गुरुवंदना...

गुरुवंदना...

  • Share this:

mahesh_mhatre_ibnlokmat- महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत

पत्रकार लक्ष्मण मोरे यांच्या पत्राला उत्तर म्हणून लिहिलेल्या ब्लॉगला खूप लोकांचा प्रतिसाद मिळाला, विशेष म्हणजे काही तरुण पत्रकारांनी मला भेटलेल्या आणि भावलेल्या संपादकांविषयी लिहिण्याचा आग्रह धरला, त्यामुळे अनेक वर्षे मनात घुमत असलेल्या भावनांचा कल्लोळ गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ब्लॉगच्या माध्यमातून मांडत आहे.

वंदनीय !

साधारणत: 24 वर्षे उलटून गेली असावीत. 'मुंबई सकाळ'च्या प्रभादेवी ऑफिसमधील 'ती' सकाळ आजही लख्खपणे आठवते. वाड्याहून पहाटे पाचची बस पकडून मी मुंबई गाठलेली होती. पत्ता विचारत प्रभादेवीला पोहोचेपर्यंत 11 वाजले होते. सकाळची वेळ असल्यामुळे कार्यालय बर्‍यापैकी शांत भासले. प्रवेशद्वारावरच शिपायाने गाठले, ''कुणाला भेटायचं?'' थोडासा उर्मट प्रश्न. मी उत्तरलो, ''संपादकांना.'' ''काय काम आहे?'' मी म्हणालो, ''वाडा गावचा अंशकालीन बातमीदार म्हणून अर्ज केला होता. आज त्याची मुलाखत आहे. हे पाहा संपादकांचे पत्र.'' त्यावर पत्राकडे न पाहता त्यांनी ''सरळ आत जाऊन, सोमनाथ पाटीलसाहेबांना भेटा'' असे सांगितले. पाटीलसाहेबांकडून माझी रवानगी झाली संपादक राधाकृष्ण नार्वेकर यांच्या खोलीकडे. मी आत गेलो तेव्हा ते काहीतरी लिहीत होते. मी येणार याची आगाऊ माहिती मिळाल्यामुळे त्यांनी लिखाण आवरते घेतले असावे. ''मी आत येऊ का?'' असा प्रश्न विचारल्यावर ''या'' असा मनमोकळा आवाज खोलीभर घुमला. त्यापाठोपाठ उमटले आदेशवजा वाक्य ''बसा, चहा घेणार?'' त्यांना नाही म्हणण्याची मला हिंमतच झाली नाही आणि मग सुरू झाली वेगवेगळ्या प्रश्नांची, उपप्रश्नांची मालिका. विद्यार्थी चळवळ, स्थानिक राजकारण, सामाजिक प्रश्न, सांस्कृतिक परंपरा अशा एक ना अनेक विषयांवर नार्वेकरसाहेब प्रश्न विचारत गेले. मी धडाधड उत्तरे देत होतो. तासाभराने सोमनाथ पाटील आत आले. एका गावखेड्याच्या अंशकालीन बातमीदाराची मुलाखत इतका वेळ का सुरू आहे, त्यांच्या मनातील प्रश्न त्यांनी बोलूनही दाखवला. तरीही आमची 'मुलाखत' सुरूच राहिली आणि आणखी अर्ध्या तासाने नार्वेकरसाहेबांनी मला हवा असणारा प्रश्न विचारला, ''काय हो, तुम्हाला इतके सारे विषय छानपणे माहिती आहेत, मग तुम्ही वाड्यामध्ये राहून काय करता? त्यापेक्षा मुंबईला या.'' नार्वेकरसाहेबांच्या त्या एका वाक्याने माझे आयुष्य बदलले. घर, शेत आणि गावाचे सुरक्षित कुंपण ओलांडून मी मुंबईच्या अचाट, अफाट आणि अज्ञात विश्वात पाऊल टाकले. नार्वेकरसाहेब भेटले नसते तर माझे जगणेही गाव-खेड्यातील माझ्या अन्य बांधवांप्रमाणे सीमित, मर्यादित, कुंपणाने बांधलेले राहिले असते.

तीन पिढ्यांचे संपादक...:

तीन पिढ्यांचे संपादक...: श्री आणि सौ.राधाकृष्ण नार्वेकर, नवकाळाचे निळूभाऊ खाडीलकर, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, माजी खासदार भारतकुमार राऊत आणि महेश म्हात्रे

1991 सालातील ही गोष्ट. त्या काळात आजच्यासारखी पत्रकारिता शिकवणारी कॉलेजेस जागोजागी उघडलेली नव्हती. अगदी 'मुंबई विद्यापीठा'मध्येसुद्धा पत्रकारितेची पदवी घेण्याची सोय नव्हती. अर्थात हे सगळे कळायला एक निमित्त झाले, 1987 मध्ये विख्यात समाजसेवक पद्मश्री अनुताई वाघ यांना मी कोसबाडला जाऊन भेटलो होतो. बोलता बोलता अनुताईंकडे मी त्यांच्या बालशिक्षण आणि आदिवासी विकास कामात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण ताई म्हणाल्या, ''अरे हे सगळे तुला वाटते तेवढे सहजसोपे नाही, त्यापेक्षा आपल्या समाजाचे प्रश्न चांगल्या पद्धतीने मांडण्यासाठी तू एक तर वकील हो किंवा पत्रकार बन.'' ते ऐकून मन चांगलेच खट्टू झाले होते. गोंधळलेल्या मनात आणखी गोंधळ उडाला, माझा चेहरा पाहून ताईंनी ठाण्यात जाऊन रमेश पानसे सरांना भेटण्याचा सल्ला दिला होता. तो प्रमाण मानून चराई येथील पानसे सरांचे घर गाठले. त्यांच्या तोंडून पहिल्यांदा पत्रकारितेची पदवी देणारी संस्था पुण्यात आहे हे कळले, पानसे सरांनी पुण्याच्या 'रानडे इन्स्टिट्यूट'ची माहिती दिली. त्यानुसार दोन-चार दिवसांत पुणे गाठले. पण तिथे गेल्यावर कळले की, त्या अभ्यासक्रमासाठी आधी प्रवेश परीक्षा द्यावी लागते, मला चांगलाच उशीर झाला होता. तिथेच घोडे अडले. अखेर वर्ष वाया जाऊ नये म्हणून ठाण्याच्या 'लॉ कॉलेजा'त प्रवेश घेतला. माझे पदवीपर्यंतचे सगळे शिक्षण मराठी माध्यमात झाल्यामुळे ठाण्याच्या महाविद्यालयातील इंग्रजी भाषेतील कायदे शिक्षण 100-120 च्या वेगाने डोक्यावरून जायचे. पहिले काही महिने रोज वाडा ते ठाणे असा पाच-सहा तासांचा प्रवास करण्याच्या वैतागाने इंग्रजीच्या अज्ञानाला जोड दिली. परिणामी माझ्या मनातील वकील होण्याची ऊर्मी आणि ऊर्जा नष्ट झाली आणि पत्रकारितेचा अंकुर वर येऊ लागला होता. मग सुरू झाला सगळ्या दैनिकांकडे अर्ज करण्याचा सपाटा. मुंबईतील एकाही दैनिक वा साप्ताहिकाकडून उत्तर आले नाही. पण 'ठाणे वैभव'चे संपादक नरेंद्र बल्लाळ, 'गगनभेदी'कार अनिल थत्ते, 'सन्मित्र'कार स.पां. जोशी यांनी प्रत्येक भेटीत प्रेम आणि मार्गदर्शन दिले. त्यामुळे पत्रकारितेत प्रवेश घेण्याच्या इच्छेला बळ मिळत गेले. मित्रांचे उत्तेजन सुद्धा होतेच, त्याच्या जोरावर संघर्षाचा काळ जगणे सुसह्य बनले होते.

पण नार्वेकरसाहेबांनी 'प्रशिक्षणार्थी उपसंपादक-बातमीदार' या पदासाठी पंधराशे रुपयांच्या मानधनावर नेमणुकीचे पत्र दिले आणि जगण्याचे सारे संदर्भच बदलून गेले. भुकेने पैशापेक्षा जगणे किती महत्त्वाचे आहे ते शिकवले. पायपिटीने 'आराम हराम है' या वाक्याचा अर्थ मनात भिनवला आणि अनेक पदोपदी अनुभवला येणार्‍या अपमानांनी आत्मभान जागवले. आणि विशेष म्हणजे सगळ्याच अनुभवांनी जगणे घडत गेले. त्यामुळे नोकरीवर रुजू झाल्या झाल्या अगदी पहिल्याच आठवड्यात लिहिलेल्या 'दिंडीचा प्रारंभ कैसा' या पंढरपूरच्या वारीवरील लेखाने सुरू झालेला लेखनप्रवास आजवर अखंड आणि अभंग राहिला.

'प्रशिक्षणार्थी' म्हणून एक वर्ष प्रशिक्षण आणि एक वर्ष उमेदवारी करून त्या उमेदवाराने पुढे संपादकीय विभागात रीतसर नोकरी करावी अशी 'सकाळ' वृत्तसमूहाची योजना होती. पण मला अगदी पहिल्या आठवड्यापासूनच रविवार पुरवणीत लिहिण्यास नारायण पेडणेकरसाहेबांनी संधी दिली. रात्री उशिरा किंवा सुट्टीच्या दिवशीच्या पत्रकार परिषदांना किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांना जाण्यास कुणी इच्छुक नसत. मला ती संधी वाटायची. अशीच एक जगजित सिंग आणि मिताली सिंग यांच्या गप्पांची मैफल होती. सोमनाथ पाटील यांनी सांगितल्यामुळे मी त्या मैफिलीला हजेरी लावली आणि एक छानसा वृत्तांत लिहिला, त्याचे नार्वेकरसाहेबांनी 'न्यूज रूम'मध्ये येऊन कौतुक केले. त्यामुळे ललित लेखनाची आवड वाढली. मग संधी मिळेल तेव्हा ललित लिखाण सुरू झाले. असाच एकदा श्रावण महिन्याच्या ओढीने एक लेख लिहिला, तो सगळ्यांना आवडला. त्याची दखल घेऊन मिलिंद गाडगीळ आणि नार्वेकरसाहेबांनी संपादकीय पानावर 'मनमोगरा' हा ललित लेखांचा साप्ताहिक स्तंभ लिहायला संधी दिली, माझ्यासाठी तो नुसता सन्मान नव्हता तर मुंबईतील गोंधळ-गर्दीत स्वत:ला व्यक्त करण्याची आणि ते करताना स्वताचे स्वत्व जपण्याची ती फार मोठी संधी होती, ती मी मन:पूर्वक निभावली, पुढे त्या लेखांचे, पुस्तकरूपाने प्रकाशन झाले. एकीकडे हे लिखाण सुरू असताना मी बातम्यांच्या जगात मुशाफिरी करीत होतोच, जमेल तशा प्रकारे बातम्या जमवत होतो, माझ्या त्या धडपडीला बर्‍याच लोकांची मदत मिळायची, काही मंडळी त्याची टिंगल करीत, शांत राहण्याचे सल्ले देत, पण एका बातमीने या टीकाकार गप्प झाले होते. पत्रकारितेचे प्रशिक्षण सुरू असतानाच जव्हार-मोखाडा परिसरातील 'वावर-वांगणीचे बालमृत्यू' ही माझी वृत्तमालिका प्रसिद्ध झाली. आणि त्यामुळे माझ्यातील बातमीदारीचे गुण लोकांना दिसले. तसे पाहायला गेल्यास ती बातमी मी देण्याचा काहीच संबंध नव्हता, ती ठाण्यातून येणे अपेक्षित होते, पण त्या संदर्भात माझ्याकडे जास्त माहिती आली होती, त्याशिवाय मी स्वत: त्या भागातील असल्यामुळे मला जव्हारला जायचे आहे असा हट्टच नार्वेकरसाहेबांकडे धरला होता.

तीन पिढ्यांचे संपादक...: श्री आणि सौ.राधाकृष्ण नार्वेकर, माजी खासदार भारतकुमार राऊत आणि महेश म्हात्रे

श्री आणि सौ.राधाकृष्ण नार्वेकर, माजी खासदार भारतकुमार राऊत आणि महेश म्हात्रे

त्याला त्यांनी संमती दिली. लगेचच मी आणि छायाचित्रकार हेमंत चव्हाण आम्ही दोघे जव्हारला गेलो. दुर्गम आदिवासी भागातील भयाण वास्तव आम्ही शब्द-चित्रबद्ध केले आणि उभ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली. त्यावेळचे आरोग्य राज्यमंत्री दिग्विजय खानविलकर, मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी त्या दुर्गम भागाला भेट देऊन अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यात जव्हारला महसूल विभागाचे समांतर प्रांत कार्यालय आणण्याचा निर्णयही होता. या वृत्तमालिकेमुळे माझ्यातील बातमीदार जागा झाला होता. त्यामुळे जशी संधी मिळेल तसा बातमीचा मागोवा घेण्याची जणू चटकच लागली होती. जातीय दंगलींपासून छोट्याछोट्या गावातील निवडणुकीपर्यंत, जमेल त्या विषयावर लिहीत गेलो. त्यासाठी महत्त्वाचे पुरस्कार मिळाले. या सगळ्याची दखल घेऊन नार्वेकरसाहेबांनी मला वर्षभरातच 'उपसंपादक' केले. उमेश करंदीकर, मधू कांबळे आणि वृत्तसंपादक प्रभाकर नेवगी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना अल्पावधीतच 'बातमीदार' झालो. आधी तात्या पारकर, विजय वैद्य आणि नंतर विजयकुमार बांदल हे मुख्य बातमीदार होते. स्वत: नार्वेकरसाहेब हाडाचे बातमीदार असल्याने त्यांचे आमच्या लिखाणाकडे विशेष लक्ष असे. त्याच काळात मी काही राजकीय वृत्तांत लिहिले होते. त्यावरून माझी त्या विषयातील रुची हेरून संपादकांनी मला 'मंत्रालय प्रतिनिधी' केले. त्या काळात इलेक्ट्रॉनिक मीडिया पर्यायाने विविध वृत्तवाहिन्या नव्हत्या. मोजक्याच मोठ्या वृत्तपत्रांचे मंत्रालयात बातमीदार असायचे. मुख्य म्हणजे ते सारे बातमीदार वयाने, अनुभवाने ज्येष्ठ आणि स्वभावाने गर्विष्ठ असायचे. त्यांच्या त्या कळपात वयाच्या 26 व्या वर्षी मला घुसण्याची संधी मिळाली हे पाहून बरेच जण अकारण अस्वस्थ झाले होते.

त्यामुळे माझी आणि माझ्यासारख्याच अन्य नवख्या मंडळींची कोंडी करण्यास अगदी पहिल्या दिवसापासून सुरुवात झाली होती. पण नार्वेकरसाहेबांना या सगळ्या गोष्टींची कल्पना होती. एक दिवस त्यांनी मला ऑफिसला बोलावून घेतले आणि मोठ्या प्रेमाने इतर बातमीदारांच्या वागण्याला भिऊ नकोस असा धीर दिला. आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे पहिले सहा महिने फक्त मंत्रालय आणि इतर राजकीय स्थितीचा अभ्यास कर असा सल्ला देत असताना आम्ही लगेचच तुझ्याकडून विशेष बातम्यांची अपेक्षा करत नाही, हेही स्पष्ट केले. त्याचा माझ्या संपूर्ण पत्रकारितेच्या पायाभरणीसाठी खूप मोठा फायदा झाला. आपला सहकारी मग तो लहान असो वा मोठा, हुशार असो वा बेपर्वा नार्वेकरसाहेब सगळ्यांची कुटुंबप्रमुखाच्या आस्थेने आणि प्रेमाने काळजी घेत. मला आठवते आमच्याबरोबरच्या एका सहकार्‍याचा मानसिक तोल गेल्यामुळे तो रोज ऑफिसला दांडी मारायचा. नार्वेकरसाहेबांनी दहा-बारा दिवस वाट पाहिली आणि एक दिवस ते थेट त्याच्या 50-60 किमी अंतरावरच्या घरी पोहोचले. त्यावेळी त्या सहकार्‍याच्या मानसिक अस्थिरतेची त्याच्या कुटुंबीयांना जाणीव झाली होती. त्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू झाले. नार्वेकरसाहेबांनी जर त्याकडे दुर्लक्ष केले असते तर काय झाले असते, याची आपण कल्पना न केलेलीच बरी. त्यांच्या मनाच्या मोठेपणामुळे फक्त संपादकीयच नाही तर जाहिरात, वितरण विभागापासून छपाई खात्यातील लोकांमध्येही ते लोकप्रिय होते.

गोरगरिबांच्या दुःखाने हळवे होणारे नार्वेकरसाहेब 'मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदू एैसे।' या तुकोबांच्या अभंगानुसार भ्रष्ट राजकारणी, भोंदू बुवा-बाबा, कामचोर नोकरशहांविरोधात लिहिताना कठोर होताना दिसायचे. मुंबईतील 1991-91च्या जातीय दंगलींविरोधात त्यांनी सलग तीन दिवस लिहिलेले अग्रलेख आजही डोळ्यांसमोर आहेत. त्यातील माणुसकीचा कैवार घेण्याची प्रामाणिक भावना माझ्यासारख्या अनेक पत्रकारांना प्रेरणा देणारी ठरली. आज अवघे जग आणि त्यासोबत प्रसारमाध्यमे वेगाने बदलत आहेत. बातमीदारापासून संपादकापर्यंतच्या सर्व स्तरांवरील लोकांच्या कामाचे स्वरूपही बदलले आहे. या बदलत्या काळात माणुसकीचे परिमाणही बदलत चाललेले आहेत. पण मी स्वतःला भाग्यवान समजतो, की माझ्या पत्रकारितेच्या आरंभीच्या काळात सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून पत्रकारिता करणारे नार्वेकरसाहेबांसारखे गुरू मला भेटले. त्यांच्यामुळे शिवाजी धुरींपासून एकनाथ ठाकूरांपर्यंत विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे प्रेम मला लाभले आणि त्याच्या बळावर पत्रकारितेतील वाटचाल सोपी आणि सुलभ झाली. म्हणून माझ्या आयुष्यात आई-वडिलांएवढेच नार्वेकरसाहेब वंदनीय आहेत.

Follow us on twitter : @MaheshMhatre

Follow @ibnlokmattv

First published: July 31, 2015, 7:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading