निमित्त पत्रकाराच्या पत्राचे...

निमित्त पत्रकाराच्या पत्राचे...

  • Share this:

mahesh_mhatre_ibnlokmat- महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत

"आज लक्ष्मण मोरे या तरुण पत्रकार मित्राचे पत्र आले आणि ते वाचता वाचता अपार वेदना आणि अमाप करुणा मनात दाटून आली. त्याचवेळी अपराधीपणाची भावना अवघ्या अस्तित्वाला अजगर विळखा घालून गेली."

"प्रिय,

महेश म्हात्रे सर

सप्रेम नमस्कार,

आपला कचरा वेचकांवर आधारित एकला चलो रे हा कार्यक्रम पाहिला. या कार्यक्रमात ज्या सुमन मोरेंसोबत बोललात ती माझी आई आहे. खूप कष्ट आणि अवहेलना झेलून तिने संसार उभा केला. आम्हाला शिकवले. कुठे जगण्याचा सोहळा साजरा होत असतो, तर कुठे जगण्याचा तिरस्कार वाटावा अशी स्थिती असते. जन्माला आलेला प्रत्येकजण आपापल्या परीने जगण्याचा अर्थ शोधत असतो. परंतु व्यवस्थेने आणि जन्माने ज्यांच्या जगण्यातला अर्थच हिरावून घेतलेला असतो त्यांनी काय शोधायचे हा मोठा प्रश्न आहे. पोटाची भूक आणि मुलाबाळांचं लेंढार पोसण्यासाठी काही हात कचरा शोधतात.

समतेची भाषा केवळ बोलण्यापुरती नसून आचरणातही आणावी लागते हे आजही समाजाला नीट समजलेले नाही. संत तुकारामांनी 'जे का रंजले गांजले... त्यासी म्हणे जो आपुले' या अभंगामधून देवत्वाची लक्षणे सांगितली. महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार केवळ बोलण्यापुरते मर्यादित राहिले. कष्टकर्‍यांच्या जीवनाच वास्तव आजही भयाण आहे. ना राहायला नीट घर ना समाजात सन्मानाचं स्थान. सतत अवहेलना आणि तिरस्कार सहन करणारी ही माणसंच आहेत याचा विसर पडत चालला आहे. एकीकडे आयटीपासून अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत देशाची प्रगती जोमात सुरू आहे. ही विकासाची प्रक्रिया आहे ती न थांबणारी आहे. पण या बदलत्या प्रक्रियेमध्ये कचरा वेचकांसारख्यांचं स्थान काय?

elka_woman_blog3माझी आई चार वेळा विदेशात जाऊन आली. तिथे श्रमाला असलेली प्रतिष्ठा आपल्या देशामध्ये कधी रुजणार हा प्रश्न आहे. माझ्यासारख्यांच्या आयुष्याचा पाया कचर्‍याने घातलेला आहे. कचरा वेचक कचरा वेचतो, भंगार गोळा करतो, कचरा पेट्यांमधून विक्रीयोग्य साहित्य बाहेर काढतो. त्यातून आपला उदरनिर्वाह चालवतो. एखाद्या व्यक्तीला लोकांनी फेकलेल्या उकिरड्यावर जीवन जगायला लागणे हा त्या व्यक्तीचा दोष आहे की समाजव्यवस्थेचा?

आपण कचरा वेचकांच्या समस्या आणि त्यांच्या जगण्यातली व्यथा मांडलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार सर. सुदैवाने अजूनही माध्यमांमधील लोकांच्या संवेदना जाग्या आहेत. आपल्या 'एकला चलो रे' या कार्यक्रमासाठी शुभेच्छा! मी एक पत्रकार आहे; त्याचा मला अभिमानही आहे. माझ्या आईच्या जीवनात कागदाचं महत्त्व मोठं आहे आणि माझ्याही फरक एवढाच आहे की माझ्या कागदावर काळी अक्षरं आहेत आणि आईचा कागद कोरा आहे. परंतु तिच्या कोर्‍या कागदावर कर्तृत्वाची छाप आहे. तीच आम्हा भावंडांच्या जगण्याची प्रेरणाही आहे.

आपला,

लक्ष्मण मोरे"

पत्रकारिता हा वसा म्हणून किंवा व्यवसाय म्हणून हाती घेण्यासाठी हल्ली खूप चढाओढ लागलेली दिसते. प्रवेश परीक्षा होतात, शैक्षणिक पात्रता काटेकोरपणे तपासली जाते. तुफान फीसुद्धा आकारली जाते. आमच्या काळात हे असे काही नव्हते.

मी तसा अपघाताने पत्रकारितेत आलो, त्यामुळे माझ्या वाट्याला हे पांढरपेशी फ्याड आले नाही. पण पत्रकारितेच्या 'जिवंत विद्यापीठां'मध्ये खरे जीवन शिक्षण मिळालं. आमचे 'मुंबई सकाळ' चे गुरुकुल फार वेगळे होते. जरी या थोर पत्रकारांना त्या काळातील माध्यमांमध्ये फार मोठे मानले जात नव्हते, पण मोठ्या पेपरामध्ये काम करणार्‍या तथाकथित नामवंत मंडळींपेक्षा आमचे 'मुंबई सकाळ'चे गुरुकुल फार श्रेष्ठ होते. त्यांची तडफ आणि हिंमत सह्याद्रीसारखी कणखर होती, मने आभाळासारखी मोठी होती. बातमीकडे फक्त बातमी म्हणून पाहू नका, ती घटना आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे असे माना आणि मग बातमी लिहा असे या मंडळींनी माझ्यासारख्या गावखेड्यातून आलेल्या नवख्या मुलांना हात धरून शिकवले.

elka_woman_blogमहानगरी मुंबईमध्ये आधार देऊन उभे केले आणि आमच्या नकळत आम्हाला सामाजिक प्रश्नांविषयी सजग आणि सक्रिय केले. आमचे अवघे संपादक मंडळ म्हणजे आपापल्या क्षेत्रात तेजाने तळपणारे नक्षत्रमंडळ होते, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. दांडगा जनसंपर्क आणि सामाजिक प्रश्नांची कळकळ असणारे मोकळ्या मनाचे राधाकृष्ण नार्वेकर साहेब, प्रचंड अभ्यास आणि तीव्र समाजभान असणारे मिलिंद गाडगीळ सर, शासन-प्रशासन आणि नव्या बदलांची जाण असणारे सोमनाथ पाटील सर, श्रमिक, शोषित, वंचित लोकांच्या विषयावर जीव ओतून आणि शब्द टोकदार करून लिहिणारे कविवर्य नारायण पेडणेकर, प्रेमाचा, स्नेहाचा अखंड निर्झर वाटावे असे दत्ताराम बारस्कर साहेब आणि उत्साह्मुर्ती, शब्दप्रभू नेवगी साहेब असे एकापेक्षा एक कर्तबगार मार्गदर्शक लाभणे हा संस्काराचा अक्षय ठेवा आहे. आजही अवचितपणे हे संस्कार मन:पटलावर दाटून येतात आणि प्रत्येक विषयाकडे बघण्याची वेगळी दृष्टी देतात.

elka_woman_blog2गेली 24 वर्षे पत्रकारिता करताना अनेक प्रसंग असे आले की जिथे माझे माणूसपण पणाला लागले होते. विशेषत: ऐन तिशी-बत्तिशीत संपादकपदाची जबाबदारी खांद्यावर आल्यानंतर मनाच्या संवेदना जाग्या ठेवून कार्यालयात किंवा बाहेर काम करण्याचा सराव आणि सवय कायम ठेवली. शेतकर्‍यांच्या आत्महत्या असतील किंवा आदिवासी बालकांचे कुपोषण, नक्षलवादी 'ठरवून' मारला गेलेला एखादा निरपराधी असेल किंवा एखाद्या भीषण अपघाताची बातमी हे सारे करताना मन आणि शब्द कोरडे ठेवणे कधी जमलेच नाही आणि गरज असेल त्यावेळी शब्दांचे कोरडे ओढणेसुद्धा थांबवले नाहीत.

पण आज लक्ष्मण मोरे या तरुण पत्रकार मित्राचे पत्र आले आणि ते वाचता वाचता अपार वेदना आणि अमाप करुणा मनात दाटून आली. त्याचवेळी अपराधीपणाची भावना अवघ्या अस्तित्वाला अजगर विळखा घालून गेली. "एकला चलो रे"च्या प्रवासात असे अनुभव पावलोपावली येतात, पण त्यामुळे प्रवास थांबवता येत नाही, तो नव्या अनुभवांच्या दिशेने जात असतो, आपल्याही नकळत...

Follow @ibnlokmattv

First published: July 21, 2015, 9:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading