खेळपट्टीचा गुंतावळा आणि फिल्ड पोझिशन

खेळपट्टीचा गुंतावळा आणि फिल्ड पोझिशन

  • Share this:

रितेश रमेश कदम,कोल्हापूर

फुटबॉल घ्या, हॉकी घ्या, बॅडमिंटन घ्या किंवा इतर तत्सम खेळ घ्या. प्युअर स्कीलवर हे खेळ आधारित असतात. आपल्या क्रिकेटचं तसं नाही. बॅट्समन आणि बॉलर कितीतरी भारी असले तरी इतर अनेक ‘फॅक्टर्स' त्यांच्या खेळावरती प्रभाव पाडत असतात.सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे पीच आणि वातावरण.

इंडिया म्हटलं की, दमट हवामान आणि कोरडी, संथपणे बॉल वळवणारी खेळपट्टी. खेळपट्टीमध्ये मातीचा वापर जास्त आणि गवत पोह्यावर कोथिंबीर टाकतो इतकं मर्यादित. आपण नेहमी बघतो, भारतीय खेळपट्टीवर बॉलरने कितीही फास्ट बॉल टाकला तरी बॅट्समन बॉलच्या लाइनमध्ये सहज ड्राईव्ह करतो; किंवा टप्पा बघून (कधी कधी डोळे झाकूनही) बॉल सोडून देतो. क्ले टाईपच्या खेळपट्टीवर फास्ट बॉलरने टाकलेल्या बॉलची गती खेळपट्टी जास्त प्रमाणात शोषून घेते. त्यामुळे बॉल जास्त बाऊन्सही होत नाही. खेळपट्टीच्या अशा स्वभावामुळेच भले-भले फास्ट बॉलर्स अशा खेळपट्टीवर विकेट्सचा जोगवा मागत असतात. पीचमध्ये बाऊन्स कमी असल्याकारणाने फिल्डसुद्धा थोडी ऍडजस्ट करावी लागते. स्लीप फिल्डर्स थोडे फॉरवर्ड आणि उतरत्या बाजूला पेरावे लागतात. तीन-साडेतीन दिवसांनंतर सततच्या वापराने खेळपट्टीचा वरचा थर सोलवटला जातो. तिथेच स्पीन बॉलर्सची कॉलर टाईट होते आणि फ्लाईट दिलेला बॉल झपकन वळतो.

blog_cricket_pitchआता मग हिरव्या खेळपट्टीचा एवढा काय गहजब असतो? काही (विशेषत: भारतीय) बॅट्समन त्या खेळपट्टीला का दबून असतात? तिथे एवढी त्रेधा का उडते? काहीजणांना तर पायाखाली निखारे असल्याचा भास होतो! गवत असलेली खेळपट्टी मातीच्या थराला व्यवस्थितपणे बांधून ठेवते. जर वातावरण सतत ढगाळ असेल तर गवताचा ताजेपणा टिकून राहतो. अशी खेळपट्टी बॉलची कमीत कमी एनर्जी शोषून घेते; त्यामुळे सीमवर बॉल पडल्यानंतर तो झपकन इन किंवा आऊटस्विंग होतो आणि सोबत एक्स्ट्रा बाऊन्सही मिळतो. ही एक्स्ट्रा मूव्हमेंट आणि बाऊन्स आपल्या अंगवळणी नसल्यामुळे बॅट्समन बॉलच्या लाईनमध्ये खेळायला जातात आणि गंडतात.

ऑफ स्टंपवरचा चेंडू म्हणजे परस्त्री असते, तिच्याशी छेडखानी करायचा प्रयत्न केला की विकेट ही जाणारच! हे माहीत असूनही भल्याभल्यांना हा मोह आवरत नाही. सगळ्यात खतरनाक म्हणजे ऑफ किंवा मिडल स्टंपवर टाकलेला सीमवर पडून स्लीपच्या दिशेने मूव्ह होणारा जॅफर’बॉल. मॅग्राथ, अक्रम, अँडरसन, स्टेन हे धुरंधर यामध्ये अतिशय वाकबगार होते/आहेत.

इंग्लंडमधील हेडिंग्ली, आफ्रिकेतील डर्बन, ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन आणि वेस्ट इंडीजमधील बार्बाडोस या खेळपट्ट्या फास्ट बॉलर्ससाठी मनमानी करायचे हक्काचे ठिकाण. अशा पीचवर पहिला स्लीप डीप असतो, त्यानंतर दुसरा, तिसरा आणि चौथा पॉइंटच्या लाईनमध्ये असतात. गली आणि पॉइंट थोडेसे डीप, मिस झालेला ड्राईव्ह किंवा स्क्वेअर कटचा कॅच पकडण्यासाठी. मिड-ऑन, मिड-ऑफ मोकळे सोडून शॉर्ट कव्हर सजवलेला असतो, सावजाला जाळ्यात हेरण्यासाठी. स्लीपसोबतच शॉर्ट-लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर-लेग आणि डीप मिड-विकेटसेट करून बॅट्समनला द्विधा मन:स्थितीत ठेवले जाते.

अशाच खेळपट्टीवर बॅट्समनचा खरा कस लागतो. ज्याला स्वतःची ऑफ-स्टंप माहीत आहे आणि साईबाबांची शिकवण श्रद्धा आणि सबुरी ज्याने लक्षात ठेवली आहे, तो अशा खेळपट्टीवर निर्भीडपणे गोलंदाजांचा सामना करू शकतो. गावसकर, द्रविड या व्यक्ती अशा पीचवर पुजनीय होत्या.

First published: July 23, 2014, 6:18 PM IST

ताज्या बातम्या