युरोप दहशतवादाच्या उंबरठ्यावर : ब्रसेल्स हल्ल्यामागचं वास्तव

युरोप दहशतवादाच्या उंबरठ्यावर : ब्रसेल्स हल्ल्यामागचं वास्तव

  • Share this:

vinod_raut_ibnlokmatविनोद राऊत, सिनीअर प्रोड्यूसर, आयबीएन लोकमत 

ब्रसेल्समध्ये झालेले दहशतवादी हल्ले काही जणांसाठी धक्का देणारे असतील, मात्र आंतरराष्ट्रीय विषयाची जाणअसणार्‍यांसाठी हे हल्ले अपेक्षित होते. महत्त्वाचं म्हणजे पॅरिस हल्ल्यात सहभागी असलेल्यांनीच हे बॉम्बस्फोट घडवून आल्याचं स्पष्ट झालंय. काही दिवसांपूर्वी पॅरिस हल्ल्यापाठीमागचा सूत्रधार सलाह अब्दुसलेमला बेल्जियम पोलिसांनी अटक केली. पॅरिस हल्ल्यानंतर जवळपास 125 दिवसांच्या शोधमोहिमेनंतर त्याला ब्रसेल्सजवळच्या मोलेंबिक भागातून अटक केली. त्याहीपेक्षा महत्त्वाचं या काळात तो ब्रसेल्स बॉम्बस्फोटातील सहभागी असलेल्यांसोबत राहत होता हे स्पष्ट झालंय.

BRUSSELS EXPLOSIONS

युरोपियन युनियनवर हल्ला

ब्रसेल्स म्हणजे बेल्जियमची राजधानी, त्याहीपेक्षा ब्रसेल्स ही युरोपियन युनियनची राजधानी आहे. या शहरात युरोपियन संघाची संसद आणि नाटोचं मुख्यालय आहे. शहरातील दोन हल्ल्यांपैकी एक आत्मघातकी बॉम्बस्फोट भूमिगत मेट्रो स्थानकावर हल्ला झाला, ती जागा युरोपियन संघाच्या संसदेपासून हाकेच्या अंतरावर आहे. शिवाय दुसरा हल्ला ब्रसेल्सच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालाय. त्यामुळे ब्रसेल्सचा हल्ला हा थेट युरोपियन युनियनच्या सार्मभौमत्वावर झालेला हल्ला आहे हे स्पष्ट आहे.

BLOG 2

बेल्जियम दहशतवादाच्या रडारवर...

युरोपमधला बेल्जियम हा 1 कोटी 10 लाख लोकसंख्या असलेला छोटा मात्र सधन देश. मात्र आयसिसच्या उदयानंतर लोकसंख्येच्या तुलनेत सर्वात जास्त मुस्लीम तरुण या देशातूनच सीरियामध्ये गेले आहेत. सध्याच्या परिस्थितीत बेल्जियमध्ये आयसिसच्या स्लीपर सेलचे 900 सक्रिय सदस्य आहेत. गेल्या महिन्यातच इराक आणि सीरियामध्ये गेलेल्यांची संख्या 441 होती, त्यातील 117 तरुण परतल्याची नोंद आहे. बेल्जियमध्ये केंद्र आणि राज्यातील प्रशासकीय यंत्रणेमध्ये समन्वय नाही. इतर युरोपियन राष्ट्रांपेक्षा बेल्जियमकडे दहशतवादाविरोधातील यंत्रणा, गुप्तचर यंत्रणा पाहिजे तेवढ्या प्रमाणात सक्षम नाहीत. असुरक्षित सीमा आणि पोलीस यंत्रणेतला ढिसाळपणा यामुळे आखाती देशातून घुसखोरांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे बेल्जियम हे सॉफ्ट टार्गेट आणि दहशतवाद्यांचं आश्रयस्थान बनत गेलं.

4035257683

बेल्जियमच्या अकार्यक्षम यंत्रणा

ब्रसेल्स शहराला लागून असलेला मोलेंबिक जिल्हा, या भागात आफ्रिकेतून स्थलांतरित झालेल्या मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. कमालीची बेरोजगारी, मुख्य प्रवाहापासून दूर आणि त्यात सरकारचं दुर्लक्ष, त्यामुळे या भागातील मुस्लीम तरुण आयसिसच्या कच्छपी लागलेत. खरं तर आयसिसच्या उदयानंतर सरकारने या भागातील हालचालींवर बारीक लक्ष ठेवणं आवश्यक होतं. मात्र तसं झालं नाही. त्यामुळे मोलेंबिक गुन्हेगार, दहशतवाद्यांचा अड्डा बनत गेला. याच ठिकाणी पॅरिस हल्लाचा कट रचला गेला होता. हल्ल्यामागचा मुख्य सूत्रधार सलाह अब्दुसलेम हा हल्ल्यानंतर याच ठिकाणी लपून बसला होता. जवळपास 124 दिवस हा भाग बेल्जियम पोलिसांनी पिंजून काढला. शेकडो धाडी टाकल्या गेल्या, पण अब्दुसलेम पोलीसांच्या हाती लागला नाही . मोबाईल फोन सुरू केल्याची घोडचूक केल्यानंतर तो पोलिसांच्या हाती लागला. दुसरी धक्कादायक बाब म्हणजे ब्रसेल्स हल्ल्यात सहभागी असलेल्या एका दहशतवाद्याला वर्षभरापूर्वी तुर्की सरकारनं सीरियाच्या सीमेवरून पकडून त्याला बेल्जियमच्या हवाली करण्याची तयारी दाखवली होती, मात्र बेल्जियम सरकारनं तशी उत्सुकता दाखवली नाही. पुरावे नसल्याचं कारण देत या दहशतवाद्याला डच सरकारनं नंतर सोडून दिलं. युरोपमध्ये इंग्लंड, फ्रान्समध्ये अशा अनेक अशांत मुस्लीम वस्त्या आहेत; ज्यामध्ये असंतोषाचा ज्वालामुखी खदखदतोय, यावर खरं तर उपाय करण्याची गरज आहे.

Blog 3

युरोपियन युनियनपुढचं आव्हान

दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिकेच्या खांद्यावर सुरक्षेची जबाबदारी ठेवून युरोपियन राष्ट्र आतापर्यंत सुरक्षित होते. नाटोची स्थापना मुळात याच उद्देशासाठी झाली. आजही युरोपमध्ये जवळपास 65 हजार अमेरिकन लष्करी अधिकारी तैनात आहेत. युरोपियन राष्ट्रांच्या गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा व्यवस्था सध्याच्या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी तेवढ्याच्या सक्षम नाहीत. दुसरी मोठी समस्या म्हणजे युरोपियन युनियनच्या सर्व सदस्य राष्ट्रांच्या सीमा मुक्त असल्यामुळे दहशतवादी याचा फायदा उचलतात. त्यामुळेच पॅरिस हल्ल्यानंतर दहशतवादी बेल्जियममध्ये पळून गेलेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे इराक, सीरियामध्ये बदललेल्या परिस्थितीनंतर युरोपच्या सीमा आता तेवढ्या सुरक्षित राहिलेल्या नाहीत. आयसिसच्या उदयानंतर एकट्या युरोमधून 5000 तरुण थेट सीरिया, इराकमध्ये गेलेत. आजही त्यातील केवळ 1700 तरुणंाची माहिती युरोपच्या देशांकडे उपलब्ध आहे. आतापर्यंत मुस्लीम तरुणांच्या दहशतवादाचा थेट धोका नसल्यामुळे दहशतवादाविरोधात एकीकृत यंत्रणासुद्धा युरोपियन युनियनकडे अस्तित्वात नाही. एकट्या फ्रान्समध्ये गुप्त माहिती गोळा करणार्‍या 35 गुप्तचर संस्था आहेत यावरून तुम्ही परिस्थिती समजू शकता. सदस्य राष्ट्रांकडील सर्व गोळा केलेल्या गुप्त माहितीची देवाणघेवाण होणं गरजेचं आहे. पॅन युरोपियन सुरक्षा व्यवस्था उभी करणं ही आतासाठी खूप आवश्यक बाब आहे.

Syria rebels in Latakia: al-Qaeda’s al-Nusra in, ISIS out

मुळावर घाला घालण्याची गरज

सीरिया, इराकमधील गृहयुद्ध हे युरोपच्या दहशतवादी समस्येचं मूळ कारण आहे. सीरियातील गृहयुद्धामुळे आयसिसकडे आकर्षित होणार्‍या युरोपियन मुस्लीम तरुणांची संख्या वाढली, त्याचबरोबर युद्धाला कंटाळून युरोपकडे स्थलांतरित, घुसखोरांच्या संख्येत वाढ झालीय. आयसिसविरोधात एकीकृत आघाडी अजूनही अस्तित्वात आली नाही. युरोपची काही राष्ट्रं आयसिसविरुद्धच्या हवाई हल्ल्यात सहभागी होत आहेत. मात्र मूळ समस्येला हात घालण्याची तयारी युरोपची नाही. त्यापेक्षा तुर्कीसोबत करार करून युरोपकडे आलेले स्थलांतरितांचे लोंढे तुर्कीकडे पाठवण्याचा करार युरोप महासंघ करतोय. सीरियातील गृहयुद्ध थांबवणे आणि आयसिसविरुद्ध रशिया, अमेरिकेने एकीकृत आघाडी उभारणे ही काळाची गरज आहे. प्रत्यक्षात अमेरिका, इराण, रशिया, तुर्कीचे अजेंडे मात्र वेगवेगळे आहेत. त्यामुळे एका बाजूने सीरियात युद्धविराम करण्यासाठी रशिया, अमेरिकेवर दबाव टाकून आयसिसला वेगळे पाडण्याचं काम युरोपियन युनियनने केलं पाहिजे तर दुसर्‍या बाजूला युरोपमधल्या मुस्लीम तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपाययोजना आखल्या पाहिजेत. शेवटी गोळ्या घालून दहशतवाद संपत नाही. महत्त्वाचं म्हणजे पॅरिस, ब्रसेल्सवरच्या हल्ल्यानंतर आता युरोपमध्ये मुस्लीम समुदायाविरोधात संतापाची लाट उमटायला सुरुवात झालीय. अर्थात या संकटाला आयसिस संधी मानून आपल्या समर्थकांची नवी भरती सुरू करण्याचा घाट घालू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 25, 2016, 8:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading