दहीहंडीचे राजकारण कोणत्या "थराला "?

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Mar 23, 2017 05:32 PM IST

दहीहंडीचे राजकारण कोणत्या

mahesh_mhatre_ibnlokmat- महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक , IBN लोकमत

दहीकाल्याचे स्मरण का करावे ? भारतात 5 हजार वर्षांपासून कृष्णभक्ती आणि पर्यायाने दहीकाला-रास गरबा का सुरु आहे ? याची काहीही माहिती नसलेले लोक सध्या दहीहंडीच्या उत्सवाचे "अर्थ" पूर्ण राजकारण राजकारण करण्यात गुंतलेले आहेत. दहीहंडी हा उत्सव गेल्या 8-10 वर्षांपासून विनाकारण वादाच्या गोंधळात सापडलाय . याआधी हंडी फोडण्याची हि साधी सरळ परंपरा राजकीय नेत्यांनी बाजारात नेवून उभी केल्याने त्यातील उत्सवी उत्साहाला बेधुंद उन्मादाचे स्वरूप लाभले होते. त्यातील वर्षागणिक वाढणारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल आणि तरुणाईची गर्दी हा सर्वपक्षीय नेत्यासाठी शक्तिप्रदर्शन कारण्याचा एक अनोखा "इव्हेन्ट" बनला होता, पण सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीच्या थरांवर नियंत्रण आणले असल्याने उद्या या एका मुद्द्यावरून मुंबई, ठाणे , नवी मुंबई परिसरात तणाव निर्माण होऊ शकतो. पोलीस आणि प्रशासन यासंदर्भात सावधगिरी बाळगेल याबद्दल आम्हाला खात्री आहे. पण तरुणाईच्या भावना भडकावणारे नेते जर या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे राजकीय भांडवल करतील तर उद्या दहीहंडीच्या ऐवजी तरुण पोरांची डोकी फुटतील याची भीती वाटते . म्हणून गेल्या चार- पाच महिन्यांपासून दहीहंडीच्या सरावात मग्न असणार्‍या आधुनिक गोपाल आणि त्यांच्या प्रशिक्षक मंडळींनी शांतता राखावी असे आवाहन करावेसे वाटते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णया संदर्भात आता बडे नेते भडक प्रतिक्रिया देतील. देव , धर्म आणि भाषिक अस्मिता धोक्यात आल्याचे नारे दिले जातील . एकूण काय तर हा खोडकर कृष्ण देवाच्या खेळाचा विषय कोणत्याही "थराला" जाऊ शकतो. याचे भान तरुणांनी ठेवणे गरजेचे आहे. त्याच्या जोडीला कृष्ण चरित्र समजून घेणे देखील गरजेचे आहे.

dahi-handi-images-2015

"कृष्ण" या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. सगळ्यात प्रचलित अर्थ म्हणजे, रंग निदर्शक, काळा सावळा. पण कृष्ण या शब्दाचा खरा अर्थ आहे आपल्याकडे खेचून, आकर्षून घेणारा. त्यामुळे असेल कदाचित, कृष्ण लीला वर्णने मनाला मोहवतात. रामकथा किंवा शिव आख्यानात कृष्ण चरित्राएवढे आकर्षण नसते. म्हणून आजही आपल्या देशातील प्रत्येक नवजात बालक त्या, त्या घरातील गोपाल लकृष्णण असतो, म्हणजे जीवनाच्या आरंभ काळाला आम्ही जसे कृष्णासोबत जोडले आहे, तद्वत आमचा अंतिम श्वास आणि अखेरचा प्रवास श्रीराम नामाशी बांधलेला दिसतो. म्हणून मला राम आणि कृष्ण हे भारतीय संस्कृतीचा श्वासोच्छ्वास असल्यासारखे वाटतात .

भारतीय समाज आणि संस्कृतीचा रोमहर्षक प्रवाह गेली अनेक शतके अव्याहतपणे सुरू आहे. कथा-दंतकथांना शब्द आणि सुरामध्ये गुंफत, मानवी नातेसंबंधांतील सारे बारकावे रंगवत सुरू असलेला हा प्रवास काही युगपुरुषांच्या जगण्याभोवती फिरतो आहे. होय, थोडा विचार करून पाहा, आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा मार्ग राम, कृष्ण आणि शिव या तीन युगपुरुषांच्या नावानेच पुढे जातो आणि म्हणूनच कृष्णाष्टमी असो वा रामनवमी, या राम-कृष्णांच्या जन्माचा उत्सवही आमच्याकडे वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.

Loading...

ram krishna shiva -wallpaper-HD-1418013205

भगवान शिव ही देवता राम-कृष्णांच्याही आधीची, बर्‍यापैकी आदिम. त्या देवाचे आरंभीचे उपासकही शिवाप्रमाणे भोळेभाबडे. त्यामुळे राम-कृष्ण या राजवंशाशी संबंधित युवराजांच्या जन्माची वेळ आणि दिवस जसा त्यांच्या भक्तांना ठाऊक आहे, तसा शिवजन्माचा निश्चित उल्लेख कुठे आढळत नाही. खरे तर शिवाचा संबंध पृथ्वी आणि विश्वाच्या उत्पत्तीशी जोडलेला असल्यामुळे भगवान शिवशंभो यांचे एक वेगळेच स्थान निर्माण झाले आहे. हिमालयातील गंगेला भूतलावर आणून मानवी समाजाला जीवनदान देणार्‍या शिवाने अनिष्ट ते भस्म करण्याची भूमिका घेऊन डबलरोल निभावलेला दिसतो. त्यामुळे राम-कृष्णांएवढा नसेल, परंतु शिवसुद्धा भारतीय जनमनाला आवडतो, भावतो. त्याचा भाबडा भोळेपणा आजही भारतीय लोकसाहित्यामध्ये कथा-काव्यरूपाने जिवंत आहे.

तसे पाहायला गेलो तर राम-कृष्ण आणि शिव या तिन्ही देवांमध्ये राम सगळ्यात लोकप्रिय आणि लोकमान्य. सध्याच्या काळासंदर्भात बोलायचे तर राजमान्यसुद्धा. भारतातील काही राज्यं वगळता तुम्ही कुठेही गेलात तर रामराम, जय रामजी की आदी अभिवादनानेच संभाषणाला सुरुवात होते. कारण आमच्या समाजात मर्यादा पुरुषोत्तम राम हाच आदर्श मानला जातो. राम हा आदर्श पुत्र आहे, बंधू आहे, सखा आहे, खारीची काळजी घेणारा प्रेमळ माणूस आहे. मुख्य म्हणजे तो सामाजिक चौकट मानणारा आहे. कोण्या एका धोबी बांधवाच्या टिप्पणीमुळे राजा श्रीराम आपल्या पत्नीला, देवी सीतेला कायमची सोडतो. त्याच्या त्या भूमिकेवर आजही टीका होते. त्यामुळेच असेल कदाचित सबंध गुजरात ज्या कृष्णाला भजतो, उठता बसता 'जय श्रीकृष्ण' बोलतो. तो बालपणीचा प्रेमसखा, बिनधास्त, धडाकेबाज श्रीकृष्ण घेऊन महात्मा गांधी स्वातंत्र्य चळवळीत उतरले नाहीत. त्यांनी प्राधान्य दिले श्रीरामाला. अगदी अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी राम आपल्या हृदयात आणि ओठांवर जपला होता.

समजा, गांधीजींनी रामाऐवजी श्रीकृष्णाची बंडखोरी, संयम, जिद्द, प्रेम, करुणा, आस्था, धैर्य, शौर्य आणि कूटनीती यांचा पुरस्कार केला असता, तर कदाचित आजच्या भारताचे चित्र वेगळे दिसले असते. आम्ही ज्या मर्यादा पुरुषोत्तम रामाला जास्त मानले, तो प्रभू राम हा मानवातून देवत्वाकडे जाण्याचा प्रयत्न करणारा होता. त्याउलट श्रीकृष्ण म्हणजे वारंवार आपले माणूसपण सिद्ध करणारा पूर्णपुरुषोत्तम.

भागवत पुराणात असे म्हटले आहे की, रामाचा त्रेतायुगातील अवतार आठ कलांचा, तर कृष्णाचा द्वापारयुगातील अवतार हा सोळा कलांचा आहे, म्हणून तो सगळ्या पुरुषांमध्ये उत्तम. अगदी बालपणापासून तर जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत कृष्ण माणसासारखा वागला. फक्त माणसांशीच नव्हे तर सकल प्राणिमात्रांशी तो 'माणुसकी'ने वागला, म्हणून कृष्ण आमच्या सगळ्या देवांमध्ये वेगळा दिसतो. सच्चा माणूस वाटतो आज आपल्याकडे दहीहंडीच्या निमित्ताने लाखो रुपयांची उधळपट्टी करणार्‍या लोकपालांना म्हणजे नेत्यांना आणि त्या उत्सवात डीजेच्या तालावर बेधुंदपणे थिरकणार्‌या 'गोपालांना' कृष्णाच्या या माणुसकीची जाण नाही. आणि आपल्या अवतीभवती असणार्‌या समाजातील दुदैर्वी स्थितीचे भान नाही.

lifting-govardhana-hill

कृष्ण लहान होता, अगदी छोटा. त्यावेळी आईने आकाशातील इंद्राला नैवेद्य दाखवणे त्याला आवडले नव्हते. तो यशोदा मैयाला उद्देशून म्हणाला, आई गं, तो आकाशातला देव थोडीच हा नैवेद्य खाणार आहे? किती छान पदार्थ केले आहेस गं चल आण तो नैवेद्य, मीच खातो. कृष्ण फक्त बोलून थांबला नाही, तर त्याने तो नैवेद्य फस्तही केला आणि आईला म्हणाला, आता या गोवर्धन पर्वताची पूजा कर. हाच आपल्या गायी-गुरांना चारापाणी देणारा खरा देव. कृष्णाच्या त्या आगळिकीने इंद्र देव रागावला. त्याने पाऊस, धारांचा, गार गारांचा वर्षाव करून अवघ्या गोकुळवासीयांना छळण्यास सुरुवात केली; पण बोलणारा कृष्ण लढणाराही होता. त्याने स्वत:च्या करंगळीवर गोवर्धन उचलून धरला. साध्या, दुबळ्या गोपाळांचा त्या पराक्रमात सहभाग असावा म्हणून त्यांना आपल्या काठ्यांवर गोवर्धन तोलण्याची विनंती केली. विजयाचे इतके सार्वजनीकरण जगात इतरत्र कुठेच पाहायला मिळणार नाही.

असा हा भलता चतुर माणूस, कृष्ण. इथे ती सारी दृश्यं मालिका आपल्या डोळ्यासमोर येते, करंगळीवर गोवर्धन उचलून धरणारा कृष्ण आपल्या मित्रांकडे, आईकडे आणि मुख्य म्हणजे प्रेमप्रिय राधेकडे कसा हसून पाहत असेल. त्याचा नटखट, नाटकी स्वभाव तेथेही जागाच असणार. कारण कोणतेही मोठे काम करताना साधेपणा दाखवणे हे तर त्याचे खास वैशिष्ट्य. त्याने गोकुळात किती तरी राक्षस मारले, पण कधीच कसलाही गाजावाजा केला नाही. कालिया नागाला त्याने धडा शिकवला, पण ती लढाई पार पाडून पाण्याबाहेर येताना तो सुमधुर बासरी वाजवत येतो. जणू काही घडलेच नाही. थेट महाभारत युद्धापर्यंत त्याचे हे वर्तन असेच राहिले. पण गोवर्धनावरील त्याची पहिली लढाई मोठी आव्हानात्मक होती. प्रस्थापित व्यवस्थेविरोधातील त्याचा पहिला एल्गार होता.

कृष्णाच्या त्या धाडसाला, आगळिकीला आपोआपच लोकलढ्याचे रूप आले आणि इंद्र देव हरला. कृष्ण तिथेच थांबला नाही. त्याने आपल्या घरातील दह्या-दुधाच्या मडक्यांवर गोरगरीब गोपाळांचाही हक्क असल्याचे मान्य केले. तसे पाहिले तर तो नंद राजाचा मुलगा होता. त्याने लोणी खावे म्हणून त्याची आई त्याच्या मागे असे; पण त्याने दहीहंडी फोडायची सुरुवात केली. ती पेंद्या, म्हाद्या, गोंद्या या आपल्या गरीब घरातील सवंगड्यांसाठी. बालपणी इतरांचा विचार करणारा हा कृष्ण मोठा झाल्यावरही इतरांसाठीच जगला. अत्याचारी कंसाला धडा शिकवून तो मथुरेचा राजा बनू शकला असता, अगदी हक्काने पण त्याने आजोबा उग्रसेन महाराजांना त्यांचे राज्य परत दिले. गोकुळ, मथुरेपासून सुरू झालेला त्याचा तो प्रवास पार हस्तिनापुरापर्यंत झाला, पण दुसर्‍यांसाठी. कधी गोपाल, कधी पांडव तर कधी यादवांच्या हिताची काळजी घेत कृष्ण जगला. अगदी भर महाभारत युद्धकाळात श्रीकृष्ण दररोज संध्याकाळी युद्ध थांबल्यावर जखमी हत्ती, घोडे यांची सेवाशुश्रुषा करण्यात मग्न असे. आम्हाला त्याच्या या प्रेमळ करुणामयी स्वभावाची ओळखच झालेली नाही. तो अफाट पराक्रमी होता, पण तेवढाच साधा, सरळळ

