एवढ्या जगात माय मानतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी

  • Share this:

mahesh_mhatre_ibnlokmat- महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत

‘मराठी भाषा दिन’ आपण दरवर्षी २७ फेब्रुवारीला ‘साजरा’ करतो. त्यानिमित्ताने गावोगावी, शाळा-महाविद्यालयात ‘माय मराठी’चे गोडवे गायिले जातात. वृत्तपत्रात राजकीय घडामोडी किंवा आर्थिक उलाढालींऐवजी मराठीच्या भवितव्याविषयी ‘चिंता’ करणारे लेख प्रसिद्ध होतात आणि दुसर्‍याच दिवशी, २८ फेब्रुवारीपासून आमचा आमच्या मातृभाषेबद्दलचा कळवळा आटून जातो. दररोजच्या व्यवहारात इंग्रजी वा हिंदीचा झटून वापर करण्यात आपण गुंतून पडतो. पुढील २७ फेब्रुवारी येईपर्यंत.. गेली कित्येक वर्षे हाच क्रम अगदी न चुकता सुरू आहे. कविवर्य कुसुमाग्रज, ज्यांनी मराठी भाषा जीर्ण वस्त्रांनिशी मंत्रालयाच्या दारात उभी असल्याचे चित्र मांडले होते. त्यांच्या त्या भेदक, वास्तव सिद्ध करणार्‍या शब्दचित्राने तमाम मराठीवर्ग अस्वस्थ झाला होता. आजही होतो. त्या कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, २७ फेब्रुवारी, हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा होतो. कुसुमाग्रजांनी मराठी साहित्याला नवे आत्मभान दिले होते. त्यामुळे या दिवशी जगातील १० कोटींहून अधिक मराठी लोकांनी आपली भाषिक अस्मिता जागवावी, हा या दिवशी होणार्‍या कार्यक्रमांचा उद्देश असू शकतो; परंतु उत्सवी मानसिकता असणार्‍या आम्हा मर्‍हाटी लोकांनी, या दिवसालाही एका कार्यक्रमापुरते मर्यादित करून टाकले आहे. ज्या भाषिक समूहातील नवी पिढी आपल्या मातृभाषेपासून तुटत आहे, जी भाषा महाविद्यालयातून तंत्र आणि यंत्र शिक्षणाच्या सर्व व्यवहारांमधून बाद होत आहे, जी भाषा आपल्या रोजगाराच्या चांगल्या पर्यायांसाठी उपयुक्त नाही आणि सगळ्यात दु:खदायक म्हणजे ज्या भाषेतून व्यवहार केल्याने आपल्याला सन्मान लाभत नाही, ती भाषा वेगाने नाकारली जाते. हे आजवर फारसी, संस्कृत, उर्दूसारख्या एकेकाळी देशव्यापी असणार्‍या भाषांच्या पतनाने, निधनाने आपण पाहिले आहे, अनुभवले आहे. अगदी तशीच स्थिती मराठीची होईल, असे मी लहान असल्यापासून वाचत आलो आहे, ऐकत आलो आहे. पण मराठीचे मरण थांबवण्याऐवजी ते जवळ आणण्याचे जे सार्वत्रिक प्रयत्न सुरू असलेले दिसतात, ते पाहून तमाम मराठी लोकांच्या दांभिकपणाची कीव करावीशी वाटते. आमचे राज्य सरकारसुद्धा त्यात सहभागी आहे, ही तर त्याहून धक्कादायक बाब.

marathi_blog_bannerकोणत्याही भाषेचा आधार त्या भाषिक समूहातील बालके असतात. त्यांच्या बोबडया बोलांनी भाषेच्या वटवृक्षाला नित्य नवी पालवी फुटत असते. त्यांच्या शालेय शिक्षणातील बडबडगीतांची लक्ष-लक्ष पाखरे जेव्हा किलबिलाट करतात तेव्हा अवघे जग सहजपणे त्या भाषावृक्षाकडे कौतुकाने पाहते. तुम्ही हल्लीच्या बहुतांश लहान मुलांना पाहा. ती गावातील असो वा शहरातील, श्रीमंत असो वा गरीब घरातील त्यांची ओढ असते इंग्रजी भाषा शिक्षणाकडे. त्यांच्या पालकांचा विश्वासच मराठीने गमावलाय; मग, या नव्या पिढीला मराठी आपली कशी वाटेल? आमच्या तरुणाईचीही तीच गत. साधे आपल्या मित्र वा मैत्रिणीविषयीचे प्रेम व्यक्त करायलाही आम्हाला इंग्रजीच्या ‘आय लव्ह यू’ या शब्दांचा आधार घ्यावा लागतो. मग लग्न, नोकरी आणि सगळा संसारही या इंग्रजीच्याच साथीने सोयीचा होत असेल, तर लोक ‘माय मराठी’चा विचारच कसा करतील, याकडे कुणालाच लक्ष द्यावेसे वाटत नाही. पुढे त्यावर उपाययोजना करणे तर दूरच. आमच्या राज्यात मराठी ही जशी नावाला राजभाषा आहे, त्याचप्रमाणे तमाम मराठी लोकांच्या वागण्या-बोलण्यावरून ती नावासाठी मातृभाषा असावी, असे वाटते. खेडय़ातला, कमी शिकलेला माणूस जसा मराठीत खातो-पितो, चालतो-बोलतो, जगतो आणि मरतोही, तशी स्थिती शिकलेल्या लोकांची नाही. ते बहुसंख्याक आहेत. त्यांच्या रस्त्यावरील, बाजारातील संभाषणात हिंदी ‘मौसी’ वारंवार तोंड उघडताना दिसेल, तर कार्यालय वा बडया लोकांशी होणा-या संवादात इंग्रजी ‘आण्टी’चा प्रभाव जाणवतो.

ज्येष्ठ समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांनी देश स्वतंत्र होण्याच्या काळात केलेल्या भाषणात भाषा, भूषा (पेहराव) आणि भोजन यावर खूप समर्पक चिंतन केले होते. इंग्रजांच्या प्रभावाखाली गेलेल्या सुशिक्षित मध्यमवर्गाने स्वातंत्र्यापूर्वीच इंग्रजांच्या या तिन्ही गोष्टी आत्मसात केल्या होत्या. स्वातंत्र्यानंतर भारतीय समाज जीवनावर या मध्यमवर्गाचा पगडा वाढला. परिणामी अन्य नवशिक्षित वर्ग या उच्चभ्रू लोकांचे अनुकरण करू लागला. आज तर ती प्रक्रिया खूप वेगाने सुरू आहे. त्यामुळे भाषा जेवढी बदलली तेवढयाच प्रमाणावर वेशभूषा आणि भोजनाचे पदार्थही बदलले, रोज बदलत आहेत; पण, या सगळ्या बदलांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न एकाही विद्यापीठामध्ये होताना दिसत नाही. अन्य नावाजलेल्या संस्थांना ‘त्या’ विषयांमध्ये रस नाही. फार दूर कशाला जायचे, ५० वर्षापूर्वी झुणका-भाकर हा पदार्थ थोडयाफार फरकाने बहुतांश मराठी घरात होत असे. आता तो चुलीबरोबर घराबाहेर पडलेला असल्यामुळे तो खाण्याचे प्रमाण एकदम कमी झाले आहे, पण आश्चर्य म्हणजे त्याचबरोबर या पदार्थाला कधी नव्हती एवढी प्रतिष्ठा प्राप्त झालेली दिसते. मध्यंतरी एका श्रीमंत उद्योगपतीच्या मुलीचे मराठी मुलाबरोबर लग्न झाले. त्या आलिशान लग्नमंडपात, पुरणपोळीच्या आधीचे स्थान झुणका-भाकर पटकावून बसलेली दिसली. विशेष म्हणजे मुलीच्या आई-वडिलांनी ‘आम्ही जेवणात झुणका-भाकर आवर्जून ठेवलेली आहे. तुम्ही अवश्य चव घ्या!’ असा आग्रहही केला. खरं सांगायचे तर आमंत्रणपत्रिकेपासून तर स्वागत समारंभापर्यंतचा सगळा व्यवहार इंग्रजीत होता आणि त्या संपूर्ण कार्यक्रमात मराठीचे स्थान चवीपुरतेच, म्हणजे झुणका-भाकरीएवढेच मर्यादित होते. हे जेव्हा लक्षात आले तेव्हा तिथली पुरणपोळीही कडू वाटायला लागली होती.

marath_blogमराठी साहित्य संमेलन असो वा अन्य कोणताही मातृभाषाविषयक कार्यक्रम, सगळीकडे आपल्याला आपले हे करंटेपण जाणवते आणि खटकते. खासकरून नवतंत्रज्ञानाच्या युगात आम्ही आमच्या भाषेकडे जे दुर्लक्ष केले, आजही करतोय त्याला तोड नाही. आमच्या ज्ञानोबा माऊलींनी, चक्रधर स्वामींनी तेराव्या शतकापासून मराठी भाषेला उर्जितावस्थेला आणण्याचे प्रयत्न केले, ते छत्रपती शिवबा राजांनी सतराव्या शतकात शासनमान्य केले; म्हणून, मराठी टिकली. पण आज आमच्या महाराष्ट्र देशीचे ‘ज्ञानवंत’ इंग्रजीला फितूर झालेले आहेत.

संगणक, इंटरनेट आणि भ्रमणध्वनीच्या समग्र वापरात मराठीला स्थान मिळू नये, असा या आधुनिक ज्ञानवंतांनी ठरवून ‘प्रयत्न’ केला. त्यामुळेच मराठीचे दूर असलेले मरण जवळ येत आहे. मराठी या नवतंत्रज्ञानाला सहजपणे कवेत घेऊ शकते. त्यासाठी खास प्रयत्न झाले पाहिजेत.

आपण ते करू शकतो, तुकोबांची वाणी, भवानी तलवारीचे पाणी आणि माय मराठीची गाणी, तुम्ही-आम्ही मिळून आपल्या छातीचा कोट करून जपू शकतो. मराठीच्या मारेक-यांवर ‘प्रहार’ करून आमच्या ‘अमृताशी पैजा जिंकणा-या’ मायबोलीला नव्या युगात नेऊ शकतो. त्यासाठी मराठीच्या नावाने रडणा-या नव्हे, तर लढणा-या तरुणांची गरज आहे.. चला! आपण मराठीपण जपण्याचा, मराठी म्हणून जगण्याचा आणि मराठी भाषा जोपासण्याचा निर्धार करूया!

(पूर्वप्रकाशित)

Follow us on – @MaheshMhatre

Follow @ibnlokmattv

First published: February 27, 2015, 10:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading