फ्लॅशबॅक 2014 : आता उरल्या आठवणी...(भाग १)

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 25, 2014 10:10 PM IST

फ्लॅशबॅक 2014 : आता उरल्या आठवणी...(भाग १)

[wzslider]

 गाडी सुटली, रुमाल हलले, क्षणात डोळे टच्कन ओले...

 गाडी सुटली, पडले चेहेरे, क्षण साधाया ह्सरे झाले...

गाडी सुटली, हाता मधुनी हात कापरा तरी सुटे ना..

अंतरातली ओली माया तुटुदे म्हटले तरी तुटे ना...

Loading...

का रे इतका लळा लावुनी नंतर मग ही गाडी सुटते...

डोळ्यानदेखत सरकत जाते आठवाणींचा ठिपका होते...

गाडी गेली, फलाटावरील नि:श्वासांचा कचरा झाला...

गाडी गेली, डोळ्या मधल्या निर्धाराचा पारा फुटला....हे भलतं अवघडं असतं...

या वर्षात राजकीय, मनोरंजन, साहित्य,क्रीडा अशा अनेक क्षेत्रात चमकणार्‍या अनेक  तार्‍यांनी निरोप घेतला. संदीप खरेंच्या शब्दात सांगायच तर हे भलतंच अवघड असतं हे तुमच्या समोर मांडणे...सरतं वर्ष अनेक घडमोडींनी गाजलं...पण या वर्षाला दु:खाची किनारही लागली...अनेक तारे निखळले....गोपीनाथ मुंडे, ए.आर.अंतुले हे सत्तासंघर्ष यात्रेकरू...तर 'रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो, आता या शहराशहराला आग लावत चला' मराठी काव्य विश्वाला हादरा देणारे बंडखोर कवी आणि दलित पँथर नेते नामदेव ढसाळ...योग साधनेनं अवघ्या जगात भारताची वेगळी ओळख निर्माण करून देणारे बि.एस.अय्यंगार...तर गेली कित्येक दशक रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सदाशिव अमरापुरकर, स्मिता तळवलकर,कुलदीप पवार, जोहरा सहगल, देवेन वर्मा हे तारेही काळाच्या पडद्याआड गेली....आपल्या कर्तृत्वाने गेली कित्येक वर्ष गाजवाणार्‍या या कलामूर्तीच्या या आठवणी....

संघर्षयात्रेकरू....गोपीनाथ मुंडे

सरत्या वर्षात गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाची बातमी सर्वांना चटका लावून जाणारी होती...बीड म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि गोपीनाथ मुंडे म्हणजे बीड असं समिकरणचं बनलं होतं. गोपीनाथ मुंडे यांचं आयुष्य संघर्षानं भरलेलं होतं. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी कष्ट आणि जिद्द यांच्या जोरावर त्यावर मात करून पुढे जात राहणं हा त्यांचा स्वभावधर्म होता. राजकारणात अगदी तळागाळापासून कामाला सुरुवात करुन राष्ट्रीय राजकारणात स्वतःचं नाव कमावलेल्या राज्यातल्या काही मोजक्या नेत्यांमध्ये गोपीनाथ मुंडेंचा समावेश करता येईल. त्यातही राजकारणाचा कोणताच वारसा नसताना, मराठवाड्यातल्या मागास भागात जन्म घेतलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी अपार कष्टाच्या जोरावर जी काही झेप घेतली, त्याला तोड नाही. 1978 मध्ये मुंडेंनी निवडणुकीच्या राजकारणात उडी घेतली. त्यावर्षी ते बीड जिल्हा परिषदेवर निवडून गेले. पुढचा प्रवास विधानसभेच्या दिशेनं सुरू झाला. 1980मध्ये रेणापूर विधानसभेवर ते निवडून गेले. यानंतर ते तब्बल 5 वेळा विधानसभेत निवडून गेले. विधानसभेत त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली. विशेषतः 1992 ते 95 या कालावधीत ते विरोधी पक्षनेते असताना त्यांनी सत्ताधारी काँग्रेसला अक्षरशः सळो की पळो करून सोडले. विशेषतः तेव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या शरद पवार यांना त्यांनी विशेष लक्ष्य केलं होतं. किंबहुना 1996 मध्ये युतीचं सरकार येण्यामध्ये मुंडेंच्या झंझावाती प्रचाराचा खूप मोठा वाटा होता. पण शिवसेनेला भाजपपेक्षा जास्त जागा मिळाल्या आणि मुंडेंना मुख्यमंत्रीपदावर पाहण्याचं त्यांच्या समर्थकांचं स्वप्न अपूर्ण राहिलं. त्यांना राज्याचं गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावं लागलं. 2009 मध्ये ते सर्वप्रथम बीडमधून लोकसभेत निवडून गेले. 15व्या लोकसभेत त्यांच्यावर लोकसभा उपनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही त्यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश धस यांचा पराभव करताना विक्रमी मताधिक्य मिळवलं. भाजपला बहुमत मिळाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांना महत्त्वाचं पद मिळणार हे अपेक्षित होतं. त्याप्रमाणे त्यांच्याकडे कें द्रीय ग्रामविकास खात्याची धुरा सोपवण्यात आली. पण अपघाती निधनामुळे हा लोकनेता हरवला आणि बीड पोरका झाला...

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे पोकळी निर्माण झाली पण याच वर्षात आणखी एका राजकीय नेत्याला आपण मुकलो...धडाकेबाज माजी मुख्यमंत्री ए.आर.अंतुले ....धडाकेबाज निर्णय घेत बेधडक वक्तव्य करणारे बॅरिस्टर अब्दुल रहेमान अंतुले नावाचं वादळं शमलं. आणीबाणीनंतर केंद्रत इंदिरा गांधींच सरकार पुन्हा आलं. राज्यातलं शरद पवारांच्या नेतृत्वाखाली असलेलं पुलोद सरकार बरखास्त झालं. नंतर 1980 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळालं. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होतील अशी अटकळ बांधली जात असताना दिल्लीतून बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांचं नाव पुढं आलं आणि 9 जून 1980 ला त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अंतुलेंच्या रूपानं कोकणाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपदं मिळालं.मुस्लीम समाजातून मुख्यमंत्रिपदावर आलेलेही ते पहिलेच नेते ठरले. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांना अनेक धडाकेबाज निर्णय घेतले. शिवाजी महाराजांची भवानी तलवार लंडनच्या म्युझियममधून आणण्याची त्यांची घोषणा चांगलीच गाजली. त्यासाठी ते लंडनची वारीही करून आले. मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबईचं नाईट लाईफ पाहण्यासाठी रात्री शहरात फेरफटका मारला आणि अनेकांचे धाबे त्यावेळी दणाणले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरच्या महाजन रिपोर्टचा पर्दाफाश करणारं `महाजन रिपोर्ट अनव्हर्ड` हे त्यांचं पुस्तक चांगलच गाजलं. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांची मैत्री जमली. नंतर केंद्रात त्यांनी आरोग्यमंत्री आणि अल्पसंख्याक विभागाचं मंत्रिपदही भुषवलं. त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले पण ते कधीच डगमगले नाहीत. त्यांच्या `इंदिरा-प्रतिभा प्रतिष्ठान`ला मिळालेल्या देणग्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप त्यांच्यावर झाले. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. 20 वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर ते दोषमुक्त झाले. शेवटपर्यंत त्यांनी आपला लढावू बाणा आणि स्पष्टवक्तेपणा कधीही सोडला नाही. अखेर हे वादळ शांत झालं.

या वर्षात आणखी एका संशयास्पद मृत्यूची बातमी धडकली..त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली....माजी कें द्रीय राज्यमंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा गूढ मृत्यू.... 17 जानेवारी रोजी दिल्लीतल्या लीला या पंचतारांकित हॉटेलातल्या एका रूममध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह सापडला होता. सुरुवातीला पुष्कर यांच्या मृत्यूविषयी संशय व्यक्त केला गेला. पण पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार पुष्कर यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं स्पष्ट झालं. पण आता सात महिन्यांनंतर एम्सच्या फॉरेन्सिक सायन्स विभागाच्या प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी एका पत्राद्वारे गौप्यस्फोट केला. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये नैसर्गिक मृत्यू लिहावं यासाठी आपल्यावर दबाव आणण्यात आला होता, असं डॉ.गुप्ता यांनी सांगितलं. पुष्कर यांचा मृत्यू आत्महत्या किंवा हत्या याचा तपास अजूनही सुरू आहे पण या मृत्यूचे गूढ अजूनही कायम आहे.

राजकीय पटलावर लोकनेत्यांच्या निधनामुळे तळागळाच्या कार्यकर्त्यांपासून ते दिल्ली दरबारीही शोक व्यक्त करण्यात आला...राजकीय क्षेत्रानंतर मनोरंजन, साहित्य, क्रीडा आणि सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गजांच्या निधनामुळे मोठी हानी झाली...

योग गुरू हरपला...योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार अर्थात बेल्लूर कृष्णम्माचार सुंदरराजा अय्यंगार यांचं दीर्घ आजाराने वयाच्या 96 व्या वर्षी निधन झालं. योगातील मौल्यवान योगदानासाठी भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण आणि पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केले होते. योगगुरू अशी त्यांची जगभरात ओळख होती. अय्यंगार यांनी योग साधना हा सामान्य माणसापर्यंत नेला.

'रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो...'अंधारयात्रिक होण्याचं ठामपणे नाकारणारा बंडखोर कवी म्हणजे नामदेव ढसाळ...आपल्या काव्य प्रतिभेने मराठी काव्याचा चेहरामोहरा बदलवून मराठी काव्य विश्वाला हादरा देणारे बंडखोर कवी आणि दलित पँथर या झुंझार संघटनेच्या माध्यमातून दलित अत्याचार विरोधात युद्ध पुकारणारे नेते नामदेव ढसाळ....

ढसाळ म्हणजे जातीयवादाचे लचके तोडण्यासाठी सर्वशक्तीनिशी झेपावलेला पँथर केवळ मराठीच नाही तर जागतिक साहित्य विश्वावर आपली शैलीदार मोहोर उठवणार्‍या हा कवी. 1949 च्या फेब्रुवारीत पुण्याजवळच्या एका खेड्यात झाला. दलित कुटुंबात जन्मलेल्या ढसाळांचं बालपण मुंबईतल्या गोलपिठा या वेश्यावस्तीत गेलं. लुंपेनवर्गाच्या समाजात ढसाळांचं बालपण अत्यंत हालाखीच्या स्थितीत गेलं. मुंबईतल्या वेश्यावस्तीतलं बकालपण, नाकारलेपण आणि उध्वस्तपणाचा उद्रेक घेऊन नामदेव ढसाळांचा गोलपिठा हा धगधगीत काव्यसंग्रह मराठी साहित्यात अवतरला आणि त्यानं मराठी विश्वाला धक्का दिला. मराठी काव्याचे मापदंड बदलून टाकले. प्रस्थापित साहित्यप्रांतात दलित आणि लुंपेनवर्गाची जळजळीत, बंडखोर भाषा नव्यानं दाखल झाली आणि मराठी साहित्य विश्वाला नाकारलं गेलेल्या जगाचं प्रतिनिधीत्व कऱणारा ढसाळांच्या रुपात बंडखोर कवी मिळाला.

नामदेव ढसाळ यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून ज्या प्रमाणं बंड करायला सुरू केलं, त्याच काळात कविता हे राजकारणच आहे असं म्हणत ढसाळ यांनी 1973 ला अमेरिकेतल्या ब्लॅक पँथरच्या धतच्वर दलित पँथर ही क्रांतीकारी संघटना स्थापन केली. ढसाळांनी सामाजिक, राजकीय जीवनात काहीही निर्णय घेतले असतील पण त्याचं सामाजिक चळवळ आणि साहित्य प्रांतातलं स्थान कायम आबाधित राहिल...

नव्या वर्षाच्या उंबरठ्यावर आता आपण आलो आहोत पण मागे वळून पाहिलं तर काय राहिलं आणि काय नाही याचा हिशेब केला तर खूप काही हरवलंय खूप काही हिरावलं गेलं...त्यामुळेच 'देणार्‍याने देत जावे घेणार्‍यांने घेत जावे, जाता जाता देण्यार्‍याचे हातही घेऊन जावे...'एवढंच म्हणावंस वाटतं...

(भाग २ लवकरच)

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2014 09:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...