नाराज मेटे,पर्वा कुणाला...

नाराज मेटे,पर्वा कुणाला...

  • Share this:

vinod_raut_ibn_lokmatविनोद राऊत,  आयबीएन लोकमत

केंद्रात सरकार आल्यानंतर महाराष्ट्रासारखं महत्वाचं राज्य कुठल्याही परिस्थितीत खिशात टाकायचं हा संकल्प होता मोदी-शहा या दुकलीचा... केंद्रात स्वबळावर  सरकार आल्यामुळे राज्यातील नेत्यांमध्येही आत्मविश्वास आला होता. मात्र शिवसेनेसोबत युती न करता स्वबळावर सत्ता मिळवायची ही रणनीती पक्षाने आखली. मात्र शिवसेनेसारख्या पक्षाला डावलून सत्ता मिळवणे कठीण होते. शिवाय आमचा पक्ष सर्वसमावेशक आहे. सर्व जातींना, वर्गाला सोबत घेऊन चालतो असा संदेशही राज्याला द्यायचा होता. राज्यात छोट्या छोट्या पॉकेटमध्ये प्रभावी असलेल्या घटक पक्षांना सोबत घ्यायचे ठरले. त्यामध्ये राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना, महादेव जानकरांचा रासप, रिपाइंचे रामदास आठवले आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे यांच्यासोबत महायुती तयार झाली. त्यावेळी सत्तेत वाटा देण्याच्या आणाभाका घेतल्या गेल्या, अगदी स्टॅम्प पेपरवरही हे लिहून ठेवण्यात आले. निवडणुका झाल्या, त्यामध्ये भाजपनं निवडणूकांमध्ये मित्रपक्षांच्या मदतीनं मोठा फायदा मिळवला. मात्र त्या प्रमाणात मित्रपक्षांना काहीच फायदा झाला नाही. रिपब्लिकन पक्ष, स्वाभिमानी पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. तर रासपचा एक, मेटेंचा एक उमेदवार तोही भाजपच्या चिन्हावर निवडून आला. शिवसेनाही भाजपच्या मागे फरफटत सत्तेत सहभागी झाली आणि भाजपनं दिलेली सर्वच आश्वासनं पूर्ण होतील अशी भोळीभाबडी आशा या घटकपक्षांना होती...

120513-mete27y262

या घटकपक्षांपैकी एक नेतृत्व म्हणजे विनायक मेटे, कधीकाळी मराठा समाजातील एका अस्वस्थ तरुणांचं नेतृत्व मेटेंकडे होतं. मराठा आरक्षणावर मेटेंनी नेहमीच प्रखर भूमिका घेतली. बीडमध्ये अशा तरुणांना हाताशी धरून मेटेंनी स्वत:ची शिवसंग्राम संघटना बांधली. शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल विरोधाचा सूर लावला म्हणून अगदी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या घरावर हल्ला करण्याची मजल शिवसंग्रामने केली. बीडमध्ये मेटेंना निवडून येणं शक्य नव्हतं, त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतृत्वानं मेटेंना मागच्या दाराने विधान परिषदेत निवडून आणलं. राष्ट्रवादीत भुजबळांचं खच्चीकरण करून मराठा नेतृत्व थोपवण्याच्या प्रयत्न करणाऱ्यांमध्ये मेटेही सहभागी होते.

मात्र बदलत्या हवेचा वेध घेण्यात माहीर असणाऱ्या मेटेंनी शिवसेना, भाजपसोबत जुळवून घेण्यास  सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीपूर्वी मेटेंनी राष्ट्रवादी पक्ष सोडला आणि विधान परिषदेच्या सदस्यपदाचाही राजीनामा दिला. मेटेंनी दिलेल्या या बलिदानाची कदर करत भाजपनं त्यांना विधान परिषदेवर सामावून घेतलं. त्यांना शिवस्मारक समितीचं अध्यक्षपद दिलं, त्याला राज्यमंत्रिपदाचा दर्जा देऊन लाल दिवा दिला. दुसरीकडे मात्र इतर मित्रपक्ष सत्तेसाठी तडफडत होते. मात्र भाजप नेतृत्व त्याची दखल घेईना, या घटकपक्षांना मंत्रिपदासाठी दीड वर्ष झुलवत ठेवलं. छोट्या पक्षांना वापरा आणि फेकून द्या अशी नीती असलेलं दिल्लीचं भाजप नेतृत्व तर या असंतोषाची साधी दखलही घ्यायला तयार नव्हतं. मात्र शेट्टी, सदाभाऊ, जानकर, आठवले यांची नाराजी ओढवून घेणं राज्याच्या नेतृत्वाला कठीण चाललं होतं.  दुसरीकडे सदाभाऊ खोत, राजू शेट्टी, आठवले, महादेव जानकर यांनी सरकारला धमकावणं सुरू केलं. या सर्व नेत्यांचं उपद्रवमूल्य, समाजातल्या विशिष्ट वर्गातील स्थान या सर्व गोष्टींकडे कानाडोळा करणं कठीण होतं. राज्यातील काही ज्येष्ठ नेत्यांनी दिल्लीदरबारी दिलेल्या शब्दाला किंमत असते, ती पाळावी लागते असं समजावून सांगितलं...आणि अखेर आठवलेंना केंद्रात, महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांना लाल दिवा मिळाला आणि नेमकं तिथूनच मेटेंना त्रास व्हायला सुरुवात झाली होती.

vinayak mete 1

याच काळात राज्यात मराठा क्रांती मोर्चाचं पर्व सुरू झालं. एकापाठोपाठ एक लाखा लाखांचे मोर्चे सुरू झालेत. पहिल्यांदा मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांचा आत्मविश्वास डगमगला. अगदी माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार काय, असा हतबल सवाल मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी केला होता. मात्र या नव्या क्रांतीत मेटेंना काहीच स्थान नव्हतं, त्यामुळे या मोर्चाची धग कमी करण्यात त्यांचा काहीच उपयोग झाला नाही. छत्रपती संभाजी महाराजांना राज्यसभा दिली गेली, मग आता मेटेंना विचारणार कोण? मराठा क्रांती मोर्चामध्ये अनेक बाजूंनी शिरकाव करण्याचा प्रयत्न मेटेंनी केला, मात्र त्यात यश मिळालं नाही. गेल्या आठवड्यात औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीच्या बैठकीत आमंत्रण नसतानाही मेटे गेले, बोलायला उभे झाले. त्यांना प्रचंड विरोध  झाला, त्यांचा माईक हिसकावून घेण्यात आला. मेटेंची मराठा तरुणांमधली पत कशी संपलेली आहे ही स्पष्ट करणारी ही दृश्यं होती. नोटबंदीच्या निर्णयानंतर मराठा मोर्चाचा झंझावात कमी झाला. नगर परिषदेत भाजप नंबर वन ठरला.आता मुख्यमंत्री आश्वस्त झाले होते.

या घटनांचा अर्थ लक्षात न घेता, मेटेंनी भाजपवर दबावतंत्राचा वापर सुरू केलाय. मात्र याचा काहीच उपयोग होणार नाही. शेवटी राजकारणात सत्ता मिळवण्यासाठी मित्रपक्षांना सोबत घेतलं जातं आणि सत्ता मिळाल्यावर मित्रपक्षांना अडगळीत टाकलं जातं. याला भाजप काय, कुठलाच पक्ष अपवाद नाही. अगदी कॉंग्रेस-राष्ट्रवादीने कधीकाळी प्रबळ असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांमध्ये सत्तेचं गाजर दाखवून पक्ष फोडला, या पक्षाची अनेक शकलं केली, पक्ष प्रभावहीन केला, नेत्यांची विश्वासार्हता संपवली, कालातंराने नेते संपले हे सर्वांना माहिती आहे. भाजपही त्याच दिशेने चालतोय. त्यामुळे मेटे आता मातोश्रीवर जाऊनदेखील काहीच उपयोग नाही. खुद्द उद्धव ठाकरेंनाच भाजप किती सन्मानाची वागणूक देतो, सत्तेत असूनही त्यांना विश्वासात घेतलं जातं का? हा प्रश्न आहेच. म्हणतात ना , राजकारणात तुम्ही काय होता त्यापेक्षा तुम्ही आज काय आहात? समाजातल्या कुठल्या वर्गात तुमची ताकद आहे ? राजकीय उपद्रवमूल्य काय? यावर तुमची किंमत ठरते... आणि सध्या विनायक मेटे या महत्त्वाच्या निकषांमध्ये कुठेही बसत नाहीत. त्यामुळे सध्यातरी विनायक मेटेंनी कितीही ठणाणा केला तरी प्रसारमाध्यम वगळता कुणीही दखल घेणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 13, 2017, 3:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading