S M L

मातृहृदयी कवी !

Samruddha Bhambure | Updated On: Mar 7, 2016 08:23 PM IST

मातृहृदयी कवी !

mahesh_mhatre_ibnlokmat- महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत

कविवर्य कुसुमाग्रज यांना दुर्गम आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबद्दल खूप प्रेम. त्यामुळे या खेडय़ापाडय़ांतील शाळांमध्ये काम करणा-या लोकांबद्दल त्यांच्या मनात खूप आस्था असे. त्याच भावनेतून १९८७ मध्ये कुसुमाग्रजांनी ठाणे जिल्ह्यातील वाडा येथे येण्याचे डॉ. रमेश वरखेडे यांचे निमंत्रण स्वीकारले होते. ‘अनुष्टूभ’च्या माध्यमातून कवी-समीक्षक म्हणून प्रसिद्ध होण्यापूर्वी विद्यार्थीदशेतच वरखेडे सरांचा कुसुमाग्रजांशी परिचय झाला होता. त्यामुळे आदिवासी भागातील महाविद्यालयात काम करायचे ठरवून आलेल्या प्राचार्य वरखेडे सरांनी ‘शारदोत्सवा’च्या माध्यमातून नामवंत कवी, लेखकांना निमंत्रित करण्याचे ठरवल्यानंतर साहजिकच पहिले नाव आले कुसुमाग्रजांचे.

कुसुमाग्रजांनी आमच्या महाविद्यालयात येण्याचे मान्य केल्यामुळे मराठी वाङ्मय शिकणा-या आम्हा विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वारे सळसळले. मी त्यावेळी आमच्या कॉलेजच्या ‘तरंग’ या हस्तलिखित साप्ताहिकाचा संपादक होतो. त्यामुळे आम्ही तात्यासाहेब शिरवाडकरांच्या एकूण साहित्याचा आढावा घेणारा विशेषांक काढण्याचे ठरवले. वरखेडे सरांनी माझ्या त्या उत्साहाकडे पाहून ‘‘कुसुमाग्रजांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तूच कर’’ असे सांगून मला आणखी प्रोत्साहन दिले; पण पुढे कसोटी होती कुसुमाग्रज कवी म्हणून, वि. वा. शिरवाडकर नाटककार म्हणून आणि तात्यासाहेब माणूस म्हणून समजून घेण्याची. पहिल्या चार-आठ दिवसांतच मी हतबल झालो आणि दुर्मुखल्या चेह-याने वरखेडे सरांपुढे जाऊन उभा राहिलो. सरांना स्पष्टपणे सांगितले, ‘मला कुसुमाग्रज समजत नाहीत.’ ते खळाळून हसले, ‘त्यात काय कठीण आहे, तुला जे वाटेल, जसे वाटेल तसे बोल.’ मी जमेल तसे कुसुमाग्रज वाचत गेलो. कार्यक्रमाच्या आदल्या दिवसापर्यंत त्यांच्यातील वेगळेपण पुस्तकांमधून माझ्यात साचत होते, माझ्या नकळत. आणि १२ जानेवारी १९८७ चा तो दिवस औत्सुक्याची पहाट घेऊन उगवला. आम्ही आमच्या कल्पनेप्रमाणे व्यासपीठ सजवले होते. जंगलातील फुलांचे गुच्छ, आंबांच्या डहाळी, फुलझाडांच्या कुंडय़ा आणि आकर्षक मडक्यांची आरास असा थाट केला होता. माझ्यासकट सगळ्याच मित्रांसाठी तो पहिला कार्यक्रम होता, त्यामुळे सगळाच आनंद.

तात्यासाहेब येणार म्हणून गावातील मान्यवर प्रतिष्ठित मंडळीसुद्धा कार्यक्रमाला आली होती. मोठय़ा पटांगणावर हजारभर विद्यार्थ्यांसमोर तात्यासाहेब ‘रणरागिणी झाशीची राणी आणि तिचे कर्तृत्व’ या विषयावर बोलणार होते. सगळ्या वातावरणाला एक मंगलमय उत्सवाची झालर होती. आजवर आमच्या स्वामी विवेकानंद शाळा-महाविद्यालयात एवढा मोठा कार्यक्रम झाला नव्हता. त्यामुळे माझ्यावरही एक प्रकारचे दडपण आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मी मोठय़ा हिंमतीने कुसुमाग्रजांच्या कवितेच्या चार ओळी म्हणालो. श्रोत्यांनी टाळ्या वाजवल्या; पण माझी नजर तात्यासाहेबांकडे होती. सस्मित नजरेने ते माझ्याकडे बघत होते. त्यांच्या डोळ्यांतील कौतुकाने मला चांगलाच धीर मिळाला. मी बोलत गेलो.. प्रत्येक वक्त्याच्या भाषणापूर्वी मी काहीतरी बोलून कार्यक्रम रंगवण्याची धडपड करत होतो. तात्यासाहेबांना भाषण करण्यास पाचारण करायला मी उभा राहिलो होतो, तेवढय़ात व्यासपीठाजवळ शोभेसाठी उभारलेली मातीच्या घडांची आरास हवेच्या झोताने कोसळली. त्याचा आवाज झाल्यामुळे स्टेजजवळ बसलेल्या मुलांच्या रांगांमध्ये गोंधळ उडाला. त्या अनपेक्षित घटनेने मुख्याध्यापक सु. पा. कुलकर्णी, वरखेडे सर आणि खुद्द तात्यासाहेबसुद्धा थोडे अस्वस्थ झाले. गुरव सरांच्या एका शिटीच्या इशा-याने मुलांचा गोंधळ शांत झाला होता; पण मी आता काय बोलावे या विचारात पडलो होतो. तरीही सगळे अवसान गोळा करून म्हणालो, ‘आज कविवर्य कुसुमाग्रज आपल्या या आडवळणाच्या गावात आले आहेत. त्यामुळे येथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आनंद झालाय; पण तात्यांसाहेबांच्या काव्य प्रतिभेने आपल्या या आदिवासी भागातील द-या-खो-यांत मुक्तविहार करणा-या वा-यालाही आपल्याकडे आकर्षित केले आहे. त्या वा-याची ही जी झुळूक आली होती ती आपला आनंद दर्शवणारी होती’ माझे ते वाक्य संपते न संपते तोच टाळ्यांचा जोरदार गजर झाला.. हस-या डोळ्यांनी तात्यासाहेब माझ्याकडे बघत होते.. ते भाषणाला उभे राहिले नाहीत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे खूर्चीवर बसूनच बोलले. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी माझे तोंडभरून कौतुक केले आणि राणी लक्ष्मीबाई आणि एकंदर सशस्त्र क्रांतीचा काळ आम्हा विद्यार्थ्यांच्या डोळ्यांसमोर उभा केला. त्यांचे भाषण संपता-संपता उन्हे कलत आली होती. अवघ्या आसमंतावर सोनपिवळी छटा पसरली होती. जणू काही तात्यासाहेबांच्या शब्दांचा आम्हा लोकांच्या विश्वाला परिसस्पर्श झाला होता.

Loading...

कार्यक्रम संपल्यानंतर वरखेडे सरांनी तात्यासाहेबांना कार्यालयात आणण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली. मी त्यांच्याजवळ गेलो, त्यांना लवून नमस्कार केला. पाठीवरून प्रेमभराने हात फिरवत त्यांनी मला जवळ घेतले, म्हणाले, ‘मला वाटलं होतं, पुण्या-मुंबईकडील मुलेच भाषणात हुशार असतात. तुझ्याकडे पाहून कळलं, आपली आदिवासी भागातील मुलेही काही कमी नाहीत.’ त्यांच्या त्या शब्दांनी मनात आत्मविश्वासाची ज्योत जागवली होती. तात्यासाहेब माझा हात हातात घेऊन चालत होते. दोन्ही बाजूने विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. खरे तर मी सुद्धा त्याच गर्दीतला, त्यांच्यासारखाच एक... पण साक्षात शारदेच्या पुत्राने माझा हात हातात घेतला होता... तात्यासाहेबांच्या त्या परिसस्पर्शानेच माझ्या जीवनात अक्षरप्रेम फुलले असावे...

@MaheshMhatre

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 27, 2016 10:50 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close