लढाई दिल्लीची

लढाई दिल्लीची

  • Share this:

rajendra hunje IBN Lokmat- राजेंद्र हुंजे, न्यूज एडिटर, आयबीएन लोकमत

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात दिल्लीत मतदान होतंय. 7 फेब्रुवारीला मतदान आणि 10 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. गेल्यावेळी जशी परिस्थिती आहे, साधारण तशीच परिस्थिती याही निवडणुकांच्या प्रचारादरम्यान पाहायला मिळू शकते.

दिल्लीच्या निवडणूक मैदानात तीन प्रमुख पक्षांमध्ये थेट सामना होताना दिसतोय. आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेस. प्रत्येकानं आपली जोरदार ताकद या निवडणुकीसाठी लावली आहे. देशभरातल्या सर्व कार्यकर्त्यांना 'आप'नं दिल्लीत पाचारण केलंय तर भाजपनं आपले सर्व खासदार आणि मंत्र्यांना निवडणुकीतच्या मैदानात उतरवलंय. दिल्ली महापालिका निवडणुकीत जसं भाजपला यश मिळवून देण्यासाठी संघाच्या केडरनं मोठी भूमिका बजावली होती; किंबहुना सर्वच निवडणुकांमध्ये भाजप यशापर्यंत कसं पोहोचेल, यासाठी संघ जोरदार मेहनत घेताना दिसतंय. त्याचा फायदा याही वेळी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला होईल, अशी स्थिती आहे.

bedhadak20दिल्लीची ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे, तर आम आदमी पार्टीसाठी अस्तित्वाची ठरणार आहे. भाजपनं अभिनंदन रॅलीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा घेऊन निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच दिल्लीच्या निवडणूक प्रचाराचं रणशिंग फुकलं होतं तर तिकडे अरविंद केजरीवाल हे पंतप्रधानांवर वेगवेगळे आरोप करत प्रचारात सक्रिय होण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. दिल्ली निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही प्रचारसभांमध्ये भाग घेऊन लोकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे अस्वस्थ झालेले अरविंद केजरीवाल हे आपण त्यांच्याच विरोधात निवडणूक लढवत असल्याचं वातावरण निर्माण करत आहेत.

इथल्या निवडणुकीचा इतिहास पाहिला तर आतापर्यंत भाजप आणि काँग्रेस हेच एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. पण गेल्या निवडणुकीपासून इथं तिरंगी लढती पाहायला मिळू लागल्या. त्यामुळे इथली निवडणूक चुरशीची बनत चालली आहे. दिल्लीतली ही निवडणूक आता पूर्वीसारखी राहिली नाही, त्यामुळे प्रत्येक पक्ष वेगवेगळी रणनीती आखताना दिसतोय. आम आदमी पार्टी आपली पूर्ण ताकद इथं पणाला लावताना दिसतेय तर भाजप वेगळीच रणनीती आखून सत्ता आपल्याकडे कशी खेचून आणता येईल, याची तयारी करताना दिसतेय. कारण दिल्लीतलं राजकारण आता पूर्वीसारखं द्विपक्षीय धोरणांवर चालणारं राहिलेलं नाही. इथली राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलेली आहे.

लोकसभा निवडणुकीत जसा सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला, तसाच वापर याही निवडणुकीत होणार यात काहीच शंका नाही. प्रत्येक पक्ष त्याची जोरदार तयारी करतोय. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचू शकू, याचाही विचार या निवडणुकीत होतोय. भाजपचे कार्यकर्ते आता प्रत्येकाच्या घरी पोहोचून मतदारांना आकर्षित करताहेत. त्यांच्याबरोबरीनं आम आदमी पार्टीनं तशीच तयारी केली आहे. विशेष म्हणजे भाजपनं त्यांच्या उमेदवारांना फेसबुक आणि ट्विटरचा वापर अत्यावश्यक असल्याच्या सूचना दिल्या आहेत. एवढंच नाही तर ट्विटरवर त्या उमेदवाराचे किमान 50 हजार फॉलोअर्स असायला हवेत, असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे.

सोशल मीडियाच्या बरोबरीनंच एफएम रेडिओचाही जाहिरातीसाठी मोठा वापर केला जातोय. एफएम रेडिओवर जाहिरातीच्या माध्यमातून प्रत्येक पक्ष एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करताना दिसतोय. एखाद्या पक्षाची जाहिरात रेडिओवर लागली आणि ती जाहिरात संपली की लगेच विरोधी पक्षाची जाहिरात लागते आणि यापूर्वीच्या पक्षानं कशी खोटी आश्वासनं दिली आहेत, हे त्या जाहिरातीतून सांगण्याचा प्रयत्न केला जातो. अशाप्रकारे मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जाताहेत. पण रेडिओच्या या रंजक जाहिरातींमुळे मात्र मतदारांचं मोठं मनोरंजन होतंय हेही तितकंच खरं! पण अशा जाहिरातीतून प्रत्येक राजकीय पक्ष एकमेकांना टार्गेट करण्याची एकही संधी सोडत नाही.

प्रचाराच्या रणनीतीसाठी अशी सगळी आयुधं वापरली जाताहेत. पण यावेळच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसचा एकही ताकदीचा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात नाही. नव्या चेहर्‍याला पुढं करतच हे दोन्ही पक्ष निवडणुकीचा सामना करताना दिसत आहेत. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षातले ज्येष्ठ नेते जे आतापर्यंत दिल्ली राजकीय पटलावर कायम वावरताना दिसत होते, तेच चेहरे या निवडणुकीत कुठं गायब झालेत? असा प्रश्न पडतो. काँग्रेसच्याच बाबतीत सांगायचं झालं तर 15 वर्षं दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दीक्षित, गेल्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सक्रिय राजकारणापासून दूर झाल्या. दरम्यानच्या काळात त्या केरळच्या राज्यपाल होत्या. राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या दिल्लीत परतल्या आहेत. कदाचित आता यावेळी त्या काँग्रेसच्या प्रचारासाठी पुन्हा मैदानात उतरू शकतात. गेल्या निवडणुकीत भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार डॉ. हर्ष वर्धन आणि विजय गोएल हे लोकसभा निवडणुकीतल्या विजयानंतर केंद्राच्या राजकारणात व्यस्त आहेत. या निवडणुकीत काँग्रेसकडे, ना भाजपकडे (पंतप्रधान नरेंद्र मोदी सोडून) असा कुठलाही चेहरा नाही की, ज्या जोरावर मतदार त्यांना मतं देतील. आम आदमी पार्टी तर अरविंद केजरीवाल यांच्या भरवशावर पुढची वाटचाल करते आहे. या निवडणुकीत भाजपचा थेट सामना तसा आम आदमी पार्टीशीच आहे. दिल्ली निवडणुकीच्या प्रचाराची धुरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांभाळलेली दिसतेय. तर सत्ता काबीज करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी वेगळीच व्यूहरचना केलेली आहे.

delhi electionगेल्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराचा आणि जनलोकपालाचा मुद्दा मोठा केला होता. त्यानुसार सगळ्याच पक्षांनी त्यावर प्रचारात जोर दिलेला दिसला. पण यावेळी हा मुद्दा बदललेला दिसतोय. भ्रष्टाचाराचा मुद्दा जाऊन ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यांभोवती फिरताना दिसतेय. या निवडणुकीत आतापर्यंतच्या प्रचारात अरविंद केजरीवाल यांना जनलोकपाल या त्यांच्याच मुद्द्याचा विसर पडलेला दिसतोय. याच मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्री असताना रान उठवलेलं होतं आणि त्यावरूनच त्यांचं सरकार कोसळलं. गेल्यावेळी जनतेनं आम आदमी पक्षावर विश्वास टाकला होता. पण सत्तेत जाऊनही त्यांना सत्ता सांभाळता आली नाही, म्हणून यावेळी आपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांना आमच्याकडून चूक झाली, ती यापुढे करणार नाही असं आश्वासन देत आहेत. तर भाजप विकासाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जाताना दिसतेय.

दिल्लीतली विधानसभेची ही निवडणूक सर्व पक्षांसाठी केवळ अस्तित्वाची लढाई नाही तर बहुमताच्या जोरावर सत्ता कशी हस्तगत करता येईल, यासाठी या निवडणुकीत जोरदार संघर्ष होताना दिसतोय. केंद्रात ज्याप्रकारे आपल्याला बहुमत मिळालं, तसंच यश दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळेल असा भाजप नेत्यांना विश्‍वास आहे. पण आम आदमी पार्टीचे नेतेही पाच वर्षं दिल्लीकरांची सेवा करण्यासाठी मतदार आपल्याला बहुमत देतील अशी आशा बाळगून आहेत. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाला बंडखोरीचा फटका बसणार आहेच. पक्षांतर्गत विरोधकांना थोपवून ठेवणं हे सर्व पक्षांपुढे मोठं आव्हान असणार आहे. गेल्या निवडणुकीपासून ते आताच्या निवडणुकीपर्यंत काँग्रेस या बंडखोरी आणि अंतर्गत धुसफुसीच्या समस्येतून बाहेर आलेली नाही. भाजपमध्ये काही प्रमाणात कुरबुरी आहेत, पण त्यांना मोठा बसण्याची शक्यता मात्र धुसर आहे. आम आदमी पार्टीच्या बाबत जर विचार सुरू केला तर गेल्या निवडणुकीपासूनच त्यांच्यामागे हे बंडखोरीचं शुक्लकाष्ठ लागलेलं आहे.

आतापर्यंत जेवढी चर्चा आपण भाजप आणि आम आदमी पार्टीबद्दल केली, तेवढीही चर्चा काँग्रेसच्या वाट्याला येत नाही. त्यावरूनच लक्षात येतं की, काँग्रेसचं स्थान इथं किती डळमळीत झालं आहे. दिल्लीची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असेल, जिथे काँग्रेसचं कुठंच प्राबल्य दिसून येत नाही. पंधरा वर्षं दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार्‍या शीला दीक्षित यांच्यानंतर दिल्लीत काँग्रेसकडं नेतृत्वच उरलं नाही; किंबहुना त्या तोडीचा नेताच काँग्रेसमध्ये दिसून येत नाही. काँग्रेसच्या दुसर्‍या फळीतले नेते हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्पर्धेत कुठंच टिकत नाहीत तर आम आदमी पार्टीचीही अवस्था काही वेगळी नाही. अरविंद केजरीवाल सोडले तर त्यांच्याकडेही नेतृत्वाची वाणवाच आहे. दिल्लीतली विधानसभा निवडणूक ही काँग्रेसच्या दुसर्‍या फळीतल्या नेत्यांसाठी एकप्रकारची लिटमस टेस्टच आहे. यात ते यशस्वी झाले तर ठीक, नाहीतर काँग्रेसची दिल्लीतली ताकद आणखी क्षीण होताना दिसेल. दरम्यान काही निवडणूकपूर्व चाचण्यांचे निष्कर्ष पाहिले तर गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसचं संख्याबळ आणखीनच घटेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे एकेकाळी सलग पंधरा वर्षं दिल्लीवर शीला दीक्षितांच्या नेतृत्वाखाली राज्य करणारी काँग्रेस आता नवं नेतृत्व मिळत नाही म्हणून अस्तित्वाची लढाई लढतेय.

मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर किरण बेदी यांनी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करून आपल्या कारकीर्दीतलं एक नवं संक्रमण केलं आहे. त्यांच्यापाठोपाठ आम आदमी पार्टीच्या माजी नेत्या शाझिया इल्मी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आणि अभिनेत्री जयाप्रदा याही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल हे किरण बेदी आणि शाझिया इल्मींच्या आरोपांना प्रचारात कसं उत्तर देतात, हे पाहणंही मोठं रंजक असणार आहे. ही निवडणूक भाजपसाठी सहजसोपी अशी अजिबात नाही. किरण बेदी या दिल्ली भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार असू शकतात, असंही म्हटलं जात आहे. एवढं असूनही बहुमताचा आकडा पार करण्यासाठी भाजपला कसून मेहनत घ्यावी लागणार आहे. पण किरण बेदींसारख्या चेहर्‍याचा त्यांना किती फायदा होतो, हे देखील पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.

@RajendraHunje

Follow @ibnlokmattv

First published: January 21, 2015, 11:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading