नवे वर्ष, नवे संकल्प !

Sachin Salve | Updated On: Dec 31, 2014 06:12 PM IST

नवे वर्ष, नवे संकल्प !

mahesh_mhatre_ibnlokmat- महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत

२०१४ संपून २०१५ चा प्रारंभ होत आहे. एकविसाव्या शतकातले हे अत्यंत महत्वाचे वर्ष होते. ते संपून दुसर्‍या वर्षात प्रवेश करताना मनात उमटणारा प्रश्न असा की, आपण या शतकाच्या पूर्वार्धात आपण  काय मिळवले आहे. याचे उत्तर शोधताना असे लक्षात येते की, जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न बघणार्‍या आपल्या देशाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. यासाठी आजच्या तरुणांनी आपापल्या आवडीच्या क्षेत्रांत स्वत:ला गाडून तपश्चर्येला सुरुवात केली पाहिजे. नव्या वर्षात अन्य कुठलाही संकल्प न सोडता, आपण जे काही काम करतो, त्यात आम्ही निष्ठेने आणि प्रामाणिकपणे केले पाहिजे. आम्ही आमच्या कामात चांगले प्रावीण्य, यश मिळवण्याचा निर्धार केला तरच भारताचे भवितव्य उज्ज्वल बनेल.

new_year3‘काळ’ हा मानवी जीवन व्यवहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. म्हणूनच असेल कदाचित मानवी इतिहासाला आकार देणार्‍या महापुरुषांच्या नावाने ‘कालखंड’ मोजण्याची पद्धत पडली असावी. ज्यांच्या पराक्रमाने अवघ्या समाजाला आधार मिळाला त्यांच्या नावाने येणारी वर्षे ओळखली जातात. आपल्याकडे नववर्षदिन म्हणून साजरा केला जाणारा गुढीपाडवा हा प्रभू श्रीराम यांनी रावणाचा पराभव करून अयोध्येत मोठ्या थाटात आगमन केले होते, त्या दिवसाची आठवण आहे. अगदी त्याच पद्धतीने येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस २५ डिसेंबरच्या पाठोपाठ एक जानेवारी रोजी सुरू होणारे नवे वर्ष ‘ख्रिस्ताब्द’ म्हणूनच ओळखले जाते. येशू ख्रिस्तांनी ज्या रोमन साम्राज्याच्या सर्वव्यापी सत्तेला आव्हान दिले, त्या काळात पारंपरिक दिनदर्शिका प्रचलित होती. तिला रोमन धर्मसंकल्पनेचा आधार होता. पुढे ‘ज्युलियन’ दिनदर्शिका सर्वत्र प्रचलित झाली. अगदी सोळाव्या शतकापर्यंत, वेगवेगळ्या देशात ज्युलियन दिनदर्शिकेचा आधार घेऊन लोकांचे व्यवहार होत होते, मात्र कॅथलिक धर्मगुरू पोप ग्रेगरी तेरावे यांनी आधीच्या दिनदर्शिकेतील अतिरिक्त ११ दिवस कमी करून नवीन ‘ग्रेगरियन कॅलेंडर’ आणले. वास्तविक पाहता त्यांचा हा निर्णय खूप धाडसी होता. युरोपातील मोजक्या कॅथलिक देशांशिवाय त्यांना कुणाचाच पाठिंबा नव्हता. त्यांनी कॅथलिक धर्ममतानुसार त्यांनी १५८२ मध्ये तयार केलेल्या दिनदर्शिकेत पहिल्या वर्षी विशेष बदल केले नव्हते. त्यात आणि ज्युलियन कॅलेंडरमध्ये फारसा फरक नसला तरी धार्मिक कट्टरतेमुळे प्रोटेस्टंट आणि इतर ख्रिश्चन पंथीयांनीसुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले होते, परंतु ग्रेगरियन दिनदर्शिका तयार करताना आधीच्या पंचांगातील घोळ संपवण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यामुळे आधीच्या कॅलेंडरमधील जास्तीचे दिवस कमी करून ग्रेगरी ‘बुल’ यांनी सोयीची आणि सुटसुटीत रचना केली. परिणामी ही दिनदर्शिका लोकप्रिय बनत गेली, आजही ती पोप ग्रेगरी यांच्याच नावाने ओळखली जाते, त्यामुळे जागतिकीकरणामुळे जवळ आलेले अवघे जग आज नववर्षाच्या स्वागतासाठी सिद्ध होत असताना पोप ग्रेगरी तेरावे यांचे स्मरण होणे साहजिक आणि स्वाभाविक आहे. अर्थात, हा वैश्विक परिणाम ‘स्वीकारून’ नाकारणार्‍या  कर्मठाचा या नववर्षाच्या स्वागताला नेहमीच विरोध असतो, तसाच विरोध ते ‘व्हॅलेंटाइन डे’लासुद्धा करताना दिसतात. परंतु जातीय अहंकाराच्या पायावर आधारित असलेला हा प्रतिकार स्वकीयांच्या पाठबळावाचून दुबळा ठरतो आणि म्हणूनच हास्यास्पदही होतो, तो भाग अलाहिदा.

