'तामिळनाडूची कारभारीण'

'तामिळनाडूची कारभारीण'

  • Share this:

ajay kautikwar- अजय काैटिकवार, डेप्युटी न्यूज एडिटर, आयबीएन लोकमत

'मी आता आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आहे. सुरुवातीचं माझं आयुष्य आईच्या प्रभावाखाली गेलं. तिला जे वाटतं तेच मला करावं लागलं. मला जे काही करण्याची इच्छा होती ते काहीच करता आलं नाही. नंतरचं आयुष्य एम.जी.आर यांच्या करिष्म्यानं झाकोळून गेलं. तरुण असताना इच्छेविरोधात केवळ आईच्या आग्रहाखातर मला चित्रपट क्षेत्रात यावं लागलं तर नंतर एम.जी.आर यांच्यामुळे राजकारणात. या दोनही क्षेत्रात मी नाखुशीनच आली. माझं अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य संपलंय... आता या शेवटच्या टप्प्यात मी माझ्यासाठी आणि माझ्या मर्जीनं जगतेय...'

अफाट लोकप्रियता... तेवढाच करिष्मा आणि सोबतीला गूढ वलय... सतत वादांचा ससेमिरा... या सर्व वादळांना झेलत आणि अंगावर घेत जे.जयललिता यांनी तामिळनाडूच्या राजकारणावर आपली अमीट छाप सोडली आणि राज्याचं तब्बल पाच वेळा मुख्यमंत्रिपद भूषवलं... त्यांच्या संघर्षमय आयुष्याची ही दुसरी बाजू...

आई, वडिलांचं प्रेम मिळालंच नाही

जयललितांचा जन्म एका संपन्न तमिळ ब्राह्मण अय्यंगार घराण्यातला. साल 1948, 24 फेब्रुवारी. त्यांचे आजोबा हे म्हैसूरच्या राजघराण्याचे सर्जन. वडील गेले तेव्हा त्या फक्त 2 वर्षांच्या होत्या. त्यांच्या आईचं वय 20 वर्षांचं. बंगलोर (आताचं बंगळुरू) मध्ये सचिवालयात त्या नोकरीला होत्या. दिसायला अतिशय सुंदर. बहिणीच्या आग्रहाखातर त्यांनी चित्रपटात काम करायला सुरुवात केली. कन्नड आणि तमिळ चित्रपटसृष्टीतल्या त्या आघाडीच्या चरित्र अभिनेत्री. आई आपल्या कामात एवढी व्यस्त होती की तिला आम्हा भावंडांकडे बघायला वेळच मिळत नव्हता. आम्ही उठायच्या आधी ती निघायची आणि रात्री उशिरा ती घरी परतायची तेव्हा आम्ही भावंडं झोपलेलं असायचो. असं जयललितांनीच एका मुलाखतीत सांगितलंय. जयललिता या चार वर्षांच्या असताना त्यांची आई मद्रास (आताचं चेन्नई)ला शिफ्ट झाली. त्या बंगलोरमध्ये आजोबांकडे राहिल्या. आई जवळ राहावं, तिनं प्रेम करावं असं त्यांना खूप वाटायचं, मात्र त्या प्रेमाला त्या कायम पारख्याच राहिल्या.

निरपेक्ष प्रेम (unconditional love) कधीच मिळालं नाही

jaya_5जयललितांच्याच शब्दांत...

असं प्रेम मला कधीच मिळालं नाही. त्या प्रेमाला मी कायम पारखी राहिले. आईचं प्रेम मिळावं असं खूप वाटायचं पण तिला वेळच नव्हता. एम.जी.आर. यांचं प्रेम होतं मात्र ते निरपेक्ष नव्हतं. असं काही प्रेम असतं असं मला वाटतं नाही. कथा, कादंबर्‍या, पुस्तकं, कविता यांच्यामध्येच ते बघायला मिळतं. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र नाही.

सोळाव्या वर्षी चित्रपटसृष्टीत

jayalalitha heroine to cm (8)जयललिता अभ्यास अतिशय हुशार. कायम नंबर पहिला. इंग्रजी साहित्य आणि भाषेवर प्रभुत्व. त्याचवेळी आर्थिक परिस्थिती घसरू लागल्यानं आईनं त्यांना चित्रपटसृष्टीत येण्याचा आग्रह धरला. त्यांना हे मुळीच मान्य नव्हतं. आठवडाभर त्यांनी विरोध केला. घरात स्वत: कोंडून घेतलं, रडल्या, रुसल्या मात्र आईचा हेका कायम होता. शेवटी त्यांनी चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. 'चित्रडा गोम्बे' हा त्यांचा पहिला कन्नड चित्रपट. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. कन्नड, तमिळ, तेलुगू, हिंदी आणि इंग्रजी अशा 125 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. माझा अभिनय हा नैसर्गिक आहे असा त्यांचा दावा होता.

पहिला क्रश

तरुण असताना क्रिकेटर नरी कॉन्ट्रॅक्टर हा त्यांचा पहिला क्रश. त्याच्या मॅचेस पाहण्याची संधी त्या कधीच चुकवत नसत. तर शम्मी कपूरवरही त्यांचं प्रेम. जंगली, दो आँखे बारा हाथ हे त्यांचे आवडते चित्रपट. आणि याsss हूsss, ये मालिक तेरे बंदे हम, आsss जा सनम मधुर चाँदनी में हम... ही त्यांची गाणी.

एम.जी.आर. नावाचं गारुड

दक्षिणेत त्या काळात एम.जी.आर. या नावाचं गारुड होतं. लहान असताना खेळात जयललिता या कायम एम.जी.आर. यांच्याच भूमिकेत असायच्या. एवढा प्रभाव त्यांच्यावर होता. नंतर चित्रपटसृष्टीत गेल्यावर त्यांची ओळख झाली... नंतर ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यांच्यासोबत जयललितांनी 28 चित्रपट केले आणि त्या चित्रपटांना तुफान प्रतिसादही मिळाला. आई गेल्यानंतरची पोकळी एम.जी.आर. यांनी भरून काढली. सुरुवातीला आई आणि नंतर एम.जी.आर. यांच्या प्रभावानं त्यांचं आयुष्य भारलेलं होतं. त्यांचे अनेकदा मतभेद झाले. अफवा पसरल्या मात्र जवळीक कायम राहिली. नंतर त्यांच्याच आग्रहाखातर त्या राजकारणात आल्या. एम.जी.आर. यांच्या निधनानंतरचा काळ हा त्यांच्या आयुष्यातला सर्वाधिक कठीण काळ.

जशास तसे...

आयुष्यात प्रत्येक गोष्ट त्यांना संघर्ष करूनच मिळवावी लागली. कुशाग्र बुद्धिमत्ता सोडली तर वारसा हक्कानं तसं त्यांना काहीच मिळालं नाही. एम.जी.आर. हे त्यांचे आधारवड असले तरी पक्षात जयललितांना त्यांनी राजकीय वारसदार म्हणून कधी प्रोजेक्ट केलं नाही असं त्यांनीच सांगून ठेवलंय. त्यांच्या अंत्ययात्रेत जयललितांना धक्के मारून बाहेर काढण्यात आलं. ती जखम त्यांची शेवटपर्यंत भळभळत राहिली. नंतर त्यांनी पक्षावर वर्चस्व मिळवलं. या संघर्षामुळेच त्या कणखर बनल्या. पहिले मी शांत, अबोल, प्रत्युत्तर न देणारी होती. लोकांनी त्याचा फायदा घेतला. नंतर परिस्थितीनं मला बदलण्यास भाग पाडलं. आधीची आणि आताची जयललिता यामध्ये खूप फरक आहे. आता जशी प्रतिक्रिया येते त्याच प्रमाणात किंबहुना त्यापेक्षा जास्त माझा प्रतिसाद असतो असं त्या अभिमानाने सांगत.

कायम नंबर वन...

'मी जेव्हा काही करायचं ठरवते तेव्हा... ते मला आवडो किंवा न आवडो, ते काम करण्यासाठी सर्वस्व झोकून देते. चित्रपटात काम करणं मला आवडायचं नाही. पण मला काम करावं लागलं. त्या क्षेत्रातही मी नंबर एकवर कायम राहिले. राजकारणात यायची इच्छा नव्हती पण राजकारणात आल्यावर लोकप्रियतेच्या शिखरावर गेले. जे करायचं ते सर्वश्रेष्ठ हीच माझी भूमिका होती.'

शशिकला या अम्मांची सावली

jayalalitha and sasikalaशशिकला ही जयललितांची जिवलग मैत्रीण आणि सहकारी. तिच्यामुळे त्यांना सतत वादांना सामोरं जावं लागलं. एकदा तर त्यांनी शशिकलाला घराबाहेरही काढलं, मात्र नंतर पुन्हा त्या एकत्र आल्या. एमजीआर मुख्यमंत्री असताना त्यांच्या विश्वासू अधिकारी व्ही.एस. चंद्रलेखा यांचे पीआरओ एम. नटराजन हे शशिकलांचे पती. जयललितांवर चित्रपट तयार करण्याच्या उद्देशाने शशिकलांची जयललितांशी ओळख झाली. पुढे त्याचं रूपांतर घट्ट मैत्रीत झालं. शशिकला अतिशय महत्त्वाकांक्षी. पाहता पाहता त्यांनी जयललितांचा ताबा घेतला. त्यांना काय हवं, काय नको अशी प्रत्येक गोष्ट त्या बघायच्या. जयललितांनाही असं कुणी जवळचं हवंच होतं. प्रत्येकाला मदत करणारं घरात कुणीतरी असतं. मला तसं कुणीच नव्हतं. शशिकला माझी सर्व काळजी घेते. तिची आणि माझी जवळीक ही अनेकांना सहन होत नाही. ज्यांना शशिकलांची जागा घ्यायची आहे ते अफवा पसरवतात असं जयललितांचं शशिकला वादावर स्पष्टीकरण होतं. जयललितांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात शशिकला या सुपर पॉवर होत्या.

कायम वादग्रस्त

आधी कलाकार म्हणून आणि नंतर राजकारणी म्हणून वाद आणि वादळांनी त्यांची कायम सोबत केली. पहिल्यांदा त्या जेव्हा मुख्यमंत्री झाल्या तेव्हा त्यांचं वय 30 वर्षंही नव्हतं. अफाट लोकप्रियता. कायम एक गूढ वलय. हुकूमशाही वृत्ती आणि एककल्ली कारभार यामुळे त्यांच्यावर कायम टीका झाली. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्यांना दोन वेळा जेलमध्येही जावं लागलं. त्यांच्या शेकडो साड्या, मोजदाद करता न येणारे दागिने, जोड्यांचे शेकडो प्रकार अशा अनेक गोष्टींमुळे त्या कायम चर्चेत आणि वादात राहिल्या. मात्र त्यांची लोकप्रियता कधीच कमी झाली नाही. त्यांचा असा स्वभाव बनण्यामागे त्यांचा बालपणातला आणि नंतरचा संघर्ष कारणीभूत असता पाहिजे.

मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रशासनावर घट्ट पकड होती. दलित, अलपसंख्याक आणि ओबीसींना सध्या सर्वात जास्त आरक्षण तामिळनाडूत आहे. मोबाईल, ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या उत्पादनांचं हब म्हणून आज तामिळनाडू ओळखलं जातं ही जयललितांचीच कामगिरी आहे.

कसं असेल तामिळनाडूचं पुढचं राजकारण?

जयललितांनंतर तामिळनाडूच्या राजकारणात एका वेगळ्या पर्वाला सुरुवात होणार हे निश्चित. जयललितांनी आपल्या पक्षात दुसरा नेताच मोठा होऊ दिला नाही. त्यामुळे अण्णाद्रमुकला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी झगडावं लागेल. तेवढा जनधार असेला नेता नसल्यामुळे आमदार फुटण्याचा धोका आहे. पक्षाला एकत्र ठेवण्याची ताकद आज तरी ओ.पनीरसेल्वम, शशिकला किंवा थंबीदुराई या नेत्यांमध्ये नाही. करुणानिधी आता 92 वर्षांचे आहेत. त्यामुळे एम.स्टॅलिनच्या नेतृत्वात द्रमुकला पुढची वाटचाल करावी लागेल त्यावेळी करुणानिधींचा करिष्मा त्यांच्यासोबत नसेल. तर काँग्रेसचे नेते असले तरी त्यांना मास बेस नाही. त्यामुळे काँग्रेसला फार फायदा होण्याची शक्यता नाही.

अभिनेता रजनीकांत यांच्याकडे आता सगळ्यांच्या नजरा आहेत. भाजपशी त्यांची जवळीक पाहता भाजप त्यांना आपल्याकडे खेचण्याचा निश्चित प्रयत्न करणार. मात्र सध्यातरी भाजपकडे स्थानिक नेताही नाही आणि पक्ष म्हणून त्या प्रमाणात विस्तारही नाही. त्यामुळे पुढच्या काही महिन्यांमध्ये तामिळनाडूत एका नव्या पर्वाला सुरुवात झाली तर आश्चर्य वाटणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 7, 2016, 6:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading