चला! मतदानाला चला..!

चला! मतदानाला चला..!

  • Share this:

mahesh_mhatre_ibnlokmat- महेश म्हात्रे,कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत  

आपल्या देशात सर्व प्रकारच्या "दाना"ला लोकजीवनात महत्वाचे स्थान आहे. धर्मकारण असो किंवा सामाजिक रूढी-परंपरा, आम्ही वेगवेगळ्या दानाचे गुणगान गात असतो, परंतु लोकशाहीत ज्याचे अत्यंत महत्व आहे, त्या मतदानाविषयी मात्र आम्ही म्हणावे तेव्हडे जागरूक नसतो. कोणी त्याकडे दुर्लक्ष करतात , कोणी त्यामधून कमाईचा मार्ग शोधतात तर कोणी त्यावर टीका करतात . आता जेव्हा निम्म्याहून अधिक महाराष्ट्र २१ फेब्रुवारी रोजी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायात समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदानाला उतरेल तेव्हा ही परिस्थिती बदललेली असेल असे मला वाटत नाही.  पण ती बदलावी, लोकांनी मतदानाच्या अधिकाऱ्याकडे पुरेशा गांभीर्याने पाहावे आणि राज्यात/ देशात लोकशाही पुनर्प्रस्थापनेचा मार्ग सुकर करावा अशी आशा आहे.

मतदान ही या लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरातील पूजा आहे, असे आमच्या राष्ट्रपित्यांनी आम्हाला वारंवार सांगितले; परंतु, आपल्या देशातील जवळपास निम्म्या लोकांनी आजवर झालेल्या  निवडणुकीत  मतदान नकरून त्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. गेल्या २/३ वर्षांमध्ये  मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक सारख्या महानगरांमध्ये  मात्र तरुण मतदारांचा उत्साह आणि एकंदर जनजागृती यामुळे मतदानाचे प्रमाण वाढताना दिसत आहे; पण, काही महत्त्वाच्या उपनगरांमध्ये , जेथे बुद्धिवंतांची, धनाढ्यांची , विचार करणा-यांची लोकसंख्या अधिक आहे, तेथे मतदानाचे घटते प्रमाण खूप चिंताजनक आहे.

हा बुद्धिजीवी वर्ग मतदान करण्याऐवजी ' मतदानाची सुट्टी ' घेऊन मौजमजा करायला निघून गेला जातो, हे सगळे जाणतात . राजकारण आणि राजकीय नेत्यांवर सतत टीका करणाऱ्या या  पांढरपेशा वर्गाचा दुटप्पीपणा सातत्याने समोर येतो. मतदान हे लोकशाहीतील अत्यंत पवित्र कर्तव्य आहे, हे आपण सर्व जाणतो, पण मानतोच असे नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुंबईच्या आसपासच्या भागातील मतदानाचे प्रमाण ४१ टक्के होते. विशेष म्हणजे या मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील साक्षरतेचे प्रमाण नव्वद टक्के आहे, तरीही फक्त ४१ टक्के लोक मतदानाला बाहेर पडतात, हे चांगल्या लोकशाहीचे लक्षण नाही. या वेळी मुंबई, ठाणे, पुणे  इत्यादी सगळ्याच शहरी मतदारांनी मतदानाविषयी असलेली अनास्था टाळून देशाच्या हितासाठी, मुख्य म्हणजे स्वत:च्या हितासाठी मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावले पाहिजे.

national_votingएकूणच लोकशाही संकल्पनेची पायाभरणी ज्या  समाजात झाली, त्या रोमन संस्कृतीत मतदान न करणा-या माणसाला इडियट म्हटले जायचे. आज इंग्रजी शब्दकोशात इडियट या शब्दाचा अर्थ मूर्ख, वेडा असा होतो. मतदान न करणा-या शिकल्या-सवरलेल्या लोकांनी आपण मूर्ख नाहीत, हे सिद्ध करण्यासाठी तरी मतदान करावे, असे आवाहन आयबीएन लोकमत च्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. प्रचलित लोकशाही राज्यव्यवस्था आपल्याकडे फ्रेंच राज्यक्रांतीतील मानवी मूल्यांच्या उत्कर्षातून आली. स्वातंत्र्य, समता व बंधुता या तीन मूल्यांची इंग्लंड, अमेरिकेसह जगातील सर्वच लोकशाहीवादी देशांनी तळी उचलून धरली आणि त्यातूनच लोकांच्या राज्यांची संकल्पना रुजली. पण लोकसहभागाशिवाय लोकांचे राज्य शक्य नाही आणि म्हणूनच मतदानाद्वारे आपण सर्वानी आपला सहभाग नोंदवणे, हे भारतीय लोकशाही अधिक बलवान करणारे ठरेल. प्राचीन काळात आपल्याकडे किंबहुना जगातील सर्वच देशात राजेशाही होती. कुठे राजाचा थेट अंमल चालायचा, तर कुठे त्याचे प्रतिनिधी राज्य करताना दिसायचे. त्या काळात राजा बोले आणि दल हाले अशी स्थिती होती.

राजाच्या हुकूमानुसार प्रजा वागत असे, म्हणून यथा राजा, तथा प्रजासारखी म्हण प्रचलित झाली होती; पण, लोकशाहीने आम्हाला ख-या अर्थाने प्रजासत्ताक बनवले. आता ही सत्ता आम्ही कशी वापरतो, यावर आमच्या देशाचे भविष्य अवलंबून आहे, ही बाब लक्षात घ्यायला कुणालाच वेळ नाही. लोकशाहीमध्ये लोकांच्या मताचे महत्त्व असते, म्हणून आता मतदाराला राजा म्हणण्याची पद्धत पडली आहे. हा मतदार राजा खूश व्हावा, यासाठी नोटा देणारे उमेदवार सगळीकडेच आहेत. यंदा निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांनी मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेकांना  पकडले आहे. हा लोकशाहीच्या शुद्धीकरणाचा प्रकार आहे. त्याहून मोठा उपायही आपल्याला घटनेने दिला आहे. तो आहे, नोटाचा अधिकार. आपल्या उमेदवारांपैकी कोणी एकही तुम्हाला पसंत नसेल तर हे नोटाचे बटन वापरता येईल. दर पाच वर्षानी प्रचारात नोटा उडवणा-यांना रोखण्यासाठी नोटासारखा दुसरा चांगला उपाय नाही. यावेळी आम्ही खास याविषयावर जनजागृती करणारा 'नोटाचा सोटा ' विशेष कार्यक्रम दाखवला, लोकांना या अधिकाराचा अर्थ सोपा करून सांगितला , जेणेकरून भ्रष्ट , गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक नाकारून आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ शकतो. अर्थात सर्वसामान्य लोकांनी यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.

A woman shows her ink-marked finger after voting inside a polling station in the village of Kamshet, in the western Indian state of Maharashtraसुमारे २४०० वर्षापूर्वी होऊन गेलेल्या प्लेटो या असामान्य विचारवंताने रिपब्लिक या ग्रंथात लोकशाहीवर जी टीका केली होती, ती गेल्या महिन्याभरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणांमुळे प्रकर्षाने   आठवू लागली आहे. प्लेटोच्या मते, राज्याचं विकृत स्वरूप म्हणजे लोकशाही मधील स्वैराचार. लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असते, सर्व माणसं समान आहेत, असे तत्त्व मान्य केल्यामुळे लोकशाहीत शिस्तीचा अभाव असतो, असे प्लेटो सांगतो. त्याचा सारा भर तत्त्ववेत्ता राजा या आदर्श राजांच्या अभिनव सूत्रधाराच्या संकल्पनेत होता. आज आपल्याकडील परिस्थिती पाहिल्यावर प्लेटोच्या कल्पनेतील राज्यसंकल्पना सर्वथैव अशक्य वाटते; कारण भारतीयांमध्ये लोकशाहीच्या एकूण संकल्पनेचा अपमान करण्याची जणू चढाओढ लागली आहे. मतदान न करणे, हा त्यातील एक भाग समजला पाहिजे. विल्यम अ‍ॅपस्टेन या राजकीय विचारवंताने प्लेटोने त्या काळात घेतलेले लोकशाही व्यवस्थेवरील आक्षेप खरे वाटतात . ते म्हणतात, विसाव्या शतकातील लोकशाहीने तुम्हा-आम्हाला दाखवून दिले आहे की, प्लेटोने लोकशाहीवर केलेली टीका ही अवाजवी नव्हती. लोकशाही विचारसरणीच्या माणसांचे त्यांनी केलेले चित्रण अवास्तव नव्हते. या सगळ्यांकडे कोणत्याही लोकशाहीवाद्याने दुर्लक्ष करता कामा नये, आजही लोकांना पटणार नाही, असे  इशारे प्लेटो देतो. त्याने जुलूमशाहीची व्याख्या करताना जे त्या काळात लिहिले होते ते आज  दररोज , पुन्हा ,पुन्हा लक्षात येते. जुलूमशाहीची लक्षणे सांगताना प्लेटो म्हणतो, सुरुवातीला जुलूमशाहाच्या चेह-यावर स्मित असतं आणि तोंडात मधाळ भाषा असते.

zp_votingतो प्रजेला, त्याचप्रमाणे आपल्या पक्षाच्या मंडळींना लंबीचौडी आश्वासनं देतो. जमिनीच्या देणग्या आणि कर्जाची सूट देऊन सर्व लोकांशी नम्रपणानं व दयाळूपणानं वागण्याचं ढोंग करतो. परंतु एकदा का काही शत्रूंशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून आणि काही जणांचा काटा काढून शत्रूच्या काळजीतून मुक्त झाला की, आपलं आसन स्थिर करण्याकरता राज्याला युद्धाच्या खाईत लोटतो. अशा वेळी जनतेचं लक्ष त्याच्या जुलमी राजवटीकडं न जाता राज्याच्या संरक्षणाकडं जातं आणि राज्याच्या संरक्षणाच्या काळजीपोटी त्यांना त्याच्या नेतृत्वाची गरज भासू लागते.  जे लोक सुखासुखी राज्य करू देणार नाहीत, अशा स्वातंत्र्यप्रेमी लोकांचा संशय येतो, तेव्हा जुलूमशाह त्यांना शत्रूबरोबर युद्ध करण्यासाठी पाठवून देतो आणि त्यांच्या भयातून मुक्त होतो. यासाठीदेखील त्याला राज्याला सदोदित युद्धाच्या खाईत ढकलणं भाग पडतं. हळूहळू स्वत:च्या मार्गातून विरोधकांना खडयासारखं बाजूला करता करता शेवटी कोणीही महत्त्वाचा मित्र अथवा शत्रू शिल्लक उरणार नाही, याची तो काळजी घेतो. अशा लोकांची घाण राज्यातून काढण्याला तो प्राथमिकता देतो. इथं प्लेटो सुंदर उपमा देतो. तो म्हणतो, शरीरातील घाण ज्या पद्धतीनं वैद्य काढून टाकतो, त्या पद्धतीच्या अगदी उलट ही पद्धत आहे; कारण वैद्य वाईट तेवढं काढून टाकून चांगलं राहू देतो; परंतु जुलमी मनुष्य चांगलं तेवढं काढून टाकतो व वाईट तेवढं तसंच राहू देतो. त्याला अशा लोकांच्या संगतीत राहावं लागतं की, ज्यांच्यासाठी बहुतेक लोक कुचकामी असतात, हे लोक त्याचे खुशमस्करे असतात; परंतु सद्गुणी लोक त्याचा तिरस्कार करून त्याला नेहमी टाळत असतात.

आपल्याकडे आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत बसलेले  नेते एकांगी विचार करणारे कसे आहेत, हे सर्व लोक जाणतात. त्यांच्या एकाधिकारशाहीला सत्तेचे अधिष्ठान दिल्यास काय गोंधळ उडतो, याचे प्रत्यंतर अनेकदा आलेले आहे आणि म्हणून आपण सर्वानी आपल्या महापालिका किंवा जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीसाठी  योग्य उमेदवार आणि राजकीय पक्षाचा जाहीरनामा पाहून, मुख्य म्हणजे नजीकचा इतिहास पाहून मतदान करणे गरजेचे आहे. लोकशाही बळकट करण्याची ही अमूल्य संधी वाया घालवू नका.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 20, 2017, 7:30 PM IST

ताज्या बातम्या