डोनाल्ड ट्रम्प,मीडिया आणि फॅक्टस...

डोनाल्ड ट्रम्प,मीडिया आणि फॅक्टस...

  • Share this:

vinod_raut_ibn_lokmatविनोद राऊत, सीनिअर प्रोड्युसर, आयबीएन लोकमत

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांविरोधात युद्ध पुकारलंय आणि या युद्धातून आता माघार घ्यायला ते तयार नाहीत. 20 जानेवारीला ट्रम्प यांनी अमेरिकेचे 45वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली, त्यादिवशी ते शांत होते...मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी ओवल ऑफिसमध्ये तात्पुरती दडवून ठेवलेलं ट्विटररुपी अण्वस्त्र बाहेर काढलं आणि हल्ला सुरू केला.

निमित्त होतं शपथविधीचं... शपथविधीच्या सोहळ्याला लाखो लोकांनी हजेरी लावली, अंदाजे साडेदहा लाख लोक या सोहळ्याला हजर होते. आजपर्यंतच्या अमेरिकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी उपस्थिती होती असा दावा केला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र माध्यमांनी हेतुपुरस्सर गर्दी लपवण्याचा प्रयत्न केला असा त्यांचा आरोप आहे. शपथविधीच्या दिवशी सर्वच माध्यमांनी बराक ओबामा आणि ट्रम्प यांच्या शपथविधीला जमलेल्या लोकांची सातत्यानं तुलना केली. दोन्ही सोहळ्याचे फुटेज दाखवत, माध्यमांनी सप्रमाण सिद्ध केलं की ओबामा यांच्या शपथविधीला ट्रम्प यांच्यापेक्षा अधिक लोक जमले होते. वॉशिंग्टन शहरातील मेट्रोकडून आलेली आकडेवारीसुद्धा माध्यमांनी छापली. वॉशिंग्टन शहरात त्यादिवशी मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची संख्या मुळात कमी होती, त्या जोडीला बराक ओबामा यांच्या शपथविधीच्या दिवशी प्रवाशांची संख्या जास्त असल्याचं एव्हाना स्पष्ट झालं होतं.

20 जानेवारीच्या शपथविधीचं मीडिया कव्हरेज बघून मुळातच ट्रम्प चांगलेच वैतागले होते. मात्र त्यांच्या सल्लागारांनी पहिल्या दिवशी शांत राहा, आजच्या दिवशी अनेक कामं आहेत असा सल्ला देत त्यांना प्रतिक्रिया देण्यापासून थांबवलं. मात्र दुसऱ्या दिवशी संपूर्ण अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर ट्रम्प यांच्याविरोधात आंदोलन सुरू झालं. आंदोलनातली उपस्थिती बघता अमेरिकेत अलीकडच्या काळात झालेली ही सर्वात मोठी निदर्शनं असल्याचं तज्ज्ञ सांगताहेत. वॉशिंग्टन शहरात निघालेल्या मोर्चात 2 लाखांच्या वर महिला सहभागी झाल्या होत्या. ज्यावेळी ट्रम्प डिनरचा आस्वाद घेत होते, त्यावेळी वॉशिंग्टनसह अनेक शहरात लोक रस्त्यावर उतरले होते, तोडफोड सुरू होती.

trumpदुसऱ्या टर्ममध्ये व्लादिमीर पुतीन रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेत, त्यावेळी त्यांच्याविरोधात 'पुस्सी कॅट' आणि इतर विरोधकांनी मास्कोसह इतर शहरात भव्य निदर्शनं केली होती. या मोर्चांचा आधार घेत अमेरिकेनं पुतीन याच्याविरोधात प्रचंड जनप्रक्षोभ आहे असा आरोप करत, या निवडणुकीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र ट्रम्प यांच्याविरोधात एवढं मोठं जनमत एकवटून मात्र मीडिया गप्प आहे. पहिल्या रात्री ट्रम्प गप्प बसले, मात्र दुसऱ्या दिवशी आंदोलकांची खिल्ली उडवणारं पहिलं ट्विट त्यांनी केलं. मी निदर्शनं बघितली, मात्र मला आश्चर्य वाटते, मतदानाच्या दिवशी हे लोक कुठे गेले होते? मात्र ते आता अमेरिकेचे अध्यक्ष असल्याची जाणीव त्यांच्या सल्लागारांनी करून दिली असावी, शिवाय आंदोलनाची व्याप्ती मोठी असल्यामुळे त्यांना दुसरं ट्विट करावं लागलं. ते म्हणाले, मी निदर्शनं बघितली, आपल्या लोकशाहीचं हेचं वैशिष्ट्य आहे, मी सहमत असो की नसो...

मात्र ट्रम्प यांचा मीडियावरचा राग शमलेला नव्हता. त्यांनी तडक सीआयएचं मुख्यालय गाठलं. तिथं पोहोचल्यावर त्यांनी मीडियाला थेट लक्ष्य केलं. माझ्यात आणि गुप्तहेर संस्थांमध्ये आग लावण्याचा मीडियाचा डाव आहे, मात्र तो मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही या शब्दात त्यांनी मीडियावर खापर फोडलं. तत्पुर्वी काही दिवसांअगोदर ट्रम्प यांनी ट्विटरवर अमेरिकन गुप्तचर संस्थेवर टीका केली होती. पुतीन यांनी अमेरिकन लोकशाहीत हस्तक्षेप केला या सीआयएच्या दाव्याची खिल्ली उडवत, सीआयएनं मीडियाला काही गोष्टी जाणीपूर्वक लीक केल्या, आपण काय नाझी युगातल्या जर्मनीमध्ये राहतोय का? असा सवाल करत ट्रम्प यांनी CIA, FBIची तुलना चक्क नाझीसोबत केली. माध्यम काहीही म्हणो, मात्र मी तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे अस म्हणत त्यांनी सीआयएला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.

नेमक्या याच काळात टाइम्स मॅगझीनच्या एका वार्ताहराने ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमधील कार्यालयातून मार्टीन ल्यूथर किंग यांचा अर्धपुतळा गायब असल्याची बातमी केली. मात्र हा पुतळा प्रत्यक्षात ट्रम्प यांच्या कार्यालयातून काढलेला नव्हता. नजरचुकीनं हा प्रकार झाल्याचं वार्ताहराच्या लक्षात आलं, त्याने लगेचच बातमी मागे घेतली आणि ट्विटरवर माफी मागितली. मात्र तोपर्यंत ट्रम्प चांगलेच भडकले होते. व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी सिन स्पिसर यांना बोलावून मीडियाला झापण्याचे आदेश दिले. स्पिसर यांनी ताबडतोब व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषद बोलावली आणि या पत्रकार परिषदेमध्ये पहिल्यांदाच माध्यमांना एकतर्फी लक्ष्य करण्यात आलं. पत्रकारांना स्पिसर यांनी जवळपास 1 तास लेक्चर दिला. बातमी देताना पत्रकारांनी वस्तुस्थिती जाणीवपूर्वक दडपली.

trump_media2एकतर्फी न्यूज कव्हरेज केलं,  फोटो काढताना बरोबर रिकाम्या कोपऱ्याचे शॉट घेतले. अगदी वॉशिंग्टन मेट्रो अधिकाऱ्यांनी खोटी माहिती दिली. आणि ट्रम्प यांची बदनामी करण्याचा डाव सहन केला जाणार नाही या शब्दात त्यांनी पत्रकारांना तंबी दिली. महत्त्वाचं म्हणजे सबंध पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांकडून एकही प्रश्न घेण्यात आला नाही. पत्रकारांचे प्रश्न सरू झाल्यावर ते तावातावाने बाहेर पडलेत. यापूर्वी प्राप्तिकर संदर्भातील माहिती उघड करणार का? या सीएनएनच्या रिपोर्टरच्या प्रश्नावर त्यांनी सीएनएन एक फेक न्यूज चॅनल आहे असं म्हणत मी तुझा प्रश्न घेणार नाही, तू चालता हो असं थेट सुनावलं होतं. जगातील प्रतिष्ठित वृत्तपत्र असलेल न्यूयॉर्क टाइम्सला सुद्धा त्यांनी टीकेचं लक्ष्य केलं होतं.

एवढ्यावरच प्रकरण थांबलं नाही तर ट्रम्प यांच्या दुसऱ्या सल्लागार केलियन कॉन्वे यांनी दुसऱ्या दिवशी  NBC या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली, त्यामध्ये टीव्ही अँकरने त्यांना स्पिसर यांना माध्यमांना एकतर्फी लेक्चर देण्याचा अधिकार कुणी दिला?  फॅक्ट दडपले म्हणजे काय? तुमच्या प्रेस सेक्रेटरीने वस्तुस्थिती दडवली, तुमचा प्रेस सेक्रेटरी खोटारडा आहे अशा प्रश्नांची सरबत्ती केली. यावर केलियन कॉन्वे यांनी कळस गाठत आमच्या प्रेस सेक्रेटरीचा वाटेल त्या शब्दात उध्दार कराल तर याद राखा, आम्हाला माध्यमांसोबतच्या संबंधावर पुनर्विचार करावा लागेल, या शब्दात त्यांनी थेट तंबीच दिली.

ट्रम्प अध्यक्ष झाल्यावर जरा नरमतील असं अनेकांना वाटलं होतं. मात्र प्रत्यक्षात ट्रम्प आपल्या जिभेचा पट्टा सुरूच ठेवणार असं दिसतंय. अध्यक्ष झाल्यावर ट्रम्प यांनी त्याचं ट्विटर हँडल करणं सोडावं असा आग्रह त्यांच्या सहकाऱ्यांनी केला, मात्र माझं सर्वात मोठं अस्त्र मी शमीच्या झाडावर का ठेवू असा सवाल करत ट्रम्प यांनी नकार दिला. पोट्स या नावानं ट्रम्प यांनी ट्विटर हँडल करणं सुरूच ठेवलंय. अमेरिकन इतिहासात माध्यमांना अशा प्रकारे टार्गेट करण्याचा हा पहिला प्रकार नाही. यापूर्वी अनेकदा अमेरिकन प्रशासनानं माध्यमांवर हल्ले केलेत. वॉटरगेट प्रकरण उजेडात आणणाऱ्या वॉशिंग्टन पोस्ट आणि न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्रांना निक्सन सरकारनं विविध प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला होता.

trump_media4व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस इथं अमेरिकेच्या गुप्त बॉम्बहल्ल्यासंदर्भातील पेंटागन पेपर्स न्यूयॉर्क टाइम्सने प्रसिध्द केले होते. या प्रकरणात न्यूयॉर्क टाइम्सवर देशद्रोहाची केस दाखल करण्यात आली होती. वार्ताहरांची चौकशी करण्यात आली होती, मात्र सुप्रीम कोर्टानं वृत्तपत्र स्वातंत्र्याची बाजू मांडत निक्सन सरकारला चांगलंच फटकारलं होतं.

जगभरातील इतिहास असा सांगतो की, सत्य बोलणारे प्रसारमाध्यम कायम सरकारच्या टार्गेटवर असतात, तुम्ही फॅक्ट लिहाल तर तुमच्यावर संशय व्यक्त केला जाईल, तुम्हाला खोटं ठरवलं जाईल, बदनाम केलं जाईल, हेतूवर संशय व्यक्त केला जाईल. मात्र या आरोपांमुळे जराही घाबरून जाण्याची गरज नाही. कारण फॅक्ट्स (वस्तुस्थिती) तुमची बाजू आहे. जनतेला कळतं कोण खरं आहे, कोण खोटं आहे. सध्या अमेरिकेन वृत्तमाध्यम ट्रम्प नावाच्या फॅक्टशी लढताहेत, हा लढा पुढची चार वर्षे असाच सुरू राहील अशी चिन्हं आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 24, 2017, 6:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading