S M L

गुढीपाडवा ! आनंद वाढवा... तरुणाई घडवा!

Samruddha Bhambure | Updated On: Mar 20, 2015 04:05 PM IST

गुढीपाडवा ! आनंद वाढवा... तरुणाई घडवा!

mahesh_mhatre_ibnlokmat- महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत

गुढीपाडवा, म्हणजे आपला नववर्ष दिवस. हल्ली या दिवसाला शोभायात्रांमुळे अगदी उत्सवी स्वरूप आलेले दिसते. अगदी हल्ली-हल्ली या नववर्ष स्वागत यात्रांचे आपल्याकडे फॅड आले आहे. त्यामुळे आजवर मोजक्या लोकांच्या घरी पारंपरिक पद्धतीने सुरू असलेला हा सण आता सार्वजनिक झाला आहे. आमच्या उत्साही तरुणाईला तसेही उत्सवांचे आकर्षण आणि त्याला जर धार्मिक, सामाजिक अधिष्ठान मिळत असेल तर मग काही बोलायलाच नको, तरुणाई त्यात सामील होणारच. यंदा या उत्सवाला जास्तच उधाण येईल, अशी चिन्हे दिसताहेत. आमचा दिग्विजयी राजा गौतमीपुत्र सातकण याच्या पराक्रमाचे स्मरण करण्यासाठी 1936 वर्षांपासून आम्ही चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारी कालगणना वापरत आहोत. श्रीशालिवाहन शक म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि मध्य प्रदेशातील लोकांमध्ये प्रसिद्ध असलेली ही कालगणना भारत सरकारने अधिकृतपणे भारतीय कॅलेंडर म्हणून मान्य केली आहे. एका पराक्रमी मराठी राजाच्या नावाचे जवळपास दोन हजार वर्षांनंतरही होत असलेले स्मरण जेवढे आनंददायी, तेवढाच मराठी लोकांना आपल्या राजाचा पडलेला विसरही वेदनादायी वाटतो. गणपतीच्या मिरवणुकीत, नवरात्रीतील दांडियात नाचणारी मराठी तरुणाई आता गुढीपाडव्याच्या शोभायात्रेतही तेच रंग उधळताना दिसते. त्यांनी शिवरायांप्रमाणे, शालिवाहन राजाचेही रूप आठवून पाहावे.

बदलते हवामान, वाढते तापमान आणि राजकीय मानापमान यामुळे सध्या सर्वसामान्य माणूस अक्षरश: संतप्त झालेला दिसतोय. गारपिटीने कंबरडे मोडलेला शेतकरी वर्ग असो वा, दररोजच्या जीवनसंघर्षाने वैतागलेला शहरी वर्ग, सगळेच त्रासलेले. त्यात भरीस भर म्हणजे बदलत्या नातेसंबंधांनी क्षीण होत चाललेली कुटुंबव्यवस्था आणि या कौटुंबिक चौकटीवर उगवणारे घर, नोकरी आणि तसेच काही महत्त्वाचे प्रश्न. घरोघरी दिसणार्‍या स्वार्थमूलक अंतर्विरोधाच्या विषवल्लीने रक्ताच्या नात्याला पाण्यापेक्षा पातळ करून टाकलंय.

आणि म्हणूनच ही सध्याची स्थिती बदलण्यासाठी तरुणाईची मानसिकता आणि जीवनशैली बदलण्याची गरज आहे. भारतीय समाजवृक्षाला हिरवे आत्मभान देणारी ही कोवळी तरुणाई भलेही नवी आहे. हिवाळ्या-पावसाळ्याची परिस्थिती भलेही तरुणाईने पाहिली नसेल. पण समाजवृक्षाचा जीवनरस लाभल्याने अनोख्या उंचीवर पोहोचलेल्या या पोपटी पानांकडे एक वेगळी दृष्टी आहे. या पालवीकडे स्वत:चे सळसळते अस्तित्व दाखवण्याची सहजता आहे. वृक्षांच्या अन्य फांद्या-पानांपेक्षा शेवटच्या टोकावरील पानांना जास्त विश्वदर्शन होत असते, हे आपण सारेच जाणतो. अगदी त्याच न्यायाने संगणक-इंटरनेट-मोबाईल या त्रिसूत्रीने ज्यांचे जगणे वेगळे बनले आहे, अशी तरुणाई वेगाने वाढत आहे. आपल्या मनातील भाव-भावना सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून मांडत आहे आणि त्यातून बदलही घडत आहेत. तरुणाई हे आमचे बलस्थान आहे. ती बिघडवून आम्हाला चालणार नाही. आज जर तुम्ही आपल्या शहरी भागात फिरलात तर प्रत्येक तीन लोकांमध्ये एक तरुण दिसेल. 2001 मध्ये शहरी तरुणांची लोकसंख्या 35 कोटी 30 लाख होती, ती 2011 मध्ये 43 कोटींवर पोहोचली आहे. 2020 मध्ये ती 47 कोटींवर जाईल. म्हणजे त्या वेळी देशातील काम करणार्‍या एकूण लोकसंख्येपैकी 64 टक्के लोक तरुण असतील. त्याच काळात चीन, जपानसारख्या देशातील काम करणार्‍यांचे हात लक्षणीयरीत्या कमी होणार आहेत.

Loading...

ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपण आपली शिक्षण-प्रशिक्षणाची समग्र यंत्रणा मजबूत करणे गरजेचे आहे. गेल्या वर्षाची आयआरआयएस नॉलेज फाऊंडेशनच्या वतीने शहरी तरुणाईच्या रोजगार आणि राहणीमानाच्या संदर्भात एक सर्वंकष अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये शहरी लोकसंख्येपैकी 20 टक्के तरुणाई दिवसाला 60 रुपयांपेक्षा कमी मोलात राबते, असे आढळले होते. उर्वरित तरुणांचे उत्पन्न ग्रामीण भागातील तरुणांपेक्षा जास्त भासत असले तरी शहरातील जीवनमान अधिक महागडे असल्याने शहरी तरुणाई आर्थिकदृष्ट्या कायम दुर्बल राहते. परिणामी ते काहीच बचत करू शकत नाहीत. चांगली वैद्यकीय किंवा शैक्षणिक सुविधा त्यांना परवडत नाही. या अहवालात शहरी भागातील तरुणींच्या आरोग्याची स्थिती किती दयनीय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. शहरी तरुण महिलांना पुरेसे अन्न आणि पोषक आहार मिळत नसल्यामुळे 50 टक्क्यांहून अधिक तरुण ऍनिमिक आहेत तसेच अजूनही गरोदरपणात होणारे मृत्यू हे शहरातील तरुणींच्या अकाली मृत्यूमागील महत्त्वाचे कारण आहे. एकूणच काय तर देशातील वाढत्या शहरीकरणामुळे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि व्यक्तिगत समीकरणे बदलत आहेत. त्यात आधुनिक माहिती-तंत्रज्ञान, संपर्क आणि दळणवळणाच्या साधनांनी गावा-माणसांमधील अंतर एकदम कमी केले आहे. पण त्याचबरोबर गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी मोठ्या प्रमाणात वाढवण्यास हेच बदल कारणीभूत होताना दिसत आहेत. हे मन अस्वस्थ करणारे वास्तव राजकीय सभांमधून भाषणे करणार्‍या बड्या नेत्यांपासून न फेसबुकवर वटवट करणार्‍या रिकामटेकड्या विचारवंतांपर्यंत कोणालाच खटकत नाही, हे आपले सगळ्यात मोठे दुदैर्व आहे. म्हणूनच असेल कदाचित या अशा बिकट काळात आमचा शालिवाहन राजा आठवतो. त्या घराण्याला सातवाहन म्हणूनही ओळखले जाते.

मराठीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा आद्यग्रंथ गाथासप्तशती ही या राजघराण्याने मराठीला दिलेली सगळ्यात मोठी भेट. आपण मराठी माणसे ज्याच्या नावाने कालगणना करतो, तो शालिवाहन राजा कोण होता, हे देखील आपल्याला ठाऊक नसते. पण तरीही शालिवाहन शकाच्या वर्षारंभी, गुढीपाडव्याला शोभायात्रेत आपण मोठ्या उत्साहाने सामील होतो. नाचतो, मिरवतो, गोड-धोड खातो आणि पुन्हा सगळे विसरून जातो. सध्याचा काळ पाहता आपण शालिवाहन राजा कोण होता, प्रचलित काळात त्याचा पराक्रम आठवणे का गरजेचे आहे. त्यांचे कार्य लक्षात घेण्याची आणि कायम स्मरणात ठेवण्याची वेळ आली आहे. गौतमीपुत्र सातकर्ण हे या शालिवाहन राजाचे नाव. खूप पराक्रमी, अगदी 1936 वर्षांपूर्वीचा शिवाजी राजाच. महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक आणि मध्य भारतात त्याने साम्राज्य विस्तार केला होता. आज मराठी म्हणून प्रचलित असलेल्या प्राकृतचा या सार्‍या सातवाहन राजांना खूप अभिमान. ख्रिस्तपूर्व दुसर्‍या शतकात पुष्पमित्र शुंग आणि पहिला सातकर्ण सातवाहन राजा यांनी एकत्रितपणे परदेशी आक्रमक मीनँडर, ऊर्फ मिलिंद राजाला देशाबाहेर हुसकावले होते. दुसर्‍या सातकर्णनेही माळव्यात घुसून शकांचा पाडाव केला होता. ज्याच्या नावाने आपण भारतीय अधिकृतपणे आपली कालगणना करतो तो गौतमीपुत्र सातकर्ण तर सगळ्यात प्रभावशाली होता.

त्याच्या काळात राजधानी प्रतिष्ठान म्हणजे आजची पैठण नगरी युरोप, आखाती देशांशी जोडलेली होती. भारतीय कपडे, दागिने, कलाकुसरीच्या वस्तू, मसाल्याचे पदार्थ जगभर पोहोचले, ते याच काळामध्ये. इतिहासकार रा. श्री. मोरवंचीकर, ज्यांनी गौतमीपुत्र आणि संपूर्ण सातवाहन घराण्याचा अभ्यास केला आहे. त्यांच्या मते, शालिवाहन हे महाराष्ट्राच्या सलग इतिहासातील पहिले पराक्रमी घराणे आणि गौतमीपुत्र हा त्या घराण्यातील सगळ्यात शूर राजा. त्याच्याच काळात संस्कृतपेक्षा प्राकृत, म्हणजे मराठीला पहिल्यांदा राजाश्रय मिळाला होता.

गौतमीपुत्र राजाच्या संदर्भात अनेक दंतकथा प्रचलित आहेत. त्यातील एक दंतकथा खूप सूचक आहे. या राजाने गुजरातमध्ये जाऊन सौराष्ट्रातील शहरात राजांचा उच्छेद केला होता. एकदा त्याच्यावर शत्रू सैन्याने आकस्मिकपणे हल्ला केला. तेव्हा या राजाने मातीचे घोडदळ आणि सैनिक तयार केले आणि त्या सैनिकांमध्ये प्राण फुंकून त्यांना जिवंत केले आणि आक्रमकांच्या सैन्याचा नि:पात केला. प्रत्येक दंतकथेत सत्याचा थोडाफार अंश असतो, असे इतिहासतज्ज्ञ म्हणतात. गौतमीपुत्राच्या या दंतकथेत मला त्याने मातीच्या गोळ्याप्रमाणे अचेतन असलेल्या तत्कालीन समाजाला लढण्यास प्रवृत्त केले असावे, असा अर्थ लागतो. सामान्य माणसाला त्याने तलवार हाती घेऊन पराक्रम करण्याची शिकवण दिली म्हणून ही दंतकथा लोकांमध्ये पसरली. विशेष म्हणजे आज जवळपास दोन हजार वर्षांनंतरही आपण तिची चर्चा करत आहोत, त्या कथेतील मतितार्थ लक्षात घेऊन. आज गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आपण सारे आपल्या लोकशाहीत प्राण फुंकण्याची प्रतिज्ञा करू या. तसे सगळ्यांनी केले तर भारतात सुवर्णयुग येणे अशक्य नाही.

(पूर्वप्रकाशित)

Follow us on – @MaheshMhatre

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 20, 2015 11:42 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close