. त्या कुठल्या जागा दिल्या जाणार,त्याबाबतची चर्चा कधी करायची याबाबत भाजपने मौन बाळगलं.

रिपब्लिकन प्रदेशाध्यक्ष,मुंबई अध्यक्ष आणि कार्यकर्ते मात्र चडफडत वाट पहात बसले. त्यानंतर मग १९ जागा देणार म्हटले मात्र त्याबाबतही चर्चा केली गेली नाही. त्यानंतर १९ पैकी ७ जागांवर भाजपनं आपले उमेदवार उभे केले. तेंव्हा रिपब्लिकन पक्षाचे नेते अचानक जागे झाले. आता ऐनवेळी कार्यकर्ते अर्ज कुठून भरणार याबाबत पळापळी सुरू झाली. मग रिपब्लिकन पक्षाच्या मतांचा फटका बसू नये म्हणून मग भाजपचे जरी ७ उमेदवार उभे राहिले असले तरी तिथं रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार भाजपचे नेते करतील,असं लेखी आश्वासनही दिलं गेलं.

fadanvis on athavaleज्यामुळे रिपब्लिकन कार्यकर्त्यांना अपेक्षा निर्माण झाल्या. नंतर मग भाजपच्या चिन्हांवर रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवावी, अशी टूम भाजपनं काढली त्यातून काही रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यानी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी अर्जही भरले. त्यामुळे पक्षाच्या अस्तित्वावरचं हा घाला आहे, हे काही कार्यकर्त्यांनी ओळखलं. त्याबाबत जोरदार प्रतिक्रिया उमटली. जेणेकरून मुंबई वगळता अनेक ठिकाणी भाजपसोबत न जाण्याचा निर्णय रिपब्लिकन पक्षानं घेतला. त्यासाठी मग आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यानंतर मग भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी तरीही भूपेश थुलकर हे प्रदेशाध्यक्ष गेल्यानं पक्षाची नक्की भूमिका काय आहे,असा प्रश्न उपस्थित केला गेला.

शेवटी पुन्हा ऐन निवडणुकीत आपल्याच अध्यक्षाला निलंबित करण्याची नामुष्की येणारा रिपब्लिकन पक्ष हा एकमेव पक्ष असेल.

राज्यभरातल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची पुरती धुळधाण उडालीय. आता रामदास आठवले यांनी पक्षाची पुनर्बांधणी करणार असल्याची घोषणा केलीय. खरंतर प्रत्येक गावागावात आणि शहरात अनेक भागात शाखा असणारा पक्ष आहे. त्यासोबत राजकीयदृष्ट्या प्रचंड जागृत आणि आक्रमक कार्यकर्ते असणारा रिपब्लिकन पक्ष हा एकमेव पक्ष आहे. आता आठवले यांना पुनर्बांधणीची भाषा म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, असं म्हणण्यात काही अर्थ नाही. खरं तर आता कार्यकर्त्यांच्या दुखऱ्या जखमेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न आहे. पण आठवले यांनी केलेली घोषणा जर प्रत्यक्षात उतरवली आणि पक्षाची पुनर्बांधणी केली तर एक सक्षम पक्ष राज्याच्या राजकारणात असेल. पण सध्या जी पक्षाची गोची झालीय त्यातून बाहेर पडण्यासाठी गांभिर्यानं कार्यकर्ते आणि नेत्यांनी केलं तरच पक्षाला भवितव्य आहे. अन्यथा कुणाची तरी वळचण शोधणं हेच या पक्षाच्या नशिबी कायम राहील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 25, 2017 09:29 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

But the job is not done yet!
vote for the deserving condidate
this year

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close