विश्वाच्या इतिहासात शतकांना महत्त्व असते. पण माणसाच्या जीवनात वर्षे महत्त्वाची असतात. त्यासाठी वाढदिवस करण्याची वा मोठ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर पुण्यतिथी-जयंती साजरी करण्याची पद्धत पडली आहे. शासकीय योजनांमध्ये पंचवर्षीय आणि साहित्य-संस्कृतीच्या क्षेत्रात दशकांना महत्त्व असते. पण लोकविलक्षण ध्येय गाठण्यासाठी निश्चय करणा-या महामानवांच्या कर्तृत्वाला तपश्चर्या म्हणतात. ते जे ‘तप’ करतात,  आपण मात्र या शतकातील दुसर्‍या  तपामध्ये आपल्या भारतवर्षाला यशोमंदिराकडे नेण्याचा व्रतसिद्ध निर्धार केला पाहिजे, कारण एक तपापूर्वी जेव्हा भारत एकविसाव्या शतकात पाऊल टाकण्यासाठी अधीर होता, त्यावेळी अवघे जग आपल्या देशाकडे मोठ्या आशेने पाहत होते. एकविसावे शतक हे ज्ञानाधारित अर्थसत्तेचे शतक असेल आणि त्या ज्ञानाधारित अर्थसत्तांमध्ये भारत आणि चीन या दोन देशांचा प्रामुख्याने समावेश असेल, असे ‘भविष्यवेधी’ लोक उच्चरवाने बोलत होते, पण आज एकविसाव्या शतकाचे एक तप उलटल्यानंतर भारताचे जागतिक बाजारपेठेतील आणि सत्ताकेंद्रातील स्थान अपेक्षेप्रमाणे उंचावलेले दिसत नाही. भारतातील वाढती लोकसंख्या, देश आणि जागतिक पातळीवर चिंतेचा आणि चिंतनाचा विषय बनली आहे. आमच्या अर्थचक्राला म्हणावी तशी गती मिळत नसल्याने गरिबी आणि बेकारी वाढत आहे. परिणामी गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार समाजाच्या सर्वच क्षेत्रांत फोफावतोय, त्यामुळे अवघा भारत अस्वस्थ आणि अशांत बनला आहे. जरा कुठे काही दुर्घटना घडली तर आंदोलनाचे उद्रेक होतात, अवघा आसमंत आक्रोशाने व्यापला जातो. हे काही प्रगत समाजाचे लक्षण नाही, पण तसे आपल्याकडे आज हरघडीला घडते आहे, अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत. ते रोखण्यासाठी तत्कालिक उपाय योजून काहीच फायदा होणार नाही. त्यासाठी गरज आहे विवेकनिष्ठ आणि लोकशाही मानणार्‍या समाजनिर्मितीची. कोणत्याही प्रसंगी पराकाष्ठेचा विवेक बाळगणारा, आपल्या स्वातंत्र्याइतकेच दुस-यांच्या स्वातंत्र्याचे मोल जाणणारा आणि सर्वागीण विकासाचा पुरस्कार करणारा वर्गविहीन समाज निर्माण करण्याचे स्वप्न गांधी-नेहरू यांनी पाहिले होते. त्यासाठी वैचारिक पायाभरणी करण्याची भक्कम कामगिरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभृतींनी केली. नेहरू-पटेल पर्वात भारताच्या एकसंध कर्तृत्वाला धुमारे फुटले होते. म्हणून जागतिक पातळीवर भारताला आदर प्राप्त झाला होता.

दुर्दैवाने आज तशी स्थिती पहायला मिळत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताकडे उपयुक्त बाजारपेठ म्हणूनच पाहिले जाते. त्याउलट आपल्या मागे असलेल्या चीनने गेल्या तीन दशकांत घेतलेली झेप विचार करायला लावणारी आहे. साधारणत: नऊ वर्षापूर्वी ‘एमआयटी टेक्नॉलॉजी रिव्ह्यू’मध्ये नामवंत अर्थतज्ज्ञ लेस्टर थुरॉ यांची एक मुलाखत प्रसिद्ध झाली होती. आपल्या मुलाखतीत प्रा. थुरॉ यांनी ‘मेसेज टू इंडिया : ग्लोबलाइज ऑर टू बी लेफ्ट बिहाईंड’ असा सणसणीत इशाराच दिला होता, ते म्हणाले होते, ‘भारताच्या तुलनेत चीनने ३० पट जास्त परदेशी गुंतवणूक मिळवलेली आहे, धंद्यासाठी उत्तम देश म्हणून स्वत:ची जाहिरात कशी करावी, हे चीनला चांगले कळलेले आहे, म्हणून मोठ्या कंपन्या तिकडे जातात. भारताला हे अजून उमगलेले नाही, हे पूर्णसत्य आहे.’ ते पुढे म्हणाले, ‘भारतीय शाळांच्या तुलनेत चीनमधील शाळांत शिकणा-यांची संख्या जास्त आहे. भारतातील शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेले राज्य चीनमधील सर्वात मागास राज्यापेक्षा कमी प्रतीचे असते,’ यावरून आपण चीनपेक्षा किती मागे आहोत हे स्पष्ट होते. सहा-आठ महिन्यांपूर्वी चीनने जपानला मागे टाकून जगातील दुसर्‍या क्रमांकाची अर्थसत्ता बनण्याचा मान पटकावला, परंतु त्या घटनेचा त्यांनी अजिबात गाजावाजा केला नाही. आपल्याकडे आजही प्राथमिक आरोग्य आणि शिक्षणाच्या बाबतीत प्रचंड अनास्था आहे. तरीही आमच्या देशातील काही अतिविद्वान लोक सर्वसामान्य जनतेला भारत आता जागतिक महासत्ता बनणार अशी स्वप्ने दाखवतात, त्यावेळी हसावे की रडावे, असा प्रश्न पडतो. त्यामुळे असेल कदाचित आपल्याकडील सुशिक्षित लोकही या दिवास्वप्नातच वावरत असतात. आम्हाला ‘मेरा भारत महान’ असे वाटणे चांगले आहे. परंतु तो जर खरोखरच ‘महान’ असेल तर तशा वाटण्याला काय अर्थ उरत नाही. म्हणून यावेळी तत्त्वज्ञानी राष्ट्रपती ए. पी. जे. कलाम यांचे शब्द आठवतात, ‘तरुणांनो, राष्ट्राने मला काय दिले, यापेक्षा मी माझ्या देशासाठी काय केले, याचा विचार करा,’ असे कलामसाहेबांनी सांगण्यामागे तरुणांना कार्यप्रवृत्त करण्याचा हेतू होता. कलाम म्हणतात, ‘२०२० पर्यंत भारत ख-या अर्थाने विकसित देश होईल, हे स्वप्न नाही. ते लक्ष्य आपण सर्वानी जीवनध्येय बनवलं तर त्याआधीच भारतविकासाचे स्वप्न प्रत्यक्षात येईल.’

आज जगात जे प्रगत देश आहेत, त्या प्रगत देशांमधील सर्वागीण विकासामागे अनेक पिढ्यांचे वेगवेगळ्या पातळीवरील योगदान आहे. देश आणि समाजाच्या विकासासाठी कार्यक्रम आखणार्‍या मोठ्या लोकांची नावे सगळ्यांना ठाऊक असतात, परंतु त्या मोठ्या मंडळींनी कागदावर आखलेल्या योजना प्रत्यक्षात उतरवणा-या लोकांची नावे अज्ञातच राहतात. मग भले तो एखादा कुशल कारागीर असेल किंवा कसबी कामगार. त्याचे नाव लोकांपर्यंत जात नाही. अर्थात, त्यामुळे त्याने देशविकासासाठी केलेले काम वाया जात नाही. त्या माणसांच्या कष्टातून उभ्या राहिलेल्या इमारतीत लोकांची कामे होतात. शेकडो कामगारांच्या घावाने आणि घामाने रेल्वे रूळ सरळ होतात आणि मग हजारो चाकरमान्यांना खांद्यावर घेणारी लोकल धावू लागते. काम करणारे हात पुढील आव्हानांशी ‘दोन हात’ करण्यासाठी निघून जातात. अगदी महत्त्वाचे निर्णय घेणारे पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री यांच्याबाबतीतही असेच घडते, परंतु संवेदना असलेला समाज त्या कर्तृत्ववान व्यक्तींचा आदर्श समोर ठेवून वाटचाल करण्याचा प्रयत्न करत असतो. त्या आदर्शातून त्याला काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा मिळते आणि साहजिकच त्याचा देशाला फायदा होतो.

कादंबरीकार चार्ल्स डिकन्स यांनी फार सुंदर लिहिले आहे. ते म्हणतात, ‘हे विश्व म्हणजे स्वप्न नाही. ते प्रत्यक्षात अस्तित्वात आहे. मुख्य म्हणजे आपण सारे त्याचा मुख्य भाग आहोत, त्यामुळे आपण सतत सज्ज आणि कार्यतत्पर असले पाहिजे. चला या तुमच्या विश्वात या, भलेही ते विश्व छोटे असेल वा मोठे.’ थोडक्यात सांगायचे तर आपण आपल्या भोवतीचे जग सुखी आणि समृद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी फार मोठ्या योजनांची किंवा मोहिमांची गरज नाही. ज्याप्रमाणे जगातील सर्वात उंच असणार्‍या एव्हरेस्टवर चढाईची सुरुवात पहिल्या पावलाने होते. ते पहिले पाऊल लोकांना अगदी सहजसोपे वाटते, परंतु एव्हरेस्टवर चढाई करणे, ही कल्पनासुद्धा सामान्य माणूस करू शकत नाही. त्यामुळे देश वा समाजबदलाचा विचार करताना आम्ही, पहिले पाऊल टाकणे आवश्यक असते. एव्हरेस्ट गाठण्याचा विचार नंतर येऊ शकतो. अगदी साध्या-साध्या गोष्टींमधून बदलाची ही प्रक्रिया सुरू असते. जेव्हा एखाद्या बालकाला जीवनाच्या विविध टप्प्यांवर पालकांकडून चांगले शिक्षण आणि शिकवण मिळते, तेव्हा तो देशाचा जबाबदार नागरिक बनतो. ज्ञान आणि अनुभव समृद्ध शिक्षक असतील तर नैतिकतेचे संस्कार असलेली तरुणाई आकाराला येते. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा कुशल कर्मचा-यांच्या गटाला योग्य तंत्रज्ञानाची जोड लाभते त्यावेळी चांगला बदल आणि अपेक्षित यश मिळणार यात शंकाच नसते. जेव्हा एखाद्या संस्थेतील प्रमुख वा संघटनेचा नेता आपल्या सहका-यांना काम करण्याचा, निर्णय घेण्याचा आणि धोका पत्करण्याचा अधिकार देतो, त्यावेळी नवे नेतृत्व घडण्याची प्रक्रिया सुरू असते. समाजाच्या सर्व स्तरावर काम करणा-या या नेतृत्वाच्या जोरावरच देशाची प्रगती होते. जेव्हा महिलांना समान अधिकार आणि सन्मान दिला जातो, त्यावेळी त्या समाजाची प्रगती वेगात होते. राजकीय नेते, सत्ताधारी लोक जेव्हा विविध योजना आणि लोककल्याणकारी कार्यक्रमांमधून सर्वसामान्य नागरिकांना समर्थ करण्याचा, सक्षम बनवण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी देशाचे भविष्य उज्ज्वल आहे, हे सांगायला कुणा तज्ज्ञांची गरज नसते.

blog_new_yearभारताच्या एकूण सद्य:स्थितीचा विचार केला तर आज आमच्या तरुण देशाला आणि राज्याला यंदा  दमदार नेतृत्वाची साथ लाभली आहे. आम्हाला असे  नेतृत्व हवे होते जे समाजाच्या विकासाचा कार्यक्रम ठरवताना सामान्य माणसांचा प्रथम विचार करेल. ‘सबसिडी’च्या शिडीवर चढून जगण्याची चटक लागलेल्या भारतीय लोकांना या नव्या  नेतृत्वाने स्वकर्तृत्वाची सवय लावावी. अनुदान, सवलतींच्या कुबड्या काढून घ्याव्यात आणि आमच्यातील दुर्बल घटकांना ज्ञानाचा-श्रमाचा ‘पाया’ किती महत्त्वाचा असतो, ते पटवून द्यावे. ही आज काळाची गरज बनली आहे. राज्यघटना तयार करताना आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाने समाजातील मागासलेल्यांचे मागासपण दूर व्हावे यासाठी राखीव जागांची खास तरतूद केली होती, ते आरक्षण सुशिक्षित, सक्षम लोकांचे ‘रक्षण’ करण्यासाठी नव्हते, पण केवळ जन्म त्या वर्गात झाला म्हणून आजही अनेक बड्या घरातील मुले आरक्षणाची सवलत राजरोसपणे भक्षण करताना दिसतात, आपल्या कृतीद्वारे आपण आपल्याच समाजातील एका खरोखर मागे असलेल्या तरुणाचा अधिकार हिरावून घेतो आहे, याचे त्यांना भान नसते किंवा त्याची जाण नसते. हे कुठे तरी थांबले पाहिजे, परंतु ते थांबणे दूरच. आता सगळ्याच प्रगत आणि बडय़ा जातींमध्ये स्वत:ला ‘मागास’ ठरवण्याची स्पर्धा लागली आहे. बदलत्या भारताचे हे बदलते चित्र अस्वस्थ करणारे आहे. एकीकडे भारताच्या विकासाची भाषा करायची आणि दुसरीकडे मागासलेपणाचे सोंग आणायचे हा सगळा विरोधाभास मन अस्वस्थ करणारा आहे, मन उद्विग्न करणारा आहे. ज्या देशातील बहुतांश लोक काही मोजक्या सवलतींसाठी स्वत:ला मागासलेले ठरवण्यास तयार आहेत. तो देश जागतिक महासत्ता कसा बनेल? त्याला जगाची सत्ता नाही, लत्ता मिळेल.. यात कोणताच संदेह नाही.

new_year_blogआमच्या देशातील तरुण वर्गाने या सार्‍या गोष्टीचा विचार केला पाहिजे. कारण आपला देश आपल्यालाच मोठा करावा लागणार आहे. आपल्या भारतीय समाजाची प्रगती आपल्या तरुणांच्याच बुलंद बाहुबळावर होणार आहे. मेणबत्त्या हातात घेऊन निदर्शने करणारे किंवा उंची कपडे घालून प्रदर्शन करणारे तरुण ज्या क्षणी आपापल्या आवडीच्या क्षेत्रांत स्वत:ला गाडून घेतील, अभ्यास, संशोधन, याचा निधीद्यास घेऊन कामात मग्न होतील, त्याक्षणी भारताच्या समृद्धीच्या आशा पल्लवीत होतील. नव्या वर्षात अन्य कुठलाही संकल्प न सोडता, आपण जे काही काम करतो, त्यात चांगले प्रावीण्य, यश मिळवण्याचा निर्धार करू या. त्यात प्रामाणिक योगदान  देऊ या. . पाहा, मग देशाचा विकास किती वेगात सुरू होईल.. नव्या वर्षाच्या या नव्या संकल्पाला  मन:पूर्वक शुभेच्छा!

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 31, 2014 06:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close