e445872dae4d94064c65e8c726aeaba9

महाभारत युद्ध संपल्यानंतर राजसूय यज्ञात पहिला मानकरी म्हणून जेव्हा कृष्णाची निवड झाली, तेव्हा अगदी त्याच क्षणी कृष्ण उष्टी-खरकटी काढत होता. लोक धावत त्याला बोलवायला गेले तर हा हीरो खरकटे हात रेशमी उपरण्याला पुसत पुढे सरसावला, अगदी सहजपणे आणि तटस्थपणे. लोकांना त्याची रासलीला आणि राधाप्रेमाची कथाकाव्ये ठाऊक आहेत. त्याची कपटकारस्थाने आणि रणछोडदासपणाच्या कहाण्या लोक रंगवून सांगतात, पण कृष्ण जी कोणती गोष्ट करायचा, ती तन्मयतेने, प्रेमाने, निष्ठेने, त्वेषाने, जोशाने आणि नवनव्या उन्मेषाने करायचा हे आपण विसरतो. द्रौपदीची भरसभेत विटंबना होत असताना सगळ्या पुरुषांनी भरलेल्या त्या सभागृहात द्रौपदीच्या मदतीला धावून आला फक्त पूर्णपुरुषोत्तम श्रीकृष्णण सगळे अतिरथी, महारथी, त्यागी, विद्वान, पराक्रमी गप्प होते. दुर्योधनाच्या दहशतीने आपले कर्तव्य विसरले होते, तेव्हा पुढील परिणामांचा विचार न करता, पुढे आला तो कृष्ण. म्हणून आजही प्रत्येक मुलीला त्याची, त्याच्या कहाण्यांची, गाण्यांची भुरळ पडते.

आपल्या समाजमनात घर करून बसलेले हे राम-कृष्ण वा शिव प्रत्यक्षात होऊन गेले की नाहीत, यावर तज्ज्ञ-विचारवंत आणि अभ्यासक खूप चर्चा करीत असतात. आपल्याला त्या वादात पडण्याचे कारण नाही; पण कृष्णाने द्रौपदीची इज्जत वाचवली होती, यावर भारतातील तमाम आया-बहिणींचा विश्वास आहे. म्हणूनच असेल कदाचित यमुना नदीच्या काठावर वृंदावन क्षेत्री एक झाड आहे, दरवर्षी त्या झाडाला भाविक बायका ओढणी किंवा रुमाल बांधतात. आपण रक्षाबंधन करतो न्, अगदी तसेच. ते झाड त्याच्या हिरव्याकंच पानांऐवजी दूरवरून लक्षात येते ते रंगीबेरंगी ओढण्यामुळे. देशभरातील आयाबाया त्याला ओढणी बांधून हात जोडतात. द्रौपदीचे दुष्ट हातांपासून रक्षण करणारा कृष्ण आपला सखा, भाऊ, बाप बनून पाठराखण करो, हीच कामना त्यामागे असते आज दिल्लीत, मुंबईत, ठाण्यात, पुण्यात, रेल्वेत, शेतात, घरात, ऑफिसात भीतीने वावरणार्‍या महिलांना पाच हजार वर्षांपूवच् होऊन गेलेल्या कृष्णाचा आधार वाटतो दर पाच वर्षांनी निवडून येणार्‍या लोकशाहीतील लोकांच्या सरकारने त्यापासून काहीतरी बोध घ्यावा. दहीहंडीचे अर्थपूर्णण राजकारण करणार्‍या आमदार र नगरसेवकांनी काहीतरी शिकावे, एवढीच साधी अपेक्षा.

Follow us on twitter : @MaheshMhatre

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 24, 2016 06:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...