S M L

मायबोलीला श्रीमंत करणारा अमृतपुत्र

Sachin Salve | Updated On: Feb 25, 2015 06:07 PM IST

मायबोलीला श्रीमंत करणारा अमृतपुत्र

mahesh_mhatre_ibnlokmat - महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत

संतांची परंपरा लाभलेली, शतकानुशतके सुरू असलेल्या प्रवासात भेटलेल्या अनेक भाषांना आपलेसे करत विकसित झालेली आणि आधुनिक युगातही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या १० भाषांत स्थान पटकावणारी अशी ‘माझी बोली मराठीया’. आज मराठी भाषा दिन.. मराठीच्या सेवेला वाहून घेणार्‍या कुसुमाग्रजांचा जन्मदिनच मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. एखाद्या भाषेतील साहित्यिकाच्या जन्मदिनी त्या भाषेचा उत्सव साजरा व्हावा, असे हे जगभरातील एकमेव उदाहरण असावे. आपल्या माय मराठीला स्वप्रतिभेच्या बळावर उत्तुंग शिखरावर पोहोचवणारे कुसुमाग्रज या मायबोलीचे अमृतपुत्र ठरले आहेत. या कविश्रेष्ठाला मानाचा मुजरा केला आहे, महेश म्हात्रे यांनी. 

कविवर्य कुसुमाग्रज सुप्रसिद्ध कवी आणि समीक्षक डॉ. रमेश वरखेडे यांच्यासमवेत

कविवर्य कुसुमाग्रज सुप्रसिद्ध कवी आणि समीक्षक डॉ. रमेश वरखेडे यांच्यासमवेत

शब्दांमधून कधी अंगार फुलवणार्‍या तर कधी लक्ष-लक्ष फुलांचे ताटवे उमलवणार्‍या कवींची प्रतिभा म्हणजे मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील सगळय़ात महत्त्वाची मजल. जेव्हा शब्दब्रह्म प्रकटले नव्हते, तेव्हा आदिमानवाला गुहेतील शिल्पचित्रांमध्ये भेटलेली ही प्रतिभाशक्ती जसजशी व्यक्त होत गेली तसतसा माणूस अभिव्यक्त होत गेला. त्याच्या या अभिव्यक्तीला आरंभी नृत्याने, सामूहिक ओरडण्याने झालेली सुरुवात कवितेसारख्या प्रतिभा विलासापर्यंत पोहोचली तेव्हा खर्‍या अर्थाने मानवाला माणूसपण लाभले, हे आम्ही नेहमी विसरतो. त्यामुळे आमच्या समाजात कवितेला आणि तिच्या निर्मात्याला म्हणावा तसा मान दिला जात नाही आणि अशा नैराश्यपूर्ण पार्श्वभूमीवर मराठी कवितेला समाजभान देणार्‍या कवी कुलगुरू कुसुमाग्रज यांची जयंती ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरी होणे ही घटना अवघ्या जगातील कवी कुळासाठी आश्वासक ठरते.

मराठी सारस्वतात स्वातंत्र्यपूर्व काळातील नवशिक्षित वर्गाने कवितेचे नव-नवे प्रवाह आणले होते. त्यामुळे पारंपरिक नागरी अभिजनवर्गाच्या अवकाशात अडकलेली मराठी कविता थोडीफार विस्तारू लागली होती. त्या काळात १९३३ मध्ये विष्णू वामन शिरवाडकर या तरुण कवीने काव्यप्रांतात पाऊल टाकले. ‘कुसुमाग्रज’ या नावाने कविता लिहिणार्‍या या कवीला खरे तर पत्रकार-संपादक व्हायचे होते; परंतु प्रतिभेच्या पंखावर स्वार होऊन सर्वकाळ आणि सर्व दिशा धुंडाळण्याचे असीम बळ असणार्‍या या कवीचे मन वर्तमानपत्रांच्या कचेरीत रमले नाही. हे एका अर्थाने बरे झाले.

कुसुमाग्रजांचे जीवनलहरी, विशाखा, किनारा, मराठीमाती, स्वगत, हिमरेषा असे ६ काव्यसंग्रह आणि समिधा हा गद्यकाव्य संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ‘हिमरेषा’ प्रसिद्ध झाल्यानंतरही ते विविध साप्ताहिकांत, मासिकांत कविता लिहीत होते; परंतु हे सगळे करीत असताना कुसुमाग्रजांच्या मनातील जनसामान्यांविषयीची कणव त्यांच्या प्रत्यक्ष वर्तनातून प्रकटत होती. समाजाने नाकारलेल्या दलित-आदिवासींच्या झोपडीत ज्ञानाचा दिवा लागावा यासाठी कुसुमाग्रज तन-मन-धनाने झटताना दिसायचे. त्यांच्या नाशिकमधील घरामध्ये साहित्य-संगीतासोबत गोरगरिबांच्या सर्वकष उत्थानाविषयी चर्चासत्रं झडायची आणि त्यामधून नवनवीन सामाजिक कार्याला प्रेरणा मिळायची. कुणी कुसुमाग्रजांच्या घरी गेला आणि नव्या विचारांनी प्रेरित होऊन आला नाही, असे कधीच होत नसे. कुसुमाग्रजांना लोक प्रेमाने तात्यासाहेब म्हणायचे. त्यांचे नाशिकमधील घर म्हणजे अनेकांसाठी हक्काचे ठिकाण बनले होते. गावखेडय़ातील होतकरू कवी असोत वा कुसुमाग्रजांच्या लिखाणाने वा भाषणाने प्रभावीत झालेला एखादा तरुण, सरकारी नोकरीत रमलेला एखादा उच्चपदस्थ वा कवितेवर प्रेम करणारा राजकारणी सगळय़ांशी ते समानतेने आणि सहजतेने वागायचे. त्यात अभिनिवेश नसायचा किंवा उसना आव आणलेला नसायचा. त्यामुळे तात्यासाहेबांच्या कवितेप्रमाणे त्यांच्या संपर्कात आलेला माणूस पूर्णपणे ‘त्यांचा’ होऊन जात असे. भारतात नव्हे जगात असे फार थोडे साहित्यिक होऊन गेले आहेत, की ज्यांनी जसे लिहिले तसे वर्तन केले. कुसुमाग्रज त्या अगदी मोजक्या लोकांपैकी होत. त्यामुळे आपल्या लिहिण्याने आणि जगण्याने मायभाषेची उंची वाढवणार्‍या कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या दिवशी मराठी भाषेचा उत्सव होणे, ही त्यांना वाहिलेली खरी आदरांजली आहे.

कुसुमाग्रज यांची कविता मराठी भाषेचे लेणे बनली त्याला अनेक कारणे आहेत. त्याचा ऊहापोह करताना ‘रसयात्रा’ या कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांच्या पुस्तकांच्या आरंभीच कविवर्य बा.भ. बोरकर आणि शंकर वैद्य लिहितात, ‘गेली ४० वर्षे कुसुमाग्रज मोठय़ा निष्ठेने काव्यनिर्मिती करत आहेत. सत्य, शिव, सौंदर्य यांचे अधिष्ठान असणार्‍या नंदनवनाची उपासना करणार्‍या मराठी रोमँटिक संप्रदायाचे ते आजचे सर्वश्रेष्ठ प्रतिनिधी आहेत. केशवसुतांचा क्रांतिकारक आवेश, गोविंदाग्रजांची उत्कटता, बालकवींचे निसर्गप्रेम आणि माधव ज्युलियन यांचा स्वप्नाळूपणा त्यांच्या कवितेत जोमाने बहरलेला दिसतो. सर्वागीण सामाजिक क्रांती, राजकीय घडामोडी आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य यांच्या विस्तृत संदर्भाकडे पाठ न फिरवता वैयक्तिक सुख-दु:खांची अतिशय हळुवार जोपासना करू पाहणार्‍या तरुण मनाची ही कविता जणू स्वतंत्र भारताची प्रातिनिधिक कविता आहे. तिची सात्त्विकता आणि भव्यता कायमची टवटवीत आहे.’

आजही जेव्हा अवघा भारतीय समाज संक्रमणावस्थेतून जात आहे. मानवी मूल्यांची घसरण होत असताना यंत्राधारित जगणे अपरिहार्य होत चालले आहे. राजकीय आणि सामाजिक संघर्षात माणसाच्या भावभावनांची हेळसांड होत आहे. सांस्कृतिक संदर्भ तर राजकारणासाठी निमित्तापुरते उरले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्हाला आज पुन्हा ‘कुसुमाग्रजांची कविता गरजेची वाटते. आमच्या धर्मामध्ये जुन्या काळात लिहिलेल्या कथा-काव्यादी ग्रंथांची पारायणे करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. तशी आधुनिक काळात ‘प्रथा’ सुरू करायची असेल तर पहिला मान कविवर्य कुसुमाग्रजांच्या साहित्याला द्यावा लागेल. कुसुमाग्रजांच्या सगळ्या कवितांमध्ये अग्रस्थानी असेल ‘गर्जा जय जयकार क्रांतीचा..’ होय, अवघ्या जगातील क्रांतिगीते समोर ठेवली तरी कुसुमाग्रजांच्या या कवितेच्या तोडीचे एकही गीत मिळणार नाही. भूगर्भातील अवघा लाव्हारस गोळा करून कविवर्यानी त्यातून एक-एक शब्द ओतून बनवलेला आहे. त्यामुळे आपल्या मातृभूमीच्या मुक्तीसाठी सर्वस्वाचा होम करायला उद्युक्त झालेल्या क्रांतिकारकांची मनोभूमिका कविता वाचणार्‍यांच्या मनावर एखाद्या तत्पमुद्रेप्रमाणे उमटते,

कशास आई, भिजविसी डोळे उजळ तुझे भाळ

रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल

सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते

उठतिल त्या ज्वालांतून भावी क्रांतीचे नेते.

कुसुमाग्रजांच्या प्रेषिततुल्य वाणीतून उमटलेले हे क्रांतिसुक्त आजही तेवढेच महत्त्वाचे ठरते. देशाला जुलमी इंग्रजांच्या पारतंत्र्यातून स्वतंत्र करण्यासाठी लिहिलेली ती कविता आजही कोटय़वधी भारतीयांना मानसिक, राजकीय आणि सांस्कृतिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रेरणादायी वाटते. क्रांतीचे गीत गाताना शब्दांना आगीची झळाळी देणारे कुसुमाग्रज ‘आगगाडी व जमीन’ हा ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ यांच्यातील वर्गसंघर्ष रेखाटताना आक्रमक झालेले कुसुमाग्रज ‘वर्षागमन’ लिहिताना

सजल श्याम घन गर्जत आले। बरसत आज तुषार।

आता जीवनमय संसार

असे म्हणतात आणि आपल्याही मनात आनंदाचे तुषार उडवून जातात. ‘आला किनारा’ म्हणताना कवीच्या आशेला आवेशपूर्ण भरती येते. ‘तमाला जणू अग्नीचा ये फुलोरा’ म्हणणारे कुसुमाग्रज लखलखून समोर येतात. ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ किंवा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ लिहिताना कुसुमाग्रजांची कविता भावभावनांच्या हिंदोळय़ावर झुलत असते. मध्येच रौद्रभीषण तांडवाचे दर्शन घडवत असतानाच ‘अद्याप विराणी कुणी वा-यावर गात’ असे सांगून हृदयात विलापाची आर्त कळ उसवून टाकते. तर कधी त्यांच्या शब्दांतून ‘उत्तररात्री’चे वर्णन करताना

घन तमी शुक्र बघ राज्य करी

रे! खिन्न मना बघ जरा तरी

अशा लोकविलक्षण ओळी आकारास येतात आणि रसिकमन त्या शब्दोत्सवाने थरारून उठते. कुसुमाग्रजांच्या कवितेचे हेच वैशिष्टय़ आहे की, ती सगळय़ा ठरावीक साच्यातील, ढाच्यातील कवितेपेक्षा वेगळी आहे. अशा या जगावेगळय़ा मराठी भाषेत जन्म घेतला आणि आपल्या मायबोलीची महती वाढवली, त्या कविवर्य कुसुमाग्रजांना त्यांच्याच शब्दांतून शब्दांजली..

शब्द- जीवनाची अपत्ये-

मृत्यूपर्यंत पोहोचत नाहीत

म्हणून तुझ्या समाधीवर

मी वाहत आहे

माझे मौन.

कविवर्य कुसुमाग्रज यांना दुर्गम आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबद्दल खूप प्रेम. त्यामुळे या खेडय़ापाडय़ांतील शाळांमध्ये काम करणार्‍या लोकांबद्दल त्यांच्या मनात खूप आस्था असे. त्याच भावनेतून १९८७ मध्ये कुसुमाग्रजांनी ठाणे जिल्ह्यातील वाडा येथे येण्याचे डॉ. रमेश वरखेडे यांचे निमंत्रण

भाषणानंतर कुसुमाग्रज व्यासपीठावरून खाली उतरत असताना सातवीतील राजू या आदिवासी विद्यार्थ्यांने त्यांच्यासाठी आणलेली गवताने विणलेली टोपी त्यांना दिली. त्याच्या कलाकुसरीचे शब्दाने कौतुक करीत असताना कविवर्यानी ती टोपी सहजपणे आपल्या डोक्यावर चढवली आणि ते उद्गारले, ‘अरे, ही टोपी तर माझ्या डोक्यापेक्षा लहान आहे.’ त्यांच्या त्या मिश्कील उद्गारांनी हास्याचा कल्लोळ उसळला होता. त्यात सहभागी झालेले राजू आणि महेश म्हात्रे.

भाषणानंतर कुसुमाग्रज व्यासपीठावरून खाली उतरत असताना सातवीतील राजू या आदिवासी विद्यार्थ्यांने त्यांच्यासाठी आणलेली गवताने विणलेली टोपी त्यांना दिली. त्याच्या कलाकुसरीचे शब्दाने कौतुक करीत असताना कविवर्यानी ती टोपी सहजपणे आपल्या डोक्यावर चढवली आणि ते उद्गारले, ‘अरे, ही टोपी तर माझ्या डोक्यापेक्षा लहान आहे.’ त्यांच्या त्या मिश्कील उद्गारांनी हास्याचा कल्लोळ उसळला होता. त्यात सहभागी झालेले राजू आणि महेश म्हात्रे.

स्वीकारले होते. ‘अनुष्टूभ’च्या माध्यमातून कवी-समीक्षक म्हणून प्रसिद्ध होण्यापूर्वी विद्यार्थीदशेतच  वरखेडे सरांचा कुसुमाग्रजांशी परिचय झाला होता. त्यामुळे आदिवासी भागातील महाविद्यालयात काम करायचे ठरवून आलेल्या प्राचार्य वरखेडे सरांनी ‘शारदोत्सवा’च्या माध्यमातून नामवंत कवी, लेखकांना निमंत्रित करण्याचे ठरवल्यानंतर साहजिकच पहिले नाव आले कुसुमाग्रजांचे.

कुसुमाग्रजांनी आमच्या महाविद्यालयात येण्याचे मान्य केल्यामुळे मराठी वाङ्मय शिकणा-या आम्हा विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वारे सळसळले. मी त्यावेळी आमच्या कॉलेजच्या ‘तरंग’ या हस्तलिखित साप्ताहिकाचा संपादक होतो. त्यामुळे आम्ही तात्यासाहेब शिरवाडकरांच्या एकूण साहित्याचा आढावा घेणारा विशेषांक काढण्याचे ठरवले. वरखेडे सरांनी माझ्या त्या उत्साहाकडे पाहून ‘‘कुसुमाग्रजांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तूच कर’’ असे सांगून मला आणखी प्रोत्साहन दिले; पण पुढे कसोटी होती कुसुमाग्रज कवी म्हणून, वि. वा. शिरवाडकर नाटककार म्हणून आणि तात्यासाहेब माणूस म्हणून समजून घेण्याची. पहिल्या चार-आठ दिवसांतच मी हतबल झालो आणि दुर्मुखल्या चेह-याने वरखेडे सरांपुढे जाऊन उभा राहिलो. सरांना स्पष्टपणे सांगितले, ‘मला कुसुमाग्रज समजत नाहीत.’ ते खळाळून हसले, ‘त्यात काय कठीण आहे, तुला जे वाटेल, जसे वाटेल तसे बोल.’ मी जमेल तसे कुसुमाग्रज वाचत गेलो. कार्यक्रमाच्या आदल्या दिवसापर्यंत त्यांच्यातील वेगळेपण पुस्तकांमधून माझ्यात साचत होते, माझ्या नकळत.

आणि १२ जानेवारी १९८७ चा तो दिवस औत्सुक्याची पहाट घेऊन उगवला. आम्ही आमच्या कल्पनेप्रमाणे व्यासपीठ सजवले होते. जंगलातील फुलांचे गुच्छ, आंबांच्या डहाळी, फुलझाडांच्या कुंडय़ा आणि आकर्षक मडक्यांची आरास असा थाट केला होता. माझ्यासकट सगळ्याच मित्रांसाठी तो पहिला कार्यक्रम होता, त्यामुळे सगळाच आनंद..

तात्यासाहेब येणार म्हणून गावातील मान्यवर प्रतिष्ठित मंडळीसुद्धा कार्यक्रमाला आली होती. मोठय़ा पटांगणावर हजारभर विद्यार्थ्यांसमोर तात्यासाहेब ‘रणरागिणी झाशीची राणी आणि तिचे कर्तृत्व’ या विषयावर बोलणार होते. सगळ्या वातावरणाला एक मंगलमय उत्सवाची झालर होती. आजवर आमच्या स्वामी विवेकानंद शाळा-महाविद्यालयात एवढा मोठा कार्यक्रम झाला नव्हता. त्यामुळे माझ्यावरही एक प्रकारचे दडपण आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मी मोठय़ा हिंमतीने कुसुमाग्रजांच्या कवितेच्या चार ओळी म्हणालो. श्रोत्यांनी टाळ्या वाजवल्या; पण माझी नजर तात्यासाहेबांकडे होती. सस्मित नजरेने ते माझ्याकडे बघत होते. त्यांच्या डोळ्यांतील कौतुकाने मला चांगलाच धीर मिळाला. मी बोलत गेलो.. प्रत्येक वक्त्याच्या भाषणापूर्वी मी काहीतरी बोलून कार्यक्रम रंगवण्याची धडपड करत होतो. तात्यासाहेबांना भाषण करण्यास पाचारण करायला मी उभा राहिलो होतो, तेवढय़ात व्यासपीठाजवळ शोभेसाठी उभारलेली मातीच्या घडांची आरास हवेच्या झोताने कोसळली. त्याचा आवाज झाल्यामुळे स्टेजजवळ बसलेल्या मुलांच्या रांगांमध्ये गोंधळ उडाला. त्या अनपेक्षित घटनेने मुख्याध्यापक सु. पा. कुलकर्णी, वरखेडे सर आणि खुद्द तात्यासाहेबसुद्धा थोडे अस्वस्थ झाले. गुरव सरांच्या एका शिटीच्या इशार्‍याने मुलांचा गोंधळ शांत झाला होता; पण मी आता काय बोलावे या विचारात पडलो होतो. तरीही सगळे अवसान गोळा करून म्हणालो, ‘आज कविवर्य कुसुमाग्रज आपल्या या आडवळणाच्या गावात आले आहेत. त्यामुळे येथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आनंद झालाय; पण तात्यांसाहेबांच्या काव्य प्रतिभेने आपल्या या आदिवासी भागातील दर्‍या-खोर्‍यांत मुक्तविहार करणार्‍या वार्‍यालाही आपल्याकडे आकर्षित केले आहे. त्या वार्‍याची ही जी झुळूक आली होती ती आपला आनंद दर्शवणारी होती’ माझे ते वाक्य संपते न संपते तोच टाळ्यांचा जोरदार गजर झाला.. हस-या डोळ्यांनी तात्यासाहेब माझ्याकडे बघत होते.. ते भाषणाला उभे राहिले नाहीत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे खूर्चीवर बसूनच बोलले. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी माझे तोंडभरून कौतुक केले आणि राणी लक्ष्मीबाई आणि एकंदर सशस्त्र क्रांतीचा काळ आम्हा विद्यार्थ्यांच्या डोळ्यांसमोर उभा केला. त्यांचे भाषण संपता-संपता उन्हे कलत आली होती. अवघ्या आसमंतावर सोनपिवळी छटा पसरली होती. जणू काही तात्यासाहेबांच्या शब्दांचा आम्हा लोकांच्या विश्वाला परिसस्पर्श झाला होता.

कार्यक्रम संपल्यानंतर वरखेडे सरांनी तात्यासाहेबांना कार्यालयात आणण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली. मी त्यांच्याजवळ गेलो, त्यांना लवून नमस्कार केला. पाठीवरून प्रेमभराने हात फिरवत त्यांनी मला जवळ घेतले, म्हणाले, ‘मला वाटलं होतं, पुण्या-मुंबईकडील मुलेच भाषणात हुशार असतात. तुझ्याकडे पाहून कळलं, आपली आदिवासी भागातील मुलेही काही कमी नाहीत.’ त्यांच्या त्या शब्दांनी मनात आत्मविश्वासाची ज्योत जागवली होती. तात्यासाहेब माझा हात हातात घेऊन चालत होते. दोन्ही बाजूने विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. खरे तर मी सुद्धा त्याच गर्दीतला, त्यांच्यासारखाच एक.. पण साक्षात शारदेच्या पुत्राने माझा हात हातात घेतला होता.. तात्यासाहेबांच्या त्या परिसस्पर्शानेच माझ्या जीवनात अक्षरप्रेम फुलले असावे..

 (पूर्वप्रकाशित)

Follow us on – @MaheshMhatre

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 27, 2015 07:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close