आणखी किती 'आयलान' युरोपच्या वेशीवर

आणखी किती 'आयलान' युरोपच्या वेशीवर

  • Share this:

vinod_raut_ibnlokmat- विनोद राऊत, सिनीअर प्रोड्यूसर, आयबीएन लोकमत

सध्या युरोपमधील निर्वासितांचे लोंढे बघता आपल्याला बांगलादेश युद्धानंतर उद्भवलेल्या परिस्थितीची सहज आठवण येईल...आजही वृत्तपत्रातून मध्ये मध्ये बातम्या येत असतात. अनधिकृत बांगलादेशी नागरिकांची मुंबईत घुसखोरी, त्यानंतर भाजप-शिवसेना, मनसे नेत्यांची नेहमीची प्रतिक्रिया आलीच... आता हंगेरी, ऑस्ट्रियाचे पंतप्रधानही राज ठाकरेंसारखे बोलू लागलेत... नुसते बोलत नाहीत तर कृतीत आणताहेत... सीरिया, तुर्कीमधील निर्वासितांना आम्ही शरण जाणार नाही... अगदी काल-परवा न्यूयॉर्क टाइम्सच्या एका बातमीत हंगेरी, ऑस्ट्रियामध्ये निर्वासितांसोबत जो सरकारचा व्यवहार सुरू आहे त्यावरून हिटलरचा काळच आठवला... त्यावेळी ज्यू लोकांना अशाच प्रकारचे नंबर दिले जायचे, त्यांना अशाच प्रकारे रेल्वेमध्ये कोंबलं जायचं... कॅम्पमध्ये ढकललं जायचं...जाणून घेवूयात या समस्येविषयी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून

निर्वासितांचा प्रश्न नेमका काय?

सध्या आखातातील अनेक देशांमध्ये गृहयुद्धाचा भडका उडालाय. मुख्यत: सीरिया, इराकमध्ये युद्ध परिस्थिती आहे. सीरियामध्ये 4 वर्षांपासून सुरू असलेल्या गृहयुद्धात अडीच लाखांपेक्षा जास्त नागरिक ठार झालेत. कित्येक लाख लोक निर्वासित झालेत. सीरियाची सध्या तीन भागात फाळणी झाली आहे. यामध्ये राजधानी दमस्कास, लटाकियासारखी महत्त्वाची शहरे सरकारच्या म्हणजे बशर अल असाद यांच्याकडे आहेत. तर दुसरा मोठा तुकडा आयसीसच्या ताब्यात आहे तर उर्वरित भागात कुर्द बंडखोर आणि अमेरिका, सौदी समर्थित सुन्नी लढाऊ गटाच्या ताब्यात आहे. सीरियामध्ये चार वर्षांच्या युद्धामुळे देशाची अर्थव्यवस्था नष्ट झालीय. लोकांना घर नाही, खायला अन्न नाही, रोजगारही नाही. त्यातही हिंसाचाराची परिस्थिती. त्यामुळे सीरियन नागरिक मिळेल तसे जगभर पलायन करत आहेत. मोठ्या संख्येने हे लोक तुर्की, लेबनॉन, जॉर्डनमध्ये शिरलेत. मात्र त्यांना फारशी चांगली वागणूक मिळत नाही. त्यामुळे या नागरिकांचा ओढा आता युरोपकडे लागलाय. युरोपमध्ये निर्वासितांना इतर देशांपेक्षा चांगली वागणूक मिळते, रोजगार मिळतो. याचा फायदा लिबिया, तुर्कीमधल्या तस्करांनी उचलला आहे. काही डॉलर घेऊन गरीब, श्रीमंत नागरिकांना ते बोटीद्वारे, बोटीनंतर कंटेनर्समधून युरोपमध्ये पोहोचवतात. सीरियाबरोबर लिबियामध्ये गृहयुद्ध सुरू आहे. ट्युनिशियामध्येही अस्थिरता आहे. इराकमधून परिस्थितीला कंटाळून नागरिक आता युरोपच्या मार्गाकडे आहेत.

Aylan Kurdi

युरोपमध्ये प्रवेशाचा कुठला मार्ग आहे?

युरोप आणि मध्य-पूर्व आखातातील देशांना विभागलं आहे ते भूमध्य सागराने. लेबनॉन, सीरिया, तुर्की, लिबिया, ट्युनिशिया, इजिप्त हे देश समुद्रकिनार्‍यावर येतात. तुर्कस्थान हे युरोपचे प्रवेशद्वार आहे असे म्हटले जाते. बुहसंख्य मुस्लीम राष्ट्र असूनही तुर्कीला युरोपियन युनियनमध्ये सहभागी होता आलेलं नाही. कारण अनेक राष्ट्रांचा तुर्कीच्या सहभागाला ठाम विरोध आहे. आता जोपर्यंत तुर्की, लिबिया, सीरियामध्ये परिस्थिती चांगली होती म्हणजे या देशामध्ये स्थिर सरकारे होती. तोपर्यंत युरोपियन युनियनच्या सीमा मुख्यत: सागरी सीमा सुरक्षित होत्या. मात्र या देशामध्ये सध्या राजकीय अस्थिर परिस्थिती निर्माण झालीय. त्यामुळे या देशामधून छुप्या पद्धतीने भूमध्य सागरी मार्गाने अनधिकृतपणे युरोपचा रस्ता धरताहेत. इथले तस्कर, काही डॉलर मोजून गरीब, श्रीमंत नागरिकांना बोटीमध्ये कोंबतात, तिथून मग काही दलाल, एसी कटेंनर्सद्वारे युरोपमधल्या शहरात पोहोचवतात. असे हे रॅकेट आहे. तुर्की, लिबिया हे देश तर युरोपमध्ये जाण्यासाठीचे लाँचिंग पॅड झालेत. महत्त्वाचे म्हणजे या देशामधल्या अस्थिरतेमुळे या दलालांवर सरकारचा अंकुश उरलेला नाही. यामध्ये आतापर्यंत अनेक नागरिकांचा मृत्यू झालाय. एकट्या या वर्षात अधिकृत आकडेवारी बघता जवळपास 3 हजार निर्वासित बोटी उलटल्यामुळे मृत्युमुखी पडलेत. अनधिकृत आकडेवारी यापेक्षा जास्त असू शकते.

या परिस्थितीसाठी कोण जबाबदार आहे?

मध्य-पूर्वेतील अनेक राष्ट्रं गृहयुद्धाने धुमसत आहेत. यामध्ये सीरिया, लिबिया, इराक, यमन या देशांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे या युद्धाला फोडणी देण्याचे काम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे युरोपचे काही देश, अमेरिका आणि तेलसंपन्न देशांनी केलंय. लिबिया हा युरोपला लागून असलेला देश आहे. जोपर्यंत इथं हुकूमशहा गद्दाफीची सत्ता होती तोपर्यंत देश स्थिर होता, युरोपचे समुद्रकिनारेही सुरक्षित होते. मात्र गद्दाफीची सत्ता हटवण्यात फ्रान्ससहित अमेरिकेने पुढाकार घेतला. गद्दाफीचा पाडाव झाला, पण देश अस्थिरतेच्या खाईत गेला. देशाची फाळणीच झाली. त्यामुळे सरकार नावाची वस्तू शिल्लक राहिली नाही. सीरियामध्ये राष्ट्रपती बशर अल असादचा एकहुकमी अंकुश होता तोपर्यंत सर्व स्थिर होतं. मात्र असादची सत्ता उलथवायला अमेरिका, सौदी, कतारच्या मदतीनं खूप हालचाली झाल्या. त्याचा परिपाक युरोपचं प्रवेशद्वार असलेलं राष्ट्र तुर्की अस्थिर होण्यात झालं. सीरियाची फाळणी झाल्यानं सीरियन नागरिकांचे लोंढे तुर्कीचा आश्रय घेत आहेत. एवढ्या मोठ्या लोंढ्यामुळे तुर्कीत भीषण परिस्थिती निर्माण झालीय. हे नागरिक युरोपला जात असतील तर बरं... त्यामुळे तुर्की सरकार युरोपकडे जाणार्‍यांकडे दुर्लक्ष करत आहे. या सर्व निर्वासितांच्या लोढ्यांला युरोपियन राष्ट्र थेट जबाबदार आहे.

Europe migration

युरोपमध्ये निर्वासितांना विरोधाचे कारण काय?

युरोपियन युनियनमध्ये 32 राष्ट्रांचा समावेश आहे. या देशाची एकच निर्वासितांसंदर्भात पॉलिसी आहे. मात्र सध्या अनेक राष्ट्रे आर्थिक मंदीशी लढा देत आहेत. यामध्ये ग्रीस, हंगेरी, रोमानिया, इटली या राष्ट्रांची नाजूक स्थिती आहे. त्यांना या निर्वासितांचे बर्डन नको आहे. त्याहीपुढे या राष्ट्रातील स्थानिक नागरिकांचा या लोकांना विरोध आहे. निर्वासितांचे लोंढे असेच येत राहिले तर मूळ नागरिक अल्पसंख्याक होतील अशी भीती त्यांना आहे. त्याही पलीकडे जरा अशा प्रकारे निर्वासितांचे वेलकम केले तर आखाती देशामधील नागरिकांची रांग लागेल. युरोपला वेगळी राष्ट्रे वसवावी लागतील. दुसरं मुख्य कारण म्हणजे सध्या युरोपमध्ये दहशतवादाचं संकट कायम आहे. त्यामध्ये किती लोक कट्टरपंथीय याची स्क्रिनिंग करणे कठीण आहे. युरोपियन लोकांच्या जगण्याची संस्कृतीही वेगळी आहे. या संस्कृतीत इतर देशांतील लोक रुळत नाहीत. अलीकडे ब्रिटनमध्ये झालेले दंगे याचे मोठे उदाहरण आहे.

निर्वासितांचे लोंढे थांबण्याची शक्यता आहे का?

तशी शक्यता फार कमी आहे. एवढे हवाई हल्ले करूनही आयसीसची आगेकूच थांबवणे अमेरिकेला शक्य झालेले नाहीय. त्यामुळे या राष्ट्रात शांतता प्रस्थापित करणे, स्थिर सरकार देणे जवळपास अशक्य आहे. शिवाय या युद्धाला धार्मिक रंग आहे, शिया विरुद्ध सुन्नी असा संघर्ष आहे. दुसरं एक होऊ शकतं. या निर्वासितांना आखाती देशातील तेलसंपन्न राष्ट्रांनी आपल्या देशामध्ये सामावून घेतले पाहिजे. त्याची शक्यता कमीच आहे. सध्या संयुक्त राष्ट्रातर्फे निर्वासितांसाठी फूड प्रोग्रॅम सुरू केलाय. मात्र या कार्यक्रमासाठी जेवढा निधी पाहिजे तेवढा मिळत नाही. यामध्ये सौदी, कतार, कुवेत यासारख्या राष्ट्रांनी मोठा वाटा उचलायला हवा.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: September 9, 2015, 11:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading