जातींची,वृत्तींची व्हावी माती !

जातींची,वृत्तींची व्हावी माती !

  • Share this:

mahesh_mhatre_ibnlokmat- महेश म्हात्रे कार्यकारी संपादक , IBN लोकमत  

तुमचे पूर्वायुष्य तुमचे भविष्य घडवत असते, असे म्हणतात. बालपणीचे संस्कार तुम्हाला मोठेपणी कसे वागायचे हे शिकवत असतात. जाती प्रथा वर्ण वर्चस्व श्रीमंतीचा गर्व, किंवा ताकदीचा माज या सगळ्याच विषवृक्षांची बीजे आजूबाजूची कुटुंब, मित्रांमधून निष्पाप बालवयात नकळतपणे रुजत जातात असे मानसोपचार शास्त्र सांगते.

माझ्या कुटुंबात आसपासच्या मित्रपरिवारात जातीची, ताकदीची किंवा श्रीमंतीची ऐट दाखविणारे त्यांची चर्चा करणारे कोणीच नव्हते. सर्वच नातेवाईक शेती, शेतीवर आधारित कामे किंवा किराणा दुकानदारी करणारे होते. टोकाच्या गरिबीचा अनुभव असणाऱ्या माझ्या आजोबांना भुकेची भाषा ठाऊक असल्यामुळे घरात सर्व जाती धर्माच्या लोकांचा मुक्तसंचार असे. विशेष म्हणजे ते सगळे लोक आमच्या सारखेच असायचे, त्यामुळे लहानपणी अगदी कॉलेजची डिग्री हातात पडेपर्यंत गावात जात कधी आडवी आली नाही.

अर्थात काही किरकोळ भांडणात जेव्हा दोन फळ्या वेगवेगळ्या जातींच्या आळ्यांच्या, गल्ल्यांच्या नावाने उभ्या राहत, तेव्हा गावात तणाव निर्माण होत असे. पण महिना पंधरा दिवसात पुन्हा वातावरण शांत होई. गावाचा सामाजिक सलोखा मोजक्या ज्येष्ठ मंडळींच्या हातात असायचा. माझे वडील दाजीसाहेब, बबन काका पाटील, पद्मन काका जगताप, सलीम चाचा शेख, बंधुजी थोरात, इशाबंधू भानुशाली, के. डी. गंधे काका हे सारे कोणत्याही प्रसंगात मनाचा तोल जाऊ देत नसत. हे आजही जुनी माणसे आवर्जून सांगतात. विशेष म्हणजे अगदी हिंदू-मुस्लिम दंगलीच्या काळातही गावातील शांतता टिकवण्याचे काम ज्येष्ठ मंडळींनी अगदी चोखपणे केले होते.

लहानपणीच्या या साऱ्या आठवणी आज का जाग्या होत आहेत... अगदी पदवीपर्यंत आपल्या छोट्याशा गावात जी जात दिसली नाही, आडवी आली नाही, ती जाता न जाणारी जात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद सारख्या महानगरात, चौकाचौकात बॅनरवर झळकताना दिसतेय. वेगवेगळ्या जाती-जमातींच्या पॉवरबाज नेत्यांचे टॉवरबाज पोस्टर्स हे तर आधुनिक महाराष्ट्राचे वैशिष्ठय बनलेले आहे. अशा अनेक पोस्टरवर अंग चोरून बसलेले शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत  गौतम बुद्ध . शाहूमहाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, बिरसा मुंडा, अण्णाभाऊ साठे इत्यादी महामानव आजकालच्या ' जाणत्या, कार्यसम्राट, समाजभूषण ' नेत्यांच्या आचार - विचारातही "तेवढेच" उरलेले दिसतात.

ram_Ganesh_gadkari_new3

पण मग राजकारणच करायचं असेल तर काहीही चालते. अगदी राम गणेश गडकरी यांनी शंभर वर्षांपूर्वी अपूर्ण सोडलेले नाटक अचानक त्यांच्या पुतळ्याच्या अंगाशी येते. रात्रीच्या काळोखात अनेक दशके निवांत बसून निश्चित झालेल्या गडकरींच्या पुतळ्यावर चार दांडगे तरुण हातोडा हाणतात काय आणि पुन्हा मराठा तरुणांच्या मर्दुमकीला उधाण येतं काय, सारं - सारं कल्पनेपेक्षाही कल्पित, अद्भुत. मग पुतळा फोडणारी पोरं आमची असा दावा करण्याचा प्रयत्न. त्यासाठीची केविलवाणी धडपड, चॅनेलच्या संपादकांना, न्युज अँकरना विनवण्या,  पेपरच्या संपादकांसाठी फोटो आणि व्हिडिओ भरलेल्या इ - मेल. त्यावर छत्रपती शंभूराजे यांच्या शौर्यगाथांची उजळणी. . .

पण माझ्या डोळ्यासमोर क्रूरकर्मा औरंगजेबाच्या अनन्वित अत्याचाराला अत्यंत धीराने तोंड देणारे शंभूराजे येतात.

ज्यांच्या बुद्धभूषण सारख्या ग्रंथात राजे द्वेषभावना सोडा ही शिकवण देतात, पण आम्ही आज नेमकी तिच वाक्ये विसरतो आणि शंभूराजेंचा वारसा सांगतो. सगळेच अनाकलनीय. बरं, हे कोणाला समजावून सांगायला जावे, तर ही 'ब्रेन वॉश' झालेली पोरं-बाळं म्हणणार, "आमच्या शंभूराजांबद्ल तुम्ही काय सांगणार?"  जो पवित्रा सनातनी मंडळींचा हिंदू धर्माबद्दल असतो, अगदी तसंच काही मराठ्यांच्या शिवधर्माचे होऊ लागलेले दिसतंय. पण द्वेषाचे राजकारण अल्पजीवी असते, हे न मानणारे किंवा न जाणणारे नेते सध्या या नवशिक्षित मराठा झुंडीला आपल्या तालावर झुलवत आहेत. पण आज ना उद्या ही बेताल आणि बेफाम झुंड आपल्या नेत्यांवरही शिंगे रोखेल, यात मला शंका वाटत नाही.

आज अवघे जग वेगाने बदलत आहे, मोबाईल आणि इंटरनेट या दोन शक्तिशाली साधनांच्या संगमामुळे आता असाध्य गोष्टी साध्य होऊ लागल्या आहेत. संपर्कापासून शिक्षणापर्यंत, मनोरंजनापासून माहितीच्या अफाट महाजालापर्यंत जीवनाच्या प्रत्येक अंगाला कवेत घेण्याचे सामर्थ्य फोर-जी च्या तंत्रज्ञान क्रांतीत सामावलेले आहे. अर्थात या सगळ्या नवबदलाच्या नवयुगात किडलेल्या मेंदूंसाठीही भरपूर सडलेल्या सडका आहेत. त्या मार्गावर आधीपासून असणाऱ्या विकृत बुद्धीच्या लोकांकडून या आधुनिक तंत्रज्ञानात क्रांतीचा यथेच्छ गैरवापर होणे अपेक्षितच होते. विशेषतः या ज्ञानाला जेव्हा जात, धर्म, भाषा किंवा पंथाची नशा चढते तेव्हा तर विभत्स् डोक्याच्या विकृतांचा विचित्र चाळ्यांना अक्षरशः उत येतो.

तुमच्या फोनवर अर्वाच्च भाषेत बोलणाऱ्या अनोळखी लोकांचे फोन येऊ लागतात. अगदी दिवस-रात्र. ट्विटर, फेसबुक किंवा व्हॉट्सअॅप वर असभ्य शब्दात धमकावणारे मेसेजेस धडकू लागतात. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे आपल्याकडे या 'सायबर दादागिरी' विरोधात कारवाई होण्याची शक्यता कमी असल्यामुळे "घुटनाछाप" नेते आपल्या संघटित पुंदाईच्या बळावर दिवसा उजेडी गुन्हे करत फिरतात. सायबर विश्वात आपल्या खूप आधी नीती-नियमांची आखणी करणाऱ्या युरोप-अमेरिकेत, चीन-जपानमध्ये असे घडणे शक्य नाही

. त्यामुळे या साऱ्या प्रगत देशांमध्ये सायबर बुलिंग, ट्रोलिंग या विरोधात जशी कायदेशीर तरतुद आहे तशी आपल्याकडेही झाली पाहिजे तरच एखाद्या विषयावर मत व्यक्त करणाऱ्या व्यक्ती, संघटना किंवा पत्रकारांना या सायबर गुंडगिरी पासून संरक्षण मिळू शकेल.

social_media3

एकीकडे सायबर विश्वात देश, राज्य आणि संस्कृतीच्या भिंती धडाधड कोसळत आहेत. पण जातीच्या धर्माच्या भिंती गगनभेदी चौकटी उभारताना दिसतात तेव्हा आपल्या करंटेपणाची लाज वाटते. कारण आम्ही आमच्या विचारवारशाला विसरलोच पण त्यासोबत मानवी मनाची उंची वाढवणाऱ्या आधुनिक ज्ञानसंपदेची आम्ही मातीच करायला घेतलीय. आजपासून दीडशे वर्षांपूर्वी 'सत्यशोधक समाजाची' स्थापना करणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जातीव्यवस्थेविरोधात एल्गार पुकारला होता. अवघ्या आयुष्याची मशाल पेटवून फुले दाम्पत्याने भारतीय समाजाला ज्ञानाचा सन्मार्ग दाखवला होता. त्यामुळे आमच्या अवाढव्य अचेतन अस्तित्वाला चेतनेची ऊर्जा मिळाली आणि जातीबद्ध भारतीय समाज ज्ञानमार्गी होऊ शकला. चांगली वाटचाल करून 'स्वातंत्र्या' चा आग्रह धरू लागला. ही वस्तुस्थिती कोणीच नाकारू शकत नाही. महात्मा फुलेंनी विद्येचे महत्व  सांगताना अगदी प्रारंभि 'विद्येविना मती गेली' असे म्हटले होते.

तमाम मागासलेल्या बांधवांना जगण्याचा 'अर्थ' समजावून सांगताना ज्योतिबांनी ज्या 'मती' चा सगळ्यात आधी आग्रह धरला होता ती 'मती,' विचार करण्याची शक्ती आम्ही हरवून बसलो आहोत. सध्याच्या शाळा-कॉलेजच्या अभ्यासक्रमात मुलं-मुलींना विचारप्रवण किंवा विचारप्रवृत्त करण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. आणि दुसरीकडे जात-धर्म-पंथ मानणारे लोक त्यांची मती कुंठित करण्याचा, त्यांना एकतर्फी विचार करण्याची सवय लावताना दिसतात. बरं याला फक्त नमो भक्त, रागा लिग, संभाजी ब्रिगेड, आदित्य सेना, ओवेसी फौज, टीम अखिलेश हेच जबाबदार आहेत असे नाही, तर सत्तरीतही बत्तीशी वाजवून स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारे चंप्र देशपांडे सारखे स्वनामधन्य चिंटुक-पिंटूक इंटुकही आहेत. त्यांना या आधुनिक काळात कसे घेवुन जायचे. हा भला मोठा प्रश्न आहे... तो सुटला तरच स्वतःला श्रेष्ठ मानणाऱ्या जातींची माती होईल. त्यासाठी कोण्या महात्म्याची वाट पहाण्यापेक्षा लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत करूया... वादांसोबत संवादाची कास धरू या...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 20, 2017, 4:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading