News18 Lokmat

बेताल लोकप्रतिनिधींना वेसण कोण घालणार?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 15, 2014 11:20 PM IST

jatin_desai_150x150-जतीन देसाई पत्रकार आणि पाकिस्तानातील राजकीय घडामोडींचे विश्लेषक

- मार्क्सवादी कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना, महिलांना हात लावला तर आमचे कार्यकर्ते त्यांची घरे आणि कुटुंबे नष्ट करून टाकतील, त्यांच्या महिलांवर बलात्कार करतील. तृणमूल काँग्रेसचे खासदार तपन पाल.

- मुलं ही मुलं असतात, ती चुका करतात -मुलायमसिंह यादव

- एखाद्या महिलेवर बलात्कार झाला तर एका इन्स्पेक्टरशी चौकशीसाठी तिचा संबंध येतो, परंतु एखाद्याला कंपनी काढायची असेल तर त्याला 16 इन्स्पेक्टरला तोंड द्यावं लागतं - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर

- गोव्याची संस्कृती वाचवण्यासाठी गोव्याच्या समुद्रकिनार्‍यावर पब आणि बिकिनीवर बंदी हवी - गोव्याचे मंत्री सुदीन ऊर्फ रामकृष्ण ढवळीकर

Loading...

या व अशा स्वरूपाची अनेक आक्षेपार्ह आणि असंवेदनशील विधानं या देशातील अनेक नेते करत असताना आपल्याला आढळतात. एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यांकडूनच अशी महिलाविरोधी विधानं केली जातात, असंही नाही. यात सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांचा समावेश होतो. भाजप, काँग्रेस, शिवसेना, तृणमूल काँग्रेसपासून ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांच्या काही नेत्यांकडून अशा प्रकारची निवेदनं व्हावी ही आता काही नवीन गोष्ट राहिली नाही. महिलाविरोधी वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या पक्षनेतृत्वाकडून देखील त्यांच्यावर काही कारवाई होत नाही. अनेकदा आपल्याला मिसक्वॉट करण्यात आल्याचं हे नेते सांगतात. मनोहर पर्रिकरांनी आपण वरील विधान केलं नसल्याचं म्हणून आपल्याला मिसक्वॉट करण्यात आल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

247004-tapas-pal-rnaतपस पालच्या वरील विधानानं मात्र पश्चिम बंगालमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. तपस पालच्या त्या भाषणाची व्हिडिओच उपलब्ध असल्याने आपल्याला मिसक्वॉट करण्यात आलं आहे असं सांगण्याची संधी त्यांना मिळाली नाही. आश्चर्य आणि दु:खाची बाब म्हणजे तपस पालनी आपल्या भाषणात जेव्हा वरील वक्तव्य केलं तेव्हा हजर असलेल्या सभेतल्या लोकांनी टाळ्यांनी त्याला प्रतिसाद दिला.

मला आठवतं की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पण त्यांच्या अनेक सभेत अनेकदा महिलाविरोधी वक्तव्यं करत आणि महिला श्रोतेदेखील टाळ्या वाजवून त्यांना प्रतिसाद देत. पुरुषी वर्चस्व असलेल्या समाजात महिलाविरोधी विधानांना महिलांचा प्रतिसाद मिळणं हे अनपेक्षित नाही. मात्र राजकीय नेत्यांची जबाबदारी महिलाविरोधी असंवेदनशील वक्तव्य करून पुरुषी वर्चस्व अधिक बळकट करण्याची असता कामा नये.

राजकीय नेते जे काही म्हणतात ते खालपर्यंत झिरपत जातं. सामान्य माणसं त्यापैकी अनेकांना आपला आदर्श किंवा मदत करणारी व्यक्ती म्हणून पाहते. अशा परिस्थितीत त्यांच्या विचाराचा लोकांवर परिणाम होतो. नेत्यांच्या पुरुषी मानसिकतेचा प्रभाव पडतो. बहुसंख्य पुरुष

शिव्यांचा बोलण्यात वापर करतात. या सगळ्या शिव्या आई, बहिणीवर असतात हे लक्षात घेतलं पाहिजे.

आजच्या व्यवस्थेत महिला स्वतंत्र नाही. तिच्याकडे अद्याप वस्तू म्हणून पाहिलं जातं. या कारणामुळेच तपस पाल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महिलांवर बलात्कार करण्याची भाषा वापरतात. पूर्वीच्या काळात एखाद्या राजा-महाराजांनी विजय मिळवल्यानंतर पराभूत राजाच्या कुटुंबातील महिलेला ते आपल्यासोबत नेत असत. त्याला सगळ्यात मोठं 'पराक्रम' म्हणून पाहिलं जायचं आणि पराजित राजांसाठी ती सर्वात मोठी 'नामुष्की' हीच मानसिकता तपस पालच्या वक्तव्यात आपल्याला दिसते.

