झुकझुक, झुकझुक आगीन गाडी

झुकझुक, झुकझुक आगीन गाडी

  • Share this:

mahesh_mhatre_ibnlokmat- महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत

 

रेल्वेचा अर्थसंकल्प मांडताना रेल्वेमंत्री बर्‍याचदा राजकीय मार्गाचा वापर करतात. काहीवेळा चतुर रेल्वेमंत्री राजकारण टाळून व्यवहारी मार्गाचा वापर करून प्रगतीचा नवा टप्पा गाठण्याचा प्रयत्न करतो. पण सुरेश प्रभू यांनी आज सादर केलेला रेल्वे अर्थसंकल्प राजकीय अथवा व्यवहारी मार्गाऐवजी भलत्याच भावनिक वळणावर धावताना दिसला. त्यामुळे "प्रभूकृपा" होणार या आशेने टीव्हीसमोर बसलेल्या करोडो भारतीयांची घोर निराशा झाली. मुख्य म्हणजे, जी रेल्वेसेवा दररोज 1 कोटी 30 लाख अधिकृत (विनातिकीट प्रवाशांचा यात समावेश नाही, त्यांचा आकडा काही लाखातच असणार) प्रवाशांना 7 हजार रेल्वे गाड्यांमधून एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी नेते, ज्या रेल्वेकडे 6853 स्थानके आहेत, लाखो एकर जागा आहे, प्रवासी आणि माल वाहतुकीच्या माध्यमातून रेल्वेकडे देशाच्या आर्थिक उभारणीला गती देण्याची क्षमता आहे, अशा महत्वाच्या खात्याला अधिकाधिक समाजाभिमुख आणि विकासाभिमुख करण्याची अपूर्व संधी सुरेश प्रभू यांनी वाया घालवली असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

गेल्या वर्षभरात झालेले रेल्वे अपघात पाहता, गेल्या काही काळात अशक्य आणि असह्य बनलेला रेल्वे प्रवास पाहता, रेल्वेमंत्री आपल्या भाषणात याविषयी काहीतरी ठोस उपाययोजना सुचवतील असे वाटले होते. परंतु तसे झाले नाही. अर्थसंकल्प मांडताना सुरुवातीला प्रभू यांनी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय भाषणात केलेल्या 139 घोषणांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला, त्यासाठी त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ते हरिवंशराय बच्चन प्रभुतींच्या काव्यपंक्तींचा आधार घेतला. पण 'विपदाये आती हैं , पर रुकेंगे नहीं, झुकेंगे नहीं' वगैरे वगैरे पण त्यांच्या या 'कवित्वा'ला वस्तुस्थितीचा आधार नसल्यामुळे नजीकच्या काळात संसदेत आणि रस्त्यावर विरोधकांच्या शिमग्याशी 'सामना' करावा लागेल.

suresh_prabhu344आज देशात जेवढे प्रवासी दररोज प्रवास करतात त्याच्या निम्मे प्रवासी, जवळपास 70-75 लाख प्रवासी मुंबई परिसरातील असतात. ही वस्तुस्थिती पाहता, याच नाही तर प्रत्येक रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईला आणि महाराष्ट्राला झुकते माप देण्याची गरज आहे. पण मुंबईकर सुरेश प्रभूंनी ती अपेक्षा फोल ठरवली. आज मुंबईच्या कोणत्याही स्थानकावर जाऊन पाहा, सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही गाडीत चढून दाखवा, तुम्हाला गाडीत पाय ठेवायला जागा मिळणार नाही, दररोज 10-12 मुंबईकरांचा घास घेणार्‍या मुंबईच्या रेल्वेचा जीवघेणा प्रवास किती भयंकर आहे हे सगळेजण जाणतात." मुंबईकर घरातून बाहेर पडताना देवावर हवाला ठेवूनच बाहेर पडतो," असे विधान मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूतीर्ंनी अलीकडेच केले होते. त्याची दखल घेऊन जरी रेल्वे मंत्रालयाने पावले उचलली तरीदेखील लोक त्यांना दुवा देतील, पण आज कोणालाही अशा लोककल्याणकारी विषयात रस नाही. हे समाजाचे दुर्दैव.

प्रभू यांनी आपल्या भाषणात मुंबईमधील रेल्वे प्रवास सोपा करण्यासाठी साधे उपाय योजण्याची देखील तसदी घेतली नाही. फार काही न करता रेल्वे फलाटांची उंची वाढवण्याचे काम सर्व स्थानकांवर एकाचवेळी सुरू केले आणि महिन्या-दोन महिन्यात पुरे केले तरी अनेक मृत्यू टळू शकतील. पण लक्षात घेतोय कोण? आज महानगर असलेल्या मुंबईच्या जडणघडणीला खरा वेग 19व्या शतकात मिळाला. इंग्रजांनी सबंध देशभरात आपली सत्ता प्रस्थापित केली होती. त्यामुळे भारताच्या आर्थिक पिळवणुकीचा त्यांना खुला परवाना मिळाला होता. भारतीय उद्योगधंदे नष्ट करून इंग्रजांनी स्थानिक बाजारपेठ काबीज केली होती आणि हा स्वस्तात कच्चा माल घेण्याचा आणि मनमानेल त्या भावात पक्का माल विकण्याचा धंदा सुलभ व्हावा यासाठी नवनवीन शोध, संशोधन आणि सुविधा शोधण्यात येत होत्या.

Railway budget 2016 (33)तार, पोस्ट, रेल्वे आणि संरक्षण व्यवस्था मजबूत झाल्याने मुंबईचे स्वरूप 19व्या शतकात पार बदलून गेले होते. 1853 साली मुंबई ते ठाणे अशी रेल्वे सर्वप्रथम धावली. सबंध आशिया खंडातील त्या पहिल्या रेल्वेने मुंबईला 'चाक्या म्हसोबा' हा देव दिला, त्यावेळी वाफेच्या इंजिनावर चालणारी ती रेल्वे पाहायला शेकडो लोक लोहमार्गाच्या दुतर्फा उभे राहून नसायबाचा पोर्‍या मोठा अकली, बिनबैलाने गाडी कशी ढकली? असा स्वत:लाच प्रश्न विचारीत. रेल्वेच्या आगमनाने मुंबई आणि मुंबईकरांच्या जगण्याला वेग प्राप्त झाला.

त्यापाठोपाठ 1861-65 दरम्यान घडलेल्या अमेरिकन यादवीने मुंबईला खर्‍या अर्थाने महानगर बनवले. हा सारा इतिहास प्रभूंना ठाऊक नाही असे नाही. परंतु झोपलेल्या माणसाला तुम्ही जागे करू शकता, पण झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे कसे करणार? हाच मोठा यक्ष प्रश्न आहे. तो ज्या पक्षाने प्रभू यांना राजकारणात आणले, मोठे केले त्या शिवसेनेला पडला की नाही, याचा शोध घेणे आता गरजेचे आहे. शिवसेनेने ते काम लवकर करावे अन्यथा ही 'प्रभू एक्स्प्रेस' येणार्‍या महापालिका निवडणुकीत त्यांच्या अंगावर देखील धडकू शकेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 25, 2016, 8:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading