ब्राह्मण असणे दोष आहे का?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2015 09:10 PM IST

ब्राह्मण असणे दोष आहे का?

amit_modak_ibnlokmat- अमित मोडक , सीनिअर प्रोड्युसर, आयबीएन लोकमत 

बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण काय जाहीर झालं? आणि त्याला विरोधाचं एक पेवच फुटलं. बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण देणे म्हणजे त्या पुरस्काराचा अवमान, अशा प्रकारचं एक चित्र निर्माण करण्यात आलं. जितेंद्र आव्हाडांनी सुरू केलेल्या या विरोधात मग पुरोगाम्यांनी उडी घेतली. बाबासाहेब पुरंदरेंना विरोध केला नाही तर आपलं पुरोगामित्व धोक्यात येईल की काय? अशा भीतीनं मग सगळ्यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराला विरोध सुरू केला.

हा विरोध पुरंदरेंना आहे की ब्राह्मण बाबासाहेब पुरंदरेंना आहे? प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं झालं तर या विरोधाला जातिवादाची किनार आहे. बाबासाहेब पुरंदरेंचं ब्राह्मण असणं त्यांच्या आड आलं. बाबासाहेब पुरंदरे ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना एवढा विरोध होतोय हे मान्य करावंच लागेल. पुरंदरेंचा सन्मान म्हणजे कुठल्यातरी दहशतवाद्याचा सत्कार असं वातावरण निर्माण करून स्वत:ला मराठा समाजाचं तारणहार समजणार्‍या संभाजी ब्रिगेडनं तोडफोड सुरू केली. राष्ट्रवादीसारख्या पक्षानं या विरोधाला खतपाणी घातलं आणि शरद पवारांसारख्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ राजकीय नेत्यानं कुठलीही ठोस भूमिका न घेऊन, या विरोधाला पाठिंबाच दिला.

पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्रात ब्राह्मण हे नवे अस्पृश्य आहेत का? ब्राह्मणांचा कुठलाही सत्कार आज महाराष्ट्राला मान्य नाही का? इतके वर्षं ब्राह्मणांनी वर्चस्व गाजवलं, त्याची चीड अशा मार्गांनी, अशा विरोधातून बाहेर येत आहे का? या प्रश्नांची चर्चा करणं, या प्रश्नांचा विचार करणं आवश्यक आहे. कारण महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणविरोधाच्या नावाखाली कुठेतरी जातीय द्वेष पसरवला जातोय. जातीच्या नावावर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होतोय.

आज कुठल्याही गोष्टीला विरोध केला किंवा समर्थन दिलं तर पहिले विरोध करणार्‍याची जात बघितली जाते आणि मग कोणी समर्थन दिलं की त्याची जात बघितली जाते. आणि एकदा जातीच्या आधारावर विरोध सुरू झाला की मग सर्व तर्क, वस्तुनिष्ठ प्रश्न निरर्थक ठरतात. विरोधाला किंवा समर्थनाला तर्काचा आधार देण्याची भानगडच उरत नाही. उरतो तो फक्त विरोध आणि तो विरोध विचारांना, व्यक्तीला असण्यापेक्षा तो विरोध उरतो तो 'जाती'ला.

Loading...

babasaheb purandare_blogमहाराष्ट्रात जातिवादाचं हे वाढतं पेव अत्यंत भयावह आहे. समाज जणू काही कोलमडण्याच्या स्थितीत उभा आहे. जातीच्या नावावर संघटना आणि मग त्या संघटनांना मिळणारा राजकीय पाठिंबा. आणि संघटना वाढण्यासाठी जातीला विरोध, हे अलीकडच्या काळातलं चित्र. पण त्याहूनही चिंताजनक म्हणजे ब्राह्मणांना होणारा वाढता विरोध. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा काय झाली, ते या पदासाठी लायक आहेत की नाही? त्यांची शैक्षणिक पात्रता काय? आजवरची राजकीय कारकीर्द कशी होती? हे सगळे प्रश्न बाजूला आणि पहिला आक्षेप आला तो म्हणजे ब्राह्मण मुख्यमंत्री. इतकी जात आज आपल्यामध्ये भिनली आहे की माणूस आणि त्याचं कर्तृत्व दिसत नाही. दिसते ती त्या व्यक्तीची जात.

एकूण आज राज्यात ब्राह्मण द्वेष वाढतोय का? याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण जाहीर झाल्यानंतरचा विरोध, त्या विरोधाची भाषा, त्या विरोधाचा आवेश, त्यानंतर याचा अधिक गांभीर्यानं विचार करण्याची गरज निर्माण झालीय. बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणाला कुणी आक्षेप घेऊ शकतं तर ते म्हणजे इतिहासकार, इतिहासाचे अभ्यासक. त्यांनी कुठलाही आक्षेप घेतला नाही किंवा विरोध केला नाही. सामान्य व्यक्तीही आक्षेप नोंदवू शकतो, शंका उपस्थित करू शकतो. पण त्या आक्षेपांना, प्रश्नांना उत्तरं मिळाल्यानंतरही हेका कायम असेल तर त्याला काय म्हणावं? तेच नेमकं बाबासाहेब पुरंदरेंसोबत होतंय. विरोध करणार्‍यांच्या आक्षेपांना इतिहासकारांनी उत्तरं दिल्यानंतरही, विरोधक हेका सोडायला तयार नाहीत. आक्षेप खरे ठरवण्यासाठी भक्कम पुरावेही त्यांच्याकडे नाहीत. विरोधाला धार आहे ती फक्त 'जाती'ची. बाबासाहेब इतके वर्षं शिवचरित्राचा प्रचार आणि प्रसार करत होते तेव्हा का आक्षेप घेतला नाही? गावोगावी जेव्हा 'जाणता राजा'चे प्रयोग होत होते, त्या प्रयोगांना हजारोंची गर्दी होत होती तेव्हा का आक्षेप घेतले नाहीत? तेव्हा का चुकीचा इतिहास सांगताय असं सांगून प्रयोग बंद पाडले नाहीत? आज ज्या गावांमध्ये पुरंदरेंच्या विरुद्ध मोहीम राबवून सह्या जमवल्या जातायत तेव्हा त्याच गावातल्या लोकांनी हा प्रयोग डोक्यावर घेतला होता आणि आता फक्त आणि फक्त जातीच्या नावावर पुरंदरेंविरोधात सह्या जमवल्या जातायत हे अत्यंत लज्जास्पद आहे.

आज सुरू असलेल्या विरोधाला राजकीय धार देखील आहे. पुरस्कार देणारा आणि घेणारा ब्रह्मण आहे हे कुठे तरी समाजमनावर भिनवण्याचा अत्यंत निंदनीय प्रकार होतोय आणि त्यातून सत्तेपासून दूर गेलेला पक्ष सत्तेसाठी रस्ता शोधण्याचा प्रयत्न करतोय. पण या प्रयत्नात समाज उभा-आडवा दुभंगतोय, याची यांना जाणीव आहे का? समाजात उभी फूट पडतेय याच्याशी त्यांना काहीही देणंघेणं नाही? जितेंद्र आव्हाडांवर हल्ला झाल्यावर शरद पवार दुखावले जातात. राज्यात गुंडशाही माजतेय अशी त्यांना जाणीव होते. मग जेव्हा दादोजी कोंडदेवांचा पुतळा पाडला गेला? भांडारकरवर हल्ला झाला तेव्हा झुंडशाही नव्हती का? किंवा मग मराठ्यांच्या संघटनांनी केलेले हल्ले समाजमान्य आणि इतरांनी केलेले हल्ले म्हणजे गुंडशाही का?

सातत्यानं ब्राह्मण समाजाला टार्गेट करून त्यांना वेगळं पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. नव्हे तर ब्राह्मण म्हणजे नवे अस्पृश्य ठरतायत आणि जितके राजकीय पक्ष यासाठी जबाबदार आहेत तेवढेच तथाकथित पुरोगामीही जबाबदार आहेत. त्यामुळेच एखादा संपादक जेव्हा थेट म्हणतो की दाभोलकरांचा खून ब्राह्मणांनी केला तेव्हा चिंता वाटते. अशा प्रकारचं टोकाचं मत तुम्ही दुसर्‍या कुठल्याही धर्माबद्दल किंवा जातीबद्दल देणार नाही. ब्राह्मण आज सॉफ्ट टार्गेट ठरतायत, अशी भावना या समाजाच्या मनात घर करत आहे. त्यामुळेच कालपर्यंत तोडफोडीची मक्तेदारी असलेल्या संभाजी ब्रिगेडसारख्या संघटना ब्राह्मण युवकही स्थापन करतायत आणि मग त्यातूनच जितेंद्र आव्हाडांवर हल्लाही केला जातो.

babasaheb_purandarephotoआज मोठ्या मिजाशीत मराठा संघटना आणि मराठ्यांचं प्रतिनिधित्व करणारे राजकीय पक्ष बाबासाहेब पुरंदरेंना विरोध करतायत. पण सगळेच मराठे का शिवाजींच्या बाजूनं होते? मराठ्यांनीही शिवाजी महाराजांचा विरोध केलाय? मराठे जसे शिवाजी महाराजांसोबत लढले तसे काही मराठी विरोधातही लढले, हे देखील सत्य आहे. शिवाजींना विरोध करणारे मराठे याबाबत का बोललं जात नाही? दुसरीकडे शिवाजींच्या राज्याभिषेकाला नकार देणारा ब्राह्मणाचा इतिहास ठासून सांगितला जातो. पण त्याच वेळी अनेक ब्राह्मण महाराजांसोबत लढले. बाजी प्रभूंचा इतिहास दुय्यम आणि गागाभट्टांचा इतिहास ठासून सांगायचा हे योग्य आहे का? यामधून ब्राह्मणाबद्दलाचा द्वेष वाढवायचा प्रयत्न करण्यात येत नाही का? शिवाजी महाराजांची ओळख महाराष्ट्राला खर्‍या अर्थानं कुणी करून दिली तर ती म्हणजे महात्मा जोतिबा फुलेंनी. ज्या महाराष्ट्राला शिवाजींचा विसर पडला होता ते शिवाजी पुन्हा एकदा मराठी अस्मितेचं प्रतीक झालं ते महात्मा फुले यांच्यामुळे.

तर दुसरीकडे बाबासाहेब पुरंदरेंनी आपलं अख्खं आयुष्य शिवरायांसाठी वाहून घेतलं आणि त्यांच्यापरीनं त्यांनी शिवाजी महाराष्ट्रात पोहोचवला. आज एवढा शिवाजींचा जयघोष करणार्‍या मराठा समाजानं काय केलं? इतकी वर्षं राज्यात मराठ्यांची सत्ता आहे, आज बाबासाहेब पुरंदरेंच्या नावानं गळा काढणारे नेते इतके वर्षं सत्तेत असूनही महाराजांच्या गडकिल्ल्यांसाठी काही केलं नाही. सत्ता असून महाराजांच्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करू शकले नाहीत. संवर्धनासाठी निधी मिळावा म्हणून मराठा मंत्र्यांचे उंबरठे झिजवावे लागले. शिवाजींवर राष्ट्रवादीचं एवढं प्रेम आहे तर मग गडकिल्ले का वाचवता आले नाहीत. तेव्हा महाराज का आठवले नाहीत? पण स्वत:च्या नावापुढे ब्रिगेड लावणार्‍या संघटना असे प्रश्न विचारणार नाही. कारण त्यांनी फक्त महाराजांच्या नावावर राजकारण केलं, समाजकारण नव्हे.

बाबासाहेब पुरंदरे फक्त निमित्त आहे, समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न होतोय. पण राजकीय फयद्यासाठी पुरंदरेंसारख्या वयोवृद्ध व्यक्तीचा असा उद्धार करणं लाजिरवाणं आहे. बरं या विरोधामधला आणखी एक विरोधाभास. आंबेडकरी जनतेनं बाबासाहेब पुरंदरेंचा खूप आधी विरोध केला होता. त्यावेळी त्या विरोधाचंही 'जाती'यकरण करण्यात आलं होतं. आंबेडकरी जनतेनं केलेल्या विरोधाला, दलितांचा विरोध असं लेबल लावण्यात आलं. आणि आज मराठे करत असलेला विरोध अचानक पुरोगामी कसा ठरतो? म्हणजे दलित विरोध करत असतीलं तर त्यांना जातीवादी ठरवण्यात येतं. त्यांच्यावर ब्राह्मण द्वेषाचा ठपका ठेवण्यात येतो. आणि मराठ्यांचा विरोध म्हणजे पुरोगामी भूमिका हा कसला न्याय? ज्या ब्राह्मण द्वेषाचा फायदा घेऊन दलित संघटनांना, आपल्या बाजूनं वळवण्याचा प्रयत्न करणार्‍या मराठा नेत्यांना आणि मराठा संघटनांना माझा एकच प्रश्न आहे. दलितांवर सर्वाधिक अत्याचार कोणी केले? आजही गावागावांमध्ये दलितांवर अन्याय करण्यात कुठल्या समाजाचा पुढाकार आहे? आणि जेंव्हा दलित विरुद्ध मराठा असा संघर्ष असतो तेंव्हा हे पुरोगामी मराठे कुठे लपून बसतात?

ब्राह्मणांबद्दल आज समाजात जो राग आहे त्याचा विचारही या समाजानं केला पाहिजे. जातीय समाजरचना निर्माण करणं, त्या जाती समाजात भिनवणं याची जबाबदारी ब्राह्मण समाजाला घ्यावी लागेल. इतकी वर्षं ज्या समाजावर अन्याय झाला, ज्यांना वाळीत टाकण्यात आलं. आज ब्राह्मणांना होणारा विरोध, याला कारण तात्कालिक असलं तरी त्यामागे हजारो वर्षं अन्याय झाला ही भावना आहे. शेकडो वर्षं ब्राह्मणांनी जातीच्या आधारावर बहुजन समाजाचं कर्तृत्व नाकारलं. आता त्याचीच पुनरावृत्ती होतेय. आता बहुजन समाज ब्राह्मणांचं कर्तृत्व नाकारतोय. हजारो वर्षं ब्राह्मणांनी समाज त्यांना हवा तसा चालवला. त्यामुळे आता बहुजनांना ब्राह्मण मुख्यमंत्री खटकतोय.

ब्राह्मणांमध्ये आज कॉर्नर केल्याची भावना आहे. पण आपणही कधीकाळी बहुजनांना कॉर्नर केलं होतं याची आठवण ब्राह्मणांना ठेवावी लागेल. समाजात दुफळी निर्माण करणार्‍या समाजरचनेचा पुरस्कार करून ब्राह्मणांनी इतकी वर्षं फळं चाखली, आता फक्त ती समाजरचना तुमच्यावर उलटतेय एवढंच. त्यामुळे ब्राह्मण समाजानं हा विरोध, हा तिरस्कार कसा दूर करता येईल याचा गांभीर्यानं विचार करावा. अन्यायग्रस्त समाजाची चीड, राग-द्वेष तुम्हाला समजून घ्यावाच लागेल. त्यानंतर पुढाकार घेऊन सामंजस्यानंच ही दरी भरून काढण्याचा प्रयत्न ब्राह्मण समाजालाच करावा लागेल. हिंदू धर्मांत जातीय उतरंड कुणी आणली? बहुजनांचा शिक्षणाचा अधिकार कुणी काढून घेतला? अस्पृश्यता भारतीय समाजात कुणी आणली? या प्रश्नांची उत्तरं मिळाली तर ब्राह्मणांना आज होणार्‍या विरोधाचं उत्तरही मिळेल.

ब्राह्मण समाजाबद्दलच्या या रागाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न मात्र हाणून पाडला पाहिजे. कुठल्याही व्यक्तीच्या योगदानाची दखल, त्याच्या जातीमुळे विसरणं महाराष्ट्राला शोभणार नाही. बाबासाहेब पुरंदरेंच्या निमित्तानं पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेली समाजातली जातीय फूट वेळीच थांबवण्यासाठी आता प्रयत्न झाले पाहिजेत. आणि ते प्रयत्न तुम्हा-आम्हाला करावे लागतील, एवढं नक्की.

(हा ब्लॉग वाचून माझी जात शोधण्याचा प्रयत्न होणार नाही ही अपेक्षा)

अमित मोडक

E-mail : ammodak376@gmail.com

08879993608 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2015 09:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...