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादवनी अत्यंत आक्षेपार्ह स्वरूपात वरील विधान मुंबईतील शक्ती मिल कम्पाऊंडमधील सामूहिक बलात्कार करणार्‍या आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा जाहीर केली, त्या संदर्भात केलेलं. एखादा राष्ट्रीय स्तरावरचा राजकीय नेता 'मुलं ही मुलं असतात, ती चूक करतात', अशा स्वरूपाचं निवेदन करतो याहून अधिक दुदैर्वी बाब काय असू शकते.

मुलायम सिंह यांच्या या विधानानंतर स्वभाविकपणे मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी त्याचा विरोध केला. पण मुलायम सिंहच पक्षाचे सर्वेसर्वा असल्याने त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागण्याची कोणाची हिंमत. याच पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष अबू आसीम आझमींनी देखील कोणाशी संबंध ठेवणार्‍या महिलेला फाशीच दिली पाहिजे असं वक्तव्य केलेलं.

समाजवादी पार्टीचा काही संबंध नसल्याचा मुलायम सिंह, अबू आझमी किंवा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची निवेदनं ऐकली किंवा वाचली तर आपल्या लक्षात येतं.

gova_sudin_dhavlikarपब आणि व्हॅलेंटाईन डेच्या कार्यक्रमावर हल्ले करण्यात हिंदुत्ववादी संघटना पुढे आहेत. बंगलोरमध्ये अनेकदा या हिंदू अतिरेकी संघटनेनं पबवर हल्ले केले आहेत. शिवसेना काही वर्षांपूर्वीपर्यंत व्हॅलेंटाईन डेला विरोध करत होता, पण आता त्यांची भूमिका बदलली आहे. गोव्याची संस्कृती वाचविण्यासाठी पब आणि बिकिनीवर बंदी हवी, असं म्हणणारे गोव्याचे मंत्री आणि महिलांनी बुरख्यात राहावं, असं सांगणारे मुल्ला-मौलवींच्या विचारात काही फरक नाही. महिलांनी अमुक प्रकारचे कपडे घालू नये, असं ढवळीकर म्हणतात. तर महिलांनी अमुक प्रकारचेच कपडे घालावे असं काही मुल्ला-मौलवी सांगतात. महिलेने कशा स्वरूपाचे कपडे घालावे किंवा घालू नये हे पुरुष ठरवतील अशा दोघांचा विचार. गोव्याची अर्थव्यवस्था बर्‍याच प्रमाणात पर्यटन व्यवसायावर अवलंबून असल्याने अशा प्रकारची बंदी शक्य नसल्याची जाणीव पर्रिकरांना असल्याने त्यांनी पब व बिकिनीवर बंदी आणण्याचा मुद्दा नसल्याचं स्पष्ट केलं.

तपस पालनी आपल्या निवेदनाबद्दल बिनशर्त माफी मागितली आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तपस पालला माफी देऊन टाकली. प्रश्न आहे तो हा की, तपस पालनी माफी मागितली म्हणजे सगळं संपलं का? एका खासदाराने अतिशय गलिच्छ स्वरूपाचं निवेदन करून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबात भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. धमकी देणं हा गुन्हा आहे. पण तपस पालच्या विरोधात काही कारवाई झाली नाही. कारण राज्यात त्यांचं सरकार आहे. खरं तर एका खासदाराच्या अशा प्रकारच्या निवेदनामुळे संसदेची बदनामी होते असं पाहिलं पाहिजे. संसदेने या दृष्टीने यंत्रणा उभी केली पाहिजे.

राज्यसभेने 1997 साली एक समिती बनवली आणि त्यांनी आपल्या सदस्यांसाठी आचारसंहिता बनवली. त्यात म्हटलं आहे, 'संसदेची बदनामी होईल आणि त्याच्या विश्वसनीयतेबद्दल प्रश्न निर्माण होईल अशा स्वरूपाचं वर्तन सदस्यांकडून होता कामा नये.' लोकसभेने अशा स्वरूपाची समिती बनवली नाही. आवश्यकता वाटल्यास तात्पुरत्या समितीकडे त्या पाठविल्या जातात. संसदेने आता स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. खासदारांकडून होणारं महिलाविरोधी वर्तन खपवून घेतलं जाणार नाही, हा संदेश गेला पाहिजे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 15, 2014 11:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...