मन्नारगुडी माफिया...

मन्नारगुडी माफिया...

  • Share this:

ajay kautikwar- अजय काैटिकवार, डेप्युटी न्यूज एडिटर, आयबीएन लोकमत

तामिळनाडूत सध्या नव्या राजकीय नाट्याला सुरुवात झालीय...या नाट्याच्या केंद्रबिंदू आहेत व्ही.के.शशिकला. तीस वर्षांपासून जोपासलेलं त्यांचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता असतानाच ओ. पनीरसेल्वम यांनी बंडाचं निशाण फडकावलं आणि शशिकलांचा जळफळाट सुरू झाला...अतिशय चाणाक्ष, धूर्त, पराकोटीची महत्त्वाकांक्षा आणि दबंग ही चिन्नमांची तामिळनाडूतली ओळख. त्यांचाही प्रवास अम्मांसारखाच ईर्षेनं पेटलेला. कोण आहेत शशिकला? त्यांच्या कुटुंबीयांना का म्हणतात मन्नारगुडी माफिया? जयललितांवर विषप्रयोग कुणी केला? मुख्यमंत्रिपदाचं त्यांचं स्वप्न पूर्ण होणार की अण्णाद्रमुकमध्ये फुट पडणार? या सर्व प्रश्नांचा घेतलेला हा वेध....

 मन्नारगुडी माफिया

चेन्नई मोनोरेल प्रकल्प मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असतानाची ही घटना... हा प्रकल्प मुख्यमंत्री जयललितांचा ड्रीम प्रोजेक्ट. हा प्रकल्प सिंगापूरच्या कंपनीनं करावा असा निर्णय त्यांनी घेतला. कायदेशीर सोपस्कार पूर्ण होऊन शेवटी फाईल जेव्हा त्यांच्याकडे आली तेव्हा अम्मा चक्रावल्या. कारण हे काम मलेशियातल्या कंपनीला देण्यात आलं होतं. अम्मांनी मुख्य सचिव देबेंद्रनाथ सारंगी यांना याबद्दल जाब विचारला तेव्हा त्यांनी जयललितांची सही आणि नोटिंग असलेला एक कागद त्यांच्या पुढं केला. हे काम मलेशियाच्या कंपनीला द्यावं असं त्यावर लिहिलं होतं. त्यांची ती सही बनावट होती. काय झालं असेल याचा काही क्षणातच त्यांना अंदाज आला. त्यांनी शशिकलांना पाचारण केलं तेव्हा त्यांची पाचावर धारण बसली. शासन आणि प्रशासनावर शशिकलांनी किती जबरदस्त पकड निर्माण केली होती त्याचं हे उदाहरण होतं...

व्हिडिओ पार्लर ते पोएस गार्डन

shashikalaचेन्नईच्या अल्वरपेट भागात १९८० मध्ये एक व्हिडिओ पार्लर सुरू झालं. व्हिडिओ कॅसेट भाड्यानं देणं, घरगुती आणि सार्वजनिक कार्यक्रमांचे शूटिंग करून कॅसेट तयार करणं हा त्यांचा व्यवसाय. या दुकानाची मालकीण होती व्ही.के. शशिकला. असा व्यवसाय करणाऱ्या त्या तामिळनाडूच्या पहिल्याच महिला. त्यावरून त्यांच्या धाडसाची कल्पना येईल. कारण त्या काळात या व्यवसायात फार दांडगाई असायची त्याला तोंड देत बाईंनी हा उद्योग भरभराटीला नेला. त्यांचे पती एम. नटराजन हे तामिळनाडू सरकारच्या माहिती खात्यात जनसंपर्क अधिकारी होते. हा माणूसही बायकोसारखाच उपद्व्यापी. त्यांच्या लग्नात त्यावेळचे मुख्यमंत्री एम. करुणानिधींनी हजेरी लावली होती, त्यावरून त्यांचा जनसंपर्क किती दांडगा होता हे लक्षात येईल. जयललिता याच काळात अण्णाद्रमुकच्या प्रपोगंडा सचिव होत्या.

नटराजन यांनी आपल्या खात्याच्या आयएएस अधिकारी व्ही.एस. चंद्रलेखा यांच्या मदतीनं शशिकलांची जयललितांशी भेट घालून दिली. त्यांनाही असं कुणीतरी काम करणारं पाहिजेच होतं, त्यामुळे जयललितांच्या कार्यक्रम आणि सभांच्या शूटिंगचं काम शशिकलांना मिळालं. बाई बोलायला, चालायला भलतीच चतुर. काही महिन्यांमध्येच तिनं जयललितांचा विश्वास संपादन केला. दोघींची घट्ट मैत्री जमली. एमजीआर यांच्या निधनानंतरच्या कठीण काळात शशिकला आणि नटराजन यांनी जयललितांना मोठा मानसिक आधार दिला. त्याची परतफेड त्यांनी लवकरच केली. १९९१ मध्ये जयललिता पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या आणि शशिकला आणि नटराजन यांचा पोएस गार्डनमध्ये प्रवेश झाला.

धूर्त आणि महत्त्वाकांक्षी

वैयक्तिक आयुष्यातली पोकळी, जवळच्या नातेवाईकांचा दुरावा अशा परिस्थितीत जयललितांना आधार हवा होता. ही संधी साधत शशिकलांनी जयललितांचा पूर्ण ताबाच घेतला. शशिकला म्हणजे त्यांचे डोळे आणि कान असं समजलं जाऊ लागलं. पोएस गार्डनच्या देखरेखीसाठी त्यांनी आपल्या मन्नारगुडी गावातून ४० नोकरांचा ताफा आणला. त्यामुळे पोएस गार्डनमध्ये खट्ट झालं तरी त्याची बातमी सगळ्यात आधी शशिकलांना मिळत असे. अम्मांच्या मनात यायच्या आधीच ती गोष्ट शशिकला त्यांच्या पुढं आणून देत. त्या शशिकलांचा उल्लेख `उदानपीरवा सगोदरी` (रक्ताची नाही, पण जिवाभावाची बहीण/मैत्रीण) असा करीत तर शशिकला त्यांना `अक्का` म्हणत. मुख्यमंत्र्यांचा एवढा विश्वास संपादन केल्यावर बाईंच्या सुप्त महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटले. सत्तेची चव जस जशी त्यांना चाखायला मिळाली तसं त्यांनी पक्षात आणि सरकारमध्ये आपली माणसं पेरायला सुरुवात केली. शशिकलांच्या परवानगीशिवाय कुणालाही अम्मांना भेटता येत नसे; अगदी मंत्री आणि आमदारांनासुद्धा. एवढा दरारा त्यांनी निर्माण केला. चेन्नईचे पोलीस आयुक्त आणि राज्याच्या गुप्तचर प्रमुखांशीही शशिकला आणि त्यांच्या नवऱ्यानं संधान बांधलं होतं असंही बोललं जात असे.

sashikal_jayaमन्नारगुडी माफिया

अम्मांचा विश्वास असल्यानं लवकरच शशिकला हे राज्यातलं दुसरं सत्ताकेंद्र झाल्या. त्यांचा शब्द म्हणजे अम्मांचा शब्द हे आता सगळ्यांना ठाऊक झालं होतं. त्यांचाच फायदा घेत शशिकलांनी आपल्या सर्व कुटुंबीयांनाच कामाला लावलं. काय केलं म्हणजे `लक्ष्मी` प्रसन्न होते हे एव्हाना त्यांच्या लक्षात आलं होतं. टी.टी. दिनकरन, सुधाकरन आणि व्ही.भास्करन हे शशिकलांचे जवळचे नातेवाईक टीटीव्ही ब्रदर्स या नावानं कुख्यात झाले. प्रशासनातल्या नियुक्त्या, बदल्या, मोठे प्रोजेक्ट्स, नवीन उद्योग या सर्व गोष्टींसाठी १५ टक्के `लंजम्` (कमिशन) दिल्याशिवाय त्या काळात कामच होत नसे. शशिकलांच्या या टोळीची राज्यात प्रचंड दहशत होती. शशिकला आणि टोळीचे हे सर्व सदस्य तामिळनाडूतल्या थिरूवरूर जिल्ह्यातल्या मन्नारगुडीचे. त्यामुळे `मन्नारगुडी माफिया` या नावानंच हे कुटुंबीय कुख्यात झालं.

हकालपट्टी आणि पुन्हा जवळीक

`मन्नारगुडी माफिया` टोळीच्या अनेक तक्रारी आल्यानंतरही सत्तेच्या धुंदीत असलेल्या अम्मांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. सुधाकरन या मानपुत्राच्या शाही लग्नात झालेल्या संपत्तीच्या ओंगळवाण्या प्रदर्शनानं शशिकला आणि अम्मांविरुद्धच्या नाराजीत भर पडली. या सर्व भ्रष्ट कारभाराचा परिणाम म्हणजे १९९६च्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत अण्णाद्रमुकचा सफाया झाला. लोकसभेच्या सर्वच ३९ जागांवर अण्णाद्रमुकचा पराभव झाला तर विधानसभेत फक्त ४ जागा मिळाल्या. या पराभवानंतर जयललितांचे डोळे उघडले. शशिकलांना आणि टोळीतल्या अनेक सदस्यांना ईडीनं बेहिशेबी संपत्तीप्रकरणी अटक केली. जयललितांविरुद्धही खटले दाखल झाले. याच दरम्यान एका आजारपणात चुकीचं औषधं दिल्याचा जयललितांना संशय आला. ज्या नर्सनं त्यांना औषधं दिली तिची नियुक्ती शशिकलांनी केली होती. त्यामुळे हा विषप्रयोग तर नसावा असा दाट संशय अम्मांना आला.

sashikalaपक्षातूनही तक्रारी येत होत्याच. त्याचाच परिणाम म्हणजे १९ डिसेंबर २०११ रोजी जयललितांनी शशिकलांची पक्षातून आणि पोएस गार्डनमधून हकालपट्टी केली. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी जयललितांना काही गुप्त माहिती देऊन सावध केलं होतं, अशी त्यावेळी चर्चा होती. तामिळनाडूत उद्योग उभारण्यात अपयश आलेल्या एका उद्योगपतीनं मोदींना `मन्नारगुडी माफिया` टोळीचे प्रताप सांगितले आणि मोदींनी ही माहिती जयललितांच्या कानावर घालत वेळीच सावध होण्याचा सल्ला दिला होता.

पण शशिकलांचा हा दुरावा फार काळ टिकला नाही. त्यांनी आपल्या अक्कांना पत्र लिहून चुका मान्य केल्या आणि पुन्हा असं होणार नाही अशी हमी दिली आणि अक्कांनीही आपल्या जिवलग मैत्रिणीला माफ करत पुन्हा पोएस गार्डनमध्ये प्रवेश दिला आणि शेवटपर्यंत मैत्री कायम राखली. गेली काही वर्ष तर सर्व जण त्यांना  `चिन्नमा` (छोटी आई ) असं म्हणू लागले. अम्मांनाही ते मान्य होतं. अनेक महत्त्वाचे निर्णय शशिकलाच घेत होत्या, पण मागच्या अनुभवानं शहाणं झाल्यानं त्यांनी शेवटपर्यंत पडद्यामागेच राहणं पसंत केलं. शशिकलांचा स्वभाव माहीत असल्यानं अम्मांनीही त्यांना कधीही कुठलं पद दिलं नव्हतं. जयललितांच्या मृत्यूनंतर चिन्नमांना वाट मोकळी झाली. ज्या लोकांना जयललितांनी हाकलून दिलं होतं ते माफिया टोळीतले सर्व सदस्य सध्या शशिकलांसोबत आहेत...आणि पक्षावर कब्जा मिळवल्यानंतर मुख्यमंत्रिपद हे त्यांचं स्वप्न आहे.

द्रविडी राजकारणाची शोकांतिका...

द्रविड चळवळीच्या संघर्षाची पार्श्वभूमी असलेलं तामिळनाडूचं राजकारण सध्या एका वेगळ्या वळणावर आहे. जयललितांच्या अचानक जाण्यानं राज्यात खऱ्या अर्थानं राजकीय पोकळी निर्माण झालीय.  ९३ वर्षांचे द्रमुकचे अध्यक्ष एम. करिणानिधींची कारकीर्द आता शेवटच्या टप्प्यात आहे. स्टॅलिन यांच्याकडे त्यांनी आपला वारसा सोपवलाय पण ते वलय त्यांच्याकडे नाही. कुठलंही आव्हान निर्माण होऊ नये म्हणून जयललितांनी दुसरी फळीच निर्माण होऊ दिली नाही. तर दुसरीकडे द्रमुकनं सर्व सत्ता आपल्याच कुटुंबाच्या ताब्यात ठेवली. असं असलं तरी अम्मा आणि करुणानिधींनी तमिळ राजकारणात अनेक उन्हाळे-पावसाळे झेलत आपलं स्थान निर्माण केलं. स्टॅलिनही संघर्ष करताहेत तर शशिकलांना कुठल्याही पदाचा एक दिवसाचाही अनुभव नाही. केवळ दरबारी राजकारण करून त्यांनी पक्षावर पकड निर्माण केलीय. धूर्त, राक्षसी महत्त्वाकांक्षी, पैशाचा अमाप लोभ आणि माफिया प्रतिमा घेऊन शशिकला मुख्यमंत्रिपद मिळवतीलही, पण लोकांच्या मनात स्थान मिळवणं ते त्यांच्यासाठी सर्वात मोठं आव्हान असणार आहे, एवढं नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 13, 2017 03:05 PM IST

ताज्या बातम्या