चला माऊली...

चला माऊली...

  • Share this:

rajendra hunje IBN Lokmatराजेंद्र हुंजे, न्यूज एडिटर, आयबीएन लोकमत

आषाढी वारी सोहळा म्हणजे, द्वैताकडून अद्वैताकडे सुरु झालेला प्रवास, वारी म्हणजे चैतन्याचा महामेळा, वारी म्हणजे विठूरायाच्या दर्शनाची ओढ, वारी म्हणजे अमाप उत्साह....

ज्ञानोबा - माऊली तुकाराम....बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम या जयघोषानं आता पंढरपूरच्या  पालखी मार्गावरचा आसमंत दुमदुमतो आहे. लाखोंच्या संख्येनं वारकरी या पारंपारिक अशा आषाढी वारी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आपल्या लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी निघाले आहेत.

आषाढी वारी सोहळ्याची तयारी तशी महिनाभरापूर्वीच सुरु झालेली असते. तिकडे शेगांवहून गजानन महाराजांची पालखी तर एक महिना आधीच वारीसाठी प्रस्थान ठेवते. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यातून मुक्ताईंची, त्यानंतर निवृत्तीनाथांची आणि सगळ्यात शेवटी एकनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवते. तब्बल 21 दिवसांचा पायी प्रवास करुन झाल्यावर या सर्व पालख्या पंढरपुरात एकत्र येतात, त्या आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी....

IMG_4260

वारीमध्ये तमाम वारक-यांसोबत प्रवास केल्यानंतर आपल्यामध्ये एक सांघिक भावना वाढीस लागते. एवढंच नाही, एकमेकांना सोबत घेऊन जाण्याची सवय जडते. घर-संसारापासून तब्बल एक महिनाभर आपण दूर असतो, तरीही या वारकरी कुटुंबात सहभागी झाल्यानंतर आपल्याला आपल्या कुटुंबियांची आठवणही येत नाही. हीच शिकवण खरं संतांनी आपल्याला घालून दिली आहे. पण त्याचं अनुकरण आयुष्य केलं तर, त्याची खरी किंमत आपल्याला कळू शकेल. अगदी लहान मुलांपासून ते 80 वर्षांच्या आजी-आजोबांपर्यंत सगळेचजण मोठ्या आनंदाने या आनंद यात्रेमध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसतात.

वारी सोहळ्याची परंपरा ही गेल्या साडेतीनशे वर्षांपेक्षाही अधिक जुनी आहे. पण वारीसोबत चालताना एकप्रकारची लष्करी शिस्तही पाहायला मिळते. चोपदारांनी एकदा दंडक वर केला की, सगळ्यांनी जागीच थांबायचं हा नियम...एवढ्या लाखभर लोकांपर्यंत पोहचणं अशक्य असलंही तरीही, चोपदारांच्या एका सूचनेनं हा संबंध वारकरी समाज स्तब्ध झालेला असतो. ही शिस्त कुणी सांगून येत नाही, तर तो चोपदारांना दिलेला मान असतो. अशाच नित्यक्रमाने वारकरी पंढरपूरकडे वाटचाल करत असतात.

IMG_4363

वारी सोहळ्याच्या मार्गावर ठिकठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम नियोजित असतात. त्यानुसार आपलं आणि समाजाचं प्रबोधन करत हा वारकरी समाज, पायी हळूहळू चाला, मुखाने हरिनाम बोला, असं म्हणत पुढं जातो. ऊन-वारा-पाऊस या कशाचीही तमा न बाळगता, वारकरी पुढचं पाऊल टाकत असतो. पाऊस आला तरी, वारी थांबत नाही, त्यातही भेटी लागी जीवा । लागलीसे आस । पाहे रात्रंदिवस वाट तुझी। असा अभंग आळवत ही मंडळी पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीची आस मनात ठेवून पुढे जातात.

पालखी सोहळ्यामध्ये संतांच्या प्रमुख पाच पालख्या राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवतात. त्यात संत ज्ञानेश्वर, संत IMG_4413तुकाराम, संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ, संत मुक्ताई, संत सोपानकाका, संत नामदेव, गजानन महाराज याशिवाय अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरच्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी प्रस्थान ठेवतात. त्यामुळं महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून निघणा-या या पालख्यांमुळं जय जय रामकृष्ण हरी चा जयघोष आणि टाळ-मृदुंगांचा नाद कानी येऊ लागतो.

संतांनी आपल्या अभंगांची रचना करताना, नेहमीच प्रवाहाच्या पलीकडे जाऊन समाजाच्या जडणघडणीचा विचार केलेला दिसून येतो. इतकंच नाही, तर जगण्यातली व्यावहारिकता आणि त्यापलीकडचं आयुष्यही त्यांनी आपल्या ओव्यांमधून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे. या संतपरंपरेनं आपल्या वाणीने आणि कृतीने समाजमनात ज्ञानजागृती, कर्मजागृती करुन समाजाला जागते ठेवण्याचं काम संतांनी केलं आहे.

संत एकनाथांनी तर आपल्या भारुडाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं मोठं काम केलं आहे. तसंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता म्हणजे त्यांच्या मनात घर करुन राहिलेल्या गावाचे आणि ग्रामसंस्कृतीचे नितळ रुप आहे. संत गाडगेबाबांनी तर आपल्या कीर्तनातून त्यांच्याजवळ साचलेलं संचित, विचारधन जनमाणसांना वाटून टाकलंय. आपल्या जगण्यामध्ये विचार आणि आचारांचा समन्वय असायला हवा, असा संदेश बाबांनी त्यांच्या कीर्तनातून नेहमीच दिला. कीर्तन-प्रबोधनाची पताका खांद्यावर घेऊन जनउद्धाराची वाट गाडगेबाबांनी समाजाला दाखवली.

सामाजिक स्तरावरील समतेचा विचार करत असताना संतांनी त्याची अनुभूती त्यांच्या रचनांमधून समाजाला करुन दिली आहे. संतांनी आध्यात्मिक तत्त्वांना सामाजिक मूल्यांची जोड दिली आहे.

ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे।

आणि शांतीचा अंकुर फुटे ।

मग विस्तार बहु प्रकटे ।

आत्मबोधाचा ।।

ज्ञानप्राप्ती हेच मानवी उन्नतीचे सर्वोत्कृष्ठ साधन आहे. ज्ञानप्राप्ती झाली, पण जगण्यात शांतता नसेल, तर तो चंचल बनतो. आणि त्याच्यातल्या चंचलतेने त्याला मिळालेलं ज्ञान हे अपूर्ण राहतं. त्यामुळं वारीचा एखादा अनुभव म्हणजे ज्ञानाच्या पूर्णत्त्वाकडे नेणारी गोष्ट होय. म्हणूनच म्हणतात एखादी तरी वारी अनुभवावी...

वारकरी कसा असावा, याबद्दल तुकाराम महाराजांनी आपल्याल अभंगामध्ये फारच सुंदर वर्णन केलं आहे -

काळ सारावा चिंतने ।

एकांतवासी गंगास्नाने ।

देवाच्या पूजने ।

प्रदक्षिणा तुळसीच्या ।।

युक्त आहार विहार ।

नेम इंद्रियासी सारा ।

नसावी बासरा ।

निद्रा बहु भाषण ।।

वारकरी संप्रदाय हा विचार आणि आचाराचा समन्वय साधणारा संप्रदाय आहे. वारीमध्ये पायी जाताना प्रत्येकजण सुखी संसाराची वाट सोडून इथं एकवटलेला असतो. त्यामुळं कोणाही जीवाचा न घडो मत्सर, असं म्हणत पंढरपूरच्या दिशेनं पुढे जात असतो. पंढरीची वारी हे वारक-यांचे जीवनव्रत आहे. पिढ्यान पिढ्या वारी करणारी घराणी आज महाराष्ट्रात आहे, इतकंच नाही तर शेजारच्या कर्नाटकातूनही गेली अनेक वर्ष वारी करणा-या दिंड्या या सोहळ्यामध्ये पाहायला मिळतात.

f6wari_4094

आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अशा दोन भक्कम तीरांमधून वाहणारा अखंड प्रवाह म्हणजे पंढरपूरची आषाढी वारी. ऐन पावसाळ्यात ही वारी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असते. त्यामुळं साहजिकच निसर्गाच्या सान्निध्यातली हिरवाई नटलेली राने-वने इथं जाताना पाहायला मिळतात. त्यातच संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांनी निसर्गाचं आणि पर्यावरणाचं महत्त्व आपल्याला पटवून दिलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात -

वृक्षवल्ली आम्हा सोयरे । वनचरे पक्षिणी सुस्वरे आळवितसे ।

तर एकनाथ महाराज म्हणतात -

सकळ लोकी निजात्मता ।

देखता जाहली पराधीनता ।

हे वृक्षापासोनि तत्त्वता ।

परात्मता शिकलो ।।

निसर्गातील एक-एक घटकाला रुपक म्हणून उभे करुन नाथ महाराजांनी मानवी सद्गुणांचा आदर्श मांडला आहे. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -

जो खांडावया घाव घाली ।

की लावणी जयाने केली ।

दोघा एकचि सावली ।

वृक्षू दे जैसा ।।

ज्याने झाड लावले आणि ज्याने झाडावर कु-हाड चालवली त्या दोघांनाही झाड सारखीच सावली देते. हाच विचार आणि त्याचा आचार घेऊन हा वारकरी जीवनाची शिदोरी इथं जमवतो आणि त्याच्या आयुष्यात झालेले बदलही कालांतराने आपल्याला पाहायला मिळतात.

शेवटी एवढंच म्हणावसं वाटतं.

दुरितांचे तिमीर जावो ।

विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो ।।

ज्ञानेदवांनी जगाच्य कल्याणासाठी मागितलेल्या पसायदानातच वारीचा अनुभव घेतल्याची अनुभूती आहे. वारी म्हणजे आणखी काय असू शकतं. जसं मी सुरुवातीला म्हणालो द्वैतापासून सुरु होऊन अद्वैताकडे सुरु झालेला प्रवास...

First published: June 19, 2014, 11